डॉ. सुनीलकुमार लवटे : माणसं घडवणारी संस्था

१० ऑक्टोबर २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा ९ ऑक्टोबरला कोल्हापुरात नागरी सत्कार झाला. या सत्कार कार्यक्रमात लवटे यांच्या गौरवग्रंथाचं प्रकाशनही झालं. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमधे संस्थात्मक काम उभं केलंय. त्यात ते यशस्वीही झाले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या सत्कारानिमित्त केलेलं छोटेखानी भाषण.

१९८०च्या दशकातली गोष्ट असेल. मी तेव्हा अहमदनगर इथल्या कॉलेजमधे तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून नोकरी करत होतो. अरुण शेवते आमच्या कॉलेजमधला तेव्हाचा विद्यार्थी.  त्या वयात अरुण उत्तम कवी म्हणून नावारूपाला येत होता. पत्रकारितेत करिअर करावं, अशी त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती. शिवाजी युनिवर्सिटीत पत्रकारितेचा डिप्लोमा आहे, असं समजल्यावर अरुण कोल्हापूरला रवाना झाला. तेथे त्याचा व लवटे सरांचा जवळून परिचय झाला.

प्रा. सुनीलकुमार लवटे हे नाव तेव्हा माझ्या ऐकण्यात होतं. पण त्यांच्याविषयीची अधिक माहिती मला अरुणकडून समजली. विशेषतः, लवटे सर कसे विद्यार्थीप्रिय आहेत आणि ते विद्यार्थ्यांना सर्वप्रकारची मदत कशी करतात, हे मला अरुण सांगायचा. सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा पैलू मला पहिल्यांदा समजला.

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

ओळखीचा दुवा ठरले

मी स्वतः अरुण भाऊसाहेब खांडेकरांच्या लेखनाचा चाहता. लवटे सर आणि त्याच्यामधला हाही एक दुवा. पुढे लवटे सरांनी प्रयत्नपूर्वक खांडेकरांचं अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला; पण त्याची पायाभरणी त्याआधीच झाली होती.

एखाद्याला एखाद्या लेखकाचं लिखाण आवडतं, याचा अर्थ बर्‍याच वेळेला असाही होतो की, तो लेखक व्यक्ती म्हणूनही त्याच्या मनाला स्पर्श करून गेलेला असतो. त्याच्याशी त्यांचं आंतरिक नातं जुळलेलं असतं. असाच काहीसा प्रकार मला खांडेकर आणि लवटे सर यांच्यातही जाणवतो.

लवटे सरांना खांडेकर आवडतात आणि त्यांनी त्यांचं लेखन प्रसिद्ध करण्यात, त्यांचं संग्रहालय उभारण्यात पुढाकार घेणं, हा काही अपघात नव्हता. खांडेकरांचं एकूण साहित्य मानवी जीवनातला आदर्शांचा पुरस्कार करणारं आहे.

जगणं कादंबरीतल्या नायकासारखं

ना. सी. फडके आणि वि. स. खांडेकर हे समकालीन लोकप्रिय साहित्यकार. कलेसाठी कला की जीवनासाठी कला, असा कलावादविरुद्ध जीवनवाद या दोन परस्परविरोधी वाङ्मयीन भूमिकांचे ते पुरस्कर्ते मानले जात. लवटे यांना खांडेकर जवळचे वाटले. याचं कारणच ते मुळी स्वतः समाजाविषयी आपुलकी आणि आस्था असलेले व्यक्तित्व आहेत. स्वतः होऊन सामाजिक बांधिलकी एखाद्या व्रताप्रमाणे पत्करलेले आहेत. किंबहुना, ती त्यांच्या व्यक्तित्वाचा स्वाभाविक भाग बनलेली आहे.

मी तर असे म्हणेन की, भाऊसाहेबांच्या एखाद्या कादंबरीतला नायक वाटावेत, असं त्यांचं जगणं आहे. खांडेकरांच्या कथा-कादंबर्‍यांचे नायक आदर्शवादी आहेत. स्वप्नाळू आहेत, अशी शेरेबाजी खरी मानली; तरी त्याचा अर्थ वास्तवात अशी माणसं नसतातच, असा घ्यायचं कारण नाही. कोणी असा घेऊ लागला, तर त्याला खुशाल लवटे सरांच्या सहवासात दोन-चार तास घालवायला सांगावेत. तो प्रामाणिक असेल, तर आपला आक्षेप नक्कीच मागे घेईल.

