मंगेश चिवटे : रुग्णसेवेचा विडा उचललेले पत्रकार

१५ जून २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


शिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे.

गरिबांनी आजारी पडूच नये अशी परिस्थिती आज आलीय. गंभीर आजारांवर दीर्घकालीन उपचार आणि महागड्या शस्त्रक्रिया करू शकतील, एवढा पैसाच त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे चांगल्या उपचारपद्धती उपलब्ध असूनही अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. यावर ठोस तोडगा काढून निर्धन लोकांचे जीव वाचवण्यासाठी मुंबईत बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची निर्मिती झाली.

या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आहेत मंगेश चिवटे. गोरगरीब, निराधार लोकांना मायेचा ओलावा देऊन देवानं दिलेलं माणसाचा जन्म सार्थकी करावा ही त्यांच्या आईवडीलांची शिकवण. तोच जीवनमंत्र आत्मसात करून चिवटे यांनी वैद्यकीय सेवेची पालखी खांद्यावर घेतलीय. आज १५ जून हा त्यांचा जन्मदिवस.

मुख्यमंत्री मदत कक्षाची स्थापना

२०१४ ला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं. रुग्णसेवेची आवड असलेले पत्रकार मंगेश चिवटे यांनी फडणवीसांकडे राज्यातल्या गरिबांना महागड्या शस्त्रक्रिया उपलब्ध करुन देण्यासाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ स्थापन करण्याची संकल्पना मांडली. त्यानंतर सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. १७ मार्च २०१५ पासून या योजनेमार्फत गरजू पेशंटना निधी देण्यास सुरवात झाली.

आजवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून सुमारे ५३ हजाराहून अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार करण्यात आलेत. चिवटे यांच्या प्रयत्नातून उभारलं गेलेलं हे ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ गोरगरीब रुग्णांसाठी संजीवनी ठरलंय.

हेही वाचा : अनिश महाजन : सगळ्यांसाठी आरोग्याचं स्वप्न पाहणारे टायगर वूड्सचे डॉक्टर

सेवेचा वारसा

चिवटे यांचे आजोबा साथी मनोहरपंत चिवटे हे स्वातंत्र्यसैनिक होते. सोलापुरातल्या करमाळ्याचे पहिले नगराध्यक्ष म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. करमाळ्यातल्याच महात्मा गांधी विद्यालयात मंगेश चिवटे यांचं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या एसपी कॉलेजमधे. मराठी या विषयात एमए करून बीएड केलं. त्यानंतर पत्रकारिता विषयात पदवी संपादन केली. एवढं शिक्षण घेऊनही ते थांबले नाहीत. मुंबईतल्या केसी कॉलेजमधून वकिलीची दोन वर्ष पूर्ण केलीयत. सध्या ते शेवटच्या वर्षाला आहेत. 

गड किल्ल्यांचा प्रवास करून त्या विषयात संशोधन करण्याचा त्यांना छंद आहे. आतापर्यंत त्यांनी ५० गडकिल्ल्यांना भेटी देऊन झाल्यात. पन्हाळगड ते पावनखिंड हा प्रवास गेल्या १० वर्षांपासून ते सातत्याने करतायत.

मुख्यमंत्र्यांकडून सत्कार

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या यशस्वी घोडदौडीनंतर याच धर्तीवर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करता येईल अशी संकल्पना मंगेश चिवटे यांनी मंत्री एकनाथ शिंदेंसमोर मांडली. शिंदेसाहेबांना ही संकल्पना मनस्वी पटली. लगेच मंजूरही झाली. त्यानंतर लगेचच १७ नोव्हेंबर २०१७ला ठाण्यातल्या कोपरीमधे बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचीही स्थापना झाली.

कक्षाची रूपरेषा आवडल्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार १७ नोव्हेंबर २०१८ ला दादरच्या शिवसेना भवनात वैद्यकीय मदत कक्षाचा शुभारंभ झाला. तेव्हा चिवटे यांचा सत्कारही झाला.

मुलाखत घेणाऱ्याची मुलाखत

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात काम करण्याआधी चिवटेंनी स्टार माझा, जय महाराष्ट्र, साम टिवी, आयबीएन लोकमत अशा प्रसिद्ध न्यूज चॅनेलमधे काम केलं होतं. त्यातून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर चिवटेसरांनी रुग्णसेवा करण्याचा संकल्प केला. दरम्यान पत्रकारिता करत असताना अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना भारतरत्न मिळावा, त्यांच्या जन्मगावी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभारावं आणि त्यांचा जयंती दिवस राज्यात क्रीडा दिन म्हणून साजरा करावा, यासंदर्भात आयबीएन  लोकमत चॅनलवर प्रसारित केलेल्या त्यांच्या बातमीवर थेट राज्य विधानसभेत चर्चा झाली होती.

एकेकाळी चिवटे लोकांच्या मुलाखती घेत होते. मात्र आज चिवटेंच्या रुग्णसेवेतल्या कामामुळे त्यांची मुलाखत घेण्यासाठी मुंबई आणि ठाण्यातले मराठी, हिंदी चॅनलचे प्रतिनिधी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयात येत असतात. चिवटेंच्या एकूण कामाची दखल घेऊन राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेवर त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली.

हेही वाचा :  डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का?

सीमाभागात मदत आणि चळवळ

या टीम स्पिरीटमुळे मदत कक्षाच्या रुग्णसेवेची कीर्ती राज्यासह बेळगावपर्यंत पोचलीय. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार कोरोना पेशंटसाठी दहा ऑक्सिजन कॉन्संट्रेटर चिवटे यांनी स्वतः बेळगावला जाऊन तिथल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. बेळगाव इथल्या एका पंधरा दिवसांच्या बाळावर हृदय शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. तेव्हा मदत कक्षाच्या मदतीने शिवसेनेच्या ऍम्बुलन्समधून रातोरात मुंबईच्या हॉस्पिटलमधे आणून त्यावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले.

मागच्या काळात बेळगावमधल्या मराठी बांधवांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. त्याच्या निषेधार्थ तिथं राज्यातून रवाना झालेल्या शिवसेनेच्या पथकात चिवटेही सामील झाले. अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड असलेल्या चिवटे यांना मराठी भाषेसह मराठी भूमिपुत्रांचाही अभिमान आहे.

सरकारी योजनांचा फायदा

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून कोरोना काळात फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांची म्हणजेच डॉक्टर, नर्स, पोलिस, पत्रकार, सफाई कामगार यांची मोफत अँटीजन टेस्ट करून घेतली.

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे छोट्या आणि मध्यम उद्योगातल्या लोकांचे अतोनात हाल होऊन त्यांना दोन वेळचं अन्न मिळणं दुरापास्त झालं होतं. अशा बिकट परिस्थितीत मदतीचा हात देत रिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिला, डबेवाले, तृतीयपंथी यांना अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचं मोफत वाटप करण्यात आलं. अपंगांवर लॉकडाऊन काळात उपासमारीची पाळी येऊ नये यासाठी त्यांनाही जीवनावश्यक वस्तूंचं वितरण करण्यात आलं. 

शिवाय, कोरोनाच्या आणि इतर आजारांच्या खर्चिक उपचारासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना आणि खासगी ट्रस्टचा पैसा गरजूंपर्यंत पोचवण्याचं कामही शिवसेना वैद्यकिय कक्षातून होतं. यात प्रामुख्याने प्रधानमंत्री सहाय्यता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, लालबागचा राजा ट्रस्ट, टाटा ट्रस्ट, कारो ट्रस्ट, चाईल्ड हेल्थ फाऊंडेशन, जय गणेश ट्रस्ट अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.

इतकंच नाही तर, आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या ‘जय अंबे मां ट्रस्ट’ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून एकनाथ शिंदे थेट रुग्णांसाठी निधी उपलब्ध करून देतात.त्यामुळे त्यांच्यात जीवन जगण्याची नवी उमेद निर्माण होत असते. या सगळ्या योजना योग्य व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी चिवटे हे कक्षाचे प्रमुख या नात्याने निरंतर प्रयत्नशील असतात. 

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत सुमारे १५ हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्यात. त्यात कॅन्सर, ब्रेन ट्युमर, किडनी, लिव्हर इन बोनम्यारो ट्रान्सप्लांट, बायपास, मोतीबिंदू, एजिओप्लास्टी, कोकलीयर इमप्लांट, लहान मुलांच्या हृदयाला असलेल्या छिद्रांचं ऑपरेशन अशा शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

हेही वाचा : पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

चिवटेंची कोरोनावर मात

आजवर मदत कक्षाच्या माध्यमातून ११० पेक्षा जास्त महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून त्यात ४ लाख ५० हजारहून जास्त नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. शिवाय ठाणे शहरात रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र आरोग्य शिबीर आयोजित करून मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वाटप करण्यात आलं.  

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी चिवटेंनी आपलं वैद्यकीय मदत कक्ष लोकांच्या सोयीसाठी २४ तास सुरू ठेवलंय. तिथला प्रत्येक कर्मचारी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रुग्णांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आवश्यक ती सर्व माहिती देत असतात. कुठल्या रुग्णाने कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं, त्यांना गरज भासल्यास रुग्णवाहिकेची तातडीने सोय करणं तसंच ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणच्या रुग्णांना हॉस्पिटलची माहिती देणं, त्यांना बेड, वेंटिलेटर, ऑक्सिजन उपलब्ध करून देणं अशी कामं ही मदत कक्षाची टीम अहोरात्र करत असते. दरम्यान चिवटेंना कोरोनाची लागण झाली होती. पण त्याला भीक न घालता, त्यांनी सहजपणे मात केली.

प्रत्येक गरजूपर्यंत पोचायचंय

राज्याच्या सीमा लांघून केरळ राज्यात महापुराने पीडित झालेल्या लोकांसाठीही कक्षाकडून आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली. तिथं सुमारे ७५ हजार लोकांची मोफत वैद्यकीय तपासणी केली गेली. त्यावर पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले.

मंगेश चिवटे यांनी आता आपल्या कामांचा विस्तार करण्याचा निर्धार केलाय. रुग्णसेवेसह अन्य सामाजिक सेवा करण्यात रस दाखवला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात नुकत्याच उद्भवलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे कल्याण, अंबरनाथ, मलंगगड आदी ठिकाणी घरांची मोठी पडझड होऊन छताचे पत्रे उडाले. या पार्श्वभूमीवर मदत कक्षाच्या वतीने नुकसानग्रस्तांना पत्रे वाटून दिलासा दिला. 

शिवराज्याभिषेक दिनी चिवटेंच्या नेतृत्वाखाली मदत कक्षाची टीमने रायगड किल्ल्यावर प्रस्थान करून तिथल्या गार्ड आणि सुरक्षा रक्षकांना गणवेश, जॅकेट्स, बुट, ट्रेकिंग, खुर्च्या असं साहित्याचं खासदार छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शहाजी राजे यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं.

आज रुग्णसेवेचं त्यांचं काम राज्यातल्या २० जिल्ह्यांमधे पोचलंय. मदतकक्षाच्या रुग्णसेवेचा विस्तार लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात पसरून गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत वा अल्प दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : 

अचूक गुंतवणुकीतून महागाईवर मात कशी करायची?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक