मनोहर कदमः चळवळीशी एकरूप झालेला कार्यकर्ता संशोधक

०४ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ७ मिनिटं


इतिहास संशोधक, कथाकार, लेखक तसंच कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रावर ठसा उमटवणारे मनोहर कदम यांचा आज स्मृतिदिन. देशातली पहिली कामगार संघटना उभारणारे नारायण मेघाजी लोखंडे असोत किंवा तेलुगू समाजाचं महाराष्ट्रातलं योगदान असो किंवा कोकणातल्या विस्थापितांची तडफड असो, सत्यशोधक मनोहर कदमांच्या लेखणीने त्यांना न्याय मिळवून दिला. आज त्यांचा स्मृतिदिन मुंबईत साजरा होतोय.

मनोहरला जाऊन अठरा वर्षे झाली तरी अजून तो विस्मृतीत गेलेला नाही. त्याचा चेहराही डोळ्यासमोर दिसत राहतो. यामागचं एक कारण त्याच्याशी असलेले वैचारिक आणि भावनिक अशा दोन्ही प्रकारच्या नात्यांचे घट्ट बंध. आणि त्याचं पूर्ण श्रेय मनोहरचं. मनोहर अगदी तसाच होता. स्वत: सर्व करून त्याच्या श्रेयाचा आग्रह न धरणारा. त्याच्यासाठी नाव नाही तर काम आणि त्यामागचा विचार महत्त्वाचा होता. 

आज त्याने केलेलं संशोधन आणि लिखाण आपल्यासाठी ठेवून गेला तो. त्याहीपलीकडे सामाजिक कामातील कळकळ, प्रतिकूल परिस्थितीतही काम करीत राहण्याची ऊर्जा कार्यकर्त्यांनी कशी कायम टिकवून ठेवावी याचा एक वस्तुपाठ सर्वांसाठी आपल्या प्रत्यक्ष जगण्या वागण्यातून ठेवून गेला.

मला अजूनही त्याची पहिली भेट आठवतेय. ७३-७४ साल असावं. एका संध्याकाळी विक्रोळीचे राष्ट्र सेवा दलाचे बाबांचे स्नेही दशरथ बटा दोन तरुणांना घेऊन आमच्या भांडूपच्या घरी आले. त्या तरुणांना आपल्याबरोबर काही कामात जोडून घ्यावं म्हणून. त्यापैकी एक कुरळ्या केसांचा, नाकेला आणि अतिशय बोलके डोळे असलेला तरुण नंतर आमच्या कुटुंबातलाच एक बनून गेला. त्याचे पाणीदार डोळे केवळ बोलके नव्हते तर त्यात एक प्रकारचा स्नेहभाव होता. मनोहर कदम त्याचं नाव. 

तो स्वस्थ बसलेला नसायचा

मनोहर तेव्हा कुठेतरी नोकरी करत शिकत होता. पण आपल्या एवढ्या व्यस्त दिनक्रमातूनदेखील थकल्यावर घरी बसावं, असं कधी त्याला वाटत नसे. तर समाज समजून घेणं आणि तो बदलण्यासाठी सतत धडपडत राहाणं ही त्याची अगदी आतली गरज असावी अस वाटायचं. कारण तो कधीही स्वस्थ आरामात बसलाय असे क्वचित दिसे. केवळ वाचन हे त्याला जरा एका ठिकाणी जखडून ठेवत असावं. अन्यथा कायम पायाला भिंगरी लावलेली असायची त्याच्या. 

सेवा दलाच्या कामात त्याने स्वत:ला गुंतवून घेतलं ते अगदी पूर्णपणे. नंतर जयप्रकाश नारायण यांचं संपूर्ण क्रांती आंदोलन, आणीबाणी यात तो जमेल तसं काहीतरी करत होताच. त्या काळात खूप तरुण चळवळीत ओढले गेले. आणीबाणीनंतरच्या सत्तापालटानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात विधायक, संघर्षात्मक कामात आले. मनोहरदेखील आपलं स्वत:चं असं क्षेत्र काम करत असताना धुंडाळत होता. 

तो मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्यात अगदी विचारपूर्वक सामील झाला होता. त्यात तुरुंगवासदेखील भोगला त्याने. हा लढा केवळ दलित चळवळीचा नसून आंबेडकरी विचारधारेशी आणि संघटनांशी पुरोगामी चळवळी जोडल्या जाव्यात, त्या समांतर असू नयेत, असं त्याला खूप मनापासून वाटत असे.

व्यक्तिगत जीवनात एकीकडे, निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात असणारी आर्थिक ओढाताण नोकरी करून स्थिर व्हायला सांगत होती. दुसरीकडे, आपल्याला असं बंदिस्त आयुष्य जगायचं नाही, काहीतरी वेगळं हवं आहे, असं वाटत असतानाच्या वळणावर कधीतरी प्रतिमा जोशी त्याच्या आयुष्यात आली. दोघेही कामाठीपुरा परिसरातील वेश्यांच्या कामात गुंतत गेले. पुढे याच कामातून ‘महात्मा फुले समता प्रतिष्ठान’शी त्याचं नातं जुळलं ते अखेरपर्यंत. 

अनुभवाची भाषा इतिहास सांगायची

मधल्या काळात आपलं म्हणणं लिखाणातून मांडण्याची सुरवात त्याने केली. आणि मग विविध चळवळी, वर्तमान घडामोडी यावर तो लिहू लागला. महानगर या त्या काळात गाजणार्‍या दैनिकात मनोहरने सलग तीन वर्षाहून अधिक काळ सकस असं स्तंभलेखन केलं. पुढे ‘तात्पर्य’ या नावाने अक्षर प्रकाशनने त्याचं पुस्तक प्रसिद्ध केलं. 

साहित्यिक शैलीच्या प्रेमात न पडता रोखठोक अनुभवाची भाषा, त्याला अभ्यासाची जोड आणि ऐतिहासिक संदर्भ वर्तमानाशी जोडत जाणारी लिखाणाची पद्धत होती त्याची. कारण तो चळवळी बाहेरून काठावरून पाहत नव्हता, तर त्यांचा तो भाग होता. मग ती दलित आदिवासी हक्काची चळवळ असो की मुंबईतील गिरणी कामगारांचे होत जाणारं विस्थापन, वेश्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाबरोबरच माणूस म्हणून त्यांना आणि त्याच्या मुलांना असणारे जगण्याचे हक्क असोत; मनोहर त्याला जमेल तसं कार्यक्रमात आपलं योगदान देत असे.  

मला आठवतेय, मी १९७८-७९ नंतरच्या काळात मुंबई सोडून तेव्हाच्या कुलाबा जिल्ह्यात आदिवासी समूहाबरोबर कामाला सुरुवात केली. त्यानंतर कोळसाभट्टी, वीटभट्टी कामगारांची संघटना बांधणं असो की बांधील गड्यांची मुक्तता, दळी जमिनीच्या हक्काचं आंदोलन असो की, आदिवासींच्या सामूहिक लग्नसमारंभासारखा कार्यक्रम, मनोहर प्रत्येक कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असे. जेव्हा जेव्हा मुंबईत भेटे तेव्हा सर्व कामाबद्दल तपशीलवार समजून घेत आपले मतदेखील मांडत असे. त्यातून एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्या विषयाकडे पाहायला आम्हाला मदत होई. केवळ ‘तुम्ही छान काम करता’ एवढेच म्हणून न थांबता तो त्यात स्वत:ला जोडून घेई, हेच त्याचं वेगळेपण होतं. 

मी लिखाणात कमी पडते आहे, दळी जमिनीचा प्रश्न आहे हेच प्रशासनासह अन्य लोकांना कळत नाही असं मी म्हणताच, त्याने त्याबद्दल सर्व माहिती माझ्याकडून समजून कधी घेतली, हेच मला कळलं नाही. पण आंदोलनातून मिळवलेल्या दळीबुकांचं वाटप बाबा आढाव यांच्या उपस्थितीत करणारा कार्यक्रम आयोजित केला, त्या दिवशी महाराष्ट्र टाइम्समध्ये या प्रश्नावर एक मोठा लेख छापून आला होता. तोही माझ्या नावाने. आणि हे नामानिराळे राहून लिहिण्याचे कर्तृत्व होतं मनोहरचं.  

पुढे कधीतरी इतिहास विषय घेऊन मनोहर एमए झाला. हा विषय अगदी मनापासून त्याने घेतला असावा. कारण पुढे त्याची प्रसिद्ध झालेली दोन संशोधनपर पुस्तकं, एक ‘भारतीय कामगार चळवळीचे जनक : नारायण मेघाजी लोखंडे’ आणि दुसरं ‘मुंबईच्या उभारणीत तेलुगू समाजाचे योगदान’. म. जोतिराव फुले प्रतिष्ठानच्या ‘पुरोगामी सत्यशोधक’ आणि ‘महानगर’मधील लिखाणही असंच. त्या लिखाणात ऐतिहासिक संदर्भ तपासून सत्य लोकांसमोर आणण्याची त्याची धडपड लक्षात येते. तीही इतिहासात न रमता त्यातून बोध घेत समाजाने पुढे जावे या भावनेतून. तसंच समाजाची जडणघडण त्यामागील प्रकियादेखील कळावी म्हणून.

तोही हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न त्याच्या अभ्यासातून करीत होता. चळवळीचा पुसला गेलेला इतिहास प्रकाशात आणण्याचे अतिशय मोलाचे काम त्याने करून ठेवले आहे. पण त्यावर डॉक्टरेट मिळवावी असं कधी त्याला वाटलं नाही. तसा मोहदेखील कधी त्याला झाला, असं वाटलं नाही. त्याला रस होता तो फुले, आंबेडकर यांना अभिप्रेत असणार्‍या दलित, बहुजन समाजाच्या जडणघडणीत. 

तळागाळातील कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांना व्यासपीठ मिळवून दिलं पाहिजे, असं त्याला वाटे. त्यातून त्याने राज्यात दौरा करून एक ओबीसी परिषददेखील आयोजित करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचं महत्त्व तेव्हा कोणालाही वाटलं नाही. अशा अनेक नाउमेद करणार्‍या अनुभवांनी खचून न जाता सक्रीय कार्यकर्ता ते चळवळीचा एक समर्थक हितचिंतक अभ्यासक आणि लेखक कार्यकर्ता असा त्याचा प्रवास झालेला दिसतो.

सहजीवनातल्या साथीला सलाम

एकीकडे पक्का राजकीय कार्यकर्ता असणारा मनोहर पक्का कोकणी होता. विशेषत: मालवण आणि तिथला माणूस हाही त्याचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. त्यातूनच त्याच्या कथा लिहिल्या गेल्या. पुढे त्याचा कथासंग्रह ‘शबय’ या नावाने प्रसिद्ध झाला. आपल्या नावे अमुक एक पुस्तक आहे असं त्याने स्वत:हून कधीच सांगितलेलं मला आठवत नाही. किंवा ‘मी लिहिलेलं वाचलेस का?’ असे विचारलंदेखील नाही. कधी बोलण्यात विषय निघालाच, तर ‘वाचलंस का तू?’ म्हणून हसायचा. लिखाणात परखड असणारा मनोहर बोलण्यात अतिशय मितभाषी, मृदू होता. 

कुटुंबवत्सल असणारा मनोहर कुटुंबातील अडचणींबाबत कधीच बोलायचा नाही. खरं पाहता मनोहर आणि प्रतिमा दोघांना सलाम केला पाहिजे, असंच दोघे जगत आले. चळवळीत असणार्‍या कुटुंबात पतीपत्नीपैकी एकाने कमवावे आणि एकाने पूर्णवेळ कार्य करावे, असा काळ होता तेव्हाचा. दोघांच्या सहजीवनात एक टप्पा असा आला की कुटुंबात मुलांसाठी, विशेषत: एका विशेष अपत्यासाठी वेळ देणं अत्यावश्यक होतं. दोघांनी कमवणे पण महत्त्वाचं. प्रतिमा नुकतीच पत्रकारितेत स्थिरावत होती. अशावेळी मनोहरने नोकरी सोडून पूर्णवेळ घर सांभाळून लिखाण संशोधन करण्याचा निर्णय घेतला आणि शेवटपर्यंत निभावला. 

