आश्चर्यच, मुंबईत काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढू शकेल

१८ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


कुचकामी नेतृत्व, दिशाहीन प्रचार, नवखे उमेदवार, साधनांची वानवा यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतलं काँग्रेसचं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं वाटतंय. तरीही मुंबईतल्या ३६ पैकी किमान १९ जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांची धुगधुगी दिसतेय. तिथे युतीचा विजय वाटतो तितका सोपा नाहीय. या मतदारसंघांत विरोधकांचे फासे नीट पडले तर भाजपला नाही, तर शिवसेनेला फटका बसू शकतो.

१९९५च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेना भाजपचं तुफान आलं होतं. त्याआधी सत्तेत असलेली काँग्रेस फक्त एक कुलाब्याची जागा जिंकू शकली होती. त्याशिवाय समाजवादी पक्षाचे तीन आमदार सोडून बाकी सगळे आमदार शिवसेना भाजपचेच होते. आज २५ वर्षांनंतर काँग्रेसचं तसंच पानिपत होणार की काय, असं मानलं जाणं स्वाभाविक आहे. पण प्रत्यक्षात तितकी वाईट परिस्थिती दिसत नाही.

आता तर युती आहे

पण २०१४च्या विधानसभा निवडणुकीत मुख्य सामना भाजप आणि शिवसेनेत झाला. काँग्रेसचे कसेबसे पाच आमदार जिंकून आले. मालाड पश्चिम, चांदिवली, मुंबादेवी हे तीन मुस्लिमबहुल मतदारसंघ आणि धारावी हा दलित मतांचा किल्ला यांनी काँग्रेसची लाज राखली. कालिदास कोळंबकरांनी लोकसंपर्काच्या जोरावर वडाळ्यात पंजा टिकवला होता. पण आता ते भाजपवासी झालेत.

काँग्रेसचे ५, समाजवादी पक्ष १, एमआयएम १, याशिवाय शिवसेना १४ आणि भाजप १५, असं एकूण संख्याबळ होतं. आता त्यात कोळंबकर युतीत जोडले तर मुंबईच्या ३६ पैकी ३० जागा युतीकडे आहेत. हे घवघवीत यश भाजप सेनेने एकमेकांच्या विरोधात लढून मिळवलं होतं. आता तर ते दोघेही एकत्र आलेत. त्यामुळे काँग्रेसचा सुपडा साफ होण्याची समीकरणं मांडली जात आहेत.

हेही वाचाः दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणातल्या चार महत्त्वाच्या गोष्टी

काँग्रेसची सगळ्यात मोठी गोची कोणती?

मुळात मुंबईत काँग्रेसच्या नेतृत्वाच्या पार चिंधड्या चिंधड्या झाल्यात. परवा राहुल गांधींच्या मुंबईतल्या सभेत मिलिंद देवरा, संजय निरुपम, जनार्दन चांदूरकर, कृपाशंकर सिंग हे मुंबई काँग्रेसचे नजीकच्या काळात झालेले एकही अध्यक्ष नव्हते. गुरुदास कामत यांना तर काळानंच ओढून नेलंय.

राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जाणारे देवरा सध्या रुसून बसलेत. त्यांचं निरुपम यांच्याशी ट्विटर वॉर सुरू आहे. त्यामुळे दोघांचीही इमेज रसातळाला गेलीय. सध्याचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या मर्यादा आहेत. त्यांचीही संघटनेत अनेकांशी दुश्मनी आहे. त्यामुळे काँग्रेस ऐन निवडणुकीत निर्णायकी झालीय.

विशेषतः मनसेच्या उदयानंतर काँग्रेसने मुंबईतली विरोधकांची स्पेस गमावलीय. मनसे आणि सेना यांच्यातल्या फाटाफुटीचा फायदा काँग्रेसला मध्यंतरी झाला. पण त्यात काँग्रेसचं मुंबईतला मुख्य विरोधी पक्ष हे स्थान गेलं. आधी मनसे, त्यानंतर गेल्या वेळच्या निवडणुकांत शिवसेना आणि भाजप यांनी एकमेकांविरोधात गरळ ओकून काँग्रेसला मुख्य रिंगणाबाहेर फेकलं. तिथे काँग्रेसची सगळ्यात मोठी गोची झालीय.

युतीचे दिग्गज विरुद्ध काँग्रेसचे नवखे

मुंबईत काँग्रेसला नेतृत्वच नसल्यामुळे पक्षाकडे ना प्रचाराची रणनीती आहे, ना पैसा. काही अपवाद वगळता उमेदवार नवखे आहेत. त्यांची नावंही कुणी ऐकलेली नाहीत. उपलब्ध पर्यायांपैकी बरा पर्याय निवडून काँग्रेसने नगास नग लढती उभ्या केल्यात. मात्र काँग्रेसमधल्या प्रस्थापितांच्या तुलनेत हे नवे उमेदवार मेहनत करत आहेत.

मुंबईत काँग्रेसची वोटबँक असूनही अनेक जागांवर ती लढतीतही नाही. त्या तुलनेत युतीचे उमेदवार सर्वच बाबतीत तगडे आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेस उमेदवारांचा पाड लागत नाहीय. या उमेदवारांमधून काँग्रेसचं नवं नेतृत्व उदयाला येईल, असंही दिसत नाही. अर्थातच दोन चार चांगले चेहरे यातून पुढे येऊ शकले, तरी काँग्रेसने खूपच मिळवलं.

मुस्लिम आणि नवबौद्ध मतदारांची संख्या चांगली आहे, फक्त तिथेच काँग्रेस लढतीत आहे. कधीकाळी काँग्रेसची हक्काची वोटबँक असणारे हिंदी भाषक, दाक्षिणात्य, पंजाबी हे समाज आता भाजपबरोबर गेलेले दिसतात. मराठी, गुजराती, मारवाडी मतदारांपैकी काँग्रेसचा एक परंपरागत गठ्ठा आहे. पण तोही आक्रसला आहे.

हेही वाचाः रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली

फक्त पाच मतदारसंघांत युती पिछाडीवर

आता पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसचे बडेबडे उमेदवार होते. देशपातळीवरचे नेते मैदानात उतरले होते. इंटलेक्च्युअल्स ठाण मांडून बसले होते. पण प्रत्यक्ष निकालात काँग्रेसचा एकही उमेदवार चमक दाखवू शकला नाही. आता त्याच मुंबईत नेतृत्वहीन, हतबल काँग्रेसकडून कुणाच्याही अपेक्षा नाहीत. अशावेळेस अपेक्षेपेक्षा बरी कामगिरी होण्याची शक्यता दिसतेय. काँग्रेसच्या साथ्या साध्या उमेदवारांनी काही जागांवर रंगत आणलीय.

लोकसभा निवडणुकीत मानखुर्द - शिवाजीनगर, वांद्रे पूर्व, धारावी, भायखळा आणि मुंबादेवी हे पाच मतदारसंघ वगळले तर इतर सगळ्याच जागांवर युतीचे उमेदवार आघाडीवर होते. मोदी लाट सर्वोच्च उंचीवर असताना काँग्रेसने हे गड टिकवले, याचा अर्थ तिथे आता विधानसभेत काँग्रेस आघाडी चांगली कामगिरी करू शकते.

पाचपैकी मानखुर्द – शिवाजीनगर इथे समाजवादी पक्षाचे अबू असीम आझमी उभे आहेत. त्यांनी लोकसभेतले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांना ४० हजारांहून जास्त लीड दिली होती. त्यामुळे तिथून आझमी पुन्हा आमदार होण्याची शक्यता खूप आहे.

तेच धारावीच्या बाबतीतही म्हणता येईल. लोकसभेत काँग्रेसला ९ हजारांचं लीड मिळवलं होतं. तिथला शिवसेनेचा उमेदवार अनोळखी असल्यामुळे काँग्रेसच्या सध्याच्या आमदार वर्षा गायकवाड पुन्हा जिंकू शकतात. काँग्रेसचे दुसरे विद्यमान आमदार अमीन पटेल यांनीही लोकसभेत काँग्रेसला त्यांच्या मुंबादेवी मतदारसंघात जवळपास वीस हजारांचं मताधिक्य दिलं होतं. त्यामुळे त्यांचीही स्थिती मजबूत आहे.

भायखळा आणि वांद्रे पूर्वही लढतीत

मुंबादेवीशेजारच्या भायखळा मतदारसंघाने लोकसभेत काँग्रेसला तब्बल ३० हजारांचा लीड मिळवून अनेकांचा बुचकळ्यात पाडलं होतं. सध्या तिथे एमआयएमचे वारिस पठाण आमदार आहेत. मुस्लिम मतदार एमआयएमला कंटाळला असेल तरच तिथे काँग्रेसला फायदा होऊ शकतो. तिथे काँग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण आणि शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्यात मुख्य लढत होतेय.

यामिनी शिवसेनेचे मुंबई महापालिकेतले स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. त्या गेले काही वर्षं तिथे जोरदार तयारी करत आहेत. स्थानिक काँग्रेस नेत्यांनाही त्यांनी शिवसेनेत आणलंय. त्यामुळे तिथे जिंकण्यासाठी मधू चव्हाणांना सगळा अनुभव पणाला लावावा लागेल.

आश्चर्य म्हणजे वांद्रे पूर्व मतदारसंघात लोकसभेच्या गणितात काँग्रेस दोन हजारांनी का होईना पण आघाडीवर होती. हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. इथेच ठाकरेंचं घर मातोश्री आहे. पण हा मतदारसंघ सध्या चर्चेत आलाय. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेने इथे मैदानात उतरवलंय. 

पण तिकीट कापलेल्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केलीय. शिवाय मनसेचे अखिल चित्रे हे उत्साही कार्यकर्तेही शिवसेनेची काही हजार मतं घेऊ शकतात. काँग्रेसने माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसचे हातावर मोजण्याइतके उमेदवार जिंकण्यासाठी लढताना दिसतात, त्यापैकी ते एक आहेत.

हेही वाचाः भाजपसाठी ब्राम्हणबहुल कोथरूड हे काँग्रेसच्या वायनाडसारखं आहे का?

काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना टफफाईट

काँग्रेसचे विद्यमान आमदार नसीम खान आणि अस्लम शेख यांच्यासाठी लोकसभेतली आकडेवारी धक्कादायक आहे. अस्लम शेख यांच्या मालाड पश्चिम मतदारसंघात उर्मिला मातोंडकर उमेदवार असूनही २० हजारांनी मागे होत्या. नसीम खान यांच्या चांदिवली मतदारसंघात प्रिया दत्त २७ हजारांनी मागे होत्या. या दोन्ही जागांवर दोन्ही आमदारांचा हक्काचा मतदार आहे. पण दोघांच्याही विरुद्ध युतीचे उमेदवार तगडे आहेत. त्यामुळे या दोघांसाठीही लढत सोपी नाही.

कुर्ला, कलिना, वांद्रे पश्चिम, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अणुशक्ती नगर, सायन कोळीवाडा, कुलाबा या नऊ जागांवर लोकसभेच्या आकडेवारीत युतीचं मताधिक्य २० हजारांहून कमी आहे. याचा अर्थ तिथे काँग्रेस आघाडी किमान लढण्याच्या परिस्थितीत आहे. पैकी कुलाब्यात भाजपने राज पुरोहित यांना हटवून त्यांचे कट्टर विरोधक राहुल नार्वेकर यांना तिकीट दिलीय. तिथे पुरोहितांनी एक बंडखोर उभा केलाय. त्याचा फायदा घेत काँग्रेसच्या भाई जगतापांनी चांगली मुसंडी मारलीय. पण ती अद्याप निर्णायक ठरेल इतकी नाही.

बंडखोरीमुळे काही समीकरणं बदललीत

वर्सोवा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती लव्हेकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी बंडखोरी केलीय. तिथे काँग्रेसचे माजी आमदार बलदेव खोसा पुनरागमनासाठी जोरदार लढत आहेत. अंधेरी पूर्वेलाही भाजपच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे रमेश लटके अडचणीत आलेत. काँग्रेसचे अमीन कुट्टी बंडखोरीचा किती फायदा उचलू शकतात, यावर निकाल अवलंबून असेल.

कलिना मतदारसंघात काँग्रेसने जॉर्ज अब्राहम हे ख्रिश्चन उमेदवार देऊन खेळी केलीय. पण तिथे माजी आमदार कृपाशंकर सिंग यांनी काँग्रेस सोडल्यामुळे समीकरणं बदललीत. माजी आमदार जगन्नाथ शेट्टी यांचं नुकतंच निधन झालं. नाहीतर सायन कोळीवाडाही लढतीत असता. गणेश यादव हा काँग्रेसचा कार्यकर्ता हिरीरीने लढतोय. पण त्याची धडक भाजपला पाडण्यासाठी पुरेशी वाटत नाही.

हेही वाचाः काँग्रेसला न्याय, केजरीवालांना चुनौती देणाऱ्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल

राष्ट्रवादीलाही दोन ठिकाणी संधी

वांद्रे पश्चिममधे शिक्षणमंत्री आशिष शेलार आणि अंधेरी पश्चिममधे अमित साटम या भाजपच्या तगड्या उमेदवारांसमोर अनक्रमे काँग्रेसचे असिफ झकेरिया आणि अशोक भाऊ जाधव यांनी आव्हान उभं केलंय. चेंबूरमधेही वंचित बहुजन आघाडीने जास्त मतं घेतली नाहीत तर काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश फातर्फेकर यांना अडचणीत आणू शकतात.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन माजी मंत्री नवाब मलिक आणि मिलिंद कांबळे यांनीही जोरदार प्रचार चालवलाय. मलिक यांच्यासमोर अणुशक्तीनगर इथे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांचं आव्हान आहे. त्यांचा जनसंपर्क तगडा आहे. मुस्लिम आणि दलित मतं एकगठ्ठा पडली तरच नवाब मलिक काठावर निघू शकतात.

तेच समीकरण मिलिंद कांबळेंनाही मदतीला येऊ शकतं. दिंडोशी इथे उभ्या असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण चर्चेत आहेत. याच मतदारसंघातल्या आरेमधे मेट्रोसाठी वृक्षतोड झालीय. त्यावर खूप टीका झाली. पण तो शिवसेनेचा गड असल्याने भगवा फडकत राहण्याची शक्यताच जास्त आहे.

पण मुंबई हवेवर चालते

याशिवाय मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या दोघांचीही लोकसभा निवडणुकीत चर्चा होती. आता राज ठाकरे वीडियोही लावत नाहीत आणि प्रकाश आंबेडकरांभोवती तयार झालेलं वलय विरळ झालंय. चेंबूरला माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर आणि विक्रोळीमधे सिद्धार्थ मोकळे या वंचितच्या उमेदवारांनी प्रचारात जोर लावलाय. मुलूंडमधे मनसेच्या हर्षला चव्हाण यांचीही चर्चा आहे. तिथे भाजपमधल्या कुरबुरी आणि मराठी-गुजराती वाद यामुळे वातावरण फिरल्यास इंजिन चालण्याचा चमत्कार होऊ शकतो.

एकूण ३६ पैकी जवळपास अर्ध्या मतदारसंघात काँग्रेस स्थानिक समीकरणांमुळे किमान लढत देताना दिसतेय. इतर ठिकाणी युती दणदणीत यश मिळवताना दिसतेय. मुंबईच्या निवडणुका या हवेवर चालतात आणि जिंकल्या जातात, हे गेल्या काही वर्षांत वारंवार पाहायला मिळालंय. विशेषतः भाजपने त्यासाठीचं यशस्वी तंत्र विकसित केलंय.

सध्या तरी हवा हीच आहे की मुंबईत भाजप-शिवसेनाच जिंकणार. पण भाजपचा काँग्रेससह कोणताही मुद्दा प्रभावी ठरलेला नाही. विरोधी पक्ष कुचकामी असल्याचा मेसेज मतदारांपर्यंत पोचवण्यात मात्र त्यांना यश आलंय. त्यामुळे काँग्रेसचं एकुणात कठीणच आहे. त्यातल्या त्यात युतीच्या हवेला आरे आणि पीएमसी बँक घोटाळा या दोन अनपेक्षित उद्भवलेल्या प्रकरणांनी थोडा धक्का दिलाय.

आज काँग्रेसचे फक्त चार आमदार आहेत. ती संख्या वाढली तर ते सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसचं मोठंच यश मानायला हवं. ते अगदीच अशक्य नाही. विशेष म्हणजे काँग्रेस जिथे फाईटमधे आहे त्या बहुसंख्य जागा शिवसेनेकडे आहेत. चार पाच जागा वगळल्या तर भाजपच्या सगळ्या जागा सेफ दिसत आहेत. त्यामुळे मुंबईत काँग्रेस चालो किंवा न चालो, भाजप जोरात असणार आहेच. अडचण झाली तर ती शिवसेनेचीच होऊ शकते.

हेही वाचाः 

साताऱ्यात तिसरी मिशी इतिहास घडवणार का?

मोदी-राहुल यांची महाराष्ट्रातल्या प्रचाराची बोहनी काय सांगते?

डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार या पाच मुद्द्यांभोवती फिरणार

माणिकराव जाधवांनी शरद पवारांना ईडीच्या फेऱ्यात कसं अडकवलं?