क्रिकेटच्या पिचवर रंगतोय सतरंगी प्रेमाचा किस्सा

१४ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


सतरंगी प्रेमाला गेल्या काही वर्षांत खेळाच्या मैदानावरही स्पेस मिळू लागलीय. या स्पेसमुळे भारावूनही जाता येत नाही आणि तितकं निराशही होण्याची गरज नाही. देर आये दुरुस्त आये म्हणत क्रिकेटच्या पिचवर आता सतरंगी प्रेमाला धुमारे फुटू लागलेत. यासाठीही पुन्हा बाईनेच पुढाकार घेतलाय. लेस्बियन क्रिकेटर्सनी पुढे येत आपली लवस्टोरी जगजाहीर केली. गे क्रिकेटर्स मात्र यात अजून खूप मागे आहेत.

१०  नोव्हेंबर २०१८.

वेस्ट इंडीजमधलं प्रोविडन्स गयानाचं मैदान.

प्रोविडन्स या इंग्रजी शब्दाचा अर्थ डिक्शनरीमधे भविष्यासाठी केलेली तरतूद किंवा दूरदर्शीपणा असा आहे. गेल्या १० नोव्हेंबरला प्रोविडन्सवर झालेल्या मॅचमधेही क्रिकेटविश्वाला मानवी नातेसंबंधांच्या संदर्भात अधिक खुलं, अधिक समंजस बनवणारं असंच एक भविष्यकालीन तरतुदीचं बोल्ड स्टेटमेंट अतिशय ओपनली केलं जाणार होतं.

त्या मॅचची सुवर्णाक्षरांनी दखल घ्यावी लागणार

भारत विरुध्द न्यूझीलंड हा महिलांच्या टी-२० वर्ल्ड कपची ओपनिंग मॅच. टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिनं या मॅचमधे फक्त ४९ बॉल्समधे सेंच्युरी ठोकली. टी-२० मॅचमधे सेंच्युरी ठोकणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर होण्याचा मान मिळवला. पण या घटनेहूनही महत्वाची अशी दुसरी ऐतिहासिक गोष्ट याच दिवशी मैदानात घडली. जेव्हा केव्हा जागतिक क्रिकेटचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी या मॅचची दखल सुवर्णाक्षरांनी घ्यावी लागेल.

न्यूझीलंडची अॅमी सॅट्टेर्थवेट आणि तिची लेस्बियन पार्टनर ली ताहूहू या समलैंगिक जोडीने पहिल्यांदाच एकाचवेळी क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवलं होतं. आयसीसीच्या कुठल्याही महत्वाच्या टूर्नामेंटमधे एखाद्या समलिंगी कपलने असं खुलेपणाने मैदानात उतरण्याची ही फक्त महिलांच्याच नाही, तर एकंदरीतच क्रिकेटविश्वातली पहिलीच घटना होती. सट्टेर्थवेट- ताहूहू ही जोडी मैदानात उतरली त्यावेळी अवघं क्रिकेटविश्व या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालं.

सट्टेर्थवेट- ताहूहू जोडीने खुलेपणाने समोर येताना जणू एक वहिवाटच घालून दिली होती. त्या वाटेवरून त्यानंतरच्या अवघ्या तिसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकन टीमची कॅप्टन डेन वॅन निकर्क आणि तिची लेस्बियन पार्टनर मेरीझेन कॅप याही चालणार होत्या. क्रिकेटमधे पहिल्यांदाच एक मॅरिड लेस्बियन कपल म्हणून २२ यार्डच्या पीचवर त्या दोघी उतरणार होत्या.

आयडेंटीटी सांगण्यासाठी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म

गेल्यावर्षी झालेल्या या महिला वर्ल्डकपमधे क्रिकेटशिवाय सर्वाधिक चर्चा कुठल्या गोष्टीची झाली असेल तर ती या स्पर्धेत सहभागी झालेल्या लेस्बियन कपल्सची. आपलं लेस्बियन असणं ही एक वेगळी सेक्शुअल आयडेंटीटी आहे आणि स्ट्रेट असण्याइतकीच ती नॅचरल आहे, हे अतिशय स्पष्टपणे सांगण्यासाठी अनेक महिला क्रिकेटर्सनी आयसीसीचा हा आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म वापरला. त्यांच्या या प्रयत्नाला तितकाच सकारात्मक प्रतिसादही मिळाला.

