शहीद हेमराजच्या बायकोला न्याय मिळाला?

०३ मार्च २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या स्क्वार्डन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पत्नीच्या प्रतिक्रियेवरूनही सध्या देशद्रोही, देशभक्त असे सर्टिफिकेट वाटणं सुरू आहे. पुलवामा हल्ल्यानंतरच्या एअर स्ट्राईकने युद्धाची चर्चा सुरू झालीय. राजकारणही जोरात सुरू आहे. राजकारणी लोक देशभक्तीच्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी सरसावलेत. पण या सगळ्यांत युद्धात, दहशतवादी कारवायांत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांचं काय होतं?

पुलवामा इथे सीआरपीएफच्या वाहनांवर अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर देशभरात साहजिकच संतापाची लाट उसळली. या लाटेचे रुपांतर देशभक्तीच्या लाटेत झालं. या लाटेच्या तडाख्यातून कुणीही सुटला नाही. युद्धाचे नगारे सोशल मीडियातून जोरजोरात बडविणाऱ्यांच्या थोबाडीत मारण्याची हिंमत एका शहीद जवानाच्या पत्नीनेच दाखवली. त्यांचं नाव विजेता मांडवगणे.

जम्मू काश्मिरमधील हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या स्क्वार्डन लीडर निनाद मांडवगणे यांच्या त्या पत्नी. सोशल मिडियातील वाचाळवीरांना झापताना त्या स्पष्टपणे म्हणाल्या, की ‘एवढाच जोश असेल तर सीमेवर लढायला जा, म्हणजे खरी परिस्थिती कळेल’ विजेता यांची ही प्रतिक्रीया वास्तवदर्शी आहे. त्याचबरोबर त्यामधे भावुकतेचा ओलावादेखील आहे.

युद्धभूमीत जिथे रक्तमांसाचा चिखल झाला आहे तिथे उगवलेले पांढऱ्या गुलाबाचं फुल असं त्यांच्या प्रतिक्रियेचे वर्णन करावं लागेल. पांढरा रंग हा शांततेचं प्रतिक आहे. अतिरेक्यांना धडा अवश्य शिकवा पण त्यासाठी युद्धाची बर्बरता नको असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. युद्धाच्या कथा ऐकून ज्यांच्या मुठी वळतात अशा व्हाईट कॉलर तथाकथित भद्र लोकांना त्यांनी आरसा दाखवलाय.

हेमराजचं प्रकरण आठवतं

विजेता यांची प्रतिक्रिया माझ्या वाचण्यात आली तेव्हा मला आणखी एका वीरपत्नीची आठवण झाली. तिचं नाव धर्मावती. जानेवारी २०१३ मधे तिचा पती हेमराज याचं शीर पाकिस्तानी सैनिकांनी कापून नेलं होतं. या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले होते. मीडियातही याची चर्चा झाली. लोकांमधे असाच युद्धज्वर उसळला.

खरं तर सैन्य देशाच्या सुरक्षेसाठी लढते. जवान जीव गमावतात पण त्या जवानांच्या बायका विधवा होतात. मुलं अनाथ होतात. राजकारणी त्यांच्या हौतात्म्याचं भांडवल करुन निवडणुकीत युद्धज्वर निर्माण करतात. जनता हौतात्म्य पत्करलेल्या जवानाच्या नावाने बेभान होते. देशभक्तीची त्सुनामी उसळते. या सर्व गोंधळात राजकारणी आरामात सत्ता मिळवतात. जनता नेतृत्वाबाबत आश्वस्त होते. हुतात्मा जवानाच्या कुटुंबाचं पुढे काय होतं याचं कुणालाही काहीच पडलेलं नसतं. शहीद हेमराजच्या वेळीही असं राजकारण झालं.

राजकारणाचा वास

सर्व टीवी चॅनेल्सवर ८ जानेवारी २०१३ ला सकाळी भारतीय जवानांचं शीर कापून नेल्याच्या बातम्या झळकल्या. हेमराज असं या जवानाचं नाव. ही बातमी सर्वत्र पोचताच देशात संतापाचा उद्रेक झाला. देशभक्तीच्या सागराने पुन्हा एकदा उसळी घेतली. बघता-बघता त्याची त्सुनामी झाली. या त्सुनामीच्या जोरावर मोदीलाटेने उसळी घ्यायला सुरवात केली. ही लाट पुढे एवढी मोठी झाली की, तिने दहा वर्षे केंद्रात ठाण मांडून बसलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सत्तेला नेस्तनाबूत करत प्रचंड बहुमताने सत्ता मिळवली.

हेमराजची बातमी समजल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना भेटणाऱ्यांची रीघ लागली होती. त्यातील काहींनी आपापल्या परीने त्यांना मदतही देवू केली. नाशिक येथील माझे उद्योजक मित्र प्रमोद गायकवाड यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून हेमराजच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी महाराष्ट्रातून निधी उभा केला होता. तो त्याच्या कुटुंबीयापर्यंत पोचवण्याच्या निमित्ताने आम्ही त्याच्या गावी गेलो. दिल्लीपासून साधारणतः साठ किलोमीटरवर अतिशय आडवळणी मार्गावर शहीद हेमराजचं शेर खैरारी हे गाव आहे. कोसीकला या रेल्वेस्टेशनपासून दहा ते पंधरा किलोमीटरपर्यंत जायला खासगी वडाप मिळतात.

तीन चार तासांच्या प्रवासानंतर आम्ही गावात प्रवेश करताच समोरून येणार्‍या चौकडीशी रामराम वगैरे झाला. हेमराजचे घर विचारताच एक जण आमच्यासोबत निघाला. पाच मिनिटांच्या आत आम्ही हेमराजच्या घरासमोर येऊन पोचलो. वरवर सुखवस्तू दिसणारं हे कुटुंब घरात अचानक झालेल्या मृत्यूने घायाळ झालं होतं. हेमराजच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका खोलीच्या समोरच त्याचा एक फोटो लावलेला दिसला.

शब्दही न बोलता वीरपत्नी निघूनही गेली

आम्ही हेमराजच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी आलो असल्याची माहिती अगोदरच मिळालेली. त्यामुळे हेमराजच्या घरातली सगळी मंडळी अंगणात जमली होती. हेमराजच्या शौर्याबद्दल आणि त्याचं शिर पाकिस्तानी सैनिकांनी पळवल्याच्या दु:खद घटनेबद्दल चर्चा चालू असतानाच घूँघट घेतलेली एक महिला अवघडल्यासारखं तिथं आल्याचं दिसलं. ही हेमराजची पत्नी, धर्मावती. एकानं माहिती दिली.

आमच्या लेकीसुना भर माणसांत येत नाहीत. पण तिच्यावर असा प्रसंग गुदरल्यामुळे तिला लोकांपुढे यावं लागतं. समोरच्या गर्दीतूनच माहिती आली. माझ्यासोबत आलेले प्रमोद गायकवाड यांनी वेळ न दवडता आपल्यासोबत आणलेला चेक तिच्याकडे सोपवला. थरथरत्या हातांनी तिने तो स्वीकारला. कॅमेर्‍याचे दोन-तीन फ्लॅश पडले. थोड्या वेळात एकही शब्द न बोलता हेमराजची पत्नी तिथून निघूनही गेली. पण त्याच्या दोन मुली आणि मुलगा आमच्या आसपास घुटमळत राहिला.

‘आमच्याकडे लवकर लग्नं होतात. ती आमच्या घरात आली तेव्हा पंधरा वर्षांची होती. लग्नाला सात-आठ वर्ष झाली तोपर्यंत हा प्रसंग तिच्यावर आला.’ हेमराजच्या भावाने दिलेली ही माहिती ऐकून मी हळूच त्याला विचारलं, ‘एवढ्या कमी वयात बिचारी विधवा झाली हे वाईट. तिचं शिक्षण काही झालंय का?’ ‘चौथी पास है,’ त्याने माहिती पुरवली.

