तिची कविता, कवितेतली ती

११ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ७ मिनिटं


सारिका उबाळे, योजना यादव, प्रज्ञा भोसले आणि दिशा शेखही. आजच्या तरुण पिढीची सशक्त अभिव्यक्ती. शर्मिष्ठा भोसले या आजच्या आणखी एका सशक्त लेखिका, कवयित्रीने या चौघींची ओळख या कवयित्रींची प्रातिनिधिक कवितांतून करून दिलीय. आजचा काळ समजून घेण्यासाठी ती गरजेची आहे.

मराठी कवितेत लिहित्या स्त्रियांची मोठीच परंपरा आहे. त्यातल्या प्रत्येकीनं आपापल्या काळाचा पट नेटकेपणानं मांडला. आपापल्या काळातल्या वास्तवाला अनेक अवघड प्रश्न विचारले. पुढच्या लिहित्या, बोलत्या लोकांच्या वाटा अधिक सोप्या केल्या. अर्थात या सगळ्याजणींच्या कवितेचा विषय केवळ स्त्री हा कधीच नव्हता. एकूण मानवी जगणं आणि त्याला जोडून येणारे सर्व विषय या कवयित्रींनी हाताळले. मात्र कवी म्हणून जगाकडे पाहण्याच्या त्यांच्या नजरेवर स्त्री असण्याचा प्रभाव कळत-नकळत राहत आला. तो प्रभाव सकारात्मकच म्हणावा लागेल.

जात, धर्म, प्रदेश, भाषा, लिंग यांच्या अस्मिता आणि परस्परविरोध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत जाणारा हा काळ आहे. या काळात स्त्री ही लैंगिक ओळख असणाऱ्या समूहातही अनेकानेक लहान लहान ओळखी विकसित झालेल्या दिसतात.  त्यांना ओळखत त्यावर बोट ठेवणारी कविता हा काळ मागतो आहे. मधल्या पिढीतील प्रज्ञा दया पवार, नीरजा, कल्पना दुधाळ, सुचेता खल्लाळ, उर्मिला चाकूरकर आणि  नुकतंच ज्यांचं निधन झालं त्या कविता महाजन, ही त्यातली काही मोठी नावं.

आज स्त्रियांसह इतरही विविध समूहांचं जगणं अनेक पातळ्यांवर गुंतागुंतीचं होत असताना तिचा आवाज कवितेतून मांडण्याचं आव्हान समोर आहे.  सोबतच स्त्रीचा भवतालाशी होणारा हवानकोसा व्यवहारत्यातून  उद्भवणाऱ्या गोष्टी शब्दात बांधणंही महत्त्वाचं. शिवाय आवाजी न होता स्त्रीप्रश्नांवर भाष्य करणं, शोषणाचे शेड्स दाखवणंही औचित्याचं आहे. हा यशस्वी प्रयत्न करणाऱ्या चार नव्या दमाच्या कवयित्रींच्या या प्रातिनिधिक कविता.     

 

सारिका उबाळे

सारिका आजच्या स्त्रीवादी कवितेतला लक्षवेधी आवाज आहे. स्त्रीचं जगणं, शोषणाचे दृश्यादृश्य प्रवाह, आकांक्षा आणि केवळ शहरी नाही, तर निमशहरी, ग्रामीण महिलेचं जगसुद्धा या कवितेत प्रकटतं. तिच्या कवितेत अनेक अवघड प्रश्न समोर येतात. कधी उपरोध, कधी प्रतीकात्मकता, कधी थेट सवाल अशी ही कविता प्रस्थापित व्यवस्थेवर भाष्य करते. स्त्री-पुरुष संबंधामधले आदिम राजकारण, सत्ताकारण या कवितेला चांगलं उमगलेलं आहे. वेगानं बदलत्या काळात बदलणारी, प्रश्न विचारणारी, चिकित्सा करणारी स्त्रीप्रतिमा ही कविता रंगवते. त्यांच्या या दोन कविता.

 

शपथ

 

मी खाली सही करणार

लिहून देते की मी कुठल्याही

यल्लमा, पोचम्मा, कालिका

पीर, फकीर, साधू, महाराज

महंत, बाबा, देवदेवता

कुणाचीही उपासना करण्यास

बांधील राहणार नाही.

त्याच्या बर्‍यावाईट परिणामास

मी स्वतः जबाबदार राहीन.

 

मी लिहून देते की,

मी कुठलेही व्रतवैकल्य

उपास तापास करण्यासाठीही

बांधील राहणार नाही.

 

मी कुठलीही संस्कृती

रीतभात, जातपात

मानणार नाही.

त्यापासून होणार्‍या

शीर्वाद, दुवा, शाप

इत्यादी तत्सम नफ्यातोटय़ाची

मी मिंधी राहणार नाही.

 

मी खाली सही करणार

असेही लिहून देते की,

फक्त स्त्री म्हणून

वाट्याला येणाऱ्या भोगांची जबाबदारी

मी एकटी स्वीकारणार नाही.

 

मी कधीच माझे मन, इच्छा,

वासना, तहान, भूक, स्वप्न

मारणार नाही

आणि

माझ्या येणाऱ्या पिढीस

कुठल्याही प्रकारचे

आस्तिक, नास्तिक

स्वस्तिकत्व स्वीकारण्यास

बाध्य करणार नाही. 

 

 

अबस्ट्रॅक्ट

 

हम्म..

तर मग

तू गोरा आहेस?

की काळा?

महत्त्वाचं नाहीच मुळी

तू लाल अस की पिवळा

नारिंगी अस की जांभळा

काहीच फरक पडत नाही

 

मोरपंखी आणि अबस्ट्रॅक्ट आहेस तू

रंगारंगात माखलेली पॅलेट आहेस तू

तुझ्याशी बोलताना गुलाबी होत जाते मी

अन तू मोराची चमकदार मान…

तरल तरल मोरपिसं

तरंगत राहतात अलगद

तुझ्या माझ्या भोवती

सगळी क्षितिज अंतरं

पार होत जातात

तू मी बोलताना

व्यवस्थेची अंतरंही

मिटत राहतात हळूहळू…

 

पुन्हा नव्याने

उगवून येत राहतो आपण

पृथ्वीच्या आरंभापासून

आदिम, असंस्कृत, नागवे

 

तर मग हे बैराग्या

तू काळा अस

की गोरा

कुठं महत्त्वाचंय..?

तू कोसळत राहा

माझ्यात निस्सी

सहस्र रंगांत इंद्रधनूतून

रंगिला रंगिला होऊन.

 

योजना यादव

हे समकालीन कवींमधे अतिशय प्रगल्भ नाव. तिच्या कविता स्वत:ची एक भाषा घेऊन येतात. थबकायला लावणाऱ्या प्रतिमा, विधानं कवितांमधे जागोजागी दिसतात. स्त्रीपुरुष नातेसंबंध ही कधीच काळ्यापांढऱ्या रंगात पाहता न येणारी गोष्ट. ते अनुभवताना, त्यांच्याविषयी लिहिताना त्यांच्याबाबत जजमेंटल न होणंच, अधिक योग्य. हे असं न होताही खूप नेमकं भाष्य करण्याची समज तिच्या कवितेत दिसते. मानवी मनाची अनाकलनीयता, बहुपदरी गुंते योजनाच्या कवितेतून अधिकाधिक गडदपणे समोर  येतात. मोह घालतात.

  

पोखरता येऊ शकतो पुरुष.

उभ्या आडदांड पुरुषाला लागू शकते वाळवी

फक्त

आसक्तीचं द्रव शोषणाऱ्या अळीसारखी

असावी लागते बाई.

 

जिवंत असण्याची झूल पांघरून बसलेल्या पुरुषाला

पोकळ करता येऊ शकतं आतून.

टाकता येते त्याच्यावर मोहिनी

ज्याला श्वासासोबत हृदय लाभलं नाही.

 

सहवासाच्या आभासात लपवता येऊ शकतात

अस्मितेच्या कत्तलीचे प्रयत्न.

आणि

आत बाहेर होणाऱ्या तृष्णेसोबत

बेमालूम सोडता येऊ शकतो

माणूस पोखरणारा संसर्ग.

 

याच भ्रमात जगते बाई

याच भ्रमात मरते बाई...

 

 

तू पावलांवर

रोमांचांची व्याख्या लिहिलीस

अन देहावर

प्रेमाचं महाकाव्य

 

दाखवून दिलंस

माझं अंतर्बाह्य बाई असणं

 

योनीच्या पाकळ्यांना

उमगले तेंव्हा

ऊब आणि दाहकतेचे अर्थ

अन

स्तनाग्रावर थरथरली

मैथुनाची हजार आसनं

 

देह झाला

पूर्ण रोमांग

संपूर्ण रोमांग... रोमांग…

असं वितळत गेलं अंतरंग

निचरा होत गेला

तृष्णेचा व्यासंग

 

मान्सूनच्या पहिल्या धारेसारखा

उतरत गेलास तू

मुरवत गेलास परम आनंद

 

उगमाच्या स्रोतावर

ओंजळ घेऊन

उभा राहिलास तू

आणि दाखवून दिलंस

अस्साही असू शकतो पुरुष

 

