वो सुबह कभी तो आयेगी!

१३ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


प्रेम एक मुलगा आणि एका मुलीचं असेल तर ते समाजमान्य ठरेलही बऱ्याचदा. पण ते माझ्यासारख्या एखाद्या मुलीनं आपल्या समवयस्क मैत्रिणीशी केलं तर तो गुन्हा का असतो? प्रेमाला जेंडरच्या काय कुठल्याच नियमांमधे बसवता येत नाही. बिहारमधल्या एका लहान गावातून येणारी मेघा सांगतेय तिच्या 'लेस्बियन लव'मागची कडूगोड स्टोरी सतरंगी वॅलेंटाईनमधे.

प्रेम हे प्रेम असतं. ते समलिंगी व्यक्तींचं असो की इतर कुणाचंही. प्रेमाची कोणतीही विशिष्ट व्याख्या करता येत नाही. त्याला कुठकुठले निकष लावून 'जज' का करतात लोक?

प्रेम चुकीचं किंवा बरोबर नसतं. चुकीचा असतो तो लोकांचा दृष्टीकोन. कधी-कधी प्रेमात माणसं इतकी वाहावत जातात की मग त्यातून प्रियकर-प्रेयसीनं इतर कुणाशी लग्न केलं तर त्यालाच मारुन टाकणं किंवा मग आत्महत्येपर्यंत जाणं असे प्रकार होत राहतात. प्रेम माणसाला राखेतून उचलून थेट आभाळात भरारी घ्यायची ताकद देतं. ही जादू आहे प्रेमाची!

मी एका छोट्या शहरात वाढले

मी लेस्बियन आहे. एका छोट्या शहरात जन्मले, वाढले. इथं सेक्स, प्रेम यावर विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे. थेट विरोधातच जातात लोक. प्रेम करायला लोक घाबरतात. आणि जर कुणी केलंच प्रेम, तर ती व्यक्ती आपल्या कुटुंबाची इज्जत पार धुळीला मिळवणार असं बोललं जाऊ लागतं. समलिंगी व्यक्तींबद्दल तर भयंकर समज आहेत. समलिंगी व्यक्ती म्हणजे जनावरं अशी घट्ट समजूत आहे.

इतकंच काय, तर या व्यक्ती वेड्या आहेत असाही अर्थ लावला जातो. आपला मुलगा-मुलगी ही गे, लेस्बियन आहे असं समजलं, की त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना भिन्नलिंगी व्यक्तीशी लग्न करायला भाग पाडलं जातं. मग पुढं तो माणूस आयुष्यभर तळमळत राहिला किंवा त्यानं आत्महत्या केली तरी हरकत नाही.

हेही वाचाः ‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम

मी टॉम बॉय आहे. मुलासारखं रहायला आवडतं मला. मग मार्केटमधे गेलं की माणसं घाणेरड्या नजरांनी बघत राहतात. अनेकदा 'लो आ गया हिजडा' सारख्या कमेंट्स पास करतात. गालीगलोच, ताने तर असतातच. मी पूर्वी अस्वस्थ व्हायचे. पण आता शिकले या सगळ्याकडे दुर्लक्ष करायला. कारण मला अभिमान आहे माझ्या असण्याचा. माझ्या तुम्हा सगळ्यांहून वेगळ्या ओळखीचा!

मुलंच हा असा त्रास देतात

कधी कधी असं होतं की, सोशल मीडियामधुन काही विकृत मनोवृत्तीची स्ट्रेट लोक, त्यांची टोळकी फेक आयडी बनवून एलजीबीटीक्यू कम्युनिटीमधे घुसतात. आणि तुम्ही सेक्स कसा करता? तू माझ्याशी सेक्स करशील? असं कायकाय थेटच विचारून त्रास देतात. सभ्य शब्दात नकार दिल्यावर, 'तुम्ही लोक घाणेरडे आहात. अबनॉर्मल आहात. तुम्ही लवकर मरणार' असं काहीही बोलून अपमान करतात.

कधी कधी तर याच्याही पलीकडे जातात. वीडियो कॉल करुन अश्लील फोटो पाठवतात. आणि शिव्याही देतात. लेस्बियन म्हणून आम्हाला या सगळ्याला खूप मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागतं. आणि माझं निरीक्षण सांगतं, की मुली सहसा असा फेक आयडी बनवण्याची शक्यता नाही. मुलंच हा असा त्रास देतात.

सोशल मीडियाचा वापर हा आमच्यासाठी एका अर्थाने चांगलाही आहे. प्रेम-जिव्हाळ्याचे चार शब्द समविचारी लोकांशी बोलता येतात. जगाचं सोडाच पण घरचेही समजून घेऊ शकत नाहीत अशा अवस्थेत काही समदु:खी लोकांसमोर मन मोकळं करता येतं. अनुभव शेअर करता येतात. ऑनलाइन रिलेशनशीपची मजा काही औरच असते. काही मित्र तर असेही आहेत की जे वॉट्सअप, फेसबुकच्या ओळखीतून भेटले आणि आजतागयत रिलेशनमधे आहेत. ऑनलाइन जगात लोक तुम्हाला जरा कमीच जज करतात.

डेटिंग साईट्सना थँक्स

आज आजुबाजूला खूप साऱ्या डेटींग साईट्स आहेत. त्यांना खूप थँक्स म्हणावं वाटतं. कारण त्यांना तुम्ही भिन्नलिंगी की समलिंगी आहात यात भोचकपणे नाक खूपसण्याची गरज वाटत नाही. मी अनेकदा विचार करते, की आज सोशल मीडिया, डेटिंग साईट्स नसत्या तर आमचं काय झालं असतं? ऑफलाईन असताना आम्हाला बोचकारलं जातं. ऑनलाईन असताना हिंमत दिली जाते. ऑफलाईन असताना तुम्ही तुमचं दु:ख व्यक्त केलं की अनेक धोके निर्माण होतात. ऑनलाईन मात्र मी बिनधास्त दु:ख लिहू बोलू शकते.

लेस्बियन असल्यानं सध्या मला खूप अवघड काळातून जावं लागतंय. माझं मन घरी कुणीच समजू शकत नाही. कुणाशी काय बोलताना हजारवेळा विचार करावा लागतो. घरचे सतत ओरड करतात, तू मुलींसारखीच का नाही वागतं? असा मेकअप कर, असे कपडे घाल, असं चाल, असं हास, प्रचंड छळ आहे. मी त्यांना खूप समजावलं की मी मुलीसारखं असण्यात 'कम्फर्टेबल' नाही.

घरच्यांइतकीच बाहेरच्यांना सांगता समजावताना एनर्जी जाते. एकदा पप्पांना सांगण्यात आलं की, 'तुम्ही तिचे हार्मोन्स चेक करुन पहा. तिला खरंच पिरीयड येतात की नाही ते पण तपासा. मी तर म्हणते डॉक्टरकडे कशाला पैसा खर्च करता? मला विचारा, मी तुम्हाला सत्य सांगते ना! प्रॉब्लेम तेव्हा वाढतो जेव्हा 'लग्नाचं वय' होतं. कितीही समजावा, घरचे खोटी आशा धरून माझ्यासाठी मुलगा शोधत राहतात.

कायदा बदलला समाजाचं काय?

'बास आता. तुझं वय झालंय' असं सांगून, इमोशनल ब्लॅकमेल करत लग्नासाठी दबाव टाकला जातो. ना मी घरच्यांना समजावू शकते आणि ना लग्न करु शकते. आता भारतात ३७७ कलम रद्द करण्यात आलंय. खूप आनंद झालता तो निकाल आल्यावर! कायद्यानं त्याचं काम केलंय. पण समाजाचं काय?

आम्हाला आमचा अधिकार तेव्हाच खरा मिळेल जेव्हा समाज मनातल्या शंका-कुशंका फेकुन देत आम्हाला, आमच्या प्रेमाला स्वीकारेल. अशा दिवसाची मी अजूनही वाट पाहतेय, ज्यावेळी समलिंगी व्यक्ती कुणाला न घाबरता आणि कोणत्याही दबावाशिवाय समलिंगी व्यक्तीसोबत वाजतगाजत लग्न करु शकेल. पालक मुलांना मिठी मारुन 'तू जसा आहेस तसा आम्ही तुला, तुझ्या जोडीदाराला स्वीकारतोय' असं म्हणतील... वो सुबहा कभी तो आयेगी!

हेही वाचाः तुमचं आमचं सेमच असतं

(सतरंगी वॅलेंटाईन या विशेष विभागातल्या लेखांची संकल्पना, संयोजन, संपादन शर्मिष्ठा भोसले यांचं आहे.)