नुकताच सुप्रीम कोर्टानं समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल दिला. यामुळं एलजीबीटीक्यूबद्दलच्या चर्चेला नव्यानं सुरवात झालीय. या समुदायाचाच एक भाग म्हणजे लेस्बियन्स, अर्थात समलिंगी स्त्रिया. पितृसत्ताक भारतीय समाजात स्त्रीला एरवीच निवडीचा, त्यातही जोडीदार निवडीचा हक्क नाकारला जातो. अशावेळी स्त्री समलिंगी असेल तर तिची घुसमट अनेकपदरी बनते. अशा लेस्बियन्सच्या घुसमटीचा हा मागोवा...
First Published : 08 September 2018
‘फेब्रुवारी १९८८ मधली गोष्ट. २७ वर्षांची लीला श्रीवास्तव आणि १९ वर्षांची उर्मिला नामदेव भोपाळला आर्म्ड फोर्सेसमधे हवालदार होत्या. एकमेकींशी लग्न केलं म्हणून या दोघांनी कामावरून काढून टाकण्यात आलं. यासाठी कारणही तसंच दिलं. ‘unauthorised absence’ आणि ’Conduct unbecoming of public servent’ म्हणजेच सरकारी नोकराला अशोभनीय असं वर्तन केल्याचा ठपका दोघींवर ठेवण्यात आला. दोघी नोकरीला असलेल्या मध्य प्रदेशात नोकरीचे जे नियम आहेत, त्यात ‘समलिंगी संबंध’ हे ‘अशोभनीय वर्तन’ आहे आणि तसं वर्तन करता येत नाही, असा कुठलाही उल्लेख नाही. आर्म्ड फोर्सेसच्या २३ व्या बटालीयनमधे असलेल्या लीला आणि उर्मिला ‘माना’ इथं झालेल्या ट्रेनिंग कॅम्पच्या निमित्तानं एकत्र आल्या. लीला विधवा होती. त्या दोघी एकमेकींच्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी लग्नही केलं. लीलाच्या कपाळाला कुंकू, हातात बांगड्या वगैरे बघून आणि त्या दोघींचं एकत्र राहणं खुपून कुणीतरी त्यांच्याविषयी वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आणि दोघींपैकी कुणी लिंगबदल केला आहे का याची तपासणी झाली. त्यांना ४८ तास अन्नाशिवाय ठेवण्यात आलं आणि शेवटी महिन्याचा पगार देऊन नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.’
हा निव्वळ एक उतारा नाही, तर समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवल्यामुळं संपूर्ण समाजाला शरमेनं मान खाली घालायला लावणारा कलंक आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती इंदु मल्होत्रा यांनी ‘एलजीबीटीक्यू समुदायासोबत आतापर्यंत जो भेदभाव झालायं, त्यासाठी इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही’ अशा शब्दांत या निकालाचं महत्त्व अधोरेखित केलं.
सुप्रीम कोर्टानं गुरुवारी सहा सप्टेंबरला समलैंगिकतेला गुन्ह्याच्या श्रेणीतून हटवलं. याचाच अर्थ आता दोन प्रौढ व्यक्तींनी परस्पर सहमतीनं ठेवलेले समलैंगिक संबंध गुन्हा ठरणार नाहीत.
ब्रिटीशकालीन भारतीय दंड विधानातील कलम ३७७ मधे समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवण्यात आलं होतं. या कलमाला पहिल्यांदा १९९४ मधे आव्हान देण्यात आलं. २४ वर्षांत अनेक याचिका दाखल झाल्या. अनेक अपीलांनंतर सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय संविधान पीठानं हा ऐतिहासिक निकाल दिला.
समलिंगी संबंध म्हटलं की आपल्या नजरेसमोर केवळ हिजडा ही एकमेव साचेबद्ध प्रतिमा येते. पण हे काही खरं नाही. समलिंगी संबंधांमध्ये अनेक प्रकार आहेत. जसं की, लेस्बियन, गे, बायसेक्सशुअल, ट्रान्सजेंडर आणि क्विर म्हणजेच एलजीबीटीक्यू.
