लॉकडाऊन लावल्यावरही कोविड-१९ पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लॉकडाऊनमधे थोडीफार ढिलाई दिल्यावर तर परिस्थिती अजून बिकट झालीय. महाराष्ट्रातली परिस्थिती तर आणखी गंभीर बनतेय. रूग्णवाढीचा वेग वाढतोय तशी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतेय. सर्वसामान्यांचं बेहाल जगणं चव्हाट्यावर येतंय. या साऱ्या परिस्थितीच्या अनुषंगानं एका सर्वसामान्य नागरिकानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र.
माननीय,
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे,
राज्यात कहर केलेल्या कोरोनाशी दोन हात करण्यात तुम्ही व्यग्र असाल. पण विडीओ कॉन्फरन्सिंगने तुम्ही करत असलेलं वन वे कम्युनिकेशन पाहून राहावलं नाही म्हणून लिहावसं वाटलं. महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात तुम्ही ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळलीत, त्याचं तुमच्या चाहत्यांसोबतच तुमच्या कट्ट्रर विरोधकांनीही तोंड भरुन कौतुक केलं. जसं राजकारण करण्याची ही वेळ नाही, तसंच कौतुक करण्याचीही ही वेळ नक्कीच नाही.
पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेल्या आणि प्रशासकीय कामाचा अनुभव नसलेल्या माणसाबद्दल मत बनवण्याची घाई करणाऱ्यांपैकी एक मीदेखील होतो. तुम्ही चांगलं काम करत आहात, करत राहाल असं मनोमन वाटत होतं. पण आता काही प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. या प्रश्नांना टाळून तुम्ही फक्त शब्दांच्या कोट्या करत विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत राहणार असाल, तर तुमच्यात आणि पत्रकार परिषदा न घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींमधे कोणताच फरक उरणार नाही, असं म्हटलं तर त्यात चूक ते काय?
सुरवातीलाच तुम्हाला एका गोष्टीबद्दल खेदानं सांगावं लागतंय. तुम्ही आता तेच तेच बोलू लागलेले आहात. महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत परिस्थिती हाताबाहेर चाललीय. नव्हे ती गेलीच आहे. अशावेळीही तुम्ही रुग्णसंख्या वाढतेय, पण परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी सरकारी विधानं करुन नेमकी कुणाची दिशाभूल करताय? महत्त्वाचं म्हणजे मुद्देसूद, कमी वेळेत, महत्त्वाचं तेवढंच बोलणारे तुम्ही आता विडीओच्या माध्यमातून एकतर्फी संवाद साधण्याच्या प्रेमात पडत चालला आहात की काय, अशी शंका वाटतेय.
गेल्या दोन महिन्यात तब्बल २१ वेळा तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधलात. पहिल्यांदा तुम्ही विडीओ कॉन्फन्सिंरगच्या माध्यमातून संवाद साधलात तो १८ मार्चला. लॉकडाऊन सुरु होण्याच्या बरोबर ६ दिवस आधी. पहिल्या संवादात तुम्ही मोजून फक्त ११ मिनिटं बोललात. मोजकं, महत्त्वाचं, साधंसरळ आणि सुटसुटीत बोललात. फिरवून फिरवून एकच गोष्ट सांगयाची ती पण गोंधळात टाकून, अशी टीका मोदींवर होत असताना तुम्ही सोप्पं करुन गोष्टी सांगितल्यात.
हेही वाचाः महाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं
आता २४ मार्चला तुम्ही लॉकडाऊनच्या ६१व्या दिवशी संवाद साधलात. हा तुमचा २१वा संवाद. यावेळी तुम्ही तब्बल ४३ मिनिटं ३० सेकंद बोललात. तुमच्या बोलण्यात केंद्रीय पथकाने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा मुंबईतली रुग्णवाढ कमी असल्याचं सुरवातीलाच सांगितलं. पण आदल्याच दिवशी म्हणजे २३ मार्चला महाराष्ट्रात झालेल्या एकूण ६० मृत्यूंपैकी ४० मृत्यू एकट्या मुंबईत झाल्याचं धगधगतं वास्तव आपल्याला सांगावसं वाटलं नाही? आरोग्य व्यवस्थेवर किती ताण पडलाय? पोलिसांना कसा कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागलाय, हे आपल्याला सांगावसं वाटलं नाही?
