लिंगभेदापलीकडची प्रेमाची वर्च्युअल पायवाट

१४ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आताच वॉट्सअप अपडेट केलं. एकदम बदलेल्या इमोजींवर लक्ष गेलं. त्यात बदलेल्या जोडप्यांच चित्र म्हणजेच दोन बाया त्यांच्या सोबतची त्यांची मुलं, दोन पुरुष यांच्या सोबत असलेली त्यांची मुलं असा या इमोजींची नवी सर्वसमावेशक कुटुंब मला फारच आवडून गेली. आपल्या आजुबाजुची लोक रोजच्या जगण्यात एलजीबीजीटीक्यू कम्युनिटीकडे बघून नाकं मुरडत असली तरी सोशल मीडियाने सतरंगी वॅलेंटाईनवर आपला शिक्का मारलाय.

नुकतचं वॉट्सअप अपडेट केलं. एकदम बदलेल्या इमोजींवर लक्ष गेलं. त्यात बदलेल्या जोडप्यांचं चित्र म्हणजेच दोन बाया त्यांच्या सोबत त्यांची मुलं, दोन पुरुष यांच्या सोबत असलेली त्यांची मुलं अशी या इमोजींची नवी सर्वसमावेशक कुटुंबं मला फारच आवडून गेली. वास्तविक समाजात सहज स्वीकारली न जाणारी ही बहूलिंगी जोडपी. पण सोशल मीडियामधे तरी इमोजीच्या स्वरुपात का होईनात आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालीत याचा आनंदच झाला. अशाच लैंगिक अल्पसंख्याक समाजाची आपलं प्रेम मिळविण्याची अदृश्य वाट ही व्हाया इटंरनेट आणि वर्च्युअल माध्यमातून जाते. या वाटेवरचं प्रेम त्यांना खरचं सापडतं काय याचा घेतलेला हा शोध.

‘मला माझ्यासारखा गे कम्युनिटीत असणार पहिला मित्र हा माझ्या फेक फेसबुक अकाऊंटवरुन मिळाला. इंटरनेट आणि सोशल मीडिया नसता तर कदाचित मी सुसह्य आयुष्य जगू शकलो नसतो. तिथं मला माझ्यासारखी, मला समजून घेणारी माणसं भेटली. तीन वर्षापूर्वी मी फेसबुकवर फेक अकाऊंट काढलं होतं त्यातूनच मला एक चांगला मित्र भेटला. त्याच्या माध्यमातून मी समपतीत ट्रस्टच्या संपर्कात आलो. हे आमचं जग चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकलो. आणि आज तिथेचं लैंगिक अल्पसंख्याक समाजासाठी काम करु लागलो.’ पुण्यात लॉचं शिक्षण घेणारा अनिल सांगतो.

पुढे तो म्हणतो, आणि आज मी गे ही माझी ओळख उघड करु शकलो. यात सर्वात मोठा वाटा हा सोशल मीडियाचाच आहे. फेक अकाउंट हे माझ्या भावना व्यक्त करण्याचं एक सशक्त साधन होतं. एक फेक अकाऊंट ते आज माझी समाजापुढे निर्भिडपणे ठळक सांगता येणारी ओळख, या माझ्या आयुष्यातल्या सकारात्मक बदलाचं श्रेय मी फेसबुकला देईन.

तो माझ्याशी अगदी मोकळेपणाने बोलत होता. ‘पण आजही  सार्वजनिक ठिकाणी सहजपणे डेटिंग ऍप उघडू शकत नाही. बाकीचे सहज वापरु शकतात. पण आम्हाला चोरुन वापरावं लागतं. एकप्रकारची भीतीच वाटत असते. आज मी माझी ओळख सोशल मीडियावर उघड केलीय. कदाचित महिलांपेक्षा जास्त त्रास आम्हाला दिला जातो. इनबॉक्समधे खूप असभ्य बोललं जातं. फोटो पाठवले जातात, सेक्सची मागणी केली जाते. पूर्वी अशांना मी ब्लॉक करायचो. पण आता ते सगळं सकारात्मक घेतो. हे लोक असे मेसेज का पाठवतात त्यांच्याशी संवाद साधतो. मग त्यांना आपलेपणा वाटू लागतो आणि ते नंतर खरं बोलू लागतात. यातूनच मला अनेक चांगले मित्र भेटलेत.’
   
ग्रामीण भागातल्या मुलामुलींना याविषयी बोलण्यासाठी स्पेस नसते. ते सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना दिसतात. मला इतकचं बोलावसं वाटतं की आम्हीपण माणसं आहोत आणि मुक्तपणे प्रेम करण्याचा आमचा अधिकार कोण नाकारु शकत नाही, असं अनिलला वाटतं.

‘माझ्याकडे पैसे नव्हते. पण मोबाईलचं कमालीचं आकर्षण होतं. पैसे जमवले आणि फोन घेतला. आज नऊ वर्ष झाली मी ट्रान्सजेंडर कम्यूनिटीचा भाग आहे. घरच्यांनीही जवळ केलं नाही आणि आजूबाजूचे लोकही दूर लोटतात. पण ही फेसबुकवरची माणसं आपली वाटतात. आज मोबाईल आणि ही अनोळखी माणसं यातूनच जगायचं बळ मिळतं. घरच्यांनाही कधीतरी मेसेज पाठवते. पण तिकडून उत्तर कधीच येत नाही. त्यांचं स्टेटस बघून तिकडे काय चाललयं याचा अंदाज येतो. कधी कधी वाटतं त्यांनी मला कळावं म्हणूनच स्टेटस ठेवलाय आणि ते फोटोच त्यांच्याशी संवादाचं साधन आहे. आज मोबाईल आणि इंटरनेट आमच्या दोन गरजा भागवतंय. पोटाची आणि प्रेमाची.’ चोवीस वर्षाची ही शोभा आपली आपबीती सांगते.

कोल्हापूर जवळच्या इचलकरंजीसारख्या छोट्याशा शहरातून आलेल्या शोभाचं इथे नाव बदलण्यात आलंय. बाजार मागून, नाच गाण्याचे कार्यक्रम करुन ती पोटं भरते. फेसबुकवर तिला हजारभर मित्र आहेत, असं ती मला खूप कौतुकाने सांगत होती.

‘तूझे फोटो मला खूप आवडतात. आपण एकदा भेटू शकतो का? असं सतत मला डेटिंग साईटवर तो विचारायचा. तसं तर बरेच लोक असं विचारुन त्रास देत असतात. मीही हे सवयीचं झाल्याने अशा लोकांकडे दुर्लक्ष करते. पण हा सतत विनंती करायचा. त्याच्या बोलण्यात मला आपलेपणा वाटायचा. म्हणून मी बोलू लागली. मग आमच्यात मैत्री झाली. नंतर लग्न केलं. पण ही गोष्ट सगळ्यांपासून लपवलीय. सगळ्यांनी नाकारलं असताना मला प्रेम करणारा साथीदार तर मिळाला आहे. पण आम्ही दोघेही घाबरत असतो, ही गोष्ट कुणाला कळू नये म्हणून.`

समाजाच्या भीतीने आपल्याला हव्या त्या माणसासोबत प्रेमच करता येत नसेल. लग्न करता येत नसेल तर काय उपयोग. समाजात मान्यता ही सोयीच्या प्रेमाला दिली जाते. आणि जे सोयीने प्रेम करतात ते प्रेम कसं असू शकतं, अशी प्रेमाची फिलॉसॉफीच राधिका मांडते. इथे तिचं नाव बदललंय. तिचं ऐकून व्यापक अर्थाने प्रेमाकडे बघण्याची नजर ज्यांना प्रेम पदोपदी नाकारलं जातंय, त्यांच्याकडे आलीय, याचाच विचार मी करु लागले.

लेस्बियन समुदायाची प्रतिनिधी असलेली सविता कुंभार पुण्यात राहते. तिच्या दृष्टीने कितीही माध्यमं आली त्यांचा विस्तार झाला तरी ती मुलींपर्यत उशीराच पोचतात. आणि पोचली तरी त्याचा मुक्त वापर करताना आजही पुर्णपणे मोकळीक मिळते, असं नाही. तरी पब्लिक टॉयलेटच्या बाहेर पडून आज एलजीबीटीक्यू समूदाय मोकळेपणाने बोलू लागलाय. भविष्यात आमचं अस्तित्व मान्य करावचं लागेल. अशी आशा बाळगून ती वयाच्या पस्तिसाव्या वर्षी आपल्या प्रेमासाठी, अस्तित्वासाठी कुटूंब, समाज आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेशी झगडतेय.

या सगळ्या आपल्या आजूबाजूच्या कथा. पण हे चित्र केवळ महाराष्ट्रापुरतं, भारतापुरतं मर्यादित नाही. जगभर थोड्याफार फरकानिशी असंच घडतंय. पुण्याच्या सावित्रीबाई फुले युनिवर्सिटीत शिकण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येतात. यात काही एलजीबीटीक्यूए कम्युनिटीतून आलेलेही असतात.

थायलंडमधे लेस्बियन मुलींसाठी एक वेबसाईट चालवली जाते. त्या माध्यमातून मला गर्लफ्रेंड मिळाली. आम्ही तीन, चार वर्षापासून सोबत राहतो. लेस्बियन मुलींचे प्रश्न हे खूप गंभीर आणि बाकी कम्यूनिटीपेक्षा खूप दबलेले, दुर्लक्षित आहेत. अशावेळी मित्र, कुटूंब कोणी मदतीला येत नाहीत. त्यावेळी इंटरनेटसारखी साधणं खूप महत्वाची भूमिका पार पाडतात, असं थायलंडची दारानी सांगत होती.

ती पॅन सेक्शुअल आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिवर्सिटीच्या स्त्री अभ्यास केंद्रात भारतातल्या हेट्रोसेक्शुअल जोडप्यांवर ती रिसर्च करतेय. विवाहित जोडप्यांमधले पुरुष टिंडरसारख्या माध्यमांचा वापर करुन शारीरिक गरजा भागवण्यासाठी अविवाहित मुलींचा शोध का घेतात? यात कशा पद्धतीने पितृसत्ताक व्यवस्था काम करते? हा तिच्या रिसर्चचा विषय आहे.

प्रत्येक माणसासाठी प्रेम ही एक वेगळीचं अनुभूती असते. त्यात भावनिक, लैंगिक आकांक्षाचा एक नैसर्गिक परिपाक असतो. आणि त्याला योग्य ती वाट करुन देणं आवश्यक आहे. प्रेम भावनेचं दमन हे क्रूरपणाचं आहे. टेक्नॉलॉजीचा प्रदेश दिवसेंदिवस विस्तारत चाललाय. आता माणूस म्हणून जाणिवांचा प्रदेश विस्तारणं ही आपली माणूस म्हणून नैतिक जबाबदारी आहे.

आपल्या या पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेत कुटुंब व्यवस्थेला, स्त्री-पुरुष नातेसंबंधांना असाधारण महत्व दिलंय. त्यात ठराविक काळात, वेळेत प्रेम झालचं पाहिजे. लग्न आणि त्यानंतर मुलं झालीच पाहिजेत, असे अनेक अलिखित नियम घातले गेलेत. यातूनच आपल्या प्रेमाच्या नव्या संकल्पना तयार होत जातात. खरं प्रेम करण्याच्या नादात आपण प्रेम करायचं कसं, हेच विसरुन जातो. यामुळेच प्रेम, लग्न आणि नातेसंबधांच्या ज्या प्रस्थापित पद्धती आहेत त्यांना चॅलेज करण्याचं सामर्थ्य हे लैंगिक अल्पसंख्याक समुदायाच्या प्रेमाच्या संकल्पनांमधे आहे.

तृतीयपंथी समुदायाची प्रतिनिधी माधूरी सरोदे यांनी जय शर्मा यांच्याशी विवाह केलाय. दोघांची ओळख फेसबुकवरूनच झाली. मग मैत्री आणि आपली ओळख जाहीर करुन दोघांनी लग्न केलं.

माधुरी सांगतात, ‘प्रेम हे जात, धर्म, काळ, स्टेटस, लिंगापलिकडे माणसाला एक माणूसपण देणारी अनुभूती आहे. ज्या नात्यांमधे या गोष्टी अडथळे निर्माण करतात ते प्रेम स्वार्थी असतं.’ त्यांचे पती जय शर्मा हे हेट्रोसेक्शुअल आहेत. ते सांगतात, ‘मैंने माधुरीसे प्यार किया है. उसके जेंडर से नहीं. हमारे शादी में भी बहुत दिक्कते आयी. पर हमारा प्यार हमारी ताकद था. आज हमारे परिवार भी हमारे साथ है.’ दोघंही राईट टू लवतर्फे पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांचे अनुभव निर्भीडपणे मांडत होते.

काही दिवसांपुर्वीच मी प्रख्यात लेखिका अमृता प्रीतम यांचे जोडीदार इमरोझ यांना भेटलीय. व्यापक अर्थाने प्रेम करुन कोणत्याही बंधनाशिवाय ते प्रेम करत जगले. ‘हमे अपना प्यार पानें के लिये प्यार के काबिल होना बहुत जरुरी होता है. और प्यार कभी नाप नहीं सकते. प्यार कभी जादा कम नहीं होता है. अपना प्यार पाने के लिए हमे प्यार के काबील होना जरुरी होता है. प्यार हमें इन्सान बनकर जिने के काबिल बनाने की प्रक्रिया है.’ हा त्यांचा संवाद मला आठवत होता. 

पण जर एखाद्या समुदायाला प्रेम करण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा आपण अधिकारच देणार नसू, तर आपली माणूस म्हणून किती प्रगती झालीय, असा प्रश्नच आहे. माधुरी, अनिल, सविता, दारानी यांच्यासारखे अजून कित्येक जण आहेत ज्यांना आपल्या अस्तित्वासाठी, प्रेमाची माणसं मिळण्यासाठी झगडावं लागतंय. पण तरी ते आपल्या पद्धतीने प्रेमाची समांतर व्यवस्था निर्माण करु पाहताहेत. त्यांच्या साथीला ही वर्च्युअल माध्यमं जशी आहेत त्याच पद्धतीने आपणही साथ देऊया. त्यांच्या या व्यापक प्रेमाला सदिच्छा देत आपणही यानिमित्ताने प्रेम करायला शिकुयात! 

(सतरंगी वॅलेंटाईन या विशेष विभागातल्या लेखांची संकल्पना, संयोजन, संपादन शर्मिष्ठा भोसले यांचं आहे.)