राष्ट्रीय पुरस्कारांवर ठसठशीत मोहर उमटवणारे मराठी सिनेमे आहेत कसे?

०६ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


२०१९ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात अभिनेत्री कंगना राणावत हिला मिळालेल्या किंवा छिछोरे या सिनेमाला मिळालेल्या पुरस्कारावरून वाद होतील. पण या पुरस्कारांच्या यादीत असलेले मराठी सिनेमे मात्र सगळ्या वादाच्या पलिकडचे आहेत. कथानक, कॅमेरे, आवाजापासून ते सिनेमांवर लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीची मोहर दिसून येते.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून बहरात असणारा सिनेमा उद्योग, संस्कृती आणि कलामाध्यम म्हणून कसा संवर्धित होईल आणि त्याचा आधुनिक भारताच्या निर्मितीत कसा उपयोग करून घेता येईल, याद़ृष्टीने स्वातंत्र्यानंतर देशपातळीवर प्रयत्न सुरू झाले. यातूनच १९५४ ला सुरू झालेले ‘स्टेट अ‍ॅवॉर्डस् फॉर फिल्म्स’ त्यांनाच पुढे ‘नॅशनल फिल्म अ‍ॅवॉर्डस्’ म्हटलं गेलं. 

पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या द़ृष्टिकोनाचं हे फलित आहे. या राष्ट्रीय पुरस्कारांमागे तीन हेतू होते. एक, भारतीय सिनेमांचा सौंदर्यशास्त्रीय आणि तंत्रद़ृष्ट्या विकास व्हावा. तसंच त्यातल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्यांची प्रगती व्हावी. दोन, भारतीय सिनेमा करणाऱ्यांना सकस सिनेमानिर्मितीसाठी प्रोत्साहित मिळावं. तीन, भारतीय प्रेक्षकांना अन्य प्रादेशिकपटांची ओळख होऊन आंतरभारती संकल्पना रुजावी. 

या पुरस्कारांचं गांभीर्य त्यांच्या राजमान्यतेमुळे आणि हेतूंमुळे अधिक राहिलंय. हे गांभीर्य टिकवणं भारतीय सिनेमा उद्योगाच्या आणि संस्कृतीच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचं आहे.

हेही वाचा : फक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर?

उद्योगांचा प्रभाव संस्कृतीवर

सुरवातीच्या काळात व्यावसायिक आणि कलात्मक सिनेमा असं स्पष्ट विभाजन नव्हतं. तेव्हा कलात्मक जाणिवेने बनणार्‍या व्यावसायिकपटांचाही समावेश पुरस्कारांमधे असायचा. हळूहळू मुख्य प्रवाहाला समांतर जाणारा कलात्मक सिनेमांचा प्रवाह ठळकपणे जाणवू लागला. तेव्हा या पुरस्कारांमधे त्यांचीच जास्त वर्णी लागू लागली.

प्रेक्षकशरण नसणार्‍या प्रायोगिकतेचं स्वागत होणं गरजेचं असतं. कारण, त्याचा अप्रत्यक्ष परिणाम मुख्य प्रवाहाची साचेबद्धता मोडण्याच्या दिशेने होत असतो. अगोदर याबाबत फारशी तक्रार नसायची. पण हळूहळू सिनेमा उद्योगाकडून व्यावसायिकपटांचीही दखल घ्यावी, असा दबाव येऊ लागला. त्यातून १९७५ पासून निखळ मनोरंजन करणार्‍या लोकप्रिय सिनेमांचा वेगळा विभाग करून त्यांनासुद्धा पुरस्कार मिळू लागले. 

संमिश्र प्रेक्षकस्तर लक्षात घेऊन सिनेमा निर्माण करताना काही तडजोडी करूनही आपल्याला सांगायचं आहे ते प्रभावीपणे पोचवणारे सिनेमा बनवणाऱ्यांची दखल घेणंही महत्त्वाचं होतं. उद्योगाचा दबाव एकूणच कला संस्कृती व्यवहारावर पडताना दिसतो.  तसा तो तर राजकारण, समाजकारण या सार्‍यावरच पडतोय. 

२०१५ मधे ‘बाहुबली’ला निखळ मनोरंजन करणार्‍या लोकप्रिय सिनेमांच्या गटातच  नव्हे, तर चक्क सर्वोत्कृष्ट सिनेमाचा सुवर्णकमळ पुरस्कार मिळाला, हे आश्चर्यजनक होतं. यंदा कंगनाला मिळालेला पुरस्कार तसेच ‘छिछोरे’ला मिळालेला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार याविषयी वाद होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमांची कामगिरी विशेष महत्त्वाची ठरते. त्यातल्या काही सिनेमांची ही ओळख.

८ प्रकारच्या कॅमेरांचा वापर

पहिला सिनेमा ‘बार्डो’. मृत्यू ते जन्म यादरम्यानची तरल अवस्था म्हणजे ‘बार्डो’. भीमराव मुडे हा उमेदीचा दिग्दर्शक या कलाकृतीतून स्वप्न-सापेक्षतावाद मांडतो. अर्थात, त्यासाठी तो प्रबंधात्मक, तत्त्वज्ञानात्मक पारिभाषिक शब्दबंबाळ भाषेचा वापर न करता, निसर्गातल्याच साध्या साध्या बाबींचा सिनेमॅटिक वापर करतो. 

सर्वसामान्यांच्या जगण्यातल्या स्वप्नांचा वेध, मागोवा, भंग, चिकाटी, पूर्ती या सार्‍याचं दर्शन घडवण्याचा त्याचा प्रयत्न सहलेखन आणि संवादाच्या माध्यमातून डॉ. श्वेता पेंडसे यांनी केला आहे. स्वप्नांचे वेगवेगळ्या द़ृष्टिकोनातून दर्शन घडवताना ८ प्रकारचे कॅमेरे वापरलेत.

या कलाकृतीला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार मिळालाय. शिवाय, खान्देशी बोलीतील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी सावनी रवींद्र हिला पार्श्वगायिकेचा पुरस्कारही मिळालाय. त्यातल्या लोकसंगीताचा वापरही केवळ खान्देशापुरता मर्यादित न राहता वैश्विक होतो. सिनेमात अंजली पाटील, मकरंद देशपांडे, गिरीश परदेशी, अशोक समर्थ यांच्या भूमिका आहेत.

हेही वाचा : इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

वास्तववादी धाटणीचा ‘ताजमाल’

या सिनेमाला राष्ट्रीय एकात्मतेवरील नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला असला, तरी याचा आशय फक्त एकात्मतेपुरता मर्यादित नाही. अगदी ताजमहालसारखी दिसणारी म्हणून नाव ताजमाल असणार्‍या बकरीभोवती सिनेमाचं कथानक फिरतं. कालौघात फक्त कर्मकांड होऊन बसलेल्या आणि हितसंबंधात गुरफटलेल्या बाबींकडे विवेकी भावनात्मकतेने पाहण्याचा प्रयत्न दिग्दर्शक नियाज मुजावर यांनी केलाय.

सिनेमाची धाटणी वास्तववादी आहे. कथानकाची मांडणी उत्कंठावर्धक असून ती द़ृश्य परिभाषेस उंचावण्याचा प्रयत्न करते. राकट, कणखर अशी निसर्गाची पार्श्वभूमी आणि रंगविचार कलादिग्दर्शक अमोल बोडके यांनी दिग्दर्शकीय द़ृष्टिकोनानुसार प्रत्यक्षात उतरावलाय. 

‘आनंदी गोपाळ’ या सिनेमाला सामाजिक सिनेमासह कला दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जीवनसंघर्ष हा सिनेमा मांडतो.

आवाज कुणाचा?

पूर्वी ध्वनिमुद्रणासाठी फक्त एक एकत्रित पुरस्कार असायचा. पण आता तो साऊंड डिझायनिंग, सिंक साऊंड आणि साऊंड मिक्सिंग अशा तीन बाबींसाठी वेगवेगळा दिला जातो. साऊंड डिझायनिंगचा पुरस्कार मंदार कमलापूरकर यांना अक्षय इंडीकर दिग्दर्शित ‘त्रिज्या’साठी मिळालाय. व्यक्तीच्या स्वतःपासून सुरू होणार्‍या शोधाची व्याप्ती वाढत जाताना वाढणारी त्रिज्या किंवा परीघ असं आशयसूत्र असणार्‍या या सिनेमात घटनाक्रमास नाही तर व्यक्तिरेखेच्या मानसिक अवस्थेला महत्त्व आहे.  

पार्श्वसंगीत नसणार्‍या या सिनेमात टँजेण्ट जाणार्‍या नॉन-डायजेटिक ध्वनी आणि अँबिएन्टिक संगीताचा प्रत्ययकारी वापर केलाय. केवळ द़ृश्य भरून काढण्यासाठी म्हणून नाही, तर व्यक्तिरेखेला आणि आशयसूत्राला एक नेमकं परिमाण देण्याचा द़ृष्टीने सर्जनशीलतेने आवाजाचा वापर केलाय.

हेही वाचा : जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

दशावताराच्या कलाकारांचा सहभाग

‘पिकासो’ या सिनेमाची दिग्दर्शकीय कामगिरी ही परीक्षकांच्या विशेष नोंदीस पात्र ठरली. अभिजित वारंग दिग्दर्शित या कलाकृतीमधे बाप आणि मुलाची कथा दशावताराच्या पार्श्वभूमीवर साकारते. कॅमेरा संकलनातून तसंच संवादासाठी वापरलेल्या आवाजाच्या पोतातून हे साधलं जातं. मध्यवर्ती व्यक्तिरेखा आणि त्याचं कुटुंब वगळता अन्य सर्व व्यक्तिरेखा या दशावतार साकारणार्‍या कलाकारांनीच पेलल्यात. केवळ ७० मिनिटांची अशी प्रायोगिक कलाकृती आता ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वर उपलब्ध आहे.

‘लता भगवान करे’ ही शीर्षकी व्यक्तिरेखा निभावणार्‍या स्वतः लता करेच अभिनयासाठी विशेष नोंदीस पात्र ठरल्यात. त्यांनी नवर्‍याच्या उपचारासाठी वयाच्या ६५ व्या वर्षीही मॅरेथॉनमधे भाग घेत शर्यत जिंकली होती. या सत्यघटनेवर आधारित प्रत्यक्षातील व्यक्तींना घेऊनच केलेल्या या सिनेमाचा प्रयत्न वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

सिनेमा पाहणाऱ्या माणसाची कमाल

नॉन-फिचर गटात लघुपटांचा आणि माहितीपटांचा समावेश होतो. या गटात पदार्पणीय दिग्दर्शकाचा पुरस्कार राज मोरे यांच्या ‘खिसा’ या कैलाश वाघमारे लिखित, अभिनित लघुपटासाठी मिळाला. यात सर्वसामान्यांच्या जगण्यातल्या साध्या साध्या आनंदाच्या बाबींवर धर्मांधतेमुळे पडणार्‍या विरजणाचे अस्वस्थकारी दर्शन घडवलंय. 

तर उत्कृष्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह फिल्मचा पुरस्कार ‘जक्कल’ या ७२ मिनिटांच्या माहितीपटास मिळाला. काही वर्षांपूर्वी पुण्यात घडलेल्या खळबळजनक हत्यासत्राचा विविध अंगाने मागोवा घेण्याचा यात प्रयत्न केलाय. 

फक्त सिनेमांनाच नव्हे, तर सिनेमांविषयक पुस्तकांना आणि समीक्षेलाही पुरस्कार दिले जातात. यात संजय सुरीच्या ‘अ गांधीयन अफेयर’ या पुस्तकास, तर एका कन्नड पुस्तकाबरोबर, अशोक राणे यांच्या ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाची विशेष नोंद घेतलीय. 

व्यवस्थेचंही ‘पोस्टमार्टम’ करणार्‍या आपल्याच लघुपटाचा विस्तार विनोद कांबळे या मराठी दिग्दर्शकाने ‘कस्तुरी’ या हिंदी सिनेमामधून केलाय. त्याला बालचित्रपटाचा पुरस्कार मिळाला असला आणि यातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा लहान मुलांची असली, तरी हा फक्त बाळबोध सिनेमा नाही.

हेही वाचा : 

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!

बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या

 एका शिक्षकाला बियरने चीनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं, त्याची गोष्ट