हिंदी बिग बॉसच्या सोळाव्या पर्वाचा विजेता म्हणून अल्ताफ शेख म्हणजेच एमसी स्टॅनची निवड झालीय. ज्या पुण्याला ‘सांस्कृतिक शहर’ म्हणत निव्वळ एका विशिष्ट संस्कृतीचा उदोउदो केला जातो, त्याच पुण्याच्या गल्लीबोळात गेली काही वर्षं जागतिक दर्जाची रॅप संस्कृती जोम धरू पाहतेय. एमसी स्टॅन हा याच नव्या संस्कृतीचा एक खंदा शिलेदार आहे.
बिग बॉस हिंदी हा भारतातल्या सर्वाधिक लोकप्रिय रिअलिटी टीवी शोपैकी एक. नुकताच या शोच्या सोळाव्या सीजनची फायनल पार पडली. पुण्याच्या ताडीवाला रस्त्यावरच्या वस्तीत लहानाचा मोठा झालेला अल्ताफ शेख हा या पर्वाचा विजेता ठरलाय.
या अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्तीत जाऊन आपण अल्ताफ शेखबद्दल विचारलं तर गोंधळलेले चेहरे दिसतील, पण एमसी स्टॅन