डॉ. मानवेंद्र काचोळे : मातीशी जोडलेला कार्यकर्ता संशोधक

०२ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


शेती विषयाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मानवेंद्र काचोळे यांचं २७ जानेवारीला निधन झालं. विद्यापीठीय संशोधनात यशाची शिखरं गाठत असतानाही त्यांनी मातीशी आपलं नातं घट्ट बांधून ठेवलं. युक्रांदपासून शेतकरी संघटनेपर्यंतचा त्यांचा प्रवास त्याची साक्ष देतो. ज्येष्ठ संपादक निशिकांत भालेराव यांनी त्यांना आदरांजली वाहताना फेसबूकवर एक पत्र लिहिलंय.

मानवेंद्र, 
 
किरण,चोळ्या, काका आणि मानवेंद्र. अशा चार नावांनी तुला आम्ही १९७२ नंतर ओळखू लागलो. मला आठवतं आपली भेट १९७४ च्या विकास आंदोलनातली. युक्रांद म्हणून आपण इतकी वर्ष एकत्र उद्योग केले. पण तसा तू लिबरल आणि वडील रॉयिस्ट असल्याने रॅशनॅलिस्ट राहिलास. अलीकडच्या काळात होते आपले वैचारिक मतभेद. पण इतके नव्हते की रागारागाने तू असं एकदम निघून जावंस आणि ते सुद्धा कोरोनाने! नाही यार किरण! फार अवघड जातंय मला आणि अनेक युक्रांदियांना!

प्रवीण गेला काही वर्षांपूर्वी तेव्हा तुझा आवडता शायर फैज याची एक नज्म तू सांगितली,

जो गुजर गई हैं रातें
उन्हे फिर जगा के लाए
जो बिसर गयी है बाते उन्हे याद में बुलाये
चलो फ़िरसे दिल लगाए चलो फ़िरसे मुस्कुराए

पण नाही जमलं आपल्याला अनेक कारणांनी. तोपर्यंत तू शेतकरी संघटनेचा थिंक टॅंक झाला होतास. तिथं तू रमणं शक्य नव्हतं. पण तुझी मांडणी खुल्या शेतमाल बाजारपेठेला पूर्ण अनुकूल झाली होती. त्यावेळी तुला मी आठवण करून दिली की १९८२ मधे शरद जोशी जेव्हा ३ दिवस आमच्या घरी मुक्कामाला होते तेव्हा अनंतरावांनी त्यांना आग्रह केला की तुम्ही युक्रांदवाल्यांना भेटा. तुम्हाला काही कार्यकर्ते इथे भेटतील.

आपण सगळे जमलो आणि जोशी आपल्याला पाहून कुचेष्टेनेच म्हणाले, ‘अरे बापरे सगळे अल्ट्रा यांच्याशी काय बोलणार?’ आपल्या सगळ्यांनाच त्यांचा टोमणा आगाऊ वाटला. तू तर बाहेरच पडला आणि म्हणाला, फारच दिसताहेत नाही जमणार!

हेही वाचा : शंकर सारडा: जगभरातल्या साहित्याला कवेत घेणारे समीक्षक

मग शेतकरी संघटनेचं राजकीय विश्लेषण तूच आम्हाला उलगडून दाखवलं. श्रीमंत बागायतदारांची संघटना वगैरे. नंतर १९९२ मधे एकदम मला समजलं की तू शेतकरी संघटनेत गेलास आणि नंतर स्वतंत्र भारत पक्षाचा अध्यक्ष झालास. मी म्हणालो होतो तेव्हा पोएटिक जस्टिस मिळाला तुला म्हणून.

पण आपल्या युक्रांदवाल्यांचे एक बरं होतं. आपण संघटनेत होतो तेव्हा टोकाचा ध्येयवाद आणि समाजवाद. आणि सोडली संघटना की एकदम दुसरं टोक. पुढे ऍग्रोवनला मी आल्यावर तू शिव्या दिल्यास मला आणि सूनवल्या चार गोष्टी. ऐकल्या मी. कारण १९७४ ते १९८४ या १० वर्षात आपण जे काय उपद्व्याप केले त्याला तोडच नाही.

आव्या, मंगल, सुभाष, अनिल, दिगंबर, प्रवीण, शशी,मनसुख, अजित, भालू अरे किती जणांची नावं घेऊ. मी, आव्या तुझ्या बुढी लेनमधल्या वाड्यात तुझ्या खोलीत झोपायचो. रात्री बेरात्री मॉडर्नवर चहा ढोसणं, सोबत गुलाम अली, सायन्स कँटीनमधे ते बंद होईपर्यंत राजकारण, तुझ्या बरोबर तुझ्या आणि सुनितीच्या संशोधनसाठी लागणारे गिनीपिग आणण्यासाठी जाणं, तू प्रयोग लावला असेल तर केमिस्ट्री विभागात रात्र काढणं.

सर्वात हाईट म्हणजे विद्यापिठाला मुलींचं हॉस्टेल नव्हतं आणि जोगदेव लायब्ररीयन यांच्या क्वार्टर शेजारी एका हॉलमधे 5 मुली राहायच्या. त्यातील लता, बेबी, साळुंके या आपल्या ओळखीच्या. त्यांना रात्री भीती वाटायची म्हणून तू आयडिया काढलीस. आपण बाहेर तिथेच त्यांना सोबत म्हणून रात्र काढू. आणि आपण ते केलं. आज वेडेपणा वाटतोय. पण त्यांना धीर मिळाला आणि पुढे त्या मोठ्या हॉस्टेलला गेल्या.

मधे तुला झटका आला की राज्य नाट्य स्पर्धेत उतरायचं. शशी आणि दिलीप तयार होते. चंद्रकांत पाटील यांनी मणी मधुकरच्या 'रसगंधर्व' चं रूपांतर करून दिलं. आपण बॅक स्टेजला. आणीबाणीचा संदर्भ स्क्रिप्टला असल्यानं पेपरचे रोल काय, लांब लांब छापलेले पेपर काय!

रात्र रात्र जागून सेट उभा केला. नाटक पडलं. तेव्हा तू म्हणालास शश्याला 'अरे नाहीतरी परीक्षकांना कळणारच नव्हतं. यांना काय कळणार अबसर्ड ड्रामा वगौरे!

मधे तू विद्यापीठाचा कुलसचिव बनला. तेव्हा तुझी पहिली विद्यापीठ स्टुडंट काऊन्सिलची निवडणूक आठवली. गंगाधर गाडे होता उभा. पँथर म्हणून त्याला दोन एलआर ज्या ब्राह्मण होत्या मत देणार नाहीत. म्हणून तू स्वतःला दोन मतं कमी घेतली आणि पहिला दलित विद्यार्थी अध्यक्ष निवडून आला. 

पुढे वसंत काळे यांचे पॅनल, मुरसा संघटनेला केलेलं मार्गदर्शन, हिमालयन कार रॅलीचा बोऱ्या, पैठणचा यज्ञ उधळणं अरे कसले उद्योग केले आपण!

हेही वाचा : जयंत नारळीकर म्हणजे फळांनी लगडलेलं एक सफरचंदाचं झाडच!

वैचारिक बाजू तूच सांभाळल्या सगळ्यांच्या. नामांतराबाबत आपले मतभेद होते. विद्यापीठ संशोधन दर्जा वाढवणं यावर तू काम करायचा. ते करता करता तू बायो केमेस्ट्री विभाग प्रमुख झालास. संशोधनात असूनही तू शेतकरी संघटनेत सक्रिय झालास. लोकसभा निवडणुकीस उभा राहिलास. खानदानी मराठा असूनही कोणत्याच राजकीय प्रलोभनाला बळी नाही पडलास. याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलंय.

खोकडपुर्यीतल्या बिस्मिलाहच्या टपरीवर अझीझ नाझाच्या कव्वालीवर आपण तासन् तास कसे घालवले आणि गोळवलकर गुरुजी विचारधन, कसबे झोत, दलित चळवळी, युक्रांदच्या भूमिकेतला दोष तू सांगत असे. चहाच्या कपात सिगरेटची राख टाकून तो पिऊन तुझी वैचारिक मांडणी आठवते बघ. तसा गेल्या काही वर्षात तू जरा सगळ्यांपासून अलिप्त होतास. मधे एमजेएमचा संचालक झाला तेव्हा बरं वाटलं होतं. पण तिथं तुझं जमेल का नाही याची भीती होतीच. तू फार टोकाचा लिबरल होतास.

शेती कायद्यांवरूनवरून आपली वादावादी झाली होती. त्या निमित्ताने तू फेसबूक आणि व्हाट्सअप्प वापरू लागला, मतं मांडू लागला. मी जेव्हा मोदी यांच्याविषयी तुझ्याशी बोललो तेव्हा तू मला कोलून लावलं. शेती कायदे हे तुझं लक्ष्य होतं, ते पूर्ण होतंय, असं म्हणालास. त्यांच्या राजकारणाशी तुला देणंघेणं नव्हतं.

मी यानंतर म्हणजे अगदी १० जानेवारीला तुझा चाळीस वर्षांपूर्वीचा चे आणि फिडेलच्या अवतारातला फोटो तुला पाठवला आणि म्हटलं की कधीकाळी चे आम्हला भेटला तो असा. त्यावेळी तू आपले शायर मित्र बशर नवाज यांचा शेर ऐकवला

'घटती बढती रोशनिया ने मुझे समझा नही
मै किसी पत्थर किसी दिवार का साया नही'

खरे होतं हे आणि आहे. मंगल, राही विद्या, बाई तुमचं सांत्वन नाही मी करू शकत! देशात शेतकऱ्यांच्या भल्या गोष्टी होत असताना त्या उलगडून सांगण्याची वैचारिकता तुझ्यात असताना नेमका तू नाहीस आज. अवघडच होतास तू तुझ्या नावाप्रमाणे मानवेन्द्रा!

हेही वाचा : 

फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!

बजेटमधे हवा कोरोना लसीकरणाचा प्लॅन

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १

दाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा