पाकिस्तानने महाराजा रणजित सिंहांचा पूर्णाकृती पुतळा का उभारला?

२८ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजित सिंह यांच्या स्मृती जागवण्यासाठी पाकिस्तानात पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. लाहोर किल्ल्यातल्या या पुतळ्याचं आज २७ जूनला रणजित सिंह यांच्या १८० व्या स्मृतिदिनी लोकार्पण करण्यात आलं. यासाठी पाकिस्तानने खास भारतातून पाहुणे बोलावले.

शेर-ए-पंजाब म्हणून लोकप्रिय महाराजा रणजित सिंह यांचा आता पाकिस्तानातही पुतळा उभारण्यात आलाय. लाहोर किल्ल्यातला हा पूर्णाकृती पुतळा आठ फुटाचा आहे. आठ महिन्यात पुतळा उभारण्याचं हे काम पूर्ण करण्यात आलं. १९ व्या शतकात पंजाबवर तब्बल ४० वर्ष राज्य करणाऱ्या महाराजा रणजित सिंह यांचा गुरुवारी १८० वा स्मृतिदिन आहे.

पाकिस्तानची जय्यत तयारी

यानिमित्ताने पाकिस्तानच्या लाहोरमधे उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचं लोकार्पण केलं जाणार आहे. यासाठी पाकिस्तानातल्या पंजाब सरकारने जोरदार तयारी केलीय. भारतातल्या शीख बांधवांना या सोहळ्याला उपस्थित राहता यावं म्हणून पाकिस्तान सरकारने ५०० यात्रेकरूंना व्हिसा दिलाय. अगोदर २७ जून ते ६ जुलै या कालावधीसाठी ४६३ जणांना व्हिसा देण्यात आला होता. नंतर बुधवारी पाकिस्तानने आणखी २२४ जणांना व्हिसा दिला.

तरीही केवळ २८२ लोकांनीच व्हिसासाठी अर्ज केला. प्रत्यक्षात केवळ २२४ लोकांनाच पाकिस्तानला जाता येणार आहे. त्यामुळे व्हिसासाठी अर्ज केलेल्यांनी आता आंदोलन सुरू केलंय. व्हिसा मिळालेले सर्व यात्रेकरू गुरुवारी एका विशेष रेल्वेने अटारीहून पाकिस्तानसाठी रवाना झाले.

हेही वाचाः टीम इंडिया निळ्याऐवजी केशरी रंगाच्या जर्सीमधे का खेळणार?

कोण आहेत महाराजा रणजित सिंह?

महाराजा रणजित सिंह यांना शीख समाजात मोठा मान आहे. त्यांना शीख साम्राज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. १३ नोव्हेंबर १७८० ला त्यांचा जन्म झाला. रणजित सिंहांनी पंजाबला एक मजबूत राज्य म्हणून एक ठेवलं. इंग्रजांना आपल्या साम्राज्यापासून दूर ठेवण्यातही त्यांना यश आलं.

रणजितसिंह यांचा हा पुतळा लाहोरच्या किल्ल्यात महाराणी जिंदां महलाच्या समोर उभारण्यात आलाय. इथेच रणजित सिंह यांची समाधी आणि गुरू अर्जून देव सिंह यांचा गुरूद्वारा डेरा साहीब आहे. विशेष म्हणजे रणजित सिंहांच्या लहान्या बायकोच्या नावावरून महाराणी जिंदां महल हे नाव देण्यात आलंय. या महलाला आता प्रदर्शनी म्हणजेच एका गॅलरीत रूपांतरीत करण्यात आलंय. या गॅलरीला शीख गॅलरी म्हणून ओळखलं जातं.

लाहोर शहराचा वारसा संवर्धनाचं काम करणाऱ्या वाल्ड सिटी ऑफ लाहोर अथॉरिटी अर्थात डब्ल्यूसीएलएने हा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी इंग्लंडमधल्या एसके शीख फाऊंडेशनची मदत घेतली. या संस्थेने पुतळा उभारण्याचा खर्च उचलला.

जगभरातला असा एकमेव पुतळा

या पुतळ्यामधे महाराजा रणजितसिंह एका घोड्यावर स्वार आहेत. महाराजांच्या ताफ्यातला अरबी जातीचा हा घोडा कहार बहार नावाने ओळखला जातो. त्यांना हा घोडा दोस्त मुहम्मद खान यांनी भेट दिला होता. साडेपाच फूट उंची असलेल्या महाराजांना चपळ आणि बुद्धिमान म्हणून ओळखला जाणारा हा घोडा खूप आवडायचा. 