 

प्रज्ञा भोसले

प्रज्ञा भोसलेची कविता साध्यासोप्या शब्दांत रोजच्या जगण्यावर भाष्य करत जाते. आधुनिक म्हणवणाऱ्या काळात स्त्रीच्या वाट्याला येणाऱ्या मागास गोष्टी तिला माणूस म्हणून खटकतात. ती सौम्य, संयत शैलीत पण ठामपणे सवाल उभे करते. ही कविता रचनेच्या निकषांवर साधीसोपी मात्र आशयाच्या अंगानं गहन आहे. इथल्या सामाजिक, सांस्कृतिक राजकारणात सगळी सूत्रं पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या हातात गेली स्त्री सतत शोषित बनत राहिली याचे वर्तमानातले दाखले तिच्या कवितेत सापडतात. समाज म्हणून आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावणारी तात्त्विक पातळीवरची विधानंही जागोजागी येतात.

 

 

पाळीची तजवीज म्हणून

 

नेहमीच जाते मेडिकल स्टोअरमधे

तोंडाचा स्टोल न सोडता अस्पष्टशा दबक्या आवाजात

तेथे काम करणाऱ्या बाईला म्हणते,

एक व्हिस्पर द्या

त्या बाईच्या कानी शब्दही पोहचलेले नसतात मी उच्चारलेले

 

बाई उठते,

शेल्फमधल्या खालच्या कप्प्यातला पॅकेट काढते

कारण बाईच्या अंगवळणी पडलेलं असतं

माझ्यासारख्या अनेक बाया, पोरींचं हे कुजबुजणं

बाई शेजारच्या पुरुषांची अन्

इतर गिऱ्हाईकांची नजर चुकवून

पेपरमधे व्यवस्थित पॅक करून

ते पॅकेट सराईतपणे काळ्या कॅरीबॅगमधे टाकते

अन् गुपचूप सरकवते माझ्यापुढं

 

तरीही समजतंच आजूबाजूच्या पुरुषांना

कारण त्यांचे कान ऐकत असतात दबके आवाज

नाक घेत असतं वास

डोळे नेहमीप्रमाणेच शोधत असतात शिकार

त्यांचं ते माझ्याकडं बघून मिष्कील हसणं

लचके तोडत राहतं माझे

 

मी स्वतःलाच विचारत राहते

माझा गुन्हा काय?

असंही हे नेहमीचं अंगवळणी पडलंय

 

मला आठवतीये लेडीज कर्मचारी असणारं

मेडिकल शोधण्यासाठी केलेली पायपीट

अन् मैत्रिणीचं बोलणंही

एकदाच मॅालमधून वर्षभरासाठी घेऊन यायचे

पुन्हा कटकटच नाही

आठवतीये तिनं अशा प्रसंगातून करून घेतलेली सुटका

आणि त्याचं कारणही

 

अन आज ओळखीच्या मेडिकलमधली

बाई नसताना

अपरिहार्यपणे पुरुषाला मागितलेलं व्हिस्पर

'एक व्हिस्पर द्या'

त्याला ऐकायला गेलेलं असतानाही

त्याची न ऐकल्याची प्रश्नार्थक खूण,

पुन्हा मुद्दाम विचारणं,

'काय पाहिजे?'

अन् माझ्या मनदेहावर साचत चाललेली कानकोंडेपणाची काजळी

तरीही व्हिस्पर पाहिजे असं मी जरा जोरातच म्हटलेलं

तेव्हा त्यानं सोबत्याला हळूच मारलेला डोळा चुकत नाही माझ्या नजरेतून

मग तो माझा खालून वरपर्यंत एक्स-रे काढत

पॅकेट कागदात गुंडाळून देऊ लागतो

 

तेव्हा त्याला मी म्हणते खणखणीत आवाजात,

`गरज नाही त्याला आवरणाची

असाच द्या...

मला नाही वाटत लाज याची

तुम्हाला वाटतेय का?`

 

अंगवळणी पडलेलं कोडगेपण मिरवत बेरकीपणे हसतो तो फक्त.

व्हिस्पर पाळीसाठी वापरायची वस्तू

पाळी म्हणजे योनीशी निगडित नैसर्गिक प्रक्रिया

योनी म्हणजे लिंगाशी निगडित स्त्रीशरीराचा भाग

याच साखळीला धरून युगांतरापासून लोंबकळतोय वासनेनं बरबटलेला पुरुष

म्हणूनच त्याला व्हिस्परमधेही दिसत असावी योनी

संभोगशिल्पालाही आकार आला असावा त्याच्या मनात

त्यामुळेच तो पाहत असावा माझ्याकडं भोगण्याच्या लालसेनं

शिल्पाला सत्यात उतरवणाऱ्या

या शिल्पकाराच्या स्वप्नात

शिलाखंड होऊन डोकवायचीही

मला भीती वाटते

 

 

बाईला वाटतं रांडवपण दारावरही फिरकू नये

 

ती विधवा

मंगळसूत्र घालते

आणि लाल टिकलीही लावते

नजरेत भरेल अशी

सभ्य म्हणून मिरवणाऱ्यांपासून

सत्ता गाजवण्याची लालसा बाळगून

असणाऱ्या भोगवाद्यांपासून

रक्षण करण्यासाठी

 

ती

मंगळसूत्र घालते म्हणून

तिला पाहून नाक मुरडणाऱ्यांनी

तोंडावर चारदोन दयेची वाक्य फेकणाऱ्यांनी

कधीतरी शिरावं तिच्या अंतरंगात

एक माणूस म्हणून

समजून घ्यावा तिच्या खोल तळात

उचंबळणारा कोलाहल

तिलाही इतरांसारखं नटावं वाटत असेल

भरजरी साडी नेसून मिरवावं वाटत असेल

फिरावं वाटत असेल दागिने घालून चारचौघांत

जर कधी तिनं बोलून दाखवलीच जवळच्या बाईला

कुंकवाची अभिलाषा

तर बाई झिडकारते तिला

विधवा झाली अन् आता कशाला गं ही थेरं ?

तेव्हा ती हिरमुसते, कोमजते, स्वतःला आकसून घेते

चालतं, फिरतं, बोलतं प्रेत होऊन जगू लागते

 

पण आत दडलेली असते तिच्या हिरवीगार पालवी

कपाटातल्या रंगीबेरंगी साड्या पाहून

बांगड्यांची आरास पाहून

आजूबाजूच्या सुवासिनी पाहून

ढवळतं तिच्या खोल डोहातलं पाणी

आणि फुटू लागते पालवी वैराण रानाला

स्त्रीवादात तोलू शकत नाही कुणीच

तिच्या मंगळसूत्र प्रेमाला

काळ्या मण्यांच्या आकर्षणाला

इथं फक्त जोखलं जावं तिचं मन

एवढीच माफक अपेक्षा असते तिची

 

तिच्याच आईबहीणलेकीसूनासासूजावाभावजयांकडून

पण तिच्या वाट्याला फक्त झिडकारणं येतं

तिच्या मनाचा दोष काय यात

 

तिला विधवा थोडीच व्हायचं होतं

तरी ती अपघाती रांडवपणाच्या भोवऱ्यात अडकली

कोणाला हौस असते विधवा होण्याची ?

मग ती असो कोणत्याही जातीची, धर्माची, पंथाची, वादाची, वयाची

 

एखाद्या बाईला विचारून पाहा बरं

तुला विधवा व्हायला आवडेल का ?

भले तिचा नवरा असेल संशयाचं पोळ

तिला मारतही असेल जनावरासारखं न चुकता

तिच्या चारित्र्यावर उडवत असेल जाहीर शिंतोडे

ती बाहेर गेल्यावर पाळत ठेवून असेल तिच्यावर

कुठल्याही जवळच्या पुरुषाशी बोलली जरी ती

तरी तिच्या संबंधाच्या कहाण्या रचत असेल

बेशरमपणे

कधीकधी तर स्वतःचीच मुलं कोणाची आहेत म्हणून

तिच्या नरड्याला नख लावून जाब विचारत असेल

तिच्याशी संबंध असणाऱ्या पुरुषाचं

नाव सांग म्हणून

तिला सिगारेटचे चटके देत असेल

तरीही

बाईला वाटतं रांडवपण दारावरही फिरकू नये

 

कारण

नको असतं तिला तिचं ते वाळवंटी कपाळ अन् विद्रूप पेहराव

गळा जणू लंकेची पार्वती

हाताच्या कांकणाची मुकी झालेली किणकिण

समाजानं, कुटुंबानं राखून ठेवलेला दळभद्रीपणाचा कोपरा

 

तरीही

समाजासाठी कुटुंबासाठी

ती विधवेचा पोशाख पांघरून घेते

मनाला बंद कुलपाआड ढकलते अन्

पोक्त बाई म्हणून वावरू लागते

मग समाज वाह वा करतो

याठिकाणी खरंच तिला स्त्रीवादानं नाकारलेलं

मंगळसूत्र हवं असतं का?