एखाद्याचं समलिंगी असणं महिला क्रिकेटविश्वाने त्यामानाने खूप खुलेपणाने स्वीकारलंय. महिला क्रिकेटमधलं पहिलं लेस्बियन लग्न झालं ते मार्च २०१५ मधे. त्यावेळी माजी ऑस्ट्रेलिअन क्रिकेटर अॅलेक्स ब्लॅकवेल हिनं आपली क्रिकेटरच असणाऱ्या आपल्या पार्टनर लीन्से अॅस्क्यू हिच्याशी लग्न केलं. त्यावेळी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अशा दोन्हीही देशांमधे समलिंगी संबंध इतक्या सहजपणे स्वीकारले जाण्याची परिस्थिती नव्हतीच. तरीसुद्धा त्या दोघींनी हे पाऊल उचललं.

त्यानंतर पुढे जुलै २०१७ मधे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर इलीस विलानी हिनेही आपलं लेस्बियन असणं जगजाहीर केलं. २०१७ मधेच ऑस्ट्रेलियन पार्लमेंटने समलैंगिक लग्न संबंधांना कायदेशीर ठरविण्यासंदर्भात एक पोस्टल सर्वे केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मेगन शट हिनेही इन्स्टाग्रामवरून आपली पार्टनर जेस होलीयाक हिला किस करतानाचा फोटो पोस्ट केला. आणि आपण लवकरच लग्न करणार असल्याचंही जाहीर केलं.

पुरुष क्रिकेटपटू अजून मागेच

विमेन्स क्रिकेटमधे समलिंगी संबंधांच्या बाबतीत इतकं खुलेपण बघायला मिळत असताना मेन्स क्रिकेटमधून मात्र याला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. काल परवाचीच गोष्ट आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरू असलेल्या टेस्टमधे वेस्ट इंडिजचा पेसर शेनॉन गॅब्रिअल याने इंग्लडच्या जो रूट याच्याशी स्लेज करताना अवमानकारक शब्दांचा वापर केला.

गॅब्रिअलने रूटला नेमकं काय म्हटलं याबाबतीतला तपशील उपलब्ध नसला तरी त्यावर रूटने दिलेलं उत्तर मात्र मीडियात आलंय. त्यात रूट म्हणतोय की, 'ड्युड, असे शब्द वापरणं योग्य नाही. गे असण्यात चुकीचं असं काहीच नाही.'

रूटच्या उत्तरावरून अंदाज लावता येऊ शकतो की गॅब्रिअलने सेक्शुअल आयडेंटिटीवरून छेडायचा प्रयत्न केला असावा. अर्थात या घटनेची गंभीर दखल आयसीसीने आणि क्रिकेट जगतानेही घेतली. एकीकडे ज्यो रूटच्या या संयमित आणि समंजस उत्तराचं प्रचंड कौतुक झालं आणि दुसरीकडे शेनॉन गॅब्रिअलवर आयसीसीच्या कोड ऑफ कंडकटचं उल्लंघन केल्यामुळं तब्बल चार मॅचसाठी बंदी घालण्यात आलीये.

पण जग बदलतंय

क्रिकेट जगतात आपल्या बिनधास्त आणि रांगड्या अॅटिट्यूडसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघातल्या एखाद्या खेळाडूकडून झालेली ही कृती निराशाजनक आहे. तरी ज्यो रूटकडून त्याला मिळालेला प्रतिसाद मात्र अधिक आशादायी आहे. विमेन्स क्रिकेटने घालून दिलेल्या पायांड्याला पुढे घेऊन जाणारा आहे.

वॅलेंटाईन डेच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने एकीकडे या बहुरंगी, बहुढंगी प्रेमाकडे बघण्याचा क्रिकेटजगताचा उदार दृष्टिकोन तर समोर आणलाच. त्याचवेळी आपल्यापेक्षा वेगळ्या सेक्शुअल आयडेंटिटीचा टॅबू सोडायला तयार नसणारे आणि या ओळखीकडे विकृती म्हणून बघणारे एलेमेंटदेखील इथेच आहेत, हेही अधोरेखित केलं.

(अजित बायस हे मुक्त पत्रकार आहेत. सतरंगी वॅलेंटाईन या विशेष विभागातल्या लेखांची संकल्पना, संयोजन, संपादन शर्मिष्ठा भोसले यांचं आहे.)