लाहोर नॅशनल कॉलेज ऑफ आर्ट अँड नक्श स्कूल ऑफ आर्ट इथल्या तीन शिल्पकारांनी हा पुतळा साकारला. आठ फुटी पुतळा साकारण्यासाठी आठ महिने लागले. या पुतळ्यासाठी ८५ टक्के ब्राँझ, ५ टक्के कथिल, ५ टक्के शिसं आणि ५ टक्के जस्त या धातूंचा वापर करण्यात आला, अशी माहिती डब्ल्यूसीएलएने एका पत्रकात दिलीय.

दरवर्षी डागडुजी केल्यास या पुतळ्याला ३५ ते ५० वर्ष काहीच होणार नाही.  अशा पद्धतीचा हा जगातला एकमेव पुतळा आहे, असं फकीर कहाना संग्रहायलयाचे डायरेक्टर फकीर सैफुद्दीन यांनी सांगितलं. पाकिस्तानी दैनिक द नेशनशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

भारताच्या संसद परिसरातही रणजित सिंह यांचा पुतळा उभारण्यात आलाय. २००३ मधे संसद परिसरात ब्राँझचा २२ फुटी पुतळा उभारण्यात आला. तीन वर्षांआधी २०१६ मधे फ्रान्सच्या सेंट ट्रोफ्ज शहरातही महाराजा रणजित सिंह यांच्या स्मृती जोपासण्याचे प्रयत्न म्हणून महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.

हेही वाचाः शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

लाहोरचं वेगळेपण काय?

लाहोर हे बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक ओळखी एकसाथ वागवत असलेलं शहर म्हणून ओळखलं जातं. इथल्या सगळ्या जातीधर्मांना सोबत घेऊन एकात्मता जोपासण्याचं काम महाराजा रणजितसिंहांच्या काळात झालं. सगळ्या वंशांना, जातींना त्यांनी एका धाग्यात बांधून ठेवलं.

फकीर सैफुद्दीन सांगतात, 'महाराजा रणजित सिंह यांच्या काळात लाहोरमधे एकही दंगल झाली नाही. तसंच बळजबरीने धर्मांतराचे प्रकारही घडले नाहीत. अनेक दशकं ते ब्रिटीश आर्मीपुढे एका पोलादी भिंतीसारखं उभं राहिले. हा पुतळा म्हणजे एका भूमिपुत्राचा सन्मान आहे.'
 
७० वर्षांपासून लाहोरला लुटून खाणाऱ्या अफगाणी जमन शाह दुर्रानीच्या ताब्यातून रणजितसिहांनी या शहराची सुटका केली. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी शाहचा पराभव केला. लाहोरमधल्या मुघल पद्धतीच्या स्थापत्यशैलीची त्यांनी जोपासना केली. अशा या महान पराक्रम राजाची २७ जून १८३९ रोजी प्राणज्योत मालावली.

पाकने परवानगी दिली, कारण

डब्ल्यूसीएलएचे डायरेक्टर कामरान लशैरी यांनी सांगितलं, 'धार्मिक पर्यटनवाढीवर आमच्या सरकारचा भर आहे. करतारपूर साहीब, ननकाना साहीब यांच्या कामाला आमच्या सरकारचं प्राधान्य आहे. धार्मिक पर्यटनातही शीख पर्यटनाला विशेष प्रोत्साहन दिलं जातंय. यादृष्टीनेच रणजित सिंह यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय.' 

गेल्यावर्षी सप्टेंबरमधे करतारपूर इथल्या गुरुद्वारा दरबार साहीबसाठी पाकिस्तानने भारताला सोबत घेऊन एक कॉरिडोअर तयार करत आहे.

१९७४ मधे धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमधे एक करार झालाय. त्यानुसार भारतातले शेकडो भाविक वेगवेगळे सणोत्सव साजरे करण्यासाठी दरवर्षी पाकिस्तानला जातात.

हेही वाचाः 

हैदर अली आणि टिपू सुलतान यांना न्याय देणारा इतिहास

ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम

वडिलांमुळे युवीला स्केटींगऐवजी क्रिकेटमधे यावं लागलं

बसभाडं ५ रुपये केल्याने, बेस्ट पुन्हा मुंबईची लाईफलाईन बनेल?

वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेता केलं काँग्रेसनं आणि थँक्स म्हणाले बाळासाहेबांना, कारण