सुरवातीला सांगितलेली घटना ही लेस्बियन्सची आहे. एखाद्या स्त्रीला दुसऱ्या स्त्रीविषयी भावनिक आणि शारीरिक आकर्षण वाटतं, तेव्हा ती लेस्बियन म्हणून ओळखली जाते. भारतात लेस्बियन समुदायाच्या वाट्याला मोठं दुःख आलंय. या समुदायाचं दुःख लेखिका मंगला आठलेकर यांनी ‘हे दुःख कुण्या जन्माचे...’ नावाच्या पुस्तकातून मांडलंय. राजहंस प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकात आठलेकर यांनी लेस्बियन्सबाबत देशभरात घडलेल्या घटनांचा आढावा घेत मांडणी केलीय. समलैंगिकता गुन्हा ठरवल्यामुळं शेकडो जणींना आयुष्याचा डाव अर्ध्यावर सोडावा लागला, किती तरी पोरींचं जगणं करपून गेलंय हेच पुस्तक वाचताना जाणवतं. काही घटनांच्या या धावत्या नोंदी -
‘गुजरातमधल्या वडधाली या खेडेगावातल्या सरकारी शाळेत ३१ वर्षांच्या असरूना गोहिल आणि २९ वर्षांच्या सुधा अमरसिंग नोकरीला होत्या. त्यांनी मे १९८८ मधे जिल्हा न्यायालयाकडे, एकत्र राहण्याच्या इच्छेनं आपल्या सह्यांनी ‘मैत्री करार’ केला.’
‘चंद्रपूरमधे १८ वर्षांची विनोधा आडकेवार आणि २१ वर्षांची रेखा चौधरी या दोघींनी चंद्रपूरच्या रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन नोंदणी पद्धतीनं लग्न करण्यासाठी अर्ज केला. जिल्हा पोलिस अधीक्षकानं त्यांना एकत्र राहण्यास मनाई केली.’
अनेकदा समलैंगिक संबंध ही एक विकृती असल्याचा दावा कथित संस्कृतीरक्षकांकडून केला जातो. पोरी अधिक शहाण्या झाल्यामुळं ही विकृती आलीय. शहरातल्या पोरी बिघडल्याचं या संस्कृतीरक्षकाकडून सांगितलं जातं. हा किती निखालस दांभिकपणा आहे हे वरच्या दोन्ही घटनांवरून स्पष्ट होतं. समलैंगिक संबंध हे कसं संस्कृती, निर्सग, धर्म यांच्याविरोधात आहेत हे सांगण्यासाठी वेगवेगळे दावे केले जातात. हा एका धर्माचा प्रश्न आहे, शिकल्यामुळं या मुली हुकल्यात असे आरोप केले जातात. सुबत्ता आल्यामुळं हे सगळं घडत असल्याचंही बोललं जातं. हे सगळं किती तर्कहीन आहे ते सांगणाऱ्या काही घटना.
‘जानेवारी १९९२ मधे नववी आणि दहावीतल्या सात मुलींना केरळातील तिरुवनंतपुरम इथल्या हायस्कूलमधून त्या लेस्बियन असल्याच्या कारणावरून काढून टाकण्यात आलं.’
‘ओडिशातल्या हुलीपूर खेड्यातील २५ वर्षाच्या ममताराणी मोहंती आणि १९ वर्षाच्या मोनालिसा मोहंती या दोन मुलींनी ऑक्टोबर १९९८ मधे जोडीदार म्हणून आयुष्यभर एकत्र राहण्याच्या करारावर सही केली. ममतानं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला होता, तर मोनालिसा ही तिच्या शेजारी राहणारी एक विद्यार्थिनी होती. लग्नानंतर चार दिवसांनी ‘आपल्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून दोघींनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ‘दोघींचं दहन एकत्र करावं’ असंही त्या चिठ्ठीत नमूद केलं होतं. दोघींपैकी ममता वाचली आणि मोनालिसाचा मृत्यू झाला.’