हेही वाचा: गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह

हिंदी जगात मराठीचं प्रतिनिधित्व

आपल्या भवतालच्या लोकांना मदत आणि मार्गदर्शन करणारे बरेच लोक समाजात सापडतील, नाही असं नाही. पण लवटे सरांच्या बाबतीत हा प्रकार इथंच थांबत नाही. वैयक्तिकस्तरावर मित्रांना, परिचितांना, गरजूंना मदत करणं हा एक महत्त्वाचा पैलू आहेच; मात्र त्यापलीकडे जाऊन लवटे सरांनी या प्रकाराला संस्थात्मक सार्वजनिक रूप दिलं. त्यातही एक व्यवस्था आणली. करवीरनगरीत क्वचितच अशी एखादी संस्था सापडेल की, जिच्याशी लवटे सरांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आलेला नाही. करवीरकरांनी त्यांना आपल्या नगरीचं भूषण मानलं ते काही उगाच नाही. ही त्यांच्या कामाला दिलेली पोचपावती आहे.

सार्वजनिक कार्याचा एवढा व्याप असताना लवटे सरांनी आपल्या अध्ययन, अध्यापन, संशोधन या अंगीकृत कार्याशी कधीही तडजोड केली नाही. शिक्षक, प्रशासक, मार्गदर्शक, संशोधक, संपादक, प्रकल्प प्रमुख अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी कार्यक्षमतेने आणि लिलया पेलून दाखवल्या.

व्यवसायाने ते हिंदीचे अध्यापक; पण मराठीपासून ते कधीच तुटले नाहीत. उलट या दोन भाषांमधल्या सेतूचं काम त्यांनी केलं. त्यांनी अनंत गोपाळ शेवडे यांच्याविषयी संशोधन करावं, हाही योगायोग नाही. मराठी माणसाने हिंदी जगतात किती परिचित आणि प्रतिष्ठित असावं, याची शेवडेजी ही जणू फूटपट्टीच आहे. त्या मापाने मोजलं, तर आज लवटे सर हिंदी जगतात मराठीचं प्रतिनिधित्व करतात, असं निःशंकपणे म्हणता येतं.

संस्थात्मक काम उभं केलं

लवटे सरांनी जी मोठमोठी कामं आपल्या शिरावर घेतली आणि यशस्वीरीत्या पार पाडून दाखवली ती पाहता ते राजवाडे-केजवर अशा गेल्या पिढ्यांमधले वाटतात. आणखीन घटना सांगतो, महाराष्ट्रातले प्रसिद्ध विद्वान आणि विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विविध विषयांवर लेखन केलं. ते साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षही होते. त्यामुळे त्यांचं समग्र साहित्य मंडळाने प्रकाशित करणं उचितच होतं; पण त्या पसार्‍याचं संकलन, संपादन करणं येरागबाळ्याचं काम नव्हतं. लवटे सरांनी हे शिवधनुष्य उचललं, पेललं आणि लक्ष्यवेधही केला.

शास्त्री बुवांच्या समग्र साहित्याचे खंड थोड्याच दिवसांत वाचकांच्या हाती पडतील. या कामासाठी मराठी विद्वक्षेत्राने लवटे यांचं सदैव ऋणी राहायला हवं. या काळात सरांनी किती दक्षता दाखवावी याचं मीच अनुभवलेलं उदाहरण सांगतो.

९० च्या दशकात प्रा. राजेंद्र होरा, प्रा. सुहास पळशीकर आणि मी एका दिवाळी अंकासाठी वाईला जाऊन शास्त्रीजींची दीर्घ मुलाखत घेतली होती. मात्र, तो अंक माझ्याकडे नव्हता. इतकंच काय; पण त्याचं नाव आणि वर्षही आठवत नव्हतं. हे मी लवटे सरांना सांगितलं. सरांनी एक-दोन महिन्यांतच तपास करून तो अंक मिळवला. समारोप करताना मला असं म्हणावंसं वाटतं की, वेगवेगळ्या क्षेत्रांमधे संस्थात्मक काम करता करता लवटे सर स्वतःच एक संस्था झालेत.

हेही वाचा: 

दिवाळी स्पेशल कथा : ‘ब्याव’

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

मनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत

पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!

करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस : मानसिक आरोग्य मोजण्याचा थर्मामीटर