बेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र

१९ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांच्या भाषणाइतकाच चर्चेचा विषय असतो. यावेळीही चर्चा झाली पण कारण वेगळं होतं. त्यांचा वाढदिवस देशभर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. अर्थात यामागे वाढती बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची ढासळलेली परिस्थितीही कारणीभूत आहे. पण तरुणाईने व्यक्तिद्वेष टाळायला हवा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबरला ७०व्या वर्षात पदार्पण केलं. त्यांना शुभेच्छा देणारे हॅशटॅग रात्रीपासूनच ट्विटरवर झळकत होते. पण या सगळ्यात #NationalUnemploymentDay आणि #राष्ट्रीयबेरोजगारदिवस हे दोन हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंगला होते. दिवसभर याचीच चर्चा होती. मध्यंतरी मोदींच्या मन की बातच्या एका युट्यूबवरच्या एका लाइव वीडियोला लाईकपेक्षा डिसलाईकची संख्या कैक पटीने अधिक होती. हाही चर्चेचा विषय ठरला होता. 

लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यात आर्थिक मंदीही आहेच. अशात देशातली तरुणाई अस्वस्थ होणं साहजिक आहे. पण मतमतांतरं आणि वैचारिक मतभिन्नतेच्या पलीकडे जाऊन बऱ्याच गोष्टींकडे तरुणाईने डोळसपणे पहायला हवं. म्हणूनच व्यक्तिद्वेषापलीकडे बऱ्याच गोष्टी असतात असं सांगणारं ज्येष्ठ पत्रकार आणि एनडीटीवी इंडियाचे संपादक रवीश कुमार यांनी देशातल्या तरूणांना एक पत्रवजा पोस्ट लिहिलीय. या मूळ हिंदी पत्राचा अक्षय शारदा शरद यांनी केलेला हा अनुवाद.

माझ्या लाडक्या बेरोजगार मित्रांनो,

छोटंसं पत्र लिहितोय. मी तुमच्या आंदोलनानं प्रभावित नाहीय. 'जनता' म्हणवून घेण्यासाठी स्वतःत बौद्धिक संघर्ष सुरू व्हावा लागतो, तो अजून तुमच्यात अजून सुरू झालेला नाही. तुमची राजकीय समज चौकटीच्या कुंपणापुरती मर्यादित आहे. म्हणूनच मी तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीय. 

जी तरुणाई मीडिया आणि मीममुळे गर्दीचा भाग बनते, ती पुढेही तशीच बदलेल. तुम्ही मला यासाठी खरं ठरवाल. 'जनता' व्हायची लढाई ही सगळ्यात जास्त कठीण असते. तुम्ही 'जनता' होऊ शकलेला नाहीत. तुम्ही तर फक्त तुमच्याच लढाया लढताय आणि त्याही खूप छोट्याशा. तुम्हाला अपयशी होण्याचा शाप आहे.

हेही वाचा : बेरोजगारी कमी करण्यासाठी शेतीक्षेत्र खुलं करायला हवं!

पण पुन्हा पुन्हा नवनव्या मार्गांनी लढा देण्याच्या तुमच्या प्रयत्नांनी मला साडेतीन टक्के तरी इम्प्रेस केलंय. मी जातीयवादी आणि धर्मांध बनलेल्या तरुणांकडून इतकीच अपेक्षा करू शकतो. माझ्या लाडक्या देशाच्या लोकशाही वातावरणाला नष्ट करण्यात तुम्हा सगळ्यांचं योगदान आहेच. मी काही नेता नाहीय. मला तुमचं मत नकोय. मला धर्मांध झालेल्या तरुणांचा हिरो बनायचं नाहीय. व्हाट्सऍप युनिवर्सिटीच्या मीमचे गुलाम झालेल्या तरुणांकडून मला अपेक्षा नाही.

तुम्ही बेरोजगार तरुणांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसाचा दिवस व्यक्त होण्यासाठी निवडला. वारंवार अपयशी ठरत असतानाही तुम्ही तरुण प्रयत्न करताय, ही चांगली गोष्ट आहे. हा प्रयत्न केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारपुरता राहू नये. बंगाल आणि  पंजाबपर्यंतही जावा. बिहारच्या पुढे मध्यप्रदेशातही जावा. 