गेल्या दोन आठवड्यांत महाराष्ट्रात भीषण घटना घडल्यात. लहान मुलांसोबतच म्हाताऱ्या माणसांनी कोरोनावर मात केल्याचे गोडवे तुम्ही गात आलात. ही गोष्ट अभिमानाची आहेच. पण मुंबई, पुणे, कल्याणसारख्या मेट्रोपॉलिटन शहरांमधे रुग्णांचे हाल होण्याच्या काही भयंकर घटना घडल्यात. काहींना तर वेळेत फक्त एम्ब्युलन्स आली नाही, म्हणून जीवही देण्याची वेळ येतेय. ही राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर भलंमोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी गोष्ट आहे.
घटना क्रमांक १
२३ मेची घटना आहे. कल्याणमधे एक वयोवृद्ध माणूस चालता येत नसल्यानं चौथ्या मजल्यावरुन रांगत तळमजल्यापर्यंत आला. खाली आल्यानंतर तो एम्बुलन्सची वाट पाहत राहिला. पण एम्बुलन्स त्याला न घेताच निघून गेली. यापेक्षा एक भयंकर घटना कल्याणमधेच घडली. एका कोरोना पॉझिटिव रुग्णाला एम्बुलन्सअभावी चक्क चालत रुग्णालय गाठावं लागलं. ही बातमी मीडियानं दाखवल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले. पण चालत हॉस्पिटल गाठेपर्यंत आणखी किती जणांना संसर्ग झाला असेल, याची नुसती कल्पनाच केलेली बरी.
घटना क्रमांक २
२० मेला ही घटना घडली. कुणीही मदतीसाठी पुढे न आल्यानं ठाण्यात कोरोना रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला. एम्बुलन्स येऊनही पीपीई किट नसल्यानं कर्मचाऱ्यांनी रुग्णाला हात लावण्यास नकार दिला. त्यामुळे ६० वर्षीय वृद्धाचा जीव गेला. ठाण्यात एम्बुलन्स आली, तरीही रुग्णाला जीव गमवावा लागला. पण इकडे मुंबई आणि पुण्यात तर याहीपेक्षा भयंकर घटना घडत आहेत.
घटना क्रमांक ३
पुण्यात एका पेशंटला तब्बल साडेतीन तास एम्बुलन्सची वाट पाहावी लागली. प्रकृती खालावलेले ५२ वर्षांचे यशूदास मोती फ्रान्सिस हे आपल्या बायकोसोबत एम्बुलन्सची वाट बघत रस्त्यावर थांबले होते. तब्बल साडेतीन तास वाट बघणाऱ्या यशूदास यांनी रस्त्यावरच जीव सोडला. फ्रान्सिस दाम्पत्याचे ते साडेतीन तास कसे असतील, याची आपण कल्पना तरी करु शकणार आहोत का? मुंबई-पुण्यात ही परिस्थिती असेल, तर राज्याच्या इतर शहरांत आणि ग्रामीण भागात काय संकट ओढावलं असेल, याची कल्पनाही करवत नाही.
वर सांगितलेल्या प्रातिनिधिक घटना महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्थाच आजारी असल्याचं अधोरेखीत करणाऱ्या आहेत. आव्हाडांनंतर आता अशोक चव्हाण कोरोना पॉझिटिव आलेत. त्यांना उपचारासाठी मुंबईत आणलं जातं. ही बाब चांगलीच आहे. ते लवकर बरे होऊन ठणठणीत झालेच पाहिजे. पण व्यक्तिनुरुप रुग्णसेवा बदलत जात असल्याचं जर का यातून अधोरेखित होत गेलं, तर ही बाब सर्वात भीषण आणि सरकार म्हणून लाजिरवाणी आहे, असं तुम्हाला वाटत नाही का?
हे कोरोना स्पेशलही वाचा :
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण
कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट
कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी
कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय
कोविड योद्धांना, फ्रंटलाईनमधे काम करणाऱ्यांच्या किमान समस्या तरी आपण जाणून घेतल्या आहेत का, याचीही शंकाच वाटते. मुंबईतली अनेक रुग्णालयं बंद आहेत. रुग्णालयं सुरु करण्यासाठी तुम्ही आवाहन करताय, पण ग्राऊंड रिअलिटी वेगळी आहे. अनेक रुग्णालयांमधला स्टाफ दहशतीत आहे. डॉक्टरही भयभीत आहेत. काही खासगी रुग्णालयांकडून अक्षरशः रुग्णांची लूट सुरु आहे. ही वेळ जशी राजकारण करण्याची नाही, तशीच ती लोकांना लुबाडून पैसे कमावण्याचीही नाही!
साम टीवीने दाखवलेल्या एका बातमीनुसार, खासगी रुग्णालयाने रूमचं रोजचं भाडे ४,५०० रुपये आणि डॉक्टरांच्या तपासणीचे २,५०० रुपये आकारलेत. तसंच पीपीई किट, सर्जिकल ग्लोवज, एन-९५ मास्क आणि इतर साहित्यासाठी ३,६७५ रुपये आकारलेत. आणि सेवा शुल्क ५०० रुपये असे दररोज ११ हजार १७५ रुपये आकारले. ठाण्यातल्या घोडबंदर भागातील एका रुग्णालयानं कोरोनाग्रस्तांच्या उपचारांचं ८ दिवसांचं बिल तब्बल १ लाख १३९ रुपये आकारलंय.
सरकारी रुग्णालयांमधे अनेक अक्षरशः आपला जीव धोक्यात घालून काम करताहेत, असं तुम्हीच म्हणता. त्यांचे उपकार कधीच फेडता येणार नाही, असंही म्हणता. पण त्यांना किमान मदत पुरवण्यासही आपण स्वतःला बांधील का समजत नाही? जेजे रुग्णालय आणि नायर रुग्णालयामधे काम करणाऱ्या नर्स आणि वॉर्ड बॉईजना झालेल्या संक्रमणाला कोण जबाबदार आहे? या प्रश्नांचं उत्तर किती दिवस आपण टाळणार आहोत?
पुरेसे पीपीई किट मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक नर्स आणि वॉर्ड बॉईज करत आहेत. विचारणा केल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळतात. बाहेर कुठे आपण याबाबत काही बोललो तर नोकरी जाण्याची भीती या सगळ्यांच्या मनात आहे. त्यामुळे विनातक्रार या सगळ्यांना राबवून घेतलं जातंय. त्यातही यापैकी कुणाला संसर्ग झालाच, तर त्याला दिली जाणारी उपचार पद्धतही लाजिरवाणी आहे.
कोरोना पॉझिटिव आयसोलेशन वॉर्ड जेलपेक्षाही बत्तर असल्याचं सांगितलं जातंय. कोरोना पॉझिटिव आलेल्या जेजेमधील एका फ्रंटलाईनर कर्मचाऱ्याने सांगितलेलं वास्तव भयंकर आहे. स्वच्छता आणि जेवणाबद्दल तर कित्येक तक्रारी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे लक्षणं नसणाऱ्या लोकांच्या चाचण्याचं न करण्याचा बीएमसीचा निर्णय भीषण असल्याची खंतही या फ्रंटलाईनर कर्मचाऱ्याने बोलून दाखवली. त्यामुळे खासगी रुग्णालयात जाऊन या कर्मचाऱ्याने उपचार घेतले. तिथे ७० हजार खर्च आल्याचंही या कर्मचाऱ्यानं सांगितलं.
खासगी दवाखान्यात कोरोना रुग्णला दाखल करुन घेण्यासाठी आधी १ लाख डिपॉझिट करावे लागतात, असंही या कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे जेजे हे कोविड-१९ रुग्णालय नसूनही तिथे कोरोना रुग्ण आणलेच का जातात, हाही मुख्य प्रश्न आहे. यावर सवाल उपस्थित न करता काम करत राहण्याचं जेजेमधील कर्मचाऱ्यांना सांगितलं जातंय.
हेही वाचाः महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?
परराज्यातले मजूर गावी जाताना महाराष्ट्राचा जयजयकार करत होते, हे जसं आपण योगी आदित्यनाथ यांचं नाव न घेता सांगितलं किंवा पॅकेजची घोषणा न करता योजनांची अंमलबजावणी केल्याचा दावा करत विरोधकांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न आपण केलात, तसाच प्रयत्न रुग्णवाढ रोखण्यात करु शकलेला नाहीत, हे वास्तव नाकारुनही चालणार नाही.
लॉकडाऊनचा बराच वेळ हा सरकारनं वाया घालवला, असं तज्ज्ञांचं म्हणणंय. या वेळेत सर्वाधिक चाचण्या करुन रुग्णवेळीच शोधून काढणं गरजेचं होतं. ते झालं नाही. मात्र आता राज्यांतर्गत प्रवासाला दिलेल्या परवानगीमुळे कोरोना रेड झोनमधून ग्रीन झोनमधेही कसा वेगानं हातपात पसरतोय, हे आपल्याला अजून लक्षात आलेलं नाही का? घेतलेले निर्णय चुकीचे ठरत असल्यानं ते सुधारले न जाणं, अर्थचक्र पुन्हा सुरु करण्याबाबत असलेला दबाव, या गोष्टी जितक्या प्रभावीपणे येणं अपेक्षित आहे, तितकं ते आलेलं नाही.
महाराष्ट्रातली जनता चिंतेत आहे. लोकांनी देव पाण्यात ठेवलेत. काहीजणांकडचं तर पाणीही आता संपत चाललंय. दुष्काळ हळूहळू डोकं वर काढेल. रुग्णही वाढलेले असतील. घटना तुम्हाला माहीत असेलच. पण तरी पुन्हा आठवण करुन द्यावी लागेलच. लातूरच्या निलंग्यात मुंबईतून आलेल्यांशी गावकऱ्यांचा होम क्वारंटाईनवरुन वाद झाला. अंगणात झोपलेल्या ५ जणांवर हल्ला झाला. दोघांची हत्या झाली. अशा घटना भविष्यात वाढल्या, तर परिस्थिती जातीय दंगलीपेक्षाही वाईट होऊन बसेल.
अशावेळी आपण संवाद साधण्यासाठी येऊन शांतपणे त्याच त्याच गोष्टी सांगू नयेत. गरज नसताना शाब्दिक कोट्या करण्यात वेळ दवडू नये. चालू भविष्यकाळापेक्षा मुख्यमंत्र्यांनी वर्तमानाबद्दल बोलण्याची ही वेळ आहे. ग्राऊंड रिअलिटी सांगावी. सरकारचं, प्रशासनाचं कुठे चुकलं, हे सांगितलं नाही तरी चालेल.
आपली कोरोनासोबत जगायची तयारी आहे, पण कोरोनाची तयारी आहे का आपल्यासोबत जगायची? अशी चमकदार वाक्यं सोशल मीडियावर चालतील. पण कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखू शकणार नाहीत. म्हणूनच म्हणतो आतातरी लोकांसमोर येऊन सगळं नियंत्रणात आहे, अशी खोटी आशा दाखवणं थांबवा. लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडण्याआधी त्यांना विश्वासात घ्या. अन्यथा, जे भयंकर परिणाम भविष्यात होतील, ते अनाकलनीय असतील, हे नक्की!
आपला,
तोंडाला मास्क लावलेला महाराष्ट्राचा एक नागरिक
हेही वाचाः
नेहरूंशी लढता लढता मोदी हरताहेत
गाडगेबाबांची दशसुत्री ठाकरे सरकारला झेपेल का?
तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?
कोरोनाची जुनी-नवी लक्षणं कोणती? त्यांच्यापासून संरक्षण कसं करायचं?
वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय?
ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी!
राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही