पुतीन यांच्या गुरूला उडवण्याच्या प्लॅनमागे नेमकं कोण आहे?

२४ ऑगस्ट २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मेंदू समजल्या जाणाऱ्या लेखक, तत्वज्ञ अलेक्झांडर दुगिन यांच्या मुलीची २० ऑगस्टला मॉस्कोत हत्या करण्यात आली. खरं लक्ष्य दुगिन असल्याचं बोललं जातंय. आताच्या रशिया-युक्रेन युद्धाची मुळं त्यांनी मांडलेल्या दुगिन सिद्धांतात आहेत. या सिद्धांतानं युक्रेनचं स्वतंत्र अस्तिव नाकारलं होतं. त्यावरच पुतीन यांचं युक्रेन प्रेम उभं राहिलंय. त्यामुळेच दुगिनच्या मुलीची हत्या जगभर चर्चेचा विषय ठरलीय.

झाखोरोव इस्टेट हे रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोतलं एक महत्वाचं सांस्कृतिक ठिकाण. कला आणि साहित्याचे अनेक कार्यक्रम इथं होत असतात. २० ऑगस्ट २०२२ ला असाच एक कार्यक्रम झाखोरोव इस्टेटमधे झाला. याला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मेंदू समजल्या जाणाऱ्या अलेक्झांडर दुगिन यांनी हजेरी लावली होती. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी पत्रकार दारिया दुगिनही होती.

झाखोरोव इस्टेटमधला हा कार्यक्रम संध्याकाळी आटोपला. बाप-लेक दोघंही एकत्र जायला निघाले. पण अचानक अलेक्झांडर यांचा प्लॅन बदलला. त्यांनी आपली कार दारियाकडे सोपवली. स्वतः तिच्या मागून जायचं ठरवलं. कार घेऊन निघताक्षणी मोठा बॉम्बस्फोट झाला आणि त्यात २९ वर्षांच्या दारियाचा मृत्यू झाला. खरं टार्गेट अलेक्झांडर दुगिन होते. या बॉम्बस्फोटामुळे रशियाचं सत्ताकेंद्र हादरलंय.

पुतीन यांच्या मेंदूवर हल्ला

दारियाचे वडील अलेक्झांडर दुगिन रशियातलं मोठं प्रस्थ समजलं जातं. कुणी त्यांना पुतीन यांचा मेंदू समजतं तर कुणी अध्यात्मिक गुरू. पुतीन यांच्यावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. रशियात जे काही घडतं त्याचे खरे कर्तेकरविते अलेक्झांडर दुगिन हेच असल्याचं बोललं जातं. दुगिन हे लेखक आणि तत्वज्ञ म्हणून ओळखले जातात. रशियावर कायमच परंपरावादी आणि हुकूमशाही राजवट असावी असं त्यांना वाटतं.

दुगिन यांनी ३०पेक्षा अधिक पुस्तकं लिहिलीत. १९९७ला त्यांचं 'द फाउंडेशन ऑफ जिओपॉलिटिक्स: द जिओपॉलिटिकल फ्युचर ऑफ रशिया' नावाचं पुस्तक आलं. त्याची फार चर्चा झाली. यात त्यांनी थेट युक्रेनला लक्ष्य करत अमेरिकेवर टीकास्त्र सोडलं होतं. युक्रेन केवळ बाहुलं असून त्याला कोणताही भौगोलिक, राजकीय किंवा सांस्कृतिक आधार नसल्यामुळे हे राष्ट्रच नसल्याचा दावा दुगिन यांनी केला होता. हाच दुगिनचा सिद्धांत म्हणून रशियात प्रसिद्ध झाला.

२०००ला पुतीन पहिल्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनीही दुगिनचा युक्रेन राष्ट्रच नसल्याचा कित्ता गिरवला. पुढं युक्रेन दबद नसल्याचं कळताच रशियन सैन्याला हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले. सध्या रशियाने छेडलेल्या युद्धाची कल्पना याच अलेक्झांडर यांच्या दुगिन सिद्धांताची आहे. त्याला वेळोवेळी त्यांनी खतपाणी घातलं.

हेही वाचा: वीस वर्ष सत्ता भोगणाऱ्या पुतिन यांना का बदलायचंय रशियन संविधान?

बापलेकी युद्धाच्या समर्थक

रशियाचा शेवटचा राजा झार निकोलस २चा रासपुतीन नावाचा आध्यात्मिक गुरू होता. असं म्हटलं जातं की त्याच्या सल्ल्याशिवाय रशियात कोणत्याच घटना घडायच्या नाहीत. याच रासपुतीन यांची अलेक्झांडर दुगिन यांच्यासोबत तुलना केली जाते. त्यांना रशियाचे दुसरे रासपुतीन असंही म्हटलं जातं. यातून रशिया आणि व्लादिमीर पुतीन यांच्यावरच्या त्यांच्या प्रभावाचा अंदाज येतो.

युक्रेनसोबतच्या युद्ध पार्श्वभूमीवरची अलेक्झांडर आणि त्यांची मुलगी दारिया यांची वक्तव्य आगीचा भडका उडवणारी होती. दोघंही या युद्धाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. २०१५ला युक्रेनसंबंधीच्या त्यांच्या विखारी प्रचार आणि धोरणामुळे अमेरिकेनं शांती, सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडतेचं कारण देत या बाप-लेकीवर देशांतर्गत बंदी घातली. पुढं इंग्लंडनंही तेच केलं.

दारिया स्वतः पत्रकार होती. 'द जेड बुक' नावाचं पुस्तकही तिने लिहिलंय. रशियातलं जहाल उजव्या विचारांचं चॅनेल असलेल्या 'जरग्रेड'मधे तिने अँकर म्हणून काम केलं होतं. आपल्या वडलांच्या पावलावर पाऊल ठेवत तिचं मार्गक्रमण सुरू होतं. दुसरीकडे पुतीन यांचीही ती कट्टर पुरस्कर्ती बनली होती. त्यामुळेच मॉस्कोतल्या बॉम्बस्फोटात तिची हत्या होणं पुतीन यांच्या मेंदूवरचा हल्ला समजला जातोय.

हत्येमागचे वेगवेगळे कयास

ज्या गाडीखाली बॉम्बस्फोट झाला ती गाडी अलेक्झांडर दुगिन यांच्या नावावर होती. त्यांचीच हत्या करण्याचा हा प्लॅन असल्याचा दावा रशियन पोलिसांनी केलाय. तर हत्या करणारी संशयित व्यक्ती ही युक्रेनियन नागरिक असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे संशयाची सुई थेट युक्रेन सरकारकडे जातेय. अर्थात याला युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार असलेल्या मिखाइलो पोडोलियाक यांनी आपण रशियासारखे गुन्हेगार नसून या हल्ल्याशी युक्रेनचं संबंध नसल्याचं म्हटलंय.

रशियाच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मारिया झाराखोव यांनीही या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एक निवेदन जाहीर केलंय. यात त्यांनी मारल्या गेलेल्या दारियाचा उल्लेख 'खरी रशियन मुलगी' असा केलाय. तसंच या हत्येमागे युक्रेन असेल तर त्याचं काही खरं नाही अशी धमकीही दिलीय. रशियन मीडियातूनही या हल्ल्यामुळे युक्रेनवर अधिक कडक कारवाईसाठी दबाव निर्माण केला जातोय. त्यातून युक्रेनचा बदला घेण्याची भावना निर्माण होतेय.

अलेक्झांडर दुगिन यांनी ऐनवेळी गाडी बदलायचा निर्णय घेतल्यामुळे ते यातून थोडक्यात बचावले. त्यामुळे यावरून थेट रशियाचे शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनाही लक्ष्य केलं जातंय. तर दुसरीकडे 'रशियन सिक्युरिटी सर्विस' तसंच पुतीन यांच्या देशांतर्गत विरोधकांचाही यामागे हात असू शकतो असेही कयास बांधले जातायत.

हेही वाचा: 

उत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा?

ट्रम्प हरलेत, ट्रम्पवाद अमेरिकेत बोकाळलेला आहेच

तिसऱ्या जगाचं नेतृत्व करायची संधी भारताने गमावलीय?

ब्रिटनची युरोपियन संघातली 'ब्रेक्झिट' कुणाच्या फायद्याची?