तुमचं आमचं सेमच असतं

१३ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


कितीही सेम आहे म्हटलं तरी स्त्री-पुरुष नात्याबद्दल अनेक शंका असतात माझ्या मनात. मुलींमधे किंवा बायकांमधे एवढं आवडण्यासारखं काय असतं? इथपासून मुळात लग्न का करतात लोक? मुलं का जन्माला घालतात? आईबाबांच्या नात्याकडे पाहून तर हे दोघं कसे एकत्र राहतात, हेच बरेचदा समजेनासं झालंय.

सन २००२. इंजीनिअरिंगचं पहिलं वर्ष होतं. 'चॉकलेट डे'च्या आदल्या दिवशी ती मला म्हणाली होती, "माझ्यासाठी चॉकलेट घेऊन ये उद्या" आणि फिसकन् हसली होती. त्याच दिवशी मित्राने ज्ञानात मोलाची भर घातली होती. पिवळं गुलाब म्हणजे मैत्री, लाल गुलाब म्हणजे प्रपोजल वगैरे. मग दुसऱ्या दिवशी ती वर्गात एकटी असताना पाच रुपयांचा पिवळा गुलाब आणि पाच रुपयांचं डेअरी मिल्क असं स्वस्तातलं प्रेम तिच्या हातात कोंबून मी पळ काढला होता. ती पुन्हा हसल्याचं आठवतं. तिच्यासाठी बहुतेक ही सगळीच मस्करी होती, पण माझ्यासाठी सगळंच गंभीर.

मला तेव्हाही, किंबहुना त्याच्याही फार पूर्वीपासून मुलंच आवडत होती. पण जगाने ठरवून दिलेल्या साच्यात बसण्याचे असफल प्रयत्न कित्येक वर्षं चालू होते. त्यातला हा पहिलाच. त्यानंतर एकलव्याला दिसणाऱ्या पक्ष्याच्या डोळ्यासारखी मला चार वर्ष यत्र-तत्र-सर्वत्र तीच दिसत होती.

पहिल्या वर्षी वर्कशॉपमधे रंधा मारताना कधी तिच्या बाजूच्याच टेबलजवळ जाऊन उभं राहा, ड्रॉईंगला आपल्या शीट्स आदल्या रात्री जागून पूर्ण करून तिच्या मागच्या डेस्कवर उभं राहा आणि ती कधी मदत मागतेय याची वाट पाहत बसा, हे हिंदी प्रेमकथेतल्यासारखे उद्योगही मी केले आणि हे सगळं अख्ख्या कॉलेजभर कसं पसरेल, याचीही मित्रांकरवी नीट काळजी घेतली.

शेवटच्या वर्षाला असताना मी तिला रीतसर प्रपोज केल्यावर तिने नकार दिला. तेव्हा काही काळ कॉम्प्युटरच्या डबड्यासमोर बसून 'आओगे जब तुम साजना' रोज पाहत अश्रू ढाळत होतो. रुटीन असल्यासारखं. नंतर हळूहळू तिला विसरलो. पण थर्ड इयरच्या कार्ट्यांनी एकदा त्यांचं प्रॅक्टिकल चालू असताना आमचे अनवधानाने बरेचसे मॅचिंग झालेले कपडे पाहून एकच कल्ला केला होता, ही आसुरी आनंद देणारी गोष्ट मात्र लक्षात राहिली.

कट टू २०१९. मी एका समवयस्क मुलाच्या प्रेमात आहे. २०१४ पासूनची ओळख. फेसबुकवर झालेली. एवढ्या वर्षांत आम्ही मोजून चार वेळा प्रत्यक्ष भेटलोय. अवघ्या काही तासांच्या धावत्या भेटी. एरवी फक्त वॉट्सअप आणि फेसबुकवर चॅट किंवा फोनवर बोलणं. तो बायसेक्शुअल आहे, क्लॉजेटेड आहे आणि कदाचित याच कारणामुळे 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' हे इतक्या वर्षांत बर्‍याचदा सांगूनही त्याने स्पष्ट होकार किंवा नकार काहीच दिलेला नाही.

पण तरीही मला त्याच्याबद्दल जे वाटतंय ते केवळ शारीरिक आकर्षणाच्याच नव्हे तर मानसिक ओढीच्याही पलीकडचं काहीतरी आहे. कदाचित तेच प्रेम वगैरे जे म्हणतात, ते असावं. ते आतुरलेलं असलं तरी अवखळ नाही. भविष्यात त्याने स्पष्ट शब्दांत नकार वगैरे दिला, तरी माझं जग संपणार नाही. ही दृष्टी त्यानेच मला दिलीय. त्याने गुपितं जपायला शिकवली. कोणत्याही व्यक्तीशी निव्वळ मैत्री करतानाही तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिच्या परवानगीशिवाय नाक खुपसायचं नसतं, हे त्याने शिकवलं. त्याने वाट पाहणं शिकवलं, तसंच शांततेचा अर्थ शोधणंही.

हेही वाचाः छोट्याशा गावातल्या दिशाचा सतरंगी संघर्ष

आमच्या संवादाला पूर्णविराम मिळतो, तेव्हा तो दोन्ही बाजूंनी पूर्ण झालेला असतो. त्याने ब्रेकअप्स पचवायला शिकवलं. मी चुकलो तेव्हा कसलीही भीडभाड न ठेवता त्याने नेहमी कानउघाडणी केली. इतक्या वर्षांत कधी आम्ही एकमेकांना कुठल्या सणाच्या शुभेच्छा सुरवातीचा काही काळ वगळता दिल्याचं आठवत नाही. तरीही त्याला माझी काळजी आहे, हे त्याने काहीही न बोलताही मला जाणवतं.

आमच्यात नेमकं काय आहे, त्याला माझ्याविषयी नेमकं काय वाटतं, हे सगळं धूसर असूनही सुंदर आहे. निव्वळ त्वचेच्या पलीकडे जाऊन आम्ही फार पूर्वी एकमेकांना सोलून पाहिलं आहे. दुखावलं आहे. मी कित्येकदा रुसूनही बसलोय त्याच्यावर. मला तो कितीही आवडत असला, तरी त्याची कॉपी करण्याचा मोह मला चुकूनही होत नाही. त्याच्याकडून बरंच काही झिरपत माझ्यापर्यंत पोचत असलं तरीही ते ठरवून झालेलं नाही. त्यात एकमेकांनी असंच असावं, वगैरे जबरदस्ती नाही.

या मधल्या काही वर्षांत आमच्या दोघांच्याही आयुष्यात लोक येत जात राहिले. प्रेम असल्याचं भासवत राहिले. त्या दुखऱ्या जागा आम्ही एकमेकांना बोलूनही दाखवल्या. मात्र त्या व्यक्तींनाही मला आताशा दोष द्यावासा वाटत नाही. त्यातून बरंच काही शिकायला मिळालं. मी प्रचंड बंडखोर झालो. खोटे चेहरे ओळखायला शिकलो. कनेक्ट होण्यासाठी जुळणाऱ्या आवडींबरोबरच शब्दांची गरज नसलेला संवाद आवश्यक असतो, हे जाणवू लागलं.

मधे झालेली दोन अयशस्वी प्रेमप्रकरणं पाहता तर अलीकडे असं वाटू लागलंय की प्रेमाच्या नात्याला अपूर्णतेतच मोक्ष मिळतो की काय. त्यावर दोन्ही पक्षांचं शिक्कामोर्तब झालं की नेमकं काय बिनसतं समजत नाही. पण सुरवातीला नाजूक वाटणाऱ्या गुलाबी नात्याचे काटे टोचू लागतात. एकमेकांवर हक्क गाजवण्याची खुमखुमी आली, की नितळ नात्यात राजकारणाचा प्रवेश होतो आणि मग अलीकडे रुजू लागलेल्या लिव इन रिलेशनशिप, ओपन रिलेशनशिप या संकल्पनांवरचा विश्वास दृढ होऊ लागतो.

ग्रिंडरसारख्या डेटिंग अॅप्सवर, फेसबुकवर आमच्या जगातलं प्रेम शोधताना काही गोष्टी एवढ्या काही वर्षांत समजत गेल्या. नातं टिकवायचं म्हटलं की ते ऑनलाईन असलं तरी त्याने फारसा फरक पडत नाहीच. फेसबुकने जवळ आणलेल्या जगात दोन ध्रुवांवरच्या दोन व्यक्तींतही प्रेम झालेलं दिसतं आणि ते टिकलेलंही दिसतं अलीकडे. 

याउलट समाजमान्य विवाहचौकटीला सुरुंग लागतानाही मला माझ्या डोळ्यासमोर दिसताहेत. नाती कॅज्युअली घेण्याचा आरोप आमच्या पूर्वीची पिढी सरसकट आमच्यावर करताना दिसते. त्यात भिन्नलिंगी, समलिंगी हा फरक नाहीच. पण मला स्वतःला मात्र तसं वाटत नाही. माझ्या पिढीतले माझे स्ट्रेट मित्र लग्न करताना फार जपून पावलं उचलत आहेत. मुली मुलांना समजून घेतायत आणि मुलं मुलींना.

पण अॅप्समुळे अनेक पर्याय उपलब्ध झालेले असल्याने काही नकोशा गोष्टी मात्र घडतायत. भिन्नलिंगी समाजाला उपलब्ध असलेला समाजमान्य लग्नाचा पर्याय एलजीबीटी समुदायाला अजूनही उघडपणे स्वीकारता येत नसल्याने माझे अनेक गे लेस्बियन मित्रमैत्रिणी अंधारातच चाचपडताहेत. वयाची अट, सुंदर दिसण्याचा आग्रह, एका विशिष्ट शरीरयष्टीचा आग्रह, स्त्रैण वर्तनाची होणारी हेटाळणी या सगळ्यांत प्रेमाचा अर्थ शोधण्याची इच्छा दूरदूरपर्यंत कुठेही दिसत नाही.

न संपणारं एकटेपण स्वीकारणं, हाच एकमेव पर्याय ही डेटिंग अॅप्स एलजीबीटी समुदायाला देऊ पाहत आहेत. आजूबाजूचं सगळंच छाती दडपवून टाकणाऱ्या वेगाने बदलत असताना नात्यांमधला संयम संपतोय. अर्थात प्रेम ही गोष्ट सोपी कधीच नव्हती. आमच्या आईबाबांच्या काळातही ती सोपी नव्हतीच. आता फक्त संदर्भ बदलताहेत इतकंच.

कितीही सेम आहे म्हटलं तरी स्त्री-पुरुष नात्याबद्दल अनेक शंका असतात माझ्या मनात. मुलींमधे किंवा बायकांमधे एवढं आवडण्यासारखं काय असतं? इथपासून मुळात लग्न का करतात लोक? मुलं का जन्माला घालतात? आईबाबांच्या नात्याकडे पाहून तर हे दोघं कसे एकत्र राहतात, हेच बरेचदा समजेनासं झालंय. आईचा आक्रस्ताळेपणा पाहिला की बाबा तिला सहन करतायत, असं वाटतं. बाबांचा हट्टी स्वभाव पाहिला की आई बिचारी गरीब गाय वाटू लागते. हे अनेकदा बाबांना विचारून झालंय. त्याचं उत्तर अलीकडेच न मागता मिळालं.

कसल्यातरी गोष्टीबद्दल आईला कन्विन्स करण्यासाठी बाबांच्या मागे लागलो होतो आणि बाबा काही ऐकत नव्हते. शेवटी रागावून म्हटलं, ‘तुमची बायको आहे ना ती? मग तुम्हीच सांगा तिला.’ बाबा म्हणाले, ‘माझी फक्त बायको नाहीये रे ती. माझी आई आहे ती. मला सांभाळते ती.’ त्यांच्या या उत्तराने माझे सगळेच प्रश्न निकालात निघाले. प्रेम, प्रेम म्हणतात तो प्रवास शेवटी स्त्रीच्या गर्भाशयापर्यंत जाऊन पोचतो तर.

थोडा विचार केला आणि मग जाणवलं की मी तरी नेमकं काय शोधतोय माझ्या प्रियकरात? बाबांची प्रतिमाच ना? वर्चस्व गाजवणारा असला तरी आपला असणारा पुरुषच शोधतोय की मी. म्हणजे शेवटी 'सेमच असतं' हेच सत्य आणि म्हणूनच पाडगांवकर ग्रेट. त्रिकालाबाधित सत्य सांगून गेलेत ते.
 

हेही वाचाः

‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम

वो सुबह कभी तो आयेगी!

(सतरंगी वॅलेंटाईन या विशेष विभागातल्या लेखांची संकल्पना, संयोजन, संपादन शर्मिष्ठा भोसले यांचं आहे.)