विदर्भातील दहा हाय व्होल्टेज लढतीकडे राज्याचं लक्ष

१८ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


एकेकाळचा बालेकिल्ला विदर्भात यंदा काँग्रेसचा अस्तित्वाचा संघर्ष सुरू आहे. भाजपनेही गेल्यावेळपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला लावलीय. गेल्या काही वर्षांत एक ट्रेंड तयार झाला. विदर्भात सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षालाच राज्यातला सत्ताधारी बनता आलंय. त्यामुळे साऱ्याच पक्षांनी आपापली समीकरणं जुळवण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्यात.

विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला. पण यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसची अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीची धडपड सुरू आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात हे चित्र बघायला मिळतंय. विदर्भात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाची सत्ता असा एक ट्रेंड आपल्याला दिसतो. १९९९ ते २०१४ पर्यंत काँग्रेसचे सर्वाधिक आमदार होते. तेव्हा काँग्रेसची सत्ता होती. २०१४ मधे भाजपने सर्वाधिक ४४ जागा जिंकत राज्यातही सत्ता स्थापन केली.

यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर यांच्यासह सहा विद्यमान मंत्री आणि आजी माजी मंत्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी दहा ते बारा लढतींनी साऱ्या विदर्भाचं लक्ष वेधलंय.

विदर्भातल्या टॉप टेन लढती

नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसच्या डॉ. आशिष देशमुख यांच्यात लढत आहे. इथे मुख्यमंत्र्यांना पराभूत करणं सोपं नाही. असं असतानाही आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांपुढे आव्हान उभं केलंय.

विशेष म्हणजे २००४ च्या निवडणुकीत फडणवीस यांनी आशिष यांचे वडील डॉ. रणजीत देशमुख यांचा पराभव केला होता. आणि आता देशमुख यांचाच मुलगा आशिष देशमुख यांचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची फौज मैदानात उतरलीय.

हेही वाचाः डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का?

भंडाऱ्यात तिकीट कापाकापी

भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा, साकोली या तीन ही मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदारांचे तिकीट कापलेत. या ठिकाणी नव्या उमेदवारांना संधी दिलीय. यापैकी साकोलीमधे भाजपचे माजी खासदार नाना पटोले काँग्रेसकडून मैदानात उतरलेत. त्यांच्याविरोधात भाजपने राज्यमंत्री डॉ. परिणय फूके यांना उमेदवारी दिलीय.

येत्या काळात विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याचे संकेत भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींकडून देण्यात आलेत. त्यामुळे विधानपरिषदेतून निवडून येत मंत्री झालेल्या डॉ. फुके यांना भाजपने साकोलीतून मैदानात उतरवलंय. त्यामुळे पटोले विरुद्ध फुके ही लढत अधिक रंगतदार झालीय. इथे काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये वंचितच्या तिकिटावर उभं आहेत.

ब्रम्हपुरी, तुमसर, अहेरीकडे लक्ष

तुमसरमधे भाजपचे आमदार चरण वाघमारे यांनी आणि शिवसेनेचे माजी आमदार नरेन्द्र भोंडेकर यांनी बंडखोरी केलीय. ब्रम्हपुरी मतदारसंघात काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यापुढे अपक्ष उमेदवार पारोमिता गोस्वामी यांनी चांगलंच आव्हान उभं केलंय. वडेट्टीवार यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची झालीय.

अहेरीमधे आत्राम परिवारातील लढतीकडे संपुर्ण विदर्भाचे लक्ष आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री अंबरीश आत्राम विरुध्द राष्ट्रवादीकडून माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यात लक्षवेधी लढत होतेय.

अमरावती, मोर्शीत थेट लढत

अमरावती मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार डॉ. सुनिल देशमुख विरुद्ध काँग्रेसच्या माजी आमदार सुलभा खोडके यांच्यात काटे की टक्कर बघायला मिळतेय. सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके यांची राजकारणातील ओळख ‘गेम चेंजर’ अशी आहे. खोडके यांनी सुनिल देशमुख यांना चांगलाच घाम फोडलाय.

मोर्शी मतदारसंघात कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यापुढे राजू शेट्टीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांनी तगडं आव्हान उभं केलंय. सुरवातीला भुयार हे लढतीत नव्हते मात्र अखेरच्या टप्प्यात त्यांनी मतदारसंघावर पकड निर्माण केलीय. भाजपचे विद्यमान आमदार राजू तोडसाम यांनी बंडखोरी करीत आर्णी मतदारसंघात उमेदवारी कायम ठेवलीय. इथे भाजपचे माजी आमदार संदीप धुर्वे विरुद्ध काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यातच थेट लढत होतेय.

हेही वाचाः काँग्रेसला न्याय, केजरीवालांना चुनौती देणाऱ्या बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल

राळेगाव, पुसद, अकोटमधे मोर्चेबांधणीला वेग

राळेगांव मतदारसंघात विद्यमान आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके विरुद्ध काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्यात कडवी झुंज आहे. पुसदमधे नाईक परिवारातच लढत होतेय. भाजपचे विधान परिषदेतले विद्यमान आमदार निलय नाईक विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनिल नाईक यांच्यातली लढत लक्षवेधी झालीय.

अकोट मतदारसंघात भाजप आमदार प्रकाश पाटील भारसाकळे विरुद्ध काँग्रेसचे प्रा. संजय बोडखे यांच्यात चुरशीचा सामना आहे. भारसाकळे यांचा पराभव करण्यासाठी अकोटमधे जबरदस्त राजकीय समीकरणं जुळवण्यात आलीत.

हेही वाचाः 

भीम परतून आल्यासारखं वाटतंय!

आश्चर्यच, मुंबईत काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढू शकेल

मोदी-राहुल यांची महाराष्ट्रातल्या प्रचाराची बोहनी काय सांगते?

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या एका दिवसाने काय सांगितलं?

महाराष्ट्रात दिवाळीआधीच फुटणार विधानसभा निकालाचे फटाके

भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी विरोधकांना कांशीरामांकडे जावंच लागेल!