लॉकडाऊन असू शकेल का कोरोना पेशंटची संख्या वाढण्यावरचं उत्तर?

०१ मार्च २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात आपली प्रयोगशाळा, हॉस्पिटल सुसज्ज करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लॉकडाऊन महत्त्वाचं होतं. ते पुन्हा लागू करणं योग्य नाही. स्वतःवर काही आवश्यक बंधनं घालून घेतली तर लॉकडाऊन न करताही आपल्याला कोरोनाचा बंदोबस्त करता येईल. आता तर आपल्या मदतीला लसही आलीय. कोरोनासोबत जगायला शिकणं आता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे.

महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचे पेशंट कमी होताना दिसत होते. त्यामुळे सगळीकडे एक मुक्ततेची भावना होती. आठ-नऊ महिन्यांपासून लॉकडाऊन आणि विविध बंधनांमुळे लोक स्वाभाविकच वैतागले होते. त्यामुळे ऑक्टोबरपासून अगदी जानेवारीच्या मध्यापर्यंत कोरोना पेशंटचा आलेख दिवसेंदिवस कमी होताना पाहून हे संकट आता संपलंय, अशी भावना अनेकांच्या मनात होती.

जानेवारीच्या मध्यानंतर अनेक जिल्ह्यांमधे आणि विशेषतः विदर्भातल्या अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात कोरोनाने परत तोंड वर काढलेलं दिसतंय. राज्यात रोजच्या पेशंटची संख्या मागच्या काही दिवसांमधे अडीच ते तीन हजारांवर आली. ती पुन्हा सहा, सात आणि आठ हजारांपर्यंत गेल्याचं २४ फेब्रुवारी २०२१ च्या आकड्यांवरून स्पष्ट झालं.

ही कोरोनाची दुसरी लाट म्हणावी का, अशी सगळीकडे चर्चा सुरू झाली. याची नेमकी कारणं काय आहेत? कोरोना वायरस बदललाय का? या भागांमधे नवीन स्ट्रेन आलाय की काय, असे एक ना अनेक प्रश्न आणि चर्चा सध्या सुरू झाल्यात.

हिवाळी वातावरणाचा फायदा

कोरोना पेशंटमधे पुन्हा वाढ होण्याची साधारणपणे तीन ते चार ठळक कारणं आपल्या समोर येतात. यातलं पहिलं कारण हे वातावरणाशी संबंधित आहे. मागच्या तीन-चार आठवड्यांमधे उत्तर भारतात थंडीची लाट आलेली आपण पाहिलीय. या थंडीच्या लाटेचा अप्रत्यक्ष परिणाम राज्याच्याही हवामानावर झालेला दिसून येतो. विदर्भासह अनेक जिल्ह्यांमधलं किमान तापमान मागच्या काही दिवसांमधे पाच ते सात डिग्री सेल्सिअसने कमी झालं.

हिवाळ्यातलं वातावरण हे नेहमी हवेनं पसरणार्‍या स्वाईन फ्लू किंवा कोरोनासारख्या वायरसच्या प्रसारासाठी पोषक असतं. त्यामुळे या वातावरणाचा हातभार या वाढीला नक्कीच लागलाय, असं दिसतं. ऑक्टोबरपासून कोरोनाचा उतरता आलेख लक्षात घेऊन आपण आपलं सामाजिक आणि आर्थिक जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी टप्प्याटप्प्याने अनलॉक करतो आहोत आणि ते आवश्यकही आहे.

हेही वाचा : लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?

ग्रामपंचायत निवडणुका आणि लग्नांमधली गर्दी

जानेवारीच्या मध्यावर आपण राज्यातल्या १४ हजारांहूनही अधिक गावांमधे ग्रामपंचायत निवडणुका घेतल्या. या ग्रामपंचायत निवडणुकांमधे ८० टक्क्यांहून अधिक मतदान झालं. स्वाभाविकपणे गावपातळीवरच्या या निवडणुकीत मतदान करण्यासाठी वेगवेगळ्या शहर, जिल्ह्यांमधे काम करणारी, नोकरीधंद्याच्या निमित्ताने बाहेर राहणारी गावकरी मंडळी काही दिवसांसाठी आपापल्या गावी गेली आणि आली. या सगळ्यामुळे मोठी सामाजिक सरमिसळ झाली, यात काहीच शंका नाही.

निवडणुकीचा प्रचार, सभा, मिटिंग या सगळ्यात लोक कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आवश्यक असणारी पंचसूत्री विसरून गेले. त्यामुळे अशा भागांमधे पेशंट संख्या वाढताना सध्या आपण पाहतोय. सातारा जिल्ह्यातला कोरेगाव रहिमतपूर भाग असेल किंवा पुणे जिल्ह्यातला शिरूर तालुका असेल या ठिकाणी गावपातळीवरच्या निवडणुकांचा काही परिणाम पेशंटच्या वाढीवर झालेला दिसून येतो.

पेशंट वाढीचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, लग्न किंवा इतर कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रम पुन्हा कोरोना पूर्वीच्या उत्साहाने पार पडू लागले आहेत. चार-पाचशे तर सोडा, हजार लोकांपेक्षाही अधिक गर्दीची लग्नं होताना आपण अनेक ठिकाणी पाहिलंय. कोरोना प्रसार टाळण्यासाठी कोणतीही काळजी न घेता अशा समारंभात सहभागी होणारे तुम्ही-आम्ही सगळे एक प्रकारे आपापल्या भागात या आजाराच्या वाढत्या संख्येस कारणीभूत आहोत, हे नाकारता येणार नाही.

वायरस बदललाय का?

वायरसची जनुकीय रचना बदलणं, बदलत राहणं हा त्याचा नेहमीचा भाग आहे. भारतातच हा वायरस असंख्य वेळा बदलला आहे; पण हे बदल अगदी सूक्ष्म असतात आणि अनेकदा फारसे महत्त्वाचे नसतात.

वायरस बदलतात म्हणजे काय आणि का बदलतो, हे दोन प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनात आहेत. वायरस एखाद्या सजीव पेशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची वाढ होते म्हणजे तो स्वतःच्याच अनेक कॉपी तयार करतो.

एका अर्थाने एखाद्या झेरॉक्स मशिनवर आपण मूळ कागदपत्राच्या अनेक प्रती कराव्यात, अशा पद्धतीने एका वायरस कणाचे अनेक वायरस कण पेशीत तयार होतात. मात्र, या कॉपी तयार करताना आपल्याकडून जसे टायपो होतात, स्पेलिंग मिस्टेक होतात त्या पद्धतीने वायरसच्या कॉपी करतानाही घडतं आणि त्यातून वायरसच्या रचनेत बदल होऊन वायरस म्युटेट होतो.

हेही वाचा : नवा कोरोना वायरस भारतात 'सुपर स्प्रेडर' ठरेल?

धोकादायक आजारांचा वेग

वायरसमधे होणारे हे बदल अनेकदा नजरचुकीने होणारे बदल असतात, तर काही वेळा प्रतिकारकशक्तीला फसवण्यासाठी, तिच्यावर मात करण्यासाठी वायरसविरोधी औषधांचा मारा चुकवण्यासाठी केलेले जाणीवपूर्वक बदलही असतात. कोणत्याही सजीवाच्या उत्क्रांतीमधली नैसर्गिक निवड हा एक महत्त्वाचा घटक आहे.

म्हणजे वायरसमधे हे जे बदल सातत्याने होत असतात त्यातला जो बदल वायरसला तगून राहण्यासाठी मदत करतो. हे बदल अधिक काळ टिकतात. ज्या शरीरात वायरसने प्रवेश केलाय त्याला मारण्यात वायरसचंही नुकसान असतं. कारण, मग त्याला नवीन जिवंत पेशी शोधावी लागते म्हणूनच अत्यंत घातक स्वरूपाचे बर्ड फ्लूसारखे वायरस अधिक वेगाने पसरताना दिसत नाहीत. तर वेगाने पसरणारे फ्लूसारखे वायरस तेवढे प्राणघातक नसतात.

जनुकीय रचनेचा अभ्यास

वायरस आपली जनुकीय रचना बदलतो तेव्हा त्याचा काय परिणाम होतो? जनुकीय रचना बदलल्यामुळे वायरसला काही वेळा नव्या गोष्टी जोडल्या जातात. काही वेळा हे बदल वायरसच्या प्रसारास मदतशीर ठरतात किंवा काही वेळा प्रसाराचा वेग मंदावतोही. काही विशिष्ट बदलांमुळे वायरस मानवी शरीरातल्या कोणत्या अवयवावर हल्ला करेल, याचं स्वरूपदेखील बदलू शकतं.

वायरसच्या धोकादायक स्थितीत बदल होऊ शकतात. त्यामुळे सध्या जगभरात ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील देशातल्या वायरस बदलाची चर्चा सुरू आहे. आपण या जनुकीय रचनेचाही नियमित अभ्यास देशातल्या दहा प्रयोगशाळांच्या मदतीने करत आहोत. महाराष्ट्रातली कोरोना पेशंटची वाढ ही वायरस बदलामुळे झालेली नाही, असं सध्या तरी दिसतंय.

हेही वाचा : लसीचे साईड इफेक्ट अच्छे हैं

कोरोनापासून वाचायची पंचसूत्री

एकूण काय, वायरस बदललेला असला किंवा नसला तरी तुमच्या-माझ्यासाठी कोरोना टाळण्याचे साधे-सोपे उपाय मात्र बदललेले नाहीत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कोरोना आपल्यापर्यंत, आपल्या घरापर्यंत येऊ नये, यासाठी वापरायची पंचसूत्री अगदी सोपी आहे. ही पाच तत्त्वं म्हणजे समूहात असताना मास्कचा वापर करा. आपले हात साध्या साबण आणि पाण्याने रोज धुवा. समूहात परस्परांपासून किमान दोन मीटरचं अंतर राखा.

याशिवाय महत्त्वाचं म्हणजे, आपण आपलं सामाजिक आणि आर्थिक जनजीवन सुरळीत ठेवणं. कारण, त्याशिवाय आपल्या जगण्याचा गाडा चालू शकणार नाही. पण रेल्वे, बसेस आणि विमानं सुरू आहेत म्हणून आपण गरज नसताना प्रवास करू नये, अनावश्यक प्रवास टाळणं अत्यंत आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधातलं हे चौथं सूत्र आहे.

यासोबतच आपले घरगुती, कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यक्रम आवश्यक असतील तरच करावेत. अशा कार्यक्रमांना गर्दी होऊ नये याची काळजी घ्यावी. प्रशासनाने जी अट घातलीय, तिचं काटेकोर पालन करावं आणि अशा कार्यक्रमांमधे कोरोना अनुरूप वागावं. सर्व लोक कोरोना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतील, हे पाहावं.

समाजात ज्या कुणाला फ्लूसारखी लक्षणं आहेत त्यांनी ती न लपवता डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. अनेकदा कोरोनाच्या भीतीने लोक सर्दी, खोकला अंगावर काढतात, हे चुकीचं आहे. पॉझिटिव पेशंटची आपल्या संपर्कातल्या व्यक्तींची माहिती आरोग्य खात्याला देणं आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व व्यक्तींचं सर्वेक्षण वेगानं करणं शक्य होतं. प्रसाराला आळा घालता येतो.

सुपर स्प्रेडरमधे कोण येतं?

सुपर स्प्रेडर लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. सुपर स्प्रेडर म्हणजे ज्यांचा जनसंपर्क अधिक आहे असे लोक. या समूहात खालील लोकांचा समावेश होतो.

छोटे व्यावसायिक गट : किराणा दुकानदार, भाजीवाले पदपथावर विविध वस्तूंची विक्री करणारे इतर विक्रेते, हॉटेल मालक आणि वेटर्स

घरगुती सेवा पुरवणारे : न्यूजपेपर, दूध घरपोच करणारी मुलं, घरगुती काम करणार्‍या मोलकरणी आणि इतर नोकर, गॅस सिलिंडर वाटप करणारे कर्मचारी, इलेक्ट्रिकविषयक कामं, नळजोडणी दुरुस्ती अशी घरगुती कामे करणार्‍या व्यक्ती, लाँड्री, इस्त्रीवाले, पुरोहित

वाहतूक व्यवसायातले लोक : मालवाहतूक करणारे ट्रक ड्रायवर्स, टेम्पोचालक, रिक्षाचालक

वेगवेगळी कामं करणारे मजूर : हमाली, रंगकाम, बांधकाम करणारे मजूर

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतले ड्रायवर, कंडक्टर आणि इतर कर्मचारी

हाऊसिंग सोसायटीमधे काम करणारे सिक्युरिटी गार्ड, सुरक्षारक्षक

आवश्यक सेवा पुरवणारे शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसंच पोलिस, होमगार्ड इत्यादी या सुपर स्प्रेडर व्यक्तींना फ्लूसारखी लक्षणं असतील, तर त्यांच्या संपर्कामुळे हा आजार अधिक वेगाने पसरू शकतो. म्हणून या मंडळींनी अधिक दक्षता बाळगायला हवी.

लॉकडाऊन नको असेल तर

आपण या सार्‍या गोष्टी सांभाळल्या, तर हा आजार पुन्हा कमी होईल. गरज आहे ती आपण जबाबदारीने वागण्याची! कारण लॉकडाऊन हे काही या आजारावरचं कायमस्वरूपी उत्तर नाही. ते केवळ पॉज बटण आहे. साथीच्या सुरवातीच्या काळात आपली प्रयोगशाळा, हॉस्पिटल सुसज्ज करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लॉकडाऊन महत्त्वाचं होतं. ते पुन्हा पुन्हा लागू करणं योग्य नाही.

सध्या गरज आहे सगळ्या गोष्टी सुरू असतानाही आपण खबरदारी पाळण्याची, स्वतःवर काही आवश्यक बंधनं घालून घेतली तर लॉकडाऊन न करताही आपल्याला कोरोनाचा बंदोबस्त करता येईल आणि आता तर आपल्या मदतीला लसही आली आहे. लॉकडाऊन न करताही कोरोनासोबत जगायला शिकणं आता आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे.

हेही वाचा : 

आयपीएल २०२१ च्या लिलावामागचं लॉजिक काय?

युनोनं २०२१ फळं, भाजीपाल्यांचं वर्ष जाहीर का केलंय?

कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?

ईबोलापासून नायजेरियाला वाचवणाऱ्या डॉक्टरच्या सन्मानाबद्दल अबोला

(लेखक राज्य शासनाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम अधिकारी आहेत)