छोट्याशा गावातल्या दिशाचा सतरंगी संघर्ष

१३ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


सोशल मीडियाला कुणी कितीही नावं ठेऊ दे. पण सोशल मीडियामुळे अनेकांना आपल्या अस्तित्वाची ओळख करून दिलीय. एलजीबीटीक्यू कम्युनिटीसाठी तर हा मीडिया वरदान ठरलाय. दिशा पिंकी शेख ही ट्रान्सजेंडर कवी, कार्यकर्तीसुद्धा महाराष्ट्राला सोशल मीडियामुळेच मिळाली. येवल्यासारख्या गावपण न सोडलेल्या शहरात वाढलेल्या दिशाने सांगितलेला आपला हा ट्रान्सजेंडर प्रवास त्या सतरंगी वॅलेंटाईनमधे.

मी येवला या नाशिकमधल्या एका छोट्या शहरवजा गावातल्या झोपडपट्टीत रहायचे. आमच्या झोपडपट्टीत माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी लहान एक मुलगा अभ्यासवर्ग घ्यायला यायचा. मला तो आवडायला लागला. १० वी झाली तरी मला लिहिता वाचता येत नव्हतं. पण तो आवडायचा म्हणून मी त्याच्या शिकवणीला जाऊन बसायचे. त्याला खुश करण्यासाठी मन लावून अभ्यास करायचे. तो माझा पहिला क्रश होता. पण त्याचं कधी प्रेमात रुपांतर झालं नाही.

शाळेत असताना मला एक मुलगी आवडायची. ती खूप साधी, सोबर होती. मलाही तिच्यासारखं व्हावसं वाटायचं. तिच्यासारखे लांबसडक केस असावेत, तिच्यासारखं सुंदर दिसावं असं वाटून जायचं. पण हे बाकीच्या मुलांना सांगितलं तर ते हसतील म्हणून मला ती आवडते असं मी म्हणायचे.

साधारण १४ – १५ वयाची असताना मला मुलं आवडतात हे मला स्पष्ट जाणवू लागलं. मला स्वत:ची घृणा वाटू लागली. माझ्या डोक्यात असणारी जगण्याची, प्रेमाची व्याख्या मला आजूबाजूच्या जगात कुठेही दिसत नव्हती. या काळात मी प्रचंड मानसिक त्रासाला सामोरी गेले. माझ्या आजूबाजूला माझ्यासारखेच आणखीही लोक आहेत याची जाणीव झाली, तेव्हा मी त्रासातून स्वत:ला सावरू शकले.

त्यानंतर मी घरातून पळून गेले आणि हिजडा समाजाचा स्वीकार केला. तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर ही ओळख स्वीकारण्यापूर्वी मी प्रेमाकडे चोरी म्हणून बघायचे. मी करतेय तो अपराध आहे आणि हे सारं मी लपून केलं पाहिजे असं मला वाटायचं. पण माझ्या कम्युनिटीमधे आल्यानंतर प्रेम हा माझा हक्क आहे, असं वाटू लागलं.

मलाही नवरा असावा, संसार असावा, नवऱ्याने कामावर जावं ह्या पितृसत्तेतल्या कल्पना माझ्या डोक्यात येऊ लागल्या. संध्याकाळी येताना त्याने गजरा आणावा, केसात माळावा असं वाटायचं. माझी स्वप्न कधीच खूप मोठी नव्हती. माझ्या जोडीदाराकडेही मी कधीच महागड्या भेटवस्तूंसाठी हट्ट केला नाही. पण पाच रुपयांच्या चॉकलेटसाठी मी अनेकदा त्याच्याशी खूप तावातावाने भांडले होते.

हेही वाचाः ‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम

हिजडा ही ओळख स्वीकारल्यानंतर मी एका माणसासोबत नातं ठेवलं होतं. तो माणूस प्रचंड हुकुमशाही वृत्तीचा होता. पण मी त्याचा त्रास निमूटपणे सहन करायचे. आई बाबांनी ठरवून माझं लग्न करून दिलं असतं तर मी सोसलं नसतं का असा विचार मी करायचे. पण नंतर त्या माणसाचा आणि नात्याचा मला फारच त्रास होऊ लागला. तेव्हा मी त्याला पूर्णविराम दिला.

माझं दुसरं नातं मात्र यापेक्षा फार वेगळं होतं. माझ्या पहिल्या नात्यात माझा जोडीदार हा माझ्याकडे निव्वळ एक वस्तू म्हणून बघायचा. पण नंतरच्या जोडीदारामधे आणि माझ्यात नुसत्या शारीरिक प्रेमापलीकडेही बरंच काही होतं.

सौंदर्याच्या सर्वसाधारण ज्या परिभाषा असतात त्यात मी कुठेच बसत नव्हते. पण या परिभाषांच्या, डेफिनेशनच्या पलीकडे जाऊन तो माझ्यावर माणूस म्हणून प्रेम करायचा. त्याचं प्रेम निर्भीड होतं. समाजाच्या चौकटी, त्यांचे निकष आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो. त्यामुळे नंतर आम्ही ठरवून वेगळे झालो. आजही मला अनेक मुलांकडे बघायला, त्यांच्याशी मैत्री करायला आवडतं. पण आमचं ‘ब्रेकअप’ होऊन बराच काळ लोटला असला तरी मला त्याची जागा दुसऱ्या कोणालाही द्यावीशी वाटत नाही.

मला माझं हे प्रेम फेसबुकद्वारे मिळालं होतं. जोडीदार शोधण्यासाठी, समाजाशी जोडलं जाण्यासाठी आणि कुटुंबाचं असं प्रेम मिळवण्यासाठी सोशल मीडिया माझ्यासारख्या ट्रान्सजेंडर लोकांसाठी महत्वाचा झालाय. माझ्या बऱ्याच मैत्रिणी सोशल मीडियातून जोडीदार शोधण्यात यशस्वी झाल्यात.

ट्रान्सजेंडर माधुरी सरोदे यांनाही त्यांचा जोडीदार फेसबुकवरूनच मिळाला होता. पुढे जाऊन त्यांनी लग्नही केलं. आणि उघडपणे, समाजासमोर असं लग्न करणारी ही महाराष्ट्रातली पहिलीच जोडी ठरली.

हेही वाचाः तुमचं आमचं सेमच असतं

सोशल मीडिया माझ्यासारख्या लोकांना खोट्या ओळखीच्या आधारे का होईना पण समाजात प्रेम शोधण्याची संधी देतं. अर्थात खोटी ओळख घेऊन आम्हाला कुणाला फसवायचाही हेतू नसतो. ही खोटी ओळख खरंतर खोटी नसतेच मुळी. खोटं नाव धारण केलेली, चेहरा नसलेली खरी व्यक्ती त्यामागे असते. ओळख खोटी असली तरी माणूस खोटा नसतो.

जनमानसात ज्यांना फेक म्हणून जगावं लागतं ते सोशल मीडियावर मोकळेपणाने लिहू, बोलू शकतात. स्वतःला हवं तसं वागू शकतात. सगळीच फेक अकाउंट फेक नसतात. काही अकाउंट खरी असली तरी त्यावरची माणसं खऱ्या आयुष्यात आणि सोशल मीडियात दुटप्पी, खोटी वागत असतात. त्यापेक्षा खऱ्या माणसांचं फेक अकाउंट चांगलंच म्हणायला हवं. या नात्याविषयीची माझी एक कविता आहे.

गोड गोड बोलून
भुलवणारा तो नाही
आणि
भुलणारी मीही नाही
दोघेही जाणतो
वास्तव काय आहे...

दोन शरीर एक प्राण
म्हणणारा तो नाही
आणि मीही नाही
जाणतो आम्ही
दोघांचेही वेगवेगळे
अस्तित्व आहे...

आवडतं त्याला माझं लाजणं
आणि मलाही त्याचा राकटपणा
पण नाहीला नाहीच समजण्याची समज
त्याच्यातही
आणि
माझ्यातही आहे...

मालकी हक्क गाजवणार
डोक्यावर पदर घे म्हणणार
तो कोण होता
हा कोण होता
तू त्याच्याशी
ह्याच्याशी का बोलत होती
लिपस्टिक फेंट कर
असं काहीबाही बोलत नाही तो
कारण
त्याचं माझ्यावर प्रेम आहे...

मीही नाही विचारलं त्याला कधी
तुझा फोन व्यस्त का होता म्हणून
आणि
खुप दिवस झाले
आठवण येत नाही का माझी म्हणून
त्याच्यासोबत
त्याच्या
मैत्रीणींवरही तितकंच प्रेम करते
कारण तो माझा
त्याच्या सकल गुणदोषांसह
मीही त्याची सर्व गुणदोष संपन्न

मग उगाच
आणाभाका आणि स्वप्नाच्या
आखलेल्या चौकटीची उपमा
का द्यावी नात्याला
माझ्या अशा अनंत प्रेमावर
कविता लिहिण्याची
गरज काय आहे...

प्रेम, लग्न आणि लकी ड्रॉ हे सारखेच शब्द आहेत, असं मला कधी कधी वाटतं. लकी ड्रॉमधे गोष्ट आपल्या हाताला लागली तर नशीब फळत, नाहीतर सारी मेहनत वाया जाते. प्रेमाचंही तसचं! मनासारखा जोडीदार नशिबानेच मिळतो. पण प्रेमाचा लकी ड्रॉ होऊ द्यायचा नसेल तर नुसतं आकर्षण आणि प्रेम यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. त्यासाठी संयम आणि विवेक फार महत्वाचा आहे.

नात्याला पुरेसा वेळ देणं आणि नात्याबद्दल विवेकाने विचार करणं यासोबतच विश्वास, संवाद आणि स्वातंत्र्यसुद्धा मला महत्वाचं वाटतं. हे स्वातंत्र्य, अगदी ‘तू असं कर’ ऐवजी ‘मला वाटतं तू असं करावसं’ अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनही देता येतं. मुळात आपलं आणि जोडीदाराच स्वातंत्र्य मान्य करणं आदर्श नात्यात अभिप्रेत असत. स्वातंत्र्य नसेल तर माणूस खोटं बोलू लागतो. नात्यातला संवाद थांबतो आणि सारं नातंच कोलमडून पडतं. नात्यातली जबाबदारी स्विकारणं आणि जबाबदारीने नातं हाताळणं ही आजच्या काळाची गरज आहे, असं मला वाटतं.

हेही वाचाः वो सुबह कभी तो आयेगी!

(या लेखाचं शब्दांकन रेणुका कल्पना यांनी केलंय. सतरंगी वॅलेंटाईन या विशेष विभागातल्या लेखांची संकल्पना, संयोजन, संपादन शर्मिष्ठा भोसले यांचं आहे.)