आशिक लाथ कधी मारेल, सांगता येत नाही

१४ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


प्रत्येकाचं आपला छोटासा कुटुंबकबिला असावा, असं स्वप्न असतं. त्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्नांची पराकाष्टा करतो. एलजीबीटीक्यू समुदायातल्या माणसांनाही असंच वाटतं. हे स्वप्न साकारण्यासाठी त्यांना प्रेम हाच एकमेव मार्ग आहे. या रस्त्यात त्यांना प्रियकर, प्रेयसी, आशिक, पार्टनर मिळतोही. पण हे सगळं टेम्पररी. फॅमिली लाईफपासून तर अनेकांना मुकावं लागतं.

नही दे सकती मै तुम्हे बच्चा, असं म्हणणाऱ्या कुक्कूला ‘भाड मे जाए शादी, बच्चा, मुझे कुक्कू का गुडलक नही चाहीए. मुझे कुक्कू चाहिए. कुक्कू का प्यार चाहीए. कुक्कू की हंसी चाहिए.’ हा सेक्रेड गेम्समधला संवाद एलजीबीटीक्यू समुदायाचं जगणं सांगणारा आहे. पण प्रत्येकाला गणेश गायतोंडेसारखा समजूतदार पार्टनर मिळत नाही. हे एलजीबीटीक्यू समुदायातल्या प्रत्येकाचं दुःख आहे.

जिसकी कुक्कू, बंबई उसकी

‘जिसकी कुक्कू, बंबई उसकी’ इतका मोठ्ठा मान असतो कुक्कूला, एलजीबीटीक्यूमधून असतानाही. तिच्यासाठी गँग आपसात भिडतात. कुक्कू बरोबर असणं ताकदीचं मानलं जातं. पण कुक्कूला ते गुडलक मानतात. तिची जागा एका पुरुषाच्या आयुष्यात असते. अर्थात सगळे पुरुष असं मानत नाहीत. प्रेम असेल तर समाजासमोर स्वीकारण्याची ताकद सगळ्यांमधे नसते.

उन्हे लगता है हम हिजडे शौक पानी के लिए है. हमारे साथ सेक्स कैसे होगा, ये पहले जानना चाहते है वो. हमे अपनाना नही चाहते. सिर्फ मजे करने होते है. प्यार तो चाहते है क्या लेकीन मिलता है. इतर मुलींसारखी आम्हीपण लग्नाची स्वप्न बघतो. दे वाँट टू मॅरी विथ सेक्स, नॉट विथ द वुमन इनसाईड अस. वेल वेल वेल हे अशाच प्रतिक्रिया महिला मुलींच्याही असतात.

वॅलेंटाईन डे सेलिब्रेशनमधे खडा पडेल असंच काहीसं आहे ना हे. पण सत्य आहे. त्या स्वप्नवत दिवसाशी जोडलेलं हे कटू सत्य. मुली, महिलांच्या वाट्यालाही हे सत्याचे चटके कमीअधिक प्रमाणात आज उद्या येतच असतात. हिजडे, गे, लेस्बियन्स, ट्रान्सजेंडर अशी वर्गवारी केलीय आपण त्यांची. पण प्रेम आणि जोडीदाराच्या शोधात त्यांच्या वाट्यालाही फार वेगळा विस्तव येत नाही.

फसवणूक हा त्यांचा स्थायिभाव मानून आपण त्यांच्या नात्यांकडे पाहतो. पण कधी त्यांच्या टाळ्या आणि हसऱ्या चेहऱ्यांच्या पलिकडचं त्यांचं जगणं आपण पाहत नाही. आर्थिक लूट करण्यासाठी ते प्रेमाचं जाळं विणतात, असं समजून आपण त्यांना शिव्याशाप देतो. पण त्यांच्याही वाट्याला प्रेमाबरोबर जबरदस्तीचा सेक्स, लूट, फसवणूक, अत्याचार, अन्याय आणि कमीपणाच येतो.

तिने गुप्तांग जाळून अग्निपरीक्षा दिली

अमृता अल्पेश सोनी. अल्पेश सोनी हे तिच्या पहिल्या बॉयफ्रेण्डचं नाव. आजही ती त्या नावाबरोबर जगतेय. १९९९ ते २००७ ते एकमेकांच्या प्रेमात होते. त्यानंतर घराघरात होतात तशी भांडण आणि खटके उडू लागले. त्यानंतर पुन्हा तो काही वर्षांनी अमृताबरोबर राहू लागला. मग मात्र त्याने तिच्यावर संशय घ्यायला सुरवात केली. चारित्र्यावर संशय घ्यायचा. अमृताने परीक्षा म्हणून गुप्तांग जाळलं. जर मी खरी असेन तर वाचेन नाहीतर मरेन.

‘मी सीतेसारखी अग्निपरीक्षा दिली आणि मी वाचले. माझ्या मनातही पाप नव्हतं.’ अमृता सांगते. ‘तू एक हिजडा है और भीक मांगते, खुद को बेचतेही मरेगी’ हे वाक्य मात्र अमृताच्या जिव्हारी लागलं. आणि तिने तिचं जगण्याचं टार्गेट निश्चित केलं. ‘तेव्हापासून आजपर्यंत मी माझ्या टार्गेटच्या आड काहीच येऊ दिलं नाही.’ आज अमृताचे युट्यूबवर ४ लाख व्यूवर्स आहेत. तिच्यावर एक सिनेमाही येतोय.

अमृता गंमतीने सांगते. असा एक दिवस नसतो की ज्या दिवशी तिला प्रपोजल येत नाही. सगळे आय लव यू म्हणतात. सगळ्यांना लग्न करायचं असतं. ती थेट सांगते. घरात विचार, आईवडिलांना घेऊन या. मला लग्नासाठी मागणी घाला. पण हे सगळं होत नाही. मुलं प्रश्न विचारतात ‘डू यू हॅव पेनिस हाव विल वी डू सेक्स’ अमृता सांगते ' 'त्यांना आमच्याशी नाही सेक्सशी लग्न करायचं असतं.'

पार्टनर ऑफिसला जाई, तेव्हा त्याच्या डोळ्यात मी वाचू शकायची की संध्याकाळी त्याला नेमकं काय हवंय. त्याने कोणालाही मिठी मारली तर तिला त्याच्या शरीराच्या सुगंधावरुन ओळखता येई. इतना गहरा रिश्ता था, हम दोनो में. लेकीन उसने बाद में शादी की. आता अल्पेशला एक मुलगी आहे. त्याला अमृता आयुष्यात पुन्हा हवीय. पण अमृता अल्पेशला त्याच्या बायको आणि मुलीपासून  तोडू इच्छित नाही.

‘कोई औरत अपने मर्द को दुसरे के साथ बेड शेअर करते नही सह सकती. हम दुआ देते है, बददुआ नही लेना चाहते`, आयुष्यात खुप मोठं होण्याचं ध्येय घेऊन अमृता जगतेय.

ती लोकअदालची जज आहे

नागपूरची विद्या कांबळे लोकअदालतची जज आहे. पण तिच्या वाट्यालाही फारसे चांगले अनुभव आलेले नाहीत. एका हिजड्याला कुटूंबाने टाकून दिलं तर सगळी प्रेम, माया गुरू देतो. एक सुरक्षित कोपरा म्हणून अनेकजण गुरूकडे बघतात. हिजडा म्हणून जगायचं ठरवलं की सगळ्यात आधी कुटुंब आम्हाला सोडून देतं. आई बापाने माया केली तर, डोक्यावर हात ठेवला तर कशाला लागतोय पार्टनर.

हिजड्याच्या आयुष्यात प्रेम येतं ना. पण ते 'लुप छुप' के वालं असतं. समाजासमोर स्वीकारण्याची हिंमत नसते लोकांची. अनेक जण असेही असतात ज्यांना त्यांचे शौक पूर्ण करण्यासाठी हिजड्यांबरोबर राहायचं असतं. हिजड्यांच्या कमाईवर जगणारे पुरुष पाहिलेत मी. वॅलेंटाईनचं म्हणाल तर तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्या कोणाहीबरोबर हा दिवस साजरा करा.

बंगालची डेबी आणि चेन्नईची सत्यश्री

बंगालची डेबी आचार्य मात्र तिचा जोडीदार संतोषबरोबर आनंदी असल्याचं तिच्याशी बोलण्यावरुन वाटतं. संतोष हा माझा आधी मित्र आणि मग माझा पार्टनर आहे. त्याला माझ्या ट्रान्सजेंडर असण्याची खंत वाटत नाही. त्याने मला मी जशी आहे तसं स्वीकारलंय आणि मला तो चांगली वागणूक देतो. माझ्या दृष्टीने प्रेम, मैत्री आणि आदर म्हणजे प्रेम आहे, असं डेबी सांगते.

दर्पण एनजीओची प्रमुख, चेन्नईची सत्यश्री भारताची पहिली ट्रान्सजेंडर एडवोकेट आहे. तिने तिच्या करिअरवर फोकस केलं. पण तिलाही असंच वाटतं की हिजड्यांच्या आयुष्यात येणारं प्रेम हे आयुष्यभरासाठी नसतं. ‘अनेकदा प्रेमाची प्रपोजल्स आली पण मोकळ्या मनाने समाजासमोर स्वीकारणारं कोणीच नव्हतं,’ सत्यश्री खेदाने सांगते.

या आणि अशा सगळ्याजणी लग्नाचं स्वप्न बघतात ती रंगवतात. पण त्यांच्या वाट्याला फॅमिली लाईफ येतच नाही. सेक्स आणि लूट म्हणजे प्रेम आणि जोडीदार असाच यापैकी अनेकींचा अनुभव असतो. त्या गळ्यात मंगळसूत्र तर घालतात. पण त्यांचा एक कोणी नवरा त्यांनी मानला तरी नसतो. अर्थात त्यांचे नवरेही त्यांच्यावर संशय घेतात.

बाजारात बसलेला प्रत्येक हिजडा हा मनापासून स्वतःचं शरीर विकायला बसलेला नसतो. पण जगण्यासाठी आणि आयुष्यात सुख, प्रेम अनुभवण्यासाठी पैसा कमावण्याचा हा मार्ग लोकांनी त्यांच्यासमोर ठेवलेला असतो. अर्थात अमृता आणि सत्यश्रीसारख्या काही जणी त्यातूनही मोठ्या होतात. पण ज्यांच्याबाबत हे घडत नाही त्यांच्यासाठी वाट्याला येणारं प्रेम हे सेक्सपुरती मर्यादित राहतं.

एलजीबीटीक्यू समुदायाकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. प्रेमात धोका मिळाल्यानंतर त्यांना रडू येत. त्याही तुटतात. पण त्यांना हरुन चालत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी हसत, नाचत बधाईवर जावं लागतं. रात्री लिपस्टीक चोपडून छातीवरचा पदर सावरत बाजारात उभं रहावं लागतं. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ‘नवरा, प्रेमी, जोडीदार, आशिक कोणीही असो कधी गांडीवर लाथ मारेल’ सांगता येत नाही.

(सतरंगी वॅलेंटाईन या विशेष विभागातल्या लेखांची संकल्पना, संयोजन, संपादन शर्मिष्ठा भोसले यांचं आहे.)