जग नको, स्वतःला जिंकूया सांगणारे भगवान महावीर

०४ एप्रिल २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


जागतिकीकरणाने आणि भांडवलशाहीने व्यापून टाकलेल्या आजच्या जगात शांती, समाधान याच्या शोधात प्रत्येक जण फिरताना दिसतोय. दुसरीकडे पुन्हा कर्मकांडे आणि धर्माचा बाजार तेजीत आहे. या पार्श्वभूमीवर भगवान महावीर यांनी मांडलेल्या सत्य, अहिंसा, अनेकांत, अपरिग्रह तत्त्वांनी कार्यरत राहण्याची सध्या गरज आहे. आज महावीर जयंतीनिमित्त, त्यांच्या कार्याची ओळख करून घ्यायला हवी.

‘जो सहस्सं सहस्साणं संगामे दुज्जए जिए, जिणेज्ज अप्पाणं एस सो परमो जयो’ अशा अर्थाचं एक जैन वचन आहे. त्याचा अर्थ असा की, दुर्जय अशा संग्रामात शत्रूच्या लक्षावधी योद्धांना जिंकण्यापेक्षा आपल्या स्वत:च्या एका आत्म्यास जिंकणं कठीण आहे. आत्मजय हाच परमजय होय. जो स्वतःला जिंकतो तो जिन. अशा जिनचं जो अनुकरण करतो, पूजा करतो तो जैन. 

माणसाच्या मुक्तीचा हा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांनी जीवनाचा एक नवा महामार्ग भारतीय समाजाला दाखवला. त्या महावीरांची आज जयंती. रुढीपरंपरा आणि कर्मकांडामधे अडकलेल्या भारतीय समाजाला महावीरांनी आत्मानुशासन आणि लोकसेवेचा धर्म सांगितला. भारतीय तत्वज्ञानाच्या दंडकारण्यात जैनांनी आखून दिलेल्या या मार्गाचं स्मरण आजच्या दिवशी करायला हवं. 

माणुसकीच्या जवळ नेणारे महापुरुष

महावीरांचा जन्म ख्रिस्तपूर्व सुमारे सहाशेव्या वर्षी भारताच्या पूर्वांचलामधे झाला. ख्रिस्तपूर्व सहावं शतक हे जगाच्या इतिहासात एक क्रांतिकारी शतक मानलं जातं. या कालखंडात संपूर्ण विश्वातल्या विचारवंतांची विचारधारा निसर्गाच्या अध्ययनाकडून समाज आणि जीवनातल्या समस्या यांच्या दिशेने वळलेली होती. अनेक क्रांतदर्शी महापुरूष या काळात जगामधे होऊन गेले. भारतात भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांनी क्रांतीचा उद्घोष केला. त्यांच्यासोबत इतरही काही महापुरूष उत्पन्न झाले.

चीनमधे लाओत्से आणि कन्फ्युशियस, ग्रीसमधे पायथागोरस, सॉक्रेटिस आणि प्लेटो, इराणमधे झरतृष्ट्र अशा रीतीने या कालखंडात जुनाट धार्मिक समजुती, शोषक सामजिक परंपरा, धार्मिक अंधश्रद्धा, कर्मकांडे आणि सामजिक विषमतेच्या विरोधात या महापुरुषांनी बंड पुकारलं. भगवान महावीर आणि भगवान बुद्ध हे दोन्ही महापुरुष समकालीन समजले जातात. त्यांच्या चरित्रांचं अवलोकन केल्यास यात अनेक साम्यस्थळे देखील दिसून येतात. 

हेही वाचा: साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?

महावीरांची जैन जन्मकथा

इसवी सनापूर्वी सातव्या-सहाव्या शतकात गंगेच्या उत्तर तीरावर वसलेलं लिच्छवी क्षत्रियांचं विशाल आणि पराक्रमी गणराज्य वैभवाच्या अत्युच्च शिखरावर होतं. वैशाली ही या गणराज्याची राजधानी होती. लिच्छवी हे सूर्यवंशी क्षत्रिय होते. ते स्वत:स श्रीरामाचे वंशज मानत. बुद्धपूर्व काळात या लिच्छवींना ‘विदेह’ या नावाने ओळखलं जायचं.

अशा क्षत्रिय लिच्छवी वंशात कुंडपूरचा राजा सिद्धार्थ आणि त्यांची राणी त्रिशलादेवी यांच्या पोटी महावीरांचा जन्म झाला. त्यांचं कुटुंब हे तीर्थंकर पार्श्वनाथांचं उपासक होतं. ज्यावेळी तीर्थंकराचा आणि चक्रवर्ती पुरुषाचा महान आत्मा एखाद्या भाग्यशाली मातेच्या उदरात प्रवेश करतो त्यावेळी त्या मातेला चौदा अत्यंत शुभ स्वप्ने पडतात अशी एक समजूत जैन परंपरेमधे रूढ आहे.

महावीराच्या जन्मसमयी माता त्रिशलादेवींना अशीच एक अद्भुत आणि दिव्य अशी स्वप्नमलिका दिसली. त्यानुसार त्यांच्या उदरी मोहरुपी चिखलात फसलेल्या आत्मरथाचा उद्धार करण्यास समर्थ असा पुत्र जन्म घेणार होता. महावीरांच्या व्यक्तिमत्वाचं अवलोकन केल्यास या स्वप्नाची सत्यता पटल्यशिवाय राहत नाही.

महापुरुषांच्या जन्मकाली येणाऱ्या सुखद आणि आनंददायक घटनांचा प्रत्यय महावीरांच्या जन्मसमयी आला. जेव्हापासून हे बालक त्रिशलादेवींच्या उदरात आलं, तेव्हापासून धन, धान्य, कोष्ठागार, स्वजन आणि राज्यकोष यांची सर्व प्रकारे अभिवृद्धी झाली, यामुळे या पुत्राचं नाव पिता सिद्धार्थाने ‘वर्धमान’ असं ठेवलं. याशिवाय महावीर, सन्मति ही प्रमुख नावं आणि वीर, अतिवीर, अंत्यकाश्यप ही गौण नावं होती. 

कर्मकांड नाकारणारी साधना

महावीरांच्या जन्मसमयी असलेल्या धार्मिक, सामजिक आणि राजकीय परिस्थितीचा विचार करता आपल्याला महावीरांच्या कार्याचं मर्म समजू शकतं. याकाळात धर्म म्हणजे केवळ कर्मकांड असं स्तोम ब्राह्मण वर्गाने माजवलं होतं. धर्माचे आणि समाजाचे सर्व अधिकार या वर्गाकडे होते. सर्व प्रकारचं पापाचरण करूनही आपण सदैव पवित्र आणि सर्वश्रेष्ठ असल्याचा दावा हा वर्ग करत होता. 

मानवोपयोगी पशुंना राष्ट्रीय धन मानलं जात असलं आणि ज्यांच्या संरक्षणासाठी मेघरथ आणि नेमिनाथ यांच्यासारख्या महापुरुषांनी महान बलिदान केलं असलं, तरी, त्या मूक पशूंना यज्ञयागाच्या नावाखाली बळी दिलं जात होतं. जातीभेद आणि अस्पृश्यता यांनी अमानवीपणाचा कळस गाठला होता. स्त्रियांचं जीवन पराश्रित, उपेक्षित, अधिकारहीन होतं.

संपत्ती आणि पशुधन यांच्याप्रमाणे स्त्री ही परिग्रहवस्तू म्हणजेच गुलाम म्हणून मानली गेली होती. म्हणजेच नारी, शुद्र आणि पशू यांना जगण्याचा अधिकारच नाकारण्यात येत होता. राजकीय स्तरावर एक शक्तिमान राजा दुसऱ्या दुर्बल राज्यावर आक्रमण करून तेथील जनतेचं शोषण करत होता, यामुळे गणराज्यांमधे असलेल्या लोकशाही समाजव्यवस्थेचा विनाश होत होता.

या सर्व परस्थितीचा विचार केल्यानंतर वयाच्या ३१व्या वर्षी वर्धमानांनी पत्नी यशोदा, कन्या प्रियदर्शना आणि सर्व राजवैभवाचा त्याग केला आणि मार्गशीर्ष वद्य दशमीच्या दिवशी चौथ्या प्रहरी राजभवनातून वनाकडे प्रस्थान केलं. तत्पूर्वीच त्यांची साधक अवस्था सुरु झालेली होती. 

हेही वाचा: गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचा सामाजिक आशय

धर्म म्हणजे समतेची साधना

भोगात योगाची साधना करणारे वर्धमान आता कठोर योगमार्गावरून एकाकी होऊन चालू लागले. कठोर तपश्चर्या करणाऱ्या वर्धमानांना समाजाकडूनही पीडा सहन करावी लागली. तरी ते आपल्या मार्गावरून ढळले नाही. यामुळेच राजकुमार वर्धमान आता वर्धमान महावीर झाले. श्रमण वर्धमानांचं साधकजीवन हे या युगातलं म्हणजेच अवसर्पिणी काळातलं एका श्रेष्ठतम साधकाचं जीवन होतं. 

महावीरांच्या साधक जीवनाचा हा उज्ज्वल अध्याय समतेच्या साधनेपासून उगम पावून समतेच्या सिद्धीत समाप्त होतो. या वर्णमालेचा वर्ण ‘अभय’पासून सुरु होऊन धीरता, वीरता, समता, क्षमा यांच्या साधनेच्या कमाने जाऊन शेवटी ‘ज्ञान’ म्हणजेच केवलज्ञान या स्थळी येऊन परिपूर्ण होतो. सम्रग जैन साहित्यामधे, समग्र तीर्थंकरांच्या साधनेमधे महावीरांच्या साधनेचा अध्याय अद्वितीय असून आश्चर्यकारी आभेने उजळून निघालाय. 

ऋजुवालुका नदीच्या तटावर साधक महावीरांना कैवल्यज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांनी धर्मतीर्थ किंवा धर्मसंघाची स्थापना केली. गणराज्यांच्या लोकशाही वातावरणात वाढलेल्या महावीरांनी आपल्या धर्मसंघातही हीच लोकशाही रुजवली. हजारो व्यक्तींना दीक्षा देणाऱ्या महावीरांनी दीक्षा घेणाऱ्या साधकाच्या शिक्षणाची आणि व्यवस्थेची सूत्रे आपल्या हाती ठेवली नाहीत, ती सुयोग्य व्यक्तीच्या हाती सोपवली. 

बहुजन विचार मांडणारा जैन धर्म

महावीरांनी शासनाचा संबंध आत्मानुशासनाशी जोडून टाकला. एकप्रकारे सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. तत्कालीन लोकभाषा असलेल्या अर्धमागधी भाषेचा वापर त्यांनी आपल्या मध्यमपावा या ठिकाणी दिलेल्या प्रवचनापासून केला आणि जैन साहित्याची भाषाही तीच ठेवली.

कारण महावीरांचे विचार सर्वसामान्य बहुजन समाजासाठी होते. यामुळेच त्यांच्या सर्वागीण आणि सर्वव्यापी अहिंसा धर्माचा प्रचार, प्रसार झाला. जैन विचारधारा आणि २३ तीर्थकरांची परंपरा महावीरांच्या पूर्वीपासून अस्तित्वात असली तरी या विचारधारेला आणि परंपरेला धर्माचं एक सुयोग्य रूप देण्याचं महान कार्य महावीरांनी केलं.

जैन धर्माच्या संस्थापकांविषयी विविध मतप्रवाह असले तरी महावीरांच्या या कार्यामुळे जैन धर्माचं संस्थापकत्व त्यांच्याकडेच जातं आणि जगही तसंच मानतं. महावीरांच्या आणि त्यापूर्वीच्या तीर्थंकरांच्या महान विचारधारेवर उभा असलेला जैन धर्म कालानुरूप दिगंबर आणि श्वेतांबर पंथात विभागलेला दिसत असला तरी या विचारधारेनुसार आचरण करण्यात कोठेही मागे नाही.

संपूर्ण विश्वात आजमितीस केवळ ४५ ते ५० लाख लोकसंख्या असलेला जैन समाज व्यापार-उदिमात अग्रेसर तर आहेच; पण दिगंबर आणि श्वेतांबर या दोन्ही पंथाच्या विविध सामजिक संस्था भारतभर मानव सेवेचं कार्य करतायत. यातूनच महावीरांच्या महान आणि कालजयी विचारधारेचा प्रत्यय येतो. आत्मजय, सम्यक दृष्टी आणि अखिल मानवजातीच्या सेवेचं निष्काम व्रत हेच महावीरांच्या जीवन संघर्षाचं सार सांगता येतं.

हेही वाचा: 

पंढरीची वारीः माऊलींच्या दिंडीतला एक दिवस

आज देहूत संत तुकारामांचा तारखेनुसार जन्मोत्सव

वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

संत नामदेवांच्या अभंगवाणीत भारतीय संविधानातल्या मूल्यांचा जागर