की तिला हवं असतं आदिम स्त्री सुख

जे अवेळीच तिच्याकडून हिसकावलं जातं

की तिला हवं असतं

तिचं ‘स्त्री’त्व जे पांढऱ्या कपाळाची म्हणून दमन केलं जातं

की तिला हवं असतं

ते मनमोकळं हसणं, घरभर किणकिणणं अन् छुमछुमणं

की तिला हवं असतं

माणूस म्हणून मुक्त जगणं

 

थोडासा विचार करायला हवा

जरी हे दुःख वाटत असेल आऊटडेटेड

तरीही म्हणतात न,

बाईचं सुख दुःख असतं वैश्विक

त्याला नसते काळवेळेची परिसीमा

ते अपडेट होत राहतं जनरेशननुसार

 

दिशा शेख  

 

'तृतीयपंथी' अशी लैंगिक ओळख घेऊन जन्माला आलेली ही कवयित्री.

दिशा स्वत:सकट भवतालाकडंही अतिशय त्रयस्थपणे बघत मार्मिक निरीक्षणं नोंदवते. विशेष म्हणजे, तिच्या स्त्री आणि पुरुष यापेक्षा वेगळ्या, अपारंपरिक ओळखीमुळं तिच्या  संवेदना आगळ्या पद्धतीनं घडल्यात. हीच तिची ताकद ठरते. तिची कविता संवादी आणि थेट आहे. तिनं सांगितलेले वैयक्तिक अनुभव आणि विधानं तिच्या समूहाचा प्रातिनिधिक उद्गार बनून येतात. या समूहाची खरी कथा व्यथा आजवर क्वचितच समोर आलेली आहे. दिशाच्या कवितेची दाखल घेणं म्हणूनच अपरिहार्य ठरतं.

 

 

आक्का...

आशीर्वाद द्या

यंदा निवडून आलोच पाहिजे

तुमचे आशीर्वाद चांगले असतात म्हणे...

 

च्या आयला... साल्याय हो...

परत इकडं भिक मागताना दिसलात तर

एक एकाला टंगडीतुन काढीन ....

 

तुम्हाला कामाला लावून

कोण पाप घेनार

तुम्हाला लावल पण आसतं हो...

कामाला म्हणतोय मी!

पण लोकांना काय उत्तर देणार...

 

च्या मायला...

काय करनार हायेस गं काम करून ?

दोनशे रूपये कमवशील

बाजूला चल थोडं

दोन मिनिटांचं काम हाय

लगेच दोनशे रूपये देतो.

 

आक्का, देवमानुस तुम्ही...

 

 

मू लटकाकर क्यू बैठी है

रेपही हूवा है ना तेरा.

ती काहीच बोलली नाही...

 

दुसरी

साली सच्चीमे नसीबवाली है

मै होती तो पार्टी दी होती सबको

ती काहीच बोलली नाही...

 

तिसरी

दिल पे मत ले

ये सबतो चलताही रहता है

अपनी लाईफ मे

ती काहीच बोलली नाही...

 

चौथी

कितने लोग थे गे

हँडसम थे क्या

कैसे कैसे क्या क्या किया उन्होने बता ना

ती काहीच बोलली नाही...

 

पाचवी

कम्पलेंट फिम्पलेंट के बारे मे

सोचनाबी नही बेहेन

बहोत मादरचोद लोग है वो

तरी ती काहीच बोलली नाही...

 

परत पहिली,

कल आ रही है ना शॉपिंग को

मुझे ना कुछ लिपस्टिक

और सँडल खरीदने है

ती काहीच बोलली नाही...

 

परत तिसरी

ये धंदेवाली रांड

हिजडा है तू भूल मत

जादा औरतोंवाले नखरे

करेगी, तो मारी जायेगी

ती काहीच बोलली नाही...

 

परत चौथी

आवरतेस का स्वतःला

बास झालं आता

ती काहीच बोलली नाही...

 

दुसरी आणि पाचवी

चलो यार इसे समझाना

फिजूल है

झक मारली आपनच इथं येऊन

तिने दीर्घ श्वास सोडला...

 

एव्हाना तिलाही कळालं होत

काहीही करता नाही येनार तिला

उठली फ्रेश झाली

कपाट उघडून चाळलं

त्यातली एक साडी काढून तिचा

पदर खांद्यावर टाकत म्हणाली

कशी दिसते मी, या साडीत.

आज घालू का?

 

साऱ्याजणी एकदम शांत झाल्या

गळ्यात पडल्या एकमेकींच्या

आणि हंबरडा फोडून रडण्याचा आवाज

त्याच घरात कोंडून टाकला...

 

आता तिला मात्र बलात्काराची सवय झाली होती...