दुसऱ्या एलिझाबेथवर बनलेल्या या सिनेकृती पाहायलाच हव्यात

१२ सप्टेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


ब्रिटनच्या महाराणी दुसऱ्या एलिझाबेथ यांचं नुकतंच निधन झालं. त्यांनी ब्रिटनवर सर्वाधिक काळ राज्य केलं. त्यांची ही राजेशाही कारकीर्द अनेक बऱ्यावाईट कारणांमुळे कायमच समाजमाध्यमांच्या चर्चेत राहिली. गेल्या कित्येक वर्षांत अनेक सिनेमे आणि वेबसिरीजमधून त्यांच्या आयुष्याचा आढावा घेतला गेलाय.

वयाच्या पंचविसाव्या वर्षीच ब्रिटनच्या महाराणी बनलेल्या दुसऱ्या एलिझाबेथ यांचं नुकतंच बाल्मोराल कॅसल इथं निधन झालं. ६ फेब्रुवारी १९५२ ते ८ सप्टेंबर २०२२ ही त्यांची सत्तर वर्षांची राजेशाही कारकीर्द आजवरची ब्रिटनमधली सर्वात मोठी राजेशाही कारकीर्द मानली जाते. यावर्षीच जूनच्या पहिल्या आठवड्यात राणीच्या राजवटीला सत्तर वर्षं पूर्ण झाल्याच्या आनंदात मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला गेला होता.

ब्रिटीश राजघराण्यावर आलेल्या अनेक वादळी संकटांना सामोरं जात दुसऱ्या एलिझाबेथ यांनी राजघराण्याची इज्जत शाबूत ठेवली. लोकशाही तत्वावर चालणाऱ्या ब्रिटीश सरकारला त्यांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलं. आपल्या मिश्कील स्वभावामुळे त्या समाजमाध्यमांमधेही लोकप्रिय होत्या. याला सिनेमाचं क्षेत्र तरी कसं अपवाद असेल? त्यांच्या आयुष्याशी निगडीत अशा आजवरच्या बऱ्याच सिनेकृतींना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय.

डॉक्युमेंटरीतली ‘महाराणी’

१९५३ला आलेल्या ‘अ क्वीन इज क्राऊन्ड’ या त्यांच्यावरच्या पहिल्याच डॉक्युमेंटरीला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. १९५४ला राणीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आधारित ‘द क्वीन इन ऑस्ट्रेलिया’ ही डॉक्युमेंटरी रिलीज झाली. ऑस्ट्रेलियात बनलेला हा पहिला कलर होता सिनेमा होता. त्याचबरोबर, ‘बीबीसी’ने अलीकडच्या काळात बनवलेल्या डॉक्युमेंटरींनाही विशेष प्रतिसाद मिळाला.

१९६९मधे ‘बीबीसी’ने ‘रॉयल फॅमिली’ ही डॉक्युमेंटरी रिलीज केली. या डॉक्युमेंटरीतून ब्रिटीश राजघराण्यात सगळं कसं आलबेल आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. आधी जाहीर प्रदर्शनाला संमती दिल्यानंतर राणीच्या आदेशावरून ही डॉक्युमेंटरी बॅन करण्यात आली. राजघराण्याबद्दल जरा जास्तच माहिती लोकांना दिल्यामुळे या डॉक्युमेंटरीला राणीचा रोष पत्कारावा लागला. सध्या ही डॉक्युमेंटरी वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

राणीचा चाळीसावा राज्याभिषेक दिन डोळ्यासमोर ठेवून १९९२ला ‘एलिझाबेथ आर’ ही डॉक्युमेंटरी बीबीसीने रिलीज केली. १९९० ते १९९१ या वर्षभरात राणीच्या अवतीभवती जे जे घडलं त्याची झलक या डॉक्युमेंटरीमधे होती. प्रचंड खपाने या डॉक्युमेंटरीची सीडी विकली गेली. २०१६ला आलेल्या ‘एलिझाबेथ अॅट ९०’ या डॉक्युमेंटरीमधे राणीचं ९० वर्षांचं आयुष्य राजघराण्यातल्या सदस्यांनी आपल्या आठवणींमधून उलगडत नेलं.

