एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय.
‘मेळघाटातून अनेक खोऱ्यातून हिवाळ्यात केसराचा पाऊस पडे. विशेषतः तेव्हा रायमुनिया फुललेला असे. रानचमेली बहरलेली असे. त्याचबरोबर कडखा, केकड आणि आरंगा या वृक्षांनाही फुलोरा आलेला. या सर्व फुलांचे परागकण हवेत उंच उडत आणि त्यांचे ढग बनत. त्यावर दव पडलं, की केशरी रंगांचे सुगंधी तुषार त्या खोर्याणतल्या नदीकाठच्या प्रचंड शिळा, दगड-गोटे आणि वृक्षांच्या पानावर पडत. चांदण्या रात्री मोठी बहर येई. नदीकाठच्या दाट जंगलावर आल्हाददायक चांदणं पडलेलं, पाण्यावर वृक्षांच्या सावल्या पडलेल्या. जिकडं तिकडं गूढ रम्य वातावरण असे.’
अरण्यऋषी, ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांच्या ‘केशराचा पाऊस’ या पुस्तकामधील हा एक उतारा आहे. या पुस्तकासह त्यांच्या अनेक पुस्तकात निसर्गाचा अशा अत्यंत तरल, उत्कट शब्दांत उल्लेख आहे. एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून, लेखणीतून कसे रोमांच आणून पाझरते, हे चितमपल्लींच्या साहित्यातून पदोपदी जाणवते.
व्यंकटेश माडगूळकर यांचं साहित्य खासकरून अरण्यावरचं वादातीत आहे. अतिशय समर्पकपणे त्यांनी त्यांचे अनुभव अनेक पुस्तकांतून मांडलेत. चितमपल्ली हे त्याच वाटेवरचे प्रवासी आहेत. त्यांची पुस्तकं वाचताना ते पदोपदी जाणवतं. ‘जंगलाचं देणं’ असो ‘रानवाटा,’ ‘रातवा’ की ‘चकवाचांदणं’ त्यांच्या लेखनातून स्थळ, काळाची वर्णनं इतक्या खुबीने येतात! हातात घेतलेलं पुस्तक कधी पूर्णत्वाला जातं, ते कळतही नाही. ते वाचल्यानंतर आत्मानंदाचा प्रत्यय पदोपदी येतो.
हेही वाचा : इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट
हे सगळं लिहिण्याचे कारण म्हणजे मारुतराव विदर्भ भूमी सोडून सोलापूरला स्थलांतरित झालेत, ते कायमचे. त्यांचं हे जाणं विदर्भवासीयांना क्लेश देणारं आहे. पण ज्या भूमीत लहानाचे मोठे झाले, आयुष्याची स्वप्नं रंगवली, तिथं परतणं हे काही नवीन नाही. उतारवयात तर माणसांना घराची ओढ लागतेच. त्यामुळे हे स्थलांतर काही काळासाठीचं नसून कायमचं आहे, हे समजल्याने निश्चितच खेद वाटतो.
वनविभागाच्या सेवेत सुमारे ४० वर्ष राहिल्यानंतर चितमपल्ली १९९०ला मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून सेवानिवृत्त झाले. या सेवेत असताना नवेगाव, नागझिरा, कर्नाला तसेच अनेक ठिकाणी ते वन्य प्राण्यांच्या विश्वात रमले. ही सरकारी नोकरी करत असताना त्यांनी आपला ग्रंथसंग्रह अत्यंत समृद्ध केला. नागपूरच्या लक्ष्मीनगरातलं निवासस्थान असो, की परतवाड्यातलं सरकारी निवासस्थान. तिथली पुस्तकं बघून मला खूप आश्चर्य वाटतं.
साहित्यावर अतोनात श्रद्धा असणार्या चितमपल्लींना संस्कृतसह अनेक भाषा अवगत आहेत. परिणामी, कोरकूपासून गोंडी मारिया आणि अन्य आदिवासींच्या भाषेचा शिरकाव त्यांच्या साहित्यलेखनात प्रतिबिंबित होतो. निवृत्तीनंतर ते गोंदिया जिल्हातल्या आपल्या लाडक्या नवेगावला रहायला निघाले. तिथं धाबेपवनीत त्यांनी घरही मिळवलं. पण, पहिल्याच पावसाळ्यात त्यांना तिथं त्रास सहन करावा लागला. परिणामी, ते नागपूरला येऊन राहिले.
खरंतर पत्नी आणि मुलगी छाया यांच्या जाण्याने त्यांना उतारवयात जे धक्के बसले, ते पचवत त्यांनी पक्षीकोश, प्राणीकोश, वृक्षकोश, मत्स्यकोशात स्वतःला बुडवून घेतलं. अत्यंत जिकिरीने कठीण वाटणारे हे कोश त्यांनी पूर्णत्वाला नेलेत. काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
मला आठवतं १९८३ चा जानेवारी महिना. नागाझिरा अभयारण्यात निसर्ग शिबिर सुरू होतं. तंबूत आम्ही सगळे विद्यार्थी मुक्कामाला होतो. शिबिराच्या दुसर्याि दिवशी मारुतराव नेचर ट्रेलसाठी आले होते. मी त्यांच्या गटात होतो. ७-८ कि.मी.ची पायपीट थंडीच्या गारठ्यात केली. तेव्हाची डायरी तपासताना २७ हून अधिक जातींच्या पक्ष्यांची ओळख चितमपल्लींनी आम्हाला करून दिली होती. त्यांचे अतिशय संयत बोलणं, ठामपणे व्यक्त होणं, आजही आठवतं.
त्यानंतर १९८६. पुन्हा पिटेहारीतील निसर्ग शिबिरात त्यांच्यासमवेत राहता आलं. १९९७ ला सोलापूरच्या पक्षीमित्र संमेलनात हिप्परगा तलावाकाठी एका नर्सरीत झाडाखाली बसून रंगलेली मुलाखत आठवते. १९८८ ला मेळघाटात असताना संपूर्ण एक दिवस चिखलदरा, रोमाडोह इथं फिरण्याची संधी मिळाली. त्यातून वेळोवेळी या ऋषितुल्य माणसाची विविधांगी ओळख होत गेली.
हेही वाचा : नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास
नागपूरला राहात असताना वनविभागाच्या विविध कार्यक्रमात ते अधूनमधून भेटत असत. प्रमुख पाहुणे असल्याने फारसं बोलणं होत नसे. वनविभागाने त्यांना वेळोवेळी आपला मंच उपलब्ध करून दिला. मात्र, उतारवयात निवांत लेखन करण्यासाठी त्यांना त्यांना हक्काची जागा वनविभागाने उपलब्ध करून दिली नाही, याची खंत वाटते. अर्थात, चितमपल्लींनीही त्यांच्या स्वभावाप्रमाणे कधीही त्याबद्दल चकार शब्दाने खंतही व्यक्त केली नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांपासून सर्वत्र त्यांचा वावर राहिला आहे. अलीकडच्या काळात वर्धात राहात असताना, तिथंही माणसं जोडण्याचं काम अव्याहतपणे चालूच आहे.
सोलापुरात वनविभागाने त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केलंय. वनविभागाला उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणा पण आता त्यांना पाहिजे तो लेखनासाठी निवांतपणा देण्यास हा विभाग तयार झालाय. वयाच्या ८९ व्या वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा!
हेही वाचा :
मुलांना कोडिंगचं शिक्षण द्यावं का?
नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास
३२ हजार कोटींचा धंदा, टीआरपी युद्धाचा अजेंडा!