गोष्ट मार्वल सिनेमांच्या बदलत्या सांस्कृतिक समावेशकतेची

२७ जून २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


‘मार्वल सिनेमॅटिक युनिवर्स’मधली सातवी टीवी सिरीज ‘मिस मार्वल’ ८ जूनपासून प्रसारित होतेय. आत्तापर्यंत या सिरीजचे तीन एपिसोड आलेत आणि तिन्ही एपिसोडना प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय. असं असलं तरी गेल्या दोन दशकभरातल्या जागतिक घडामोडी बघता, ‘मिस मार्वल’ ही सिरीज इतर मार्वल कलाकृतींपेक्षा वेगळी ठरते.

११ सप्टेंबर २००१. सकाळी पावणेनऊ-नऊच्या दरम्यान अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली. पश्चिमेकडून विशेषतः अमेरिकेकडून पसरवल्या जाणाऱ्या मुस्लिमद्वेषाला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं सांगितलं जात होतं.

पण वास्तवात, हाच हल्ला गेल्या दोन दशकांत कैकपटीने वाढलेल्या मुस्लिमद्वेषासाठी जबाबदार ठरला. अमेरिकेतल्या वर्गसंघर्षापेक्षा इथला वर्णसंघर्ष अधिक दाहक आहे. ९/११च्या हल्ल्यानंतर प्रभुत्ववादी श्वेतवर्णीय अमेरिकन नागरिकांच्या शत्रूयादीत कृष्णवर्णीयांसोबतच मुस्लिमांचंही नाव ठळकपणे नोंदवलं गेलं.

जगात महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेचा मुस्लिमद्वेष आता लपून राहिलेला नाही. तो वारंवार उफाळून येताना दिसतो. पण अमेरिकन पॉप कल्चरमधे मात्र आता बदलाचा, समावेशकतेचा नवा वारा सुटलेला दिसून येतो. याचं कारण लोकप्रिय मार्वल कॉमिक्सवर आधारित ‘मार्वल सिनेमॅटिक युनिवर्स’ म्हणजेच एमसीयू!

काय आहे ‘मार्वल सिनेमॅटिक युनिवर्स’

मार्टिन गुडमॅन यांनी सुरु केलेलं ‘टाईमली कॉमिक्स’ १९६१मधे स्टॅन ली यांच्या नेतृत्त्वाखाली ‘मार्वल कॉमिक्स’ बनलं आणि इथून मार्वल युगाला सुरवात झाली. साठच्या दशकात स्टॅन ली यांनी अनेक सुपरहिरो जन्माला घातले. हे सुपरहिरो म्हणजे काही अंतर्बाह्य सद्गुणांचे पुतळे नव्हते. सामान्यांसारख्याच भावभावनांचा त्यांच्यात पुरेपूर समावेश होता. त्यामुळेच बालसाहित्य म्हणून गणलं जाणारं कॉमिक सर्वच वयोगटातल्या वाचकांना आवडू लागलं.

मार्वलचे सुपरहिरो लहानांपासून मोठ्यांशी अगदी सहजपणे आपलं नातं जोडताना दिसतात. कालानुरूप त्यांच्या अद्भुत शक्तींना नवी धार चढताना दिसत असली तरी, स्टॅन ली यांनी त्यांच्यात पेरलेलं माणूसपण अजूनही अबाधित आहे. म्हणूनच की काय, काल्पनिक जगातल्या अनैसर्गिक आणि अमानवी शक्तींशी झुंजणारे हे सुपरहिरो खऱ्या आयुष्यातल्या समस्यांनाही सामोरे जाताना दिसतात.

या कॉमिकच्या दुनियेला मोठ्या पडद्यावर अधिक भव्यदिव्यतेने साकारणं शक्य व्हावं या दृष्टीकोनातून १९९६मधे मार्वल स्टुडियोची स्थापना करण्यात आली. २००५ला मार्वल स्टुडियोने सिनेनिर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि ‘मार्वल सिनेमॅटिक युनिवर्स’ म्हणजेच एमसीयूची घोषणा केली. २००८चा ‘आयरन मॅन’ हा ‘एमसीयू’चा पहिला सिनेमा ठरला.

एकूण २८ सिनेमे आणि २ सिरीज असलेली ही युनिवर्स आत्तापर्यंत फेज-१, फेज-२, फेज-३ आणि फेज-४ अशा एकूण चार खंडांमधे विभागली गेलीय. यातले पहिले तीन फेज हे ‘द इन्फिनिटी सागा’ म्हणून ओळखले जातात. याच महिन्यात या युनिवर्समधली नवी टीवी सिरीज ‘मिस मार्वल’ रिलीज झालीय आणि तिची प्रचंड चर्चा होताना दिसतेय.

मुस्लिम कुटुंबातली ‘मिस मार्वल’

इमान वेल्लानी या पाकिस्तानी-कॅनडीयन अभिनेत्रीने साकारलेल्या कमाला खान या सोळा वर्षांच्या छोकरीची ही गोष्ट. ही पोर ‘एमसीयू’मधल्या अॅवेंजर्सची, विशेषतः कॅप्टन मार्वलची फॅन आहे. कॅप्टन मार्वलचं वैयक्तिक आयुष्यातलं नाव कॅरोल डॅनवर्स आहे आणि कॅप्टन मार्वल बनण्यापूर्वी कॅरोलही मिस मार्वल म्हणूनच ओळखली जात होती. त्यामुळेच कमालाला कॅरोलविषयी, तिच्या सुपरपॉवर्सविषयी खास आकर्षण आहे.

एका मुस्लिम कुटुंबातल्या मुलीचं आयुष्य आपल्याला या सिरीजमधून पाहायला मिळतं. शाळा, समाज आणि कुटुंबाने घातलेल्या वेगवेगळ्या बंधनांपेक्षा तिला मार्वलचं अद्भुतरम्य जग जवळचं वाटतं. त्यामुळेच तिला ‘अॅवेंजरकॉन’मधे जायचं असतं, पण तिची आई तिला जाऊ देत नाही. पण नाना खटपटी करून अॅवेंजरकॉन गाठल्यावर तिथं एक अशी घटना घडते, ज्यामुळे कमालाचं पूर्ण आयुष्यच बदलून जातं.

आतापर्यंत या सिरीजचे फक्त तीनच एपिसोड आलेत. पण या सिरीजच्या चर्चांनी इंटरनेटवर अगदी धुमाकूळ घातलाय. ‘अरेबियन नाईट्स’सारख्या मध्यपूर्वेतल्या सुरस आणि चमत्कारिक कथांची दुनिया, अमेरिकेतल्या मुस्लिम कुटुंबाचं उलगडत जाणारं भावविश्व, भारत-पाक फाळणीची पार्श्वभूमी अशा कित्येक उपकथानकांनी ही सिरीज वेढली गेलीय. या सगळ्याबरोबरच आणखी एक गोष्ट चर्चेत आलीय. ती म्हणजे ‘एमसीयू’ची सांस्कृतिक समावेशकता.

तीन वर्षांपूर्वी स्टॅन ली यांनी या जगाचा निरोप घेतल्यावर त्यांनी जन्माला घातलेले हे सुपरहिरो, सिनेमात का होईना, पण जगभर तापलेलं विखारी वातावरण आपल्या माणूसपणाच्या जोरावर शांत करतील का, हा एक मोठा प्रश्न होता. पण मुस्लिमद्वेषात होरपळत चाललेल्या अमेरिकेसमोर मार्वलने कमाला खानच्या रुपात पहिली मुस्लिम सुपरहिरोईन उभी करत आपल्या लाडक्या स्टॅनबाबाला अनोखी श्रद्धांजली वाहिलीय.

हेही वाचा: आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

‘एमसीयू’ची सांस्कृतिक समावेशकता

खरं तर, ‘एमसीयू’ आधीपासूनच इतकी समावेशक कधीच नव्हती. स्टॅन ली यांनी आपल्या कॉमिकमधून अनेक सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवलं होतं. पण ते पडद्यावर यायला बराच काळ जावा लागला. अमेरिकन सिनेजगतातल्या प्रभुत्ववादी श्वेतवर्णीयांच्या भाऊगर्दीत अश्वेतांची, विशेषतः अमेरिकेच्या बाहेरच्या जगाची दखल घेतली न जाणं साहजिकच होतं. ‘एमसीयू’साठी सगळं जग म्हणजे फक्त उत्तर अमेरिका आहे अशा आशयाचे मीमही इंटरनेटवर वायरल झाले होते.

पण गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलताना दिसतंय. २०१६ला आलेल्या ‘डॉ. स्ट्रेंज’मधे जुन्या कॉमिक्समधे सांगितल्याप्रमाणे तिबेटमधल्या बौद्ध भिख्खूंची पार्श्वभूमी वापरली गेली होती. अॅवेंजर्सपैकी एक असलेला डॉ. स्ट्रेंज तिबेटमधे तंत्रविद्या शिकतो असं कॉमिक्समधे सांगितलं होतं. सिनेमात अगदी तसंच्या तसं दाखवलं गेलं नसलं तरी, तिबेटीयन संस्कृती आणि तंत्रविद्येचा प्रभावी वापर करून घेतला गेला होता.

२०१८ला आलेल्या ‘ब्लॅक पँथर’ने तर ‘एमसीयू’च्या चाहत्यांना न्यूयॉर्कच्या दुनियेतून उचलून पूर्व आफ्रिकेत ‘वाकांडा’ला नेलं. या सिनेमात आफ्रिकन आदिवासींच्या लोकजीवनाचा मागोवा घेण्यात आला. मागच्याच वर्षी आलेल्या ‘शांग-ची अँड द लिजंड ऑफ द टेन रिंग्ज’ने ‘एमसीयू’ला पहिला आशियाई सुपरहिरो मिळवून दिला. मुळात ही सगळी पात्रं खूप आधीच कॉमिक्समधे आलेली आहेत, पण पडद्यावर येण्यासाठी मात्र त्यांना बराच काळ वाट बघावी लागली.

‘शांग-ची’नंतर दोनेक महिन्यांनी रिलीज झालेल्या ‘इटर्नल्स’मधे कुमैल नंजीयानी हा पाकिस्तानी अभिनेता किंगो या इटर्नलच्या भूमिकेत दिसला होता. यात त्याने एका बॉलीवूड नटाची भूमिका साकारली होती. हे ‘एमसीयू’मधलं पहिलं भारतीय पात्र, पण यात भारताची बॉलीवूडशिवाय दुसरी कुठलीही ओळख नव्हती. हे चित्र आताच्या ‘मिस मार्वल’मधल्या भारत-पाक फाळणीच्या कथानकावरून बदलता येईल असा विश्वास आहे.

वर्णवर्चस्व झुगारून लावताना

सिनेमा किंवा टीवी सिरीजमधल्या मूळच्या अमेरिकन नसलेल्या पात्रांना त्यांच्या वर्ण, वंश, भाषा आणि सांस्कृतिक स्टीरियोटाईपवरुन हिणवणं हा अमेरिकन नागरिकांसाठी एक विनोदाचा भाग समजला जातो. ‘एमसीयू’मधेही कळत-नकळत अशा चुका घडल्याच आहेत, पण त्या चुका सुधारण्याचा पुरेपूर आणि प्रामाणिक प्रयत्नही केला गेल्यामुळे ‘एमसीयू’चा चाहतावर्ग मारुतीच्या शेपटीसारखा उत्तरोत्तर वाढत चाललाय.

प्रदीर्घ काळापर्यंत ‘एमसीयू’मधे कुठल्याही कृष्णवर्णीय पात्राला प्रमुख भूमिकेत आणलं गेलं नव्हतं. मग तो आयरन मॅनसोबत वावरणारा ऱ्हॉडी असेल किंवा कॅप्टन अमेरिकाची पाठराखण करणारा सॅम, ‘एमसीयू’ने त्यांचा वापर फक्त कथेला पुढं नेणारा एक सहायक दुवा म्हणूनच केला गेला होता. पण २०१८च्या ‘ब्लॅक पँथर’ने एक वेगळाच इतिहास घडवला.

या सिनेमातली सगळीच प्रमुख पात्रं कृष्णवर्णीयांनी साकारली होती. इतके दिवस गोऱ्यागोमट्या अॅवेंजर्सचं ‘दुरून डोंगरे साजरे’ म्हणत कौतुक करणाऱ्या कृष्णवर्णीय प्रेक्षकांनी ‘ब्लॅक पँथर’ला न भूतो न भविष्यती असं प्रेम दिलं. ‘एमसीयू’चा हा एकमेव सिनेमा आहे, ज्याला मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार समितीकडून ‘सर्वोत्कृष्ट सिनेमा’चं नामांकन मिळालं होतं.

‘ब्लॅक पँथर’ने झालेला बदल म्हणा किंवा मार्वलची मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणा, पण ‘एमसीयू’ने समावेशक भूमिका घेतलीय, हे खरं! ‘फाल्कन अँड विंटर सोल्जर’मधे तर चक्क सॅमला कॅप्टन अमेरिका बनताना दाखवलंय. मार्वलची पॅरेंट कंपनी डिज्नीने नुकतीच ‘इटर्नल्स’मधे असलेला गे किसिंग सीन डिलीट करणार नाही अशी कणखर भूमिका घेत ‘एमसीयू’चं लैंगिक स्वातंत्र्याला असलेलं समर्थन अधोरेखित केलं. एकंदरीत, स्टॅनबाबाला अपेक्षित असलेलं सुपरहिरोंचं माणूसपण आता पडद्यावर येतंय.

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा