घानामधे लवकरच तिथलं सरकार ‘एलजीबीटी+’विरोधी कायदा आणू पाहतंय. त्यामुळे देशभर सध्या तणावाचं वातावरण आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी देशातली एकमेव ट्रान्सजेंडर गायिका एंजल मॅक्सिन ओपोकूने कंबर कसली आहे. तिचं ‘किल द बिल’ हे नवं गाणं या अमानुष कायद्यावर घाव घालायचं बळ देतंय.
‘एलजीबीटी+’ समाजाचं अस्तित्व हे घानातल्या कौटुंबिक आणि सामाजिक रचनेसाठी हानिकारक असल्याचं तिथल्या सरकारचं मत आहे. त्यामुळे इथलं सरकार आता ‘योग्य मानवी लैंगिक हक्क आणि घानायन कौटुंबिक मूल्य प्रचारक विधेयक’ संसदेत सादर करायच्या तयारीत आहे. हे नवं विधायक म्हणजेच कायदा हा ‘एलजीबीटी+’विरोधी कायदा असल्याने देशात मोठी खळबळ उडालीय.
या नव्या आणि अमानुष कायद्याला विरोध करण्यासाठी अनेक बुद्धीजीवी, साहित्यिक, कलाकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकिलांची फौज मैदानात उतरलीय. एंजल मॅक्सिन ओपोकू ही घानाची एकमेव ट्रान्सजेंडर गायिका या लढ्यात आघाडीवर आहे. तिचं ‘किल द बिल’ हे गाणं या नव्या कायद्याविरुद्ध उभ्या राहिलेल्या चळवळीचं क्रांतिगीत ठरतंय.
हेही वाचाः `होय, मी हिजडा` असं दिशाने गडकरींना का सुनावलं?
फॅशन डिझायनर असलेली आई आणि सरकारी अधिकारी असलेल्या वडलांचा मॅक्सवेल हा थोरला लेक. त्याला आधी सगळे मुलगीच समजायचे. ‘तुमची मुलगी फार सुंदर आहे’ म्हणत कौतुक करणाऱ्यांना ‘मॅक्सवेल मुलगाच आहे’ असं पटवून देताना त्याच्या आईच्या नाकी नऊ यायचे. पण तरीही त्याचं अतीव देखणेपण पाहून लोक त्याला मुलगीच मानायचे.
मॅक्सवेलच्या आईला खरंतर पहिलं अपत्य म्हणून मुलगाच हवा होता आणि झालंही तसंच; पण तो कधीच मुलांसारखा वाढला नाही. त्याचे कपडे, खेळ सगळे मुलींसारखेच. मित्रांपेक्षा मैत्रिणीच जास्त. त्याच्या आईने त्याला वेगवेगळ्या चर्चमधे नेऊन तिथल्या धर्मोपदेशकांकडून समजवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी तिने मॅक्सवेलनमधे दडलेल्या मॅक्सिनला स्वीकारलं.
लहानपणी घरगुती प्रार्थनांमधे गाणाऱ्या मॅक्सिनने वयाच्या २३व्या वर्षापासून बाहेरही गायला सुरवात केली. तिची सुरवातीची गाणी प्रेम आणि प्रणयावर आधारित होती. आपलं नवं स्टेजनेम हे ‘एंजल मॅक्सिन’ असल्याचं घोषित करत तिने आपली ओळख गायिका अशी करून दिली. आपण ट्रान्सजेंडर आहोत असं खुलेआमपणे सांगणारी मॅक्सिन ही घानाची पहिली आणि एकमेव गायिका ठरली.
तिच्या या निर्णयाला सुरवातीला प्रचंड विरोध झाला. अगदी भर मैफिलीत तिच्यावर टहल्लेही झाले. ती त्यावेळी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होती. त्याचबरोबर एक शेफ म्हणूनही काम करत होती. पण ती ट्रान्सजेंडर असल्याचं कळाल्यावर तिची नोकरी गेली. अगदी तिच्या घरावरही संतप्त जमावाने हल्ला करत प्रचंड नासधूस आणि लुटालूट केली.
ब्रिटीश राजवटीने आपला वसाहतवाद आफ्रिकेत राबवताना गिनीच्या आखाती भागाला ‘गोल्ड कोस्ट’ असं नाव दिलं होतं. इथून सोन्याचा मुबलक पुरवठा होत होता. १९५७ला ब्रिटीश राष्ट्रकुल परिषदेकडून ‘घाना स्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी करण्यात आली आणि या भागाला ‘घाना’ नावाचा स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली.
घाना ब्रिटीश राजवटीतून मुक्त झाला त्यावेळीही समलैंगिक असणं हा गुन्हा मानला जात होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही घानायन दंड संहितेनुसार, कलम १०४ अंतर्गत ‘अनैसर्गिक शारीरिक ज्ञान’ असं कारण देत ‘एलजीबीटी+’ समाजाला गुन्हेगार ठरवलं जाऊ लागलं. घानामधली बहुतांश लोकसंख्या ही ‘एलजीबीटी+’ समाजविरोधी आहे.
त्यामुळे ‘एलजीबीटी+’ समाजातल्या लोकांवर हल्ले होणं ही नेहमीचीच गोष्ट मानली जाते. अनेकांना गे असल्यामुळे किंवा असल्याच्या संशयातून घरं, नोकऱ्या, अपेक्षित आदर मिळत नाही. सध्या घानामधे ‘एलजीबीटी+’ समाजाला आवश्यक असा आधार आणि उपचार देण्याच्या नावाखाली अत्यंत अमानुष अशा कन्वर्जन थेरपीला बढावा दिला जातोय.