त्याला जे सांगायचं असे ते त्याचे डोळेच बोलून जात. जवळचं कुणी भेटल्याचा आनंद तर लगेच ओसंडून वाहे. माझा धाकटा भाऊ चारू आजही या मनोहरदादाची आठवण काढतो, कधी कुळथाचं पिठले, काळ्या वाटाण्याची उसळ केली की. हे त्याचे आवडीचे पदार्थ त्याला आपल्या माणसांत नेत असत बहुधा.  

मनोहरचं मन अतिशय तरल आणि संवेदनशील होते. म्हणूनच तो वाईट घटनांनी अस्वस्थ होई. अगदी आजारपणाच्या शेवटच्या टप्प्यातदेखील त्याला जेव्हा शरीर पूर्णपणे साथ देईनासं झालं, तेव्हा नोव्हेंबर २०००मधे त्याने बाबा आढाव यांना लिहिलेले पत्र अतिशय बोलकं आहे. 

तो लिहितो, ‘असाध्य आजारामुळे प्रत्यक्षात कुठल्या कार्यक्रमात सहभागी होता आलं नाही. परंतु गतवर्षी घडलेल्या अनेक घटनांमुळे डोक्यात विचारांचं काहूर आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मुंबईत येऊन गेले. आयटी कल्चरचा उदोउदो झाला. जिथे शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या त्या आंध्रला सायबराबाद म्हटले गेलं. तर जयपुरात मनू पुतळ्याबाबत दोन महिन्यांची प्रबोधनयात्रा काढूनही समाजाला, माध्यमांना त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. भाजपचे अध्यक्ष सारखे राममंदिर, संघ याविषयी वेगवेगळी प्रतिपादने करत आहेत आणि माध्यमं त्यांना साथ देत आहेत. आर्थिक अरिष्टात देश सापडला आहे. तेथून लक्ष हटवणे हाच या सार्‍याचा अर्थ आहे. या सर्व काळात खाजगीकरणाने जोर धरला आहे. जागतिक बँकेच्या अध्यक्षांनी नुकतेच वीज मंडळाच्या व्यवस्थापनात सरकारचा हस्तक्षेप नको, असं बजावलं आहे. हे होताना संघटित कामगार चळवळ गप्प राहत आहे आणि त्याचे दुष्परिणाम जाणवल्याशिवाय राहणार नाहीत. दुसरीकडे हातावर पोट असलेल्या कष्टकर्‍यांचं जगणं कठीण झालं आहे. छोटे मोठे समतावादी गट याविरुद्ध झगडण्याचं काम करत आहेत, पण त्यांची शक्ती क्षीण आहे...`

अतिशय लहान वयात त्याला कर्करोगाने गाठलं. तरीही संशोधनपर लिखाणाची त्याची उमेद कमी झाली नव्हती. अजून बाबू गेनूवर त्याला लिहायचं होतं. अवघड दुखण्यातदेखील त्याचं मन समाजातील वंचित घटक आणि त्यांचं भवितव्य, त्यांच्या चळवळी यातच घोटाळत होतं. अगदी शेवटचा श्वास घेतानासुद्धा त्याला आपल्या कुटुंबियांसह चळवळीचं गाणं ऐकायचं होते. असं भरभरून आणि परिवर्तनाच्या विचाराने लढ्याशी समरसून जगणारा मनोहर होता. बहुजन समाजाची परिवर्तनाची चळवळ आणि मनोहर ही त्याच्यापुरती एकरूप झालेली होती.

(लेखिका सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणार्‍या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत)