`प्लॅनेट मराठी` या नावाने मराठीतलं पहिलं ओटीटी चॅनेल बाजारात येणार आहे. मराठी निर्मात्यांच्या संघटनेनेही मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करायची घोषणा केलीय. इंग्रजी, हिंदीप्रमाणे मराठी ओटीटीप्लॅटफॉर्म चालतील का? तेलुगू, तमिळप्रमाणेच मराठी ओटीटीच्या पदरात यश पडेल का? यावर प्रख्यात माध्यमकर्मी नितीन वैद्य यांची मुलाखत.
मनोरंजन ही माणसाची शेवटची गरज खरी, पण अन्न, वस्त्र, निवाऱ्यापेक्षाही जास्त चर्चा मनोरंजनाचीच होते. कोरोनाकाळात नवे सिनेमे आणि नव्या सिरियल बंद असताना ही शेवटची गरज भागवण्याचं काम ओटीटी म्हणजेच ओव्हर द टॉप कंटेण्ट दाखवणाऱ्या प्लॅटफॉर्मने केलंय. नेटफ्लिक्स, ऍमेझॉन, हॉटस्टार, मॅक्सप्लेयरही नावं आता दूरची नाहीत. प्रामुख्याने इंग्रजी आणि हिंदी भाषेतला कंटेण्ट दाखवणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर आता मराठीसह स्थानिक भाषांचा कंटेण्टही येऊ लागलाय.
तिकडे दक्षिणेत तमिळ, तेलुगू या भाषांमधलाच कंटेण्ट देणारे ओटीटी प्लॅटफॉर्म आधीच सुरू झालेत. आता `प्लॅनेट मराठी` या नावाने मराठीतलंही पहिलं ओटीटीचॅनेल बाजारात येण्याची घोषणा झालीय. मराठी सिनेमाच्या निर्मात्यांच्या संघटनेनेही एक मराठी ओटीटीप्लॅटफॉर्म सुरू करण्याची घोषणा केलीय.
मनोरंजनाचं अत्यंत महत्त्वाचं साधन बनलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या मराठी भवितव्याविषयी कोलाजने नितीन वैद्य यांच्याशी चर्चा केलीय. `मुरांबा` या सुपरहिट सिनेमाचे आणि टीवीवरच्या मालिकांचे निर्माते ही त्यांची सध्याची ओळख. एक पत्रकार ते झी, स्टार या माध्यम समूहांचे सीईओ अशा करियरमधे माध्यम जगातली स्थित्यंतरं त्यांनी जवळून पाहिलीत. त्यांच्याशी झालेली ही प्रश्नोत्तरं.
१९९९ मधे अल्फा मराठी म्हणजे आताचं झी मराठी हे मराठीतलं पहिलं २४ तास चॅनेल लॉन्च झालं. ते उभारण्यात तुमचा पुढाकार होता. त्यावेळी हिंदी चॅनेलच्या गर्दीत आत्मविश्वासाने मराठी झळकणं ही नवी क्रांतीच होती. आता साधारण २० वर्षांनी ओटीटी नावाची नवी क्रांती मनोरंजनाच्या जगात आलीय. त्याकडे तुम्ही कसं पाहता?
ओटीटीमुळे मनोरंजनाच्या जगतात खूप मोठे बदल झाले आहेत आणि यापुढेही होतील. स्क्रीनवर दिसणाऱ्या कंटेण्टचा दर्जा सुधारण्यात या ओटीटी प्लॅटफॉर्मचा मोठा हात आहे. शिवाय, प्रेक्षकांना हवा तो कंटेण्ट निवडता येणं किंवा नाकारता येणं इथं शक्य आहे. ओटीटीवरचा फक्त एखादा सिनेमा किंवा वेबसिरिजच नाही तर संपूर्ण ओटीटी प्लॅटफॉर्म आवडला नाही तरी प्रेक्षकवर्गणी रद्द करून सोडून देऊ शकतात.
हवा तो कंटेण्ट, जाहिरातींचा कोणताही व्यत्यय न येता पाहता येणं हा ओटीटीचा सर्वात मोठा फायदा आहे. त्यामुळेच आता नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉनसारख्या जगप्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मसारखा दर्जेदार कंटेण्ट भारतीय प्रेक्षकांच्या रूचीनुसार तयार व्हायला सुरूवात झालीय. त्याच्या संकल्पनांपासून सादरीकरणापर्यंत सगळाच दर्जा सुधारायला यातून मदत होणार आहे. खूप खर्च करून दर्जैदार आणि आकर्षक पद्धतीने तयार केलेला, आटोपशीर लांबीचा आणि चांगल्या कलाकारांनी सादर केलेला असा कंटेण्ट हे प्लॅटफॉर्म देतायत. ही निश्चितच चांगली आणि स्वागतार्ह गोष्ट आहे.
हेही वाचा : बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?
जगभरात ओटीटी प्लॅटफॉर्मचा काय प्रभाव दिसतो? किती स्थानिक भाषेतली ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत? भारतातही स्थानिक भाषेतले प्लॅटफॉर्म येतायत. ते यशस्वी होतील?
ओटीटी प्लॅटफॉर्म पाश्चिमात्य देशांमधूनच आपल्याकडे आलेत. जगभरात या प्लॅटफॉर्मना मागणी आहे. भारताच्या तुलनेत तिथे त्यांची वर्गणीही जास्त आहे. इंग्रजी कंटेण्ट खूप पाहिला जातो हे खरंय. तरीही स्थानिक भाषेत ओटीटी प्लॅटफॉर्मही खूप चालतात. यात जर्मनी, स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज अशा भाषांचा समावेश होतो. आता पोर्तुगाल लहान देश असला तरी ब्राझीलमधे राहणारे बहुतेक लोक पोर्तुगीज भाषा बोलतात. त्यामुळे या भाषेला भरपूर मागणी असते.
भारतीय भाषांमधले ओटीटी प्लॅटफॉर्म वाढतील का? तर हो, नक्की वाढतील. ओटीटी इंग्रजीमधून पहिल्यांदा हिंदीत आले. संपूर्ण देशाच्या जनतेवर त्यांचा निशाणा होता. तो तीर व्यवस्थित बसलाही. हिंदीतले ओटीटी भरपूर चालतायत. तसंच, तसंच तमिळ, तेलुगू ओटीटीलाही चांगला प्रतिसाद दिसतो. पण स्थानिक भाषेतल्या यशासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
आता मराठीतलं पहिलं ओटीटी येतंय. पण मुळात सगळ्या महत्त्वाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थोडाफार मराठी कंटेण्ट आहे. मग वेगळ्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची गरज आहे का?
लॉकडाऊनच्या काळात ओटीटी पाहणाऱ्यांचं प्रमाण वाढलं हे खरंतर अर्धसत्य आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म ही स्वागतार्ह गोष्ट आहे, असं मी म्हटलं. पण त्याच्या काही मर्यादाही आहेत. या मर्यादा सामाजिक आहेत. सांस्कृतिक आहेत. तशा कौटुंबिक आणि आर्थिकही आहेत. भारतात सध्यातरी ओटीटी तळागाळात पोचलेला नाही. तो मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय वर्गाला सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक बंधनांच्या पलिकडे जाऊन ओटीटी पाहण्याची मुभा आहे.
लॉकडाऊनच्या काळातही असाच प्रेक्षक वर्ग ओटीटीकडे वळालेला दिसतो. हा प्रेक्षक आर्थिक दृष्ट्याही वरच्या वर्गातला आहे. त्यामुळे शिकला, सवरलेला आहे. त्याला इंग्रजीचं ज्ञान आहे. असा एकप्रकारे विकसित झालेला प्रेक्षक वर्ग ओटीटीनं या लॉकडाऊनच्या काळात मिळवलाय. या वर्गाने ओटीटीला भरपूर उचलून धरलं.
पण तळागाळात म्हणजे निम्न मध्यमवर्ग, गरीब किंवा छोट्या शहरांत, गावांत काय सुरूय याकडे ओटीटी पाहणाऱ्यांचं लक्ष नव्हतं. लॉकडाऊनच्याच काळात टीवीवर मालिकांचे रिपीट टेलिकास्ट लागत होते. या टेलिकास्टला मिळणारा प्रतिसाद ओटीटीपेक्षा कित्येक पटींनी जास्त होता. उदाहरणार्थ, स्टार प्लसने रामायण दाखवलं. तेच रामायण पुन्हा स्टार प्रवाहने दाखवलं. त्यालाही वेड्यासारखा प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद आपल्याला वेगळी सामाजिक परिस्थिती दाखवतो.
घरात ओटीटी पहायचा म्हणजे पहिल्यांदा त्याची हजार रूपयांची वर्गणी द्यावी लागते. ते पाहण्यासाठी घरात वायफाय लागतं. वायफायला साधारण महिन्याला हजार बाराशे रूपये खर्च येतो. ओटीटीचा संपूर्ण आनंद घेण्यासाठी आपल्याकडे स्मार्ट टीवी असणं गरजेचं असतं. कुटुंबाचं उत्पन्न घसघशीत असेल तरच भारतात स्मार्ट टीवी घेता येतो. भारतातल्या गावांमधे किंवा अगदी शहरी मध्यमवर्गातही सध्या ही चैन परवडणारी नाही. बरं, फक्त ओटीटीकडे वळून चालत नाही. तर स्मार्ट टीवी, वायफाय याच्यासोबत केबल कनेक्शनही घ्यावंच लागतं. या सगळ्याचा खर्च साधारण २ ते ३ हजाराच्या घरात येतो. लॉकडाऊनच्या काळात लोकांचे पगार होत नव्हते. काहींचे नेहमीपेक्षा कमी होत होते. मग असं असताना हे लोक ओटीटीकडे कसे वळतील?
सध्या मराठी कुटुंबांचं महिन्याचं उत्पन्न १० हजार ते २५ हजारच्या घरात आहे, असं गृहित धरुया. ते प्रामुख्याने केबलवर टीवी पाहणं पसंत करतात. भारतात सगळ्याच भाषेत हा वर्ग मोठा आहे. या वर्गानेच लॉकडाऊनच्या काळात टीवी मालिकांना प्राधान्य दिलं आहे, हे आपण समजून घ्यायला हवं. या वर्गासाठी हे मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचे ठरतील.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय
कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?
या वर्गासाठी मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म कशाप्रकारे गेमचेंजर ठरू शकेल?
ओटीटीच्या आर्थिक मर्यादेविषयी आपण बोललो. तशीच एकप्रकारची सांस्कृतिक आणि कौटुंबिक मर्यादाही त्यात येते. नवरा बायको, आई वडील आणि मुलं असं साधारण मराठी कुटुंब आपल्याला दिसतं. तेच भारतात सगळीकडेदिसतं. घरातले आई, वडील, आजी आजोबा आणि मुलं सगळे मिळून नेटफ्लिक्सवरची एखादी वेबसिरिज पाहू शकतील का? याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. एका घरात चार चारटीवीसगळ्यांना परवडत नाहीत.
ओटीटीवर दर्जेदार कंटेण्ट असतो. पण त्यातल्या कोणत्या कंटेण्टमधे हिंसा, लैंगिकता अशा गोष्टींचं मोकळं प्रदर्शन असतं. आपण पाहत असेलल्या वेबसिरिजमधे कधी हिंसा सुरू होईल, कधी सेक्स सुरू होईल, हे सांगता येत नाही. हे चूक की बरोबर हा यातला मुद्दा नाही. ते वल्गर आहे, असंही मी म्हणणार नाही. पण आपल्या मराठी कुटुंबांची मानसिकता पाहिली, तर अशा प्रकारचे सिनेमे, वेबसिरिज घरातले सगळेजण एकत्र पाहू शकत नाहीत. मोबाईलवर पहायचे म्हटलं तरी घरात तितकी प्रायवसी मिळत नाही. सॅक्रेड गेम्स, गेम ऑफ थ्रोन्ससारख्या वेबसिरिज बहुतेक लोक ऑफिसमधल्या मोकळ्या वेळात किंवा लोकल, बसमधे पाहतात. ही प्रायवसी लॉकडाऊनमधे मिळालेली नाही आणि हेच रामायणसारख्या मालिकांना मिळालेल्या यशामागचं खरं कारण आहे.
आपला मराठी समाजाचं मनोरंजनाचं स्वरूप हे नेहमी कौटुंबिक राहिलं आहे. टीवी चॅनेल, त्यावरच्या मालिका अशाच स्वरूपाचा कंटेण्ट पुरवतात. मात्र, पाश्चिमात्य देशात तयार झालेला कंटेण्ट अनेकदा इथं पाहता येत नाही. सगळ्या कुटुंबाला एकत्र बसून पाहता येईल असा कंटेण्ट झीफाईवसारखे काही प्लॅटफॉर्म पुरवतात. लॉन्च झाल्यानंतर मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने अशाप्रकारचा कौटुंबिक कंटेण्ट पुरवला तर ते गेमचेंजर ठरू शकेल.
भविष्यातल्या मराठी ओटीटीचं आर्थिक गणित कसं असेल?
मराठी आणि इतरही स्थानिक भाषांतल्या ओटीटीचं स्वरूप हे आता हळूहळू विकसित होतंय. त्यांची आर्थिक गणितं सुरवातीला तरी उत्तम चालतील असं मला वाटत नाही. त्यांचा सगळा भर वर्गणीदार वाढवण्यावर असेल. त्यासाठी कमीत कमी सबसिडाइज्ड किमतीचे मासिक – वार्षिक प्लॅन दिले जातील. जितके वर्गणीदार जास्त तितकी त्यांची कमाई वाढेल. मराठीतही अनेक छोटे प्लॅटफॉर्म तयार होतील. ते वर्गणीदार गोळा करण्याचा प्रयत्न जोमाने सुरू ठेवतील.
पण फक्त वर्गणीदार जमा करण्यासाठी लागणारी गुंतवणूक, आलेल्या वर्गणीदारांना आपल्याकडे थांबवून ठेवण्यासाठी लागणारं मार्केटिंग, त्यासाठीचा पैसा आणि फक्त वर्गणीदारांकडून मिळणारं उत्पन्न या सगळ्याचा ताळमेळ बसवणं बहुसंख्य छोट्या कंपन्यांना शक्य होणारं नाही. त्यामुळे असेअनेक छोटे प्लॅटफॉर्म तयार होतील आणि आणि कालांतराने मोठ्या प्लॅटफॉर्मसोबत विलीन होतील. नुकतंच अल्ट बालाजीने झी टेलिविजनसोबत हातमिळवणी केलीय. बालाजी ही खरंतर या क्षेत्रातली फारच मोठी कंपनी आहे. तरीही त्यांना झीसोबत जायची गरज पडली. त्यापेक्षा भविष्यातल्या छोट्या कंपन्या आर्थिक बाजू सावरण्यासाठी मोठ्या कंपन्यांसोबत टायअप करतील.
या मोठ्या कंपन्या म्हणजे नेटफ्लिक्स, ऍमेझॉनसारखे दर्जेदार प्लॅटफॉर्म असू शकतील किंवा मराठीतल्या घराघरात पोचलेल्या झी, स्टार सारख्या टीवी वाहिन्या असतील. टीवी वाहिन्या ओटीटीमधे जाहिराती घेऊ शकत नाहीत. पण त्यांच्या वाहिन्यांवरच्या जाहिरातींमधून मिळालेला काही पैसा ते ओटीटीवर दर्जेदार कंटेण्ट निर्माण करायला वापरतील.
हेही वाचा : पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे
हे प्लॅटफॉर्म पाहणाऱ्यांच्यात सध्या तरूण पिढी पुढे आहे. पण या तरूणांना आकर्षित करेल असे फारसे सिनेमे, वेबसिरिज, सिरियल्स मराठीत उपलब्ध नाहीत. ते यानिमित्ताने तयार होतील का? मराठी ओटीटीमधेनवं काय करावं लागेल?
मराठीत चांगले सिनेमे, सिरियल्स तयार होत नाहीयत, असं म्हणता येणार नाही. अनेक चांगले सिनेमे आहेत. पण या सिनेमांचं ब्रॅंडिंग अतिशय वाईट आहे. तरूणांपर्यत पोचायचं तर हे मार्केटिंग शिकावं लागेल. मघाशी म्हटलं त्याप्रमाणे कौटुंबिक स्वरुपाच्या कंटेण्टचीही निर्मिती करावी लागेल. फक्त सिनेमे, वेबसिरीजच नाही तर चांगली नाटकं, गाणी, साहित्य, डॉक्युमेंटरी यांचाही मराठी माणूस मोठा चाहता आहे. त्याची साहित्यातली रूची अतिशय चांगली आहे. डॉक्युमेंटरीसारख्या गोष्टींचं अर्थकारण आपल्याकडे चांगलं विकसित झालेलं नाही. त्याकडेही लक्ष द्यावं लागेल. हिंदी आणि इतर भाषेतल्या कंटेण्टचं मराठीत डबिंग होईल. काही तमिळ वेबसिरिजचं डबिंग सुरूही झालंय.
अर्थात मराठीतल्या निर्मितीला राजकीय मर्यादा असणार आहेत. भारतातली परिस्थिती पाहता एखाद्या राजकीय व्यक्तिमत्त्वावर केलेला मेजेस इथं चालणारा नाही. प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जायची तयार असली तरीही. प्लॅटफॉर्मला रेग्युलेशन वगैरे नसलं तरी ‘राम के नाम’ सारखी डॉक्युमेंटरी हे स्थानिक प्लॅटफॉर्म दाखवू शकतील का? नेटफ्लिक्सवरच्या `लैला` या वेबसिरिजलाही अशाच टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
ओटीटी हे नवं माध्यम थिएटर आणि टीवी चॅनलच्या वरचढ होईल का? त्याचा प्रेक्षक ओटीटीकडे वळेल का?
ओटीटी हे थिएटर आणि टीवी चॅनेल दोन्हीलाही वरचढ ठरणारं नाही. ओटीटी टीवी चॅनेलच्या स्पर्धेतही नाहीय. टीवी चॅनेल खूप पुढे आहेत. टीवी, त्यावरचे चॅनेल आजही मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात. विविध आर्थिक, सांस्कृतिक मर्यादांमुळे त्याच्याशी बरोबरी साधणं ओटीटीला जमणारं नाही. पण हाती पैसा खुळखुळणारा शहरी उच्च मध्यमवर्गीय त्याकडे नक्कीच वळेल. त्याकडेच सोनी लिव, नेटफ्लिक्स, अमेझॉन, हॉटस्टार नजर ठेवून आहेत. उद्या ओटीटी मराठीत आणि सगळ्या स्थानिक भाषेत रुजेल, वाढेल आणि पाहिलंही जाईल. पण त्यामुळे टीवी चॅनेल मागे पडणार नाहीत.
तसंच, थिएटरवर सिनेमे प्रदर्शित करणं ही प्रेक्षकाची आणि दिग्दर्शकाची सर्जनशील गरज आहे. आपण निर्माण केलेली किंवा प्रेक्षक म्हणून आपल्याला आवडणारी कलाकृती थिएटरमधे, मोठ्या पडद्यावर पाहायला आपल्याला आवडतं. अमेरिकेत ओटीटी प्लॅटफॉर्म इतके लोकप्रिय असतानाही ४८ हजार बिग स्क्रीनथिएटर तिथे आहेत. त्यामुळे ओटीटी थिएटरसोबतच पुढे जाणार आहे.
कमी दर्जाचे, टुकार सिनेमे कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म घेणार नाही, हे दिग्दर्शक, निर्मात्यांना लक्षात ठेवायला हवं. उलट आता थिएटरबरोबरच ओटीटीसाठी निर्मात्यांना उत्तम निर्मिती करावी लागेल. ओटीटी आहे म्हणून थिएटर जाऊ दे, असं करून चालणार नाही. थिएटरमधे सिनेमा चालला तरच ओटीटी प्लॅटफॉर्म तो विकत घेणार आहेत. मराठीत गोष्ट चांगली असलेला सिनेमा खूप चालतो. त्यामुळे वर्षाला १०० पेक्षा कमी सिनेमे काढले तरी चालतील. पण त्याचा दर्जा सर्वोत्तमच असायला हवा.
हेही वाचा :
अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी
सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी
ज्ञानदा कदमः वायरल होणारी मराठी न्यूज अँकर