गंगेच्या पाण्यात डुबकी मारणाऱ्यांना महात्मा बसवेश्वर काय म्हणतात?

२९ मे २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


गंगेत कोरोनाची लागण झालेले मृतदेह तरंगताना दिसतायत. गंगेत मृतदेह सोडणं, डुबकी मारणं अशा प्रथांवर महात्मा बसवण्णांनी नेहमीच टीका केली. या टीकेमुळे बसवण्णांना कल्याणमधून परांगदा व्हावं लागलं होतं. आज गंगेची व्यथा व्यक्त करणार्‍या कवितेमुळे कवयित्री ट्रोल होतेय. गंगा मैय्याची अवस्था सांगणार्‍या गुजराती कवयित्री पारुल खक्कर यांना शिव्यांची लाखोली वाहिली जातेय.

‘मुझे गंगामैय्याने बुलाया है. पहले मुझे लगा था मैं यहां आया, या फिर मुझे पार्टी ने यहां भेजा है, लेकिन अब मुझे लगता है कि मैं मां गंगा की गोद में लौटा हूं।‘

२४ एप्रिल २०१४. काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या वाराणसी लोकसभा मतदार संघातून आपली उमेदवारी भरल्यानंतर अच्छे दिनवाले, कालचे विश्वगुरू, आजचे रवींद्रनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या उमेदवारीबद्दल बोलताना केलेलं हे विधान आहे. निवडणूक जिंकण्याच्या व्यूव्हरचनेतून नव्हे गंगा मांने धाडलेल्या सांगाव्यामुळे आलो आहेत, अशी अफलातून कॅचलाईन त्यांनी माध्यमांना दिली. आयटी सेलने सहाजिकच ती मतदारांपर्यंत पोचवली. 

गंगेचेही आटले अश्रू

निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या वाराणसी विजयावर प्रतिक्रिया देतांना त्यांनी पुन्हा एकदा अशीच हेडलाईन दिली. ‘गंगा मांची सेवा करणं हे माझं अहोभाग्य’ निवडणुकीचा धुरळा खाली बसण्याच्या आत ’नमामि गंगे’ ही तब्बल २० हजार कोटींची गंगा स्वच्छता आणि संवंर्धनाची महत्त्वकांक्षी योजना जाहीर केली. त्याच बळावर २०१९ चीही निवडणूक खिशात घातली. २० हजार कोटींच्या योजनेच्या घोषणेमुळे आणि उत्तरप्रदेश-बिहारच्या जनतेसह गंगासागर-समुद्रापर्यंतच्या किनार्‍यावरच्या दोन्ही बाजूंचे दगडगोटेही सुखावले.

पण आज कोरोनाबाधीत मृतदेहांनी ओसंडून वाहणारे किनारे पाहून गंगा मां आपल्या भाग्याला दूषणं देत कपाळावर हात मारून घेत असणार. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असणार. रामाच्या नावावर राजकारण करणार्‍यांकडून रामाची गंगा इतकी मकळट झालीय की मृतदेहांचा खच तिला असह्य झालाय. अनेक शतकांपासून यांची पाप पोटात घेणार्‍या गंगामाईच्याही डोळ्यातलं पाणी आता आटून गेलं असणार.

हेही वाचा : महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष

वाळलेलं पाणी आणि वठलेलं झाड

गंगेत डुबकी मारल्याने पुण्य मिळतं, कुंभपर्वात अंघोळ केल्याने पापं धुवून जातात ही धारणाच आज गंगेच्या मुळावर आलीय. कोरोनाने त्या धारणेतल्या फोलपणावर घाव घातलाय. हरिद्वारचा कुंभमेळा सुपर स्प्रेडर ठरला असताना गंगा नदीत वाहून जात असलेल्या कोरोनाची लागण झालेले मृतदेहांमुळे नदीला फक्त नदीच मानण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन अधोरेखित करत आहे.

जी विज्ञानवादी भूमिका बाराव्या शतकात बसवण्णा नावाच्या महात्म्याने आपल्या शरणांसह मांडली ती आज नव्याने स्वीकारण्याची गरज आहे. महात्मा बसवण्णा, शिवयोगी सिद्धरामेश्वर, अल्लम प्रभुदेव यांच्यासह ३६ शरणांनी आपल्या वचनांतून गंगा स्नानातल्या डुबकीच्या पवित्र्यावर प्रश्न विचारलाय. महात्मा बसवण्णा म्हणतात,
 
पाणी पाहिलं की डुबकी मारतात
झाड पाहिलं की फेर्‍या घालतात
वाळून जाणारं पाणी, वठून जाणार झाड
भुरळ घालणार्‍यांना आपली जाण कशी असेल

गंगा घाटावर साग्रसंगीत गंगा आरती, होम हवन करणार्‍यांनाही बसवण्णांनी फटकारलंय. होम करणार्‍यांच्या ढोंगीपणावर बोलतांना महात्मा बसवण्णा म्हणतात,

अग्नीस देव म्हणत हवन करणारे विप्र
स्वत:च्या घरास आग लागल्यानंतर 
गटारीतलं पाणी, रस्त्यावरची माती 
टाकत बोंब ठोकून गाव गोळा करतात
त्याच अग्नीला दूषणं देतात

परमज्ञानाची प्राप्ती

महात्मा बसवण्णांनी वेदांचं नाक कापण्याची धमक ठेवलीय. एकूणच वैदिक कर्मकांडातली धर्माच्या नावाने चालणारी ढोंगं त्यांनी उघड केलीयत. जगातली पहिली लोकसंसद म्हणून ओळखल्या जाणार्‍या बसवादी शरणांनी स्थापन केलेल्या अनुभाव मंटपाचे पहिले अध्यक्ष असलेले थोर तत्त्वज्ञ अल्लम प्रभुदेव म्हणतात,

दूरदूरपर्यंत क्षेत्र भ्रमंती
करूनही नच लाभे.
गंगातीर्थी लक्ष स्नान
करूनही नच लाभे.
मेरुगिरीच्या शिखरावरून
सादवूनही नच लाभे.
नित्य व्रत-नेमांनी तनू
शिणवूनही नच लाभे.
नित्य विषय स्मरणात रमणारे,
विषयांमागे क्षणोक्षणी धावणारे,
चंचल मन चित्तात स्थिर केल्यास
गुहेश्वरलिंग केवळ परमज्ञानप्रकाश!

विषयासक्ती न सोडता गंगेत आंघोळ करून, तीर्थाटन करून, मेरूपर्वतावर पायपीट करून, व्रत वैकल्यं करून काही मिळणार नाही. चंचल मन स्थिर केल्यानंतरच परमज्ञानाची प्राप्ती होईल. अशा शब्दात अल्लमप्रभुदेवांनी तीर्थाटनाच्या मागे लागलेल्यांना फटकारलंय.

हेही वाचा : बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

गंगेच्या पात्रात दगड गोटे

अनुभव मंटपाचे तिसरे अध्यक्ष आणि ६८ हजार वचनांची रचना करणारे सोलापूरचे शिवयोगी सिद्धरामेश्वर म्हणतात,

गंगेत डुबकी मारल्यानंतर 
स्वर्ग मिळणार असेल तर
गंगेच्या पात्रात असंख्य दगड गोटे,
मगरी मासे जलचर अनंतानंत
हे सगळे जर देव झाल्यास 
स्वर्गातील नियमित देवांचे कसे होईल
सांगा कपिलसिद्ध मल्लिकार्जुन 
त्यांना मिळेल का जागा

गंगा स्नानाला थोंतांड म्हणणारी सिध्दरामश्वरांची सुमारे १३ वचनं आज उपलब्ध आहेत. दुसर्‍या एका वचनात ते म्हणतात,

एखाद्याच्या मनाला यातना देऊन, 
विश्वासघात करून, 
गंगेत डुंबल्यानंत काय होईल? 
गंगा किनार्‍यावर चंद्र आला तर
त्याच्यावरचे डाग जातील का धूऊन? 
जो कुणाचंही मन दुखावणार नाही,
कुणाचाही घात करणार नाही, 
तोचि परमपावन पहा, 
कपिलसिद्ध मल्लिकार्जुना!

गंगेत डुबकी मारणार्‍यांनी इतरांचं मन दुखणार नाही, इतरांचा घात होणार नाही याची काळजी घ्यावी असा आग्रह शिवयोगी सिध्दरामेश्वरांनी धरलाय.

डुबकीनंतर थेट स्वर्गाचा प्रवास

महात्मा बसवण्णा आणि  शरणांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढीच्या जळमट दूर करून विज्ञाननिष्ठ आणि सजग दृष्टिकोन रूजवण्यासाठी आयुष्य वेचलं. समाजातल्या प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याचा, सद्सद्विवेक बुध्दी जागी ठेवण्याचा आग्रह धरला. बसवादि शरणांच्या या विचारापासून समाजाला दूरच ठेवणार्‍या शक्तींनी श्रद्धेचा बाजार मांडलाच होता. आता तो मार्ग स्मशानाकडे वळवलाय.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांचं विधान त्याची साक्ष देतं. हरिद्वारचा कुंभमेळा कोरोना सुपर स्प्रेडर ठरण्याची भीती व्यक्त होत असताना त्यांनी थेट ’गंगा मॉ’ वरच जबाबदारी सोपवली. मां गंगाच्या आशिर्वादाने कोरोना पसरणार नाही. उलट ’गंगा मां’चे आशीर्वाद घेऊन गेल्यास कोरोनाची बाधा होणार नाही. या तर्कहीन आणि तद्दन भोंदूगिरी प्रदर्शित करणार्‍या विधानाबद्दल काय बोलावं!

गंगा मांचा आशीर्वाद घेतलेल्या अनेकांना थेट स्वर्गाचा प्रवास करावा लागतोय. गंगा घाटावर मृतदेहांच्या रांगा लागल्यात. दहनासाठी जागा नाही. सरपण नाही. इतर सरकारी यंत्रणा नाही. त्यातूनच मृतदेह थेट नदीपात्रात टाकून देण्याचे अघोरी प्रकार घडतायत. त्यामुळे कोरोना बाधितांचे मृतदेह त्याच गंगा मैय्याच्या पात्रात तरगंतायत. 

गंगेत डुबकी मारण्याची गरज नसल्याचे सांगणार्‍या महात्मा बसवण्णांना कल्याणमधून परांगदा व्हावं लागलं होतं. आज गंगेची व्यथा व्यक्त करणार्‍या कवितेमुळे कवियत्री ट्रोल होतेय. गंगा मैय्याची अवस्था सांगणार्‍या गुजराती कवयित्री पारुल खक्कर यांना शिव्यांची लाखोली वाहिली जातेय.

हेही वाचा : 

संविधानाची भीती कोणाला आणि कशासाठी?

नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?

सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन

आपल्याला कोणता आणि कसा हिंदू धर्म हवाय?

कलयुगातल्या राक्षसांची ओळख करून देणारा 'असूर'

बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?

(लेखक महात्मा बसवण्णा आणि समकालीन शरण साहित्याचे अभ्यासक आहेत.)