घानाच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या दिग्गजांचा यात सहभाग आहे. वेगळी लैंगिकता हा एक शारीरिक-मानसिक आजार असून तो या थेरपीने बरा होऊ शकतो, असं त्यांचं मत आहे.तसं प्रशिक्षणही नव्याने भरती होणाऱ्या नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना दिलं जातंय. पण ही थेरपी पूर्वग्रहदुषित मानसिकतेतून केली जात असल्याचं एका उपस्थिताने ‘ओपनडेमोक्रसी’ या वेबसाईटशी बोलताना सांगितलंय.
हेही वाचाः ‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम
‘एलजीबीटी+’ समाजासोबत होणारी हिंसा ही सरकार पुरस्कृत हिंसा असल्याचं मानवाधिकार संघटनांचं म्हणणं आहे. धार्मिक आणि ‘एलजीबीटी+’विरोधी संघटनांकडून वाढत्या हिंसेला आणि दबावाला बळी पडून राजधानी आक्रामधलं ‘एलजीबीटी+’ कम्युनिटी सेंटर मागच्यावर्षी बंद केलं गेलं. त्यामुळे आता येणारा कायदा हळूहळू संपूर्ण ‘एलजीबीटी+’ समाजच संपवणार की काय, अशी भीती व्यक्त केली जातेय.
‘योग्य मानवी लैंगिक हक्क आणि घानायन कौटुंबिक मूल्य प्रचारक विधेयक’ अशा गोंडस नावाखाली घानातलं सरकार ‘एलजीबीटी+’विरोधी कारवायांना कायदेशीररीत्या बळ पुरवू पाहतंय. त्यामुळे हा नवा कायदा ‘एलजीबीटी+’विरोधी असल्याचं मत तिथले कायदेपंडित, कलाकार आणि मानवाधिकार संघटना मांडतायत. या नव्या कायद्यानुसार, ‘एलजीबीटी+’ समाजातली व्यक्ती ही गुन्हेगार समजली जाणार आहे.
समलैंगिक संबंधासाठी तीन ते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद यात करण्यात आलीय. ‘एलजीबीटी+’ समाजाशी संबंधित कोणत्याही प्रकारचं साहित्य निर्माण, विक्री-खरेदी करणाऱ्यांना ५ ते १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. इतकंच नाही, तर लिंगबदल शस्त्रक्रिया करणाऱ्यांना, क्रॉसड्रेसिंग करणाऱ्यांना किंवा उघडपणे समलैंगिक प्रेमाचं प्रदर्शन करणाऱ्यांना या नव्या कायद्यानुसार वर्षभर जेलची हवा खावी लागेल.
नव्या कायद्यात सांगितल्याप्रमाणे, ‘एलजीबीटी+’ समाजाला लग्न करण्याचा, मूल दत्तक घेण्याचा अधिकार नसेल. त्यांना कसलीही मदत पुरवणाऱ्यांना, त्यांच्याविषयी सकारात्मक चित्र निर्माण करणाऱ्यांना, लहान मुलांना ‘एलजीबीटी+’विषयी सकारात्मक गोष्टी शिकवणाऱ्यांनाही तुरुंगात जावं लागेल. आपल्या ओळखीतल्या ‘एलजीबीटी+’ समाजाच्या व्यक्तींबद्दल प्रशासनाला माहिती देणं तसंच ‘एलजीबीटी+’ समाजाने कन्वर्जन थेरपी घेणं बंधनकारक असणार आहे.
घानामधे अल्पसंख्याक समजल्या जाणाऱ्या ‘एलजीबीटी+’ समाजावर खुलेआम दडपशाहीची परवानगी देणारा हा कायदा नाकारण्यासाठी जनचळवळ उभी राहतेय. जो तो आपापल्यापरीने या कायद्याला विरोध करताना दिसतोय. ‘लिबरल पार्टी ऑफ घाना’ या सत्ताकारणात दुबळ्या ठरलेल्या पक्षाचा अपवाद वगळता, झाडून सर्वच राजकीय पक्षांनी नव्या कायद्याला आपलं समर्थन दिल्याने ‘एलजीबीटी+’ समाजासाठी हा लढा आव्हानात्मक ठरतोय.
पण तरीही हा समाज लोकशाही मार्गाने लढतोय. एंजल मॅक्सिन ओपोकू हे त्यातलंच एक प्रातिनिधिक नाव. याआधीही तिने ‘वो फीए’ या गाण्यातून ‘एलजीबीटी+’चं घानामधलं अस्तित्व अधोरेखित केलं होतं. तुमच्या घरातली, ओळखीतली, शेजारची व्यक्ती ‘एलजीबीटी+’मधली असूच शकते; त्यामुळे द्वेष नको, प्रेम पसरवा, असं आवाहन तिने या गाण्यात केलं होतं.
आपल्या ‘किल द बिल’मधे एंजल मॅक्सिन म्हणते, ‘हा नवा कायदा मारून टाका. प्रेम हीच आमची एकमेव इच्छा आहे’. ‘देशातली जनता तुमच्यावर नाराज असून देश सुधारण्यावर भर द्या, आम्हाला नाही’ असा सूचक इशारा एंजल मॅक्सिन आपल्या गाण्यातून देतेय. तिचं हे नवं गाणं ‘एलजीबीटी+’ समाजाच्या हितासाठी या जाचक कायद्याविरोधात लढणाऱ्यांचं क्रांतिगीत बनलंय.
हेही वाचाः
छोट्याशा गावातल्या दिशाचा सतरंगी संघर्ष
तृतीयपंथी हसीना मान जायेगी, पण समाज?