‘मग पुढं शिकवणार का?’ या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे त्याला क्षणभर सुचलं नाही. पण थोड्या वेळाने तो म्हणाला, ‘आमच्या बहू-बेटी घराचा उंबरा ओलांडत नाहीत. आणि आम्ही आहोतच की तिला सांभाळायला.’

तो चेक तिच्या हाती देऊन आम्ही दोघेही परत जाण्यासाठी निघालो. त्यावेळी हेमराजचा छोटा मुलगा तिथेच खेळताना दिसला. त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहताच आतापर्यंत आवरुन ठेवलेला भावनेचा बांध कोसळला. दरवर्षी सुट्टीवर येणाऱ्या बापाचा चेहरा शोधणारी ती अबोध नजर थेट काळजात घुसली. डोळ्यातलं पाणी पुसत-पुसत आम्ही दिल्लीकडे परतलो. गाडीत आम्ही किती तरी वेळ निःशब्द होतो.

धर्मावती अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत

पुढे काही दिवसांनी हेमराजच्या कुटुंबासंदर्भातल्या बातम्या येत राहिल्या. त्याच्या पत्नीला दिलेले पेट्रोल पंपाचे आश्वासन अद्याप पुर्ण झालं नसल्याचंही समजायचं. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवूनही हेमराजची पत्नी धर्मावतीला न्याय न मिळाल्याचं वाचत होतो. त्यातच एका ठगानं तिला मिळालेल्या पैशांवर डोळा ठेवून तिची फसवणूक केल्याची बातमीही वाचण्यात आली.

हेमराजचं शीर परत आणा अशी तिची आर्त मागणी तर कुठल्या कुठे विरुन गेली. आजही 'एक के बदले दस सर' अशी गगनभेदी डरकाळी फोडली जाते तेव्हा त्याला संदर्भ हेमराजच्या घटनेचा असतो. पण ना दस सर आले ना हेमराजच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेतली गेली.

परवा इंटरनेट चाळताना हेमराजच्या पत्नीचं गाऱ्हाणं मांडणारी ही स्टोरी दिसली. पुन्हा एकदा त्याच्या मुलाचा तो निरागस चेहरा डोळ्यासमोर आला. त्याच्या डोळ्यातलं बाप गमावल्याचं अव्यक्त दुःख आठवलं. पोटात मरियाना गर्तेपेक्षा खोल खड्डा पडला. त्याचवेळी एक के बदले दस सर म्हणणाऱ्यांचे, सोशल मीडियावर देशभक्तीचा हैदोस घालणाऱ्या व्हाईट कॉलर देशभक्तांच्या पोस्टी आठवल्या.

देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा कोणत्याही देशाने सन्मानच करायला हवा. त्या सैनिकाच्या चितेवर सत्तेची भाकरी भाजणाऱ्या राजकारण्यांनी तरी किमान तारतम्य बाळगत सैनिकांच्या कुटुंबाची काळजी घेऊ नये का? आता मुद्दा पुलवामातल्या चाळीस जवानांच्या हौतात्म्याचा आहे. माझी या देशातल्या सत्ताधारी आणि विरोधकांना हात जोडून विनंती आहे.

कृपया, या सैनिकांनी देशासाठी सांडलेल्या रक्ताचा टिळा लावून राजकीय चिखलफेक करु नका. यासाठी बरेच मुद्दे आहेत. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींना विजेता मांडवगणे यांनी स्पष्ट शब्दांत झापलंय ते अशा अनेक धर्मावतींसाठीच. भारतीय समाजाने आणि विशेषतः युद्धाची खुमखुमी असणाऱ्या प्रत्येकाने विजेता यांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मित्रांनो, यंदाच्या निवडणुकीत जे पक्ष सैनिकांच्या हौतात्म्याचा अथवा त्यांच्या शौर्याचा मुद्दा घेऊन तुमच्याकडे मतं मागतील त्यांना आवर्जून हेमराजची आठवण करुन द्या. आमचं मत विसरा असं त्यांना तिथेच सांगा. हीच शहीद हेमराजला खरी श्रद्धांजली ठरेल.
 

(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.)