रोजगाराच्या अनेक व्यापक प्रश्नांचा यात समावेश करा. आपली परीक्षा, आपला रिझल्ट इतकी संकुचित भावना तुमच्या आंदोलनाला कोणतीही दिशा देणार नाही. कॉलेजमधल्या वाढत्या फीकडे तुम्ही बघणार की नाही? कॉलेजमधे शिकवणाऱ्या शिक्षकांची गुणवत्ता आणि त्यांच्या नोकऱ्यांची स्थिती पाहणार की नाही? शिक्षक काँट्रॅक्टवर असतील तर तुमचं भविष्य घडवू शकनार नाहीत. आपल्या लढ्याचा परीघ वाढवा.

हेही वाचा : जिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू!

लढा म्हणजे आरत्या असं मला म्हणायचं आहे. दिल्ली पोलिसांनी आपल्या दंगलीच्या चार्जशीटमधे म्हटलंय की, रास्तारोको लोकशाहीचा मार्ग नाहीय. हे करताना तुमच्यावर कोणती कलम लावली जातील? त्यामुळे आता तुम्ही फक्त आरत्या करा. कारण तेच तुमच्या हातात उरलंय. 

बेरोजगारांनी हे लक्षात ठेवावं की, त्यांना मीडियातून बाहेर करण्यात आलंय. त्यामुळे मीडिया कवरेजच्या अपेक्षेशिवाय शांततापूर्ण आणि सभ्य संघर्षाची इच्छा टिकवून ठेवा. आम्ही मीडियाशिवाय देखील अनेक वर्ष संघर्ष करू शकतो, हा स्वाभिमान निर्माण करा. मेणबत्या पेटवल्यावर आपण टीवीवर दिसू म्हणून न्यूज चॅनेल सुरू करू नका. न्यूज चॅनेलनी लोकांचा ब्रेन वॉश केलाय. मानसिक पातळीवर बेरोजगार केलंय. म्हणून तुम्ही न्यूज चॅनेलनाच बेरोजगार करा. चॅनेल बघणं बंद करा. लोकांना समजवा.

मुख्य प्रवाहातल्या पेपर आणि न्यूज चॅनेलवर एक रुपयाही खर्च करू नका. तुम्ही स्वतःच विचार करा की तुम्ही हे का वाचताय ? यात बातम्या नसतातच. असल्याच तर त्याचा तितका प्रभाव पडत नाही कारण त्यात दिवसरात्र फक्त प्रचार छापून जनतेतल्या जाणिवा शून्य करण्यात आल्यात. 

त्यामुळे फक्त रोजगारासाठी संघर्ष करू नका. वाचक आणि प्रेक्षक म्हणूनही संघर्ष करा. काही वेबसाईट आहेत ज्यांना सपोर्ट करा. वाचा. आर्टिकल14, स्क्रोल, वायर, द केन, क्विंट, न्यूजलॉण्ड्री, अल्ट न्यूज, द न्यूज मिनिट, गोरखपूर टाइम्स, लाइव लॉ, पीपल आर्काइव ऑफ रूरल इंडिया (PARI), इंडिया स्पेंड, मीडिया विजील, जनचौक, हे सगळं वाचा.

हेही वाचा : मध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे

तुम्हीच पंतप्रधानांना निवडलं, ठिकाय. पण मला या गोष्टीचं वाईट वाटलं की तुम्ही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. 'छोट्या मनानं कुणी मोठं होत नाही,' अशी अटलजींची ओळ आहे. पंतप्रधानांना मोठ्या मनानं वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. ट्विटरवर मी तुमचे सगळे पोस्टर बघितलेत. एक ओळ लिहून जर तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या असत्या तर तुमचं आंदोलन छोटं होणार नव्हतं. पोस्टरवरून समजतंय की, तुमच्या आंदोलनात विचारांची कमतरता आहे. तुमचं आंदोलन खूप बोअरिंग आहे. त्यामुळेच मला वाटलं की, पत्राच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधायला हवा.

स्वतःला बदलवणं हेच पहिलं आंदोलन असतं. काय लिहिलंय ते काळजीपूर्वक वाचा. यशस्वी व्हा.

रवीश कुमार

हेही वाचा : 

नाहीतर आपल्या अर्थव्यवस्थेचं खरं नाही!

प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत

मारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’

मनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत

सोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