स्वतंत्र विदर्भाची पिपाणी मोडणार महाराष्ट्राचं नवं राज्यगीत

०८ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ८ मिनिटं


मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र यांचा इतिहास नेमक्या स्फूर्तिदायी शब्दांत वर्णन करणाऱ्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गौरव गीताला ‘राज्यगीता’चा दर्जा देण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलाय. त्यावर लवकरच राज्य मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब होईल.

सध्या २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी बनलेला आपला भारत देश हे गणराज्य आहे, तसंच संघराज्यही आहे. राज्याची रचना ही देशाच्या स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेनुसार झालीय. प्रत्येक राज्याला भाषेची, संस्कृतीची, इतिहासाची स्वतंत्र अशी ओळख असते आणि आहे. ही ओळख विविधतेनं नटलेल्या परंपरेची आहे. त्यालाच अस्मिता म्हणतात.

हे लक्षात घेऊन, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, प्रत्येक राज्यांनी आपलं ‘राज्यगीत’ तयार करावं आणि शासकीय कार्यक्रमांची सुरुवात त्या गीतानं करावी, अशी सूचना राज्य सरकारांना दिलीय.

राज्यगीत ब्रिटिशांची देणगी

कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, गुजरात, मध्य प्रदेश, मणिपूर, ओडिशा, पाँडीचेरी, तमिळनाडू आणि उत्तराखंड या १२ राज्यांनी यापूर्वीच अशी गीतं तयार करून त्यांना राज्यगीताचा दर्जा दिलाय. काही राज्यांनी तर आपली ओळख सांगणारा ध्वजही बनवलाय. हे ध्वज आणि राज्यगीतं अशी तरतूद नसलेल्या राज्यांना आणि भाषिकांना खटकायचे.

राष्ट्राच्या एकसंधतेला बाधा आणणारा हा स्वतंत्र बाणा आहे, अशीही टीका त्यावर झालीय. कारण राज्यगीत ही ब्रिटिशांची देणगी आहे. ब्रिटिशांची राजवट जिथं असायची, तिथं ब्रिटिश साम्राज्याचं ‘गौरव गीत’ सरकारी कार्यक्रमांतून सादर व्हायचं. ब्रिटिश जो प्रदेश पादाक्रांत करायचे तिथल्या राजा,संस्थानिकाला आपला मांडलिक बनवायचे किंवा साथ देणाऱ्या मूळ स्थानिकाला त्या भूप्रदेशाची जबाबदारी सोपवायचे.

अशा अंकित झालेल्या राजा, संस्थानिकाची जरब प्रजेवर राहावी, यासाठी त्याचं आणि त्याच्या भूप्रदेशाचं गुणगौरव करणारी गीतं लिहून घेऊन ती शाही कार्यक्रमात सादर करण्याची परवानगी ब्रिटिश मांडलिकाला द्यायचे. ब्रिटिश येण्यापूर्वी हे राजे, संस्थानिक स्वतंत्रपणे किंवा पाच मुसलमानी शाह्यांच्या वतीनं एकमेकांशी लढत होते. त्यांच्या पराक्रमाचंही गुणगान त्यांच्या राज्यगीतात असायचं.

त्याला ‘फोडा, झोडा आणि राज्य करा’ या धोरणानुसार परवानगी देताना ब्रिटिश आपल्या साम्राज्याचं गौरव गीत सादर करण्याचीही जबाबदारी सोपवायचे. भारतातून ब्रिटिश राजवट संपली. सार्वभौम लोकशाहीवादी राष्ट्राची निर्मिती झाली. संस्थानं खालसा झाली. तशी त्या प्रांताचा भूगोल, भाषा, संस्कृतीचा अभिमान सांगणारी राज्यगीतंही इतिहासजमा झाली.

हेही वाचा: सदानंद मोरे सांगतायत ‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र

राज्यांची भाषावार प्रांतरचना

देशात भाषावार प्रांतरचना झाली तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर राष्ट्रीय नेत्यांच्या घटना समितीनं जशी जाहीर वाद टाळून राष्ट्रीय ऐक्यमत निर्माण केलं. ‘जन गण मन’ला स्वतंत्र भारताच्या अधिकृत राष्ट्रगीताचा  दर्जा दिला आणि ‘वंदे मातरम’ची स्वातंत्र्यसंग्रामातली थोर परंपरा लक्षात घेऊन, त्याच्या पहिल्या कडव्याला ‘राष्ट्रीय गीत’म्हणून मान्यता दिली.

तशी तरतूद ‘राज्यगीत’बद्दल संविधानात केलेली नाही. भाषावार प्रांतरचनेत सीमावादाचे प्रश्न निर्माण झाल्यानं जवळपास सर्वच राज्यांना न्यायनिवाड्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळे प्रत्येक राज्यांचे स्थापना दिन वेगवेगळे झाले. ते साजरेही होऊ लागले. त्या निमित्तानं राज्याचं वैभव सांगणारी गीतंही वाजू लागली.

महाराष्ट्रात तो मान ‘गोविंदाग्रज’ म्हणजेच राम गणेश गडकरींच्या ‘मंगल देशा, महाराष्ट्र देशा’, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या ‘बहु असोत सुंदर’, राजा बढेंच्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’, चकोर आजगावकरांच्या ‘जय महाराष्ट्र जय’ या गीतांना मिळाला. पण कोणत्याही गीताला राज्यगीताचा दर्जा देण्याचा स्वतंत्र बाणा महाराष्ट्रानं केला नाही.

‘महाराष्ट्र माझा’ची निवड

खरं तर, असा दर्जा देणं हेच घटनाबाह्य आहे. त्यावर बोट ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यगीतामधून स्वतंत्र बाणा दाखवणाऱ्या बारा राज्यांना समज द्यायला पाहिजे होती. काँग्रेस सरकारनं जे चालवून घेतलं, ते आम्ही चालवून घेणार नाही, असा दम द्यायला पाहिजे होता.

पण ते राजकीय हिशोबात नुकसानीचं ठरणारं असल्यानं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या आडून सर्व राज्यांना राज्यगीत वाजवण्याची सूचना दिलीय. हे भारतीय संविधानात आवश्यक ती तरतूद किंवा दुरुस्ती करून सूचित केलं असतं, तर राज्यगीताला दर्जाबरोबर सन्मानही लाभला असता.

कारण, राज्यगीत हे संविधानानुसार बंधनकारक नाही. महाराष्ट्रात भाजप सध्या सत्ताधारी पक्ष असल्यानं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक खात्याचा कार्यभार स्वीकारताच प्राधान्यानं राज्यगीत निर्माणाच्या विषयाला गती दिली.

‘मंगल देशा’, ‘बहुत असो सुंदर’ आणि ‘महाराष्ट्र माझा’ या तीन गीतातून ‘महाराष्ट्र माझा’ची निवड केल्याचं त्यांनी जाहीर करताना ‘महाराष्ट्र दिनी, शिवजयंतीला किंवा इतर कार्यक्रमात हे गाणं ऐकताना छाती अभिमानानं फुलून येते,’ असंही सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. ते खरं आहे आणि बरंही आहे. कारण त्यातून ‘स्वतंत्र विदर्भ’चा दावा पोकळ ठरतो.

हेही वाचा: यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता

राज्यगीताचं शब्द नियोजन

राज्यगीताला घटनात्मक नसला तरी शासकीय अधिकृततेचा दर्जा देण्यासाठी सादरीकरणात वेळ, चाल आणि शिस्तीचं बंधन पाळणं आवश्यक असतं. शाहीर साबळे यांच्या आवाजातलं जे ‘महाराष्ट्र माझा’ गीत आपण ऐकतो, ते साडेतीन मिनिटांचं आहे. ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत ५२ सेकंदांत पूर्ण होतं. पण तेवढा काळ शिस्तीत उभं राहणंही काहींना मोठं दिव्य वाटतं.

हे लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र माझा’ गीत सव्वा ते दीड मिनिटांत पूर्ण होईल, अशाप्रकारे त्याचं शब्द नियोजन असेल,’ अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. हे शब्द नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी मूळ शब्दात बदल होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल. त्यानुसार, आजवर आपण ऐकत असलेल्या महाराष्ट्र गीतातलं पहिलं कडवं काढण्यात आलंय.

महाराष्ट्र गीताची मूळकथा

शाहीर साबळे यांच्या आवाजात ६२ वर्षांपूर्वी हे गीत ध्वनिमुद्रित करतानाही मूळ गीतावर कात्री चालवण्यात आली होती. कविश्रेष्ठ राजा बढे यांनी लिहिलेलं मूळ गीत असं होतं,

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
रावी ते कावेरी भारत, भाग्याच्या रेषा
निळे निळे आकाश झाकते, या पावन देशा
तुंग हिमालय, विंध्य अरवली, सयाद्री निलगिरी
उत्तर दक्षिण वारे पाऊस, वर्षविती भूवरी
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी, मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या, यमुनेचं पाणी पाजा ॥१॥ ॥धृ.॥
भीती न आम्हा तुझी मुळी ही, गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्या
द्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा॥२ ॥ ॥धृ.॥

गुलगुच्छे पिळदार मिशीवर, उभे राहते लिंबू
चघळीत पाने पिकली करितो, दो ओठांचा चंबू
मर्द मराठा गडी ओढतो, थंडीची गुडगुडी 
ठसक्याची लावणी तशी ही, ठसकदार गुलछडी 
रंगरंगेला रगेल मोठा, करितो रणमौजा॥३ ॥ ॥धृ.॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥४ ॥ ॥धृ.॥

यात ठळक केलेल्या ओळीच शाहीर साबळे यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्या आहेत. बाद करण्यात आलेल्या ओळी जर ध्वनिमुद्रणात वापरल्या असत्या तर गीत अनावश्यक लांबलं असतं आणि पाठही झालं नसतं. ‘शाहीर साबळे यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यानं हे राज्यगीत शाहिरांना मानवंदना देणारं ठरेल,’ अशी भावना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलीय.

हे गीत शाहीर साबळे यांच्या आवाजात नसेल. त्यासाठी आजच्या पिढीतल्या गायकांचा आवाज आणि संगीत दिग्दर्शनाचा वापर केला असणार! हा बदल श्रवणीय असेल, तरच ते सर्व लोकांना पाठ होईल! तरच ‘महाराष्ट्र माझा’ राज्यगीत होईल. नाहीतर राज्यगीताचा सन्मान हा सरकारी उपचाराचा विधी होईल.

हेही वाचा: आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे

एक गायक, दोन गीतकार

अस्सल ‘शाहीर’ हा कवनं लिहितो, ती सुरेल चालीत बांधतो आणि गातो. असे शाहीर कृष्णराव साबळे होते. याशिवाय वर्तमानाला थेट भिडणारी प्रहसनं स्वत: लिहून सादर करणारे ‘लोकनाट्य’कार आणि कलावंत होते. उत्तम ढोलकीपटू होते. मराठी भाषा-संस्कृती आणि महाराष्ट्राचे कट्टर अभिमानी होते.

१९५३ला त्यांनी लिहून सादर केलेला ‘आधुनिक मानवाची कहाणी’ हा प्रदीर्घ पोवाडा त्यांच्या सखोल अभ्यासाची आणि विश्वव्यापक विलक्षण बुद्धिमत्तेची साक्ष देतो. त्यात त्यांनी ‘फ्रेंच राज्य क्रांती ते भारताचं स्वातंत्र्य’ असा ४०० वर्षांचा विशालपट काव्यरूपात मांडलाय. ही करामत त्यांनी वयाच्या तिशीत केली होती.

त्यामुळे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत म्हटलं की, ताडकन शाहीर साबळे यांचीच आठवण येते. या महाराष्ट्र गीताचे तेच गायक, लेखक, संगीतकार असावेत, असा बऱ्याच जणांचा समज होतो. पण या गीताचे लेखक नागपूरला जन्म झालेले राजा बढे हे सिद्धहस्त लेखक आहेत. पण, त्यांची लेखणी काव्यनिर्मिती क्षेत्रात अधिक रमली. त्यातही गीतकार असा लौकिक त्यांनी कमावला. ‘चांदणे शिंपीत जाशी’सारखी गाणी त्यांच्या लेखणीतून उतरली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

१९५६ ते १९६२ या काळात राजा बढे मुंबई आकाशवाणी केंद्रात सुगम संगीत विभागाचे निर्माते होते. तो ‘संयुक्त महाराष्ट्र’ लढ्याचा काळ होता. मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी, यासाठीच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीनं १९५६पासून जोर धरला आणि १९५९पर्यंत चळवळीनं उग्र रूप धारण केलं होतं.

तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच व्हावी, यासाठी १०६ जणांचे बळी पोलिसी गोळीबारानं घेतले होते. या हुतात्म्यांमुळे मुंबई महाराष्ट्राला देण्याशिवाय केंद्र सरकारपुढे पर्याय उरला नव्हता. तशी १९६०च्या सुरवातीला घोषणाही झाली. हा आनंदाचा प्रसंग साजरा करण्यासाठी ‘हिज मास्टर्स वॉइस’ म्हणजेच ‘एचएमवी’ या ध्वनिमुद्रिकांच्या कंपनीनं ‘महाराष्ट्र गीतां’ची रेकॉर्ड काढण्याचं ठरवलं.

हेही वाचा: दांभिकतेच्या वेढ्यात अडकलेली 'आयडिया ऑफ महाराष्ट्र'

चळवळ जागवणारी गीतं

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात ‘प्रबोधन’कार ठाकरे, आचार्य अत्रे, वसंत बापट हे साहित्यिक थेटपणे उतरत होते. अमर शेख, अण्णा भाऊ साठे, आत्माराम पाटील, ल. ना. गवाणकर, लीलाधर हेगडे या शाहिरांनी आपल्या लेखणी, गाण्यांनी ‘संयुक्त महाराष्ट्रा’चा लढा धगधगता ठेवला होता.

‘जय महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या गाऊ गाना। गाऊ उंचावुनी माना। घेऊ तानावर ताना॥’ असा अमर शेख यांचा ‘शाहिरी बाणा’ होता. तर, ‘अखंड गुण गायनी जाहला, जरी माझा अंत। पुन्हा जन्मुनी गातच राहीन, महाराष्ट्र गीत॥’ असा आत्माराम पाटील यांचा निश्चय होता. म्हणून ते ‘महाराष्ट्र उगवतो माझ्या सरकारा। खुशाल कोंबडं झाकून धरा॥’ असा थेट सरकारला आवाज देणारे शब्द लिहू शकले.

त्यांचं हे ७ मोठ्या कडव्यांचं महाराष्ट्राची समग्र ओळख सांगणारं गाणं दिल्लीतल्या धरणे आंदोलनात अमर शेख आपल्या बुलंद आवाजात सलग सात तास पुन्हापुन्हा गात होते. लोकांना पेटवत होते. झोपलेल्या सरकारला जागवत होते. अशी असंख्य ‘महाराष्ट्र गीतं’ तयार होती.

तीन तासांत बनलं राज्यगीत

पण कंपनी गाण्याची असेल किंवा नाण्याची, त्यांची व्यावसायिक गणितं वेगळी असतात. त्यानुसार, ‘एचएमवी’नं राजा बढे यांच्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आणि चकोर आजगावकर यांच्या ‘जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, जय राष्ट्र महान’ ही गाणी रेकॉर्डच्या दोन बाजूंसाठी निवडली.

संगीतकार श्रीनिवास खळे यांनी त्या गीतांना चाली दिल्या आणि ही दोन्ही गीतं शाहीर साबळे यांनी गावीत, असा आग्रहही धरला. त्यानुसार शाहीर साबळेंनी ही दोन्ही गीतं तीन तासांच्या तालमीत पक्की केली आणि ती रेकॉर्ड झाली.

हेही वाचा: यशवंतरावांची आयडिया ऑफ महाराष्ट्रः नवं राज्य जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठीच

नेहरूंना आवडलं राज्यगीत

विशेष म्हणजे, हे गीत महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सोहळ्यात त्यावर कोणतेही ‘सरकारी संस्कार’ न झाल्यानं इतर महाराष्ट्र गीतांबरोबर म्हटलं गेलं. पण, ते त्या आधीच गाजलं होतं. यशवंतराव चव्हाण यांनी ११ एप्रिल १९६०ला सोलापूरला शेतकरी मेळावा आयोजित केला होता.

त्याला तेव्हाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वागताचं गीत गाण्यासाठी ‘शाहीर साबळे आणि पार्टी’ हजर होती. ती संधी साधून शाहीर साबळे यांनी गायनातलं सर्व कसब पणाला लावून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत म्हटलं.

त्यानं लाखोचा जनसमुदाय भारावला; तसे नेहरूही मंत्रमुग्ध झालं. त्यांनी गाणं संपताच शाहिरांना भरभरून शाबासकी दिली. तिथून प्रसिद्धीच्या दिशेनं सुरू झालेला अवघा जीवन प्रवास शाहीर साबळे यांनी ‘माझा पवाडा’ या मॅजेस्टिक प्रकाशनच्या पुस्तकात शब्दबद्ध केलाय. तो आवर्जून वाचावा, संग्रही ठेवावा असा आहे.

या गाण्याचा विषय निघाला की, शाहीर साबळे म्हणायचे, ‘आपण आपल्या आयुष्यात खूप काही चांगलं करतो. पण त्यातली एखादीच गोष्ट आपलं अवघं आयुष्य व्यापून टाकते. माझ्याबद्दल हे श्रेय राजा बढे यांच्या ‘जय जय महाराष्ट्र’ या गीताला देतो. या गीतानं मला अमरत्व प्राप्त करून दिलंय!’ अर्थात, श्रीनिवास खळे यांनी गाण्यासाठी शाहिरांची केलेली निवडही तितकीच महत्त्वाची होती.

स्वतंत्र विदर्भाची मोडली पिपाणी

या गाण्यानं गीतकार, संगीतकार आणि गायक या तिघांनाही अमर केलंय. त्यांचं कलाकर्तृत्व आता महाराष्ट्राचं राज्यगीत होतंय. विशेष म्हणजे, या महाराष्ट्र गीतनिर्मितीला कारण ठरलेल्या ‘संयुक्त महाराष्ट्र’च्या लोकलढ्यात शाहीर साबळेंचा अमर शेख किंवा इतर शाहिरांसारखा थेट सहभाग नव्हता. तसंच ‘भाजप’चा तेव्हाचा अवतार असलेला ‘जनसंघ’ही या लोकलढ्यात सामील झाला नव्हता.

कारण भाषिक-प्रांतवाद त्यांच्या राष्ट्रवादात बसत नाही. ‘राष्ट्र प्रथम’ हे त्यांच्या राष्ट्रवादाचं कार्यसूत्र आहे. तरीही भाजपच्या मंत्र्यांना ‘संयुक्त महाराष्ट्र’ लढ्याच्या निर्मितीतून स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याची ओळख, आठवण ठेवणाऱ्या ‘महाराष्ट्र गीता'ला राज्यगीताचा दर्जा देण्यासाठी पुढाकार घ्यावा लागतोय.

शिवाय, या राज्यगीताचे गीतकार राजा बढे हे नागपूरचे सुपुत्र आहेत. परिणामी, राजकीय सोयीनं ‘स्वतंत्र विदर्भ’च्या वाजणाऱ्या पिपाण्या आता मोडीत काढण्याच्या लायकीच्या झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्यगीताची ही उलटी खूण खोट्या महाराष्ट्रप्रेमाचे दाखवायचे दातही घशात घालणारी ठरलीय!

हेही वाचा: 

यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसातल्या आठवणी

शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही

बहुजन समाजाने सत्तेत राहिलं पाहिजे, असं यशवंतराव चव्हाण का म्हणाले?

यशवंतरावांची आयडिया ऑफ महाराष्ट्र: भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईल

(‘साप्ताहिक चित्रलेखा’च्या ताज्या अंकातून संपादकीय लेख साभार)