‘सप्टेंबर १९९८ मधे अंधेरी आणि मालाडला राहणाऱ्या आणि मुंबईतील नानावटी कॉलेजात शिकणाऱ्या माधुरी पटेल आणि वर्षा जाधव या मुलींनी आपल्या संबंधाला आईवडील परवानगी देत नाहीत म्हणून आत्महत्या केली. विरारमधील एका इमारतीच्या छतावर त्यांची प्रेतं सापडली.’
‘ऑक्टोबर १९८८ सालची गोष्टंय. गुजरातमधली २४ वर्षाच्या गीता दर्जी आणि किशोरी शाह या हॉस्पिटलमधे नर्स म्हणून कामाला होत्या. एकत्र राहता येत नाही म्हणून त्यांनी आयुष्य संपवून घेतलं.’
‘मे १९९० मधे नम्रता देसाई आणि मल्लिका शर्मा या मुंबईच्या दोन मुली ऑस्ट्रेलियाला पळून गेल्या. तिथं जाऊन मल्लिका स्वतःमधे लिंगबदल करून घेऊन नम्रताशी लग्न करणार असं ठरलं होतं.’
‘जानेवारी १९९५ मधे सोळा वर्षाची सईजा आणि २२ वर्षाची गीता अलेप्पीहून गायब झाल्या. तिसऱ्या दिवशी विष प्यालेल्या अत्यवस्थ स्थितीत त्रिचूर इथं पोलिसांना सापडलेल्या. पोलिसांना त्यांच्या बॅगेत एकमेकींना लिहलेली प्रेमपत्रं सापडली.’
‘ऑगस्ट १९९५ मधे पारूल आणि मेहरनाज आपापल्या घरातून पळून गेल्या. दहा महिने मद्रास, कोलकाता, सिलीगुडी अशा ठिकाणी भटकत एकत्र जीवन जगण्याचा प्रयत्न केला. अखेरीस मुंबईला परतल्यावर पारूलच्या वडिलांनी मेहरनाजवर आपल्या मुलीला पळवून नेल्याची केस दाखल केली.’
‘सिम्मी आणि श्वेता या कॉलेजमधील वर्गमैत्रीणींनी पाटणा सिविल कोर्टात लग्न झाल्याची नोंद केली.’
‘एप्रिल २००० मधे १७ वर्षाची इंदिरा राय आणि १८ वर्षाची माया तमंग या नेपाळी मुलींनी बिरतनगर इथं लग्न केल्यानंतर त्यांना अटक झाली. दोघींना त्यांच्या कुटुंबीयांकडे देण्यात आलं.’
‘नोव्हेंबर २००० मधे विहिरीत उडी मारून गडचिरोली जिल्ह्यातील दोन पोरींनी एकत्र आत्महत्या केली.’
‘जानेवारी २००१ मधे एर्नाकुलम इथं २१ वर्षाची बिंदू आणि २२ वर्षाची रंजना या कनिष्ठ मध्यमवर्गातील दोन मुलींनी ग्रॅनाईटच्या खाडीत उड्या मारून जीव दिला.’
कायद्यानं समलैंगिक संबंधांना मान्यता दिली. ‘अनैसर्गिक संबंध’ एका फटक्यात ‘नैसर्गिक’ झाले. समलैंगिक संबंधांना संस्कृती, धर्माचा आधार देऊन विरोध करणाऱ्यांची नजर, तुमचा-आमचा भवताल ‘नैसर्गिक’ कधी होणार, हा प्रश्न मात्र कायम आहे. त्याची उत्तर शोधण्याच्या दिशेनं चालणं केवळ ‘त्यांच्या’च नाही तर ‘आपल्या’ही सर्वांच्याच हिताचं आहे.