२०१८ची ‘द कोरोनेशन’ ही राणीच्या पासष्टाव्या राज्याभिषेक दिनानिमित्त बनवण्यात आलेली डॉक्युमेंटरी अनेक कारणांनी गाजली. यात राणीने पहिल्यांदाच आपल्या मुकुटातली रत्नं स्वतःहून कॅमेऱ्यासमोर दाखवत मुलाखत दिली होती. ‘एलिझाबेथ: द अनसीन क्वीन’ ही डॉक्युमेंटरी मे २०२२मधे रिलीज झाली. यात आजवर आधी कधीच न दिसलेली वेगळी राणी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तिचे राज्याभिषेकाआधीचे कित्येक क्षण या डॉक्युमेंटरीत कैद केले गेले होते.

राणीचा सिनेमा आणि सिनेमातली राणी

ब्रिटीश जनता, विशेषतः ब्रिटनचं राजघराणं हे त्यांच्या सामाजिक शिष्टाचारांसाठी ओळखलं जातं. छोट्याछोट्या गोष्टींबाबतही काटेकोर नियमावलीचं पालन करणाऱ्या या राजघराण्यात अनेक बंडाळ्या उठल्या आणि कालांतराने शमल्याही. पण यात सर्वाधिक चर्चा कुणाची झाली असेल तर ती राणीच्या थोरल्या सुनेची, अर्थातच ‘लेडी डायना’ची! ब्रिटीश जनतेची लाडकी राजकुमारी असलेल्या डायनाचा १९९७मधे अपघाती मृत्यू झाला.

२००६ला आलेल्या स्टीफन फ्रीअर्स दिग्दर्शित ‘द क्वीन’ या सिनेमाची सुरवातच डायनाच्या मृत्यूने होते. डायनाच्या मृत्यूचं प्रकरण आणि त्याबद्दल राणीने घेतलेली हटवादी भूमिका हा या सिनेमाचा केंद्रबिंदू होता. जगभरातल्या समीक्षकांकडून नावाजल्या गेलेल्या या सिनेमात हेलन मिरेननं राणीची भूमिका साकारली होती. त्यासाठी तिला ऑस्कर आणि गोल्डन ग्लोबसह अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.

त्यानंतर २०१५ला ‘अ रॉयल नाइट आऊट’ हा सिनेमा आला, ज्यात राणीची भूमिका सारा गेडन हिने साकारली होती. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असला तरी त्यात काल्पनिक प्रसंग आणि पात्रांचा भरणा केला होता, ज्यामुळे तो अधिकच रंगतदार बनला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने विनाशर्त शरणागती स्वीकारल्यानंतर लंडनमधे विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्या रात्री राजकुमारी एलिझाबेथने काय केलं हे या सिनेमात दाखवलं गेलंय.

प्रत्यक्षात, एलिझाबेथने आपल्या एका नेहमीच्या गटासोबत त्या रात्री विजयोत्सवाचा आनंद लुटला होता. पण सिनेमात मात्र ती आपल्या मोठ्या बहिणीसोबत सगळ्यांची नजर चुकवून महालातून पळून जाते, असं दाखवलं होतं. क्रिएटीव लिबर्टीचा पुरेपूर फायदा घेत दिग्दर्शक ज्युलियन जेरोल्डनं एलिझाबेथचं महाराणी बनण्यापूर्वीचं अल्लड आयुष्य या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर चितारलं होतं.

हेही वाचा: हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

वेबसिरीजच्या विश्वातली महाराणी

‘द क्वीन’ या २००९ला आलेल्या टीवी मालिकेत एकूण पाच एपिसोड आहेत. या पाचही एपिसोडमधे राणीची भूमिका वेगवेगळ्या अभिनेत्रींनी साकारली होती. एमिलीया फॉक्स, समंथा बाँड, सुझान जेम्सन, बार्बरा फ्लिन आणि डायना क्विक या अभिनेत्रींनी पाच वेगवेगळ्या आणि महत्त्वपूर्ण कालखंडातल्या राणीची भूमिका यात साकारली होती.

२०१६ला ‘द क्राऊन’ या वेबसिरीजचा पहिला सीझन नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. २०१३ला आलेल्या ‘द ऑडियन्स’ या नाटकावर आधारित ही वेबसिरीज होती. या वेबसिरीजमधे क्लेअर फॉय आणि ऑलीविया कॉलमन या अभिनेत्रींनी राणीची भूमिका साकारली होती. या वेबसिरीजचे प्रत्येकी दहा एपिसोड असलेले चार सीझन आत्तापर्यंत रिलीज करण्यात आले असून, आणखी दोन सीझन येत्या काळात बघायला मिळणार आहेत.

सिरीजची सुरवात १९४७मधे राणीच्या लग्नापासून होते. पहिल्या सीझनमधे राणीचा राज्याभिषेक, ब्रिटनचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल यांचा राजीनामा तसंच १९५५पर्यंतच्या अनेक घडामोडींचा वेध घेतला गेलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचा ब्रिटन दौरा, त्यांची हत्या, घानाचं स्वातंत्र्य आणि सुएझ कालवा वादासारख्या १९५६ ते १९६४मधल्या महत्त्वाच्या विषयांना सिरीजच्या दुसऱ्या सीझनमधे हात घातला गेला.

तिसरा सीझन १९६४च्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीपासून सुरु होतो आणि राणीच्या रौप्य महोत्सवी राज्याभिषेक दिनावर संपतो. विस्टन चर्चिल यांचा मृत्यू, अमेरिकेची चांद्रमोहीम, अॅबरफॅन दुर्घटना अशा प्रसंगांचा यात समावेश आहे. भारताचे शेवटचे वॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांचा मृत्यू, फॉकलँड युद्ध, लेडी डायनाचं राजघराण्यातलं आगमन आणि मार्गारेट थॅचर यांची पंतप्रधान म्हणून नेमणूक आपल्याला चौथ्या सीझनमधे पाहायला मिळते.  

राणी आणि भारतीय सिनेमा

ब्रिटनसारख्या लोकशाही तत्त्वांनुसार चालणाऱ्या देशातही आपला राजेशाही थाट टिकवून ठेवलेली राणी अनेकांच्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय आहे. तिच्या वादळी आणि प्रदीर्घ कारकिर्दीमुळे जिवंतपणीच राणी एक आख्यायिका बनली होती. त्यामुळे जगभरातल्या अनेक सिनेकृती तसंच अगदी ‘मिस्टर बीन’, ‘टॉम अँड जेरी’ आणि ‘फॅमिली गाय’सारख्या लोकप्रिय कार्टूनवरही राणीच्या आयुष्याची छाप आहे. भारत आणि भारतीय सिनेमाही याला अपवाद नाही.

यश राज फिल्म्सच्या लोकप्रिय ‘धूम’ सिनेमालिकेतल्या ‘धूम २’ची तर सुरवातच राणीच्या मुकुटचोरीपासून झाली होती. या सिनेमात चोराची मध्यवर्ती भूमिका साकारणारा हृतिक रोशनच राणीच्या भूमिकेत दिसला होता. २०१९च्या ‘हाऊसफुल ४’मधल्या ‘एक चुम्मा’ या गाण्यात तर पूर्ण ब्रिटीश राजघराणंच ठेका धरताना दाखवलं गेलं. नृत्यदिग्दर्शिका फराह खानने खास या गाण्यासाठी ब्रिटीश राजघराण्यातल्या व्यक्तींशी मिळतेजुळते चेहरे असणाऱ्या कलाकारांची निवड केली होती. 

‘बघतोस काय मुजरा कर’ या मराठी सिनेमात अभिनेते जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव आणि अक्षय टांकसाळे हे छत्रपतींची तलवार मिळवण्यासाठी थेट राणीच्या महालात शिरायचा प्रयत्न करतात असं दाखवलं होतं. नुकत्याच आलेल्या ‘दे धक्का २’मधे अभिनेते शिवाजी साटम राणीच्या प्रेमात पडतात आणि सिद्धार्थ जाधव त्यांचा मुकुट चोरतो असा प्रसंग होता. यात राणीच्या भूमिकेत भारती आचरेकर यांनी रंग भरले होते.

मराठीत तर ‘एलिझाबेथ एकादशी’ नावाचा सिनेमाही आला होता, ज्यात चक्क एका सायकलचं नाव एलिझाबेथ ठेवलं गेलं होतं. यात लहानगी मुक्ता साकारणारी सायली भंडारकवठेकर ज्ञानेशच्या भूमिकेतल्या श्रीरंग महाजनला सायकलचं नाव आणि त्यामागचा अर्थ विचारते. तो एलिझाबेथ म्हणजे ‘टिकाऊ’ असा अर्थ तिला सांगतो. सिनेमातली सायकलही राणी दुसऱ्या एलिझाबेथसारखी खूप वर्ष टिकली आणि टिकावी अशी मुक्ता आणि ज्ञानेश या लहान भावंडांची समजूत होती.

हेही वाचा: 

ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?

ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

‘मिशन मंगल’ सिनेमा बघून आपलं मंगलयानही आत्महत्या करेल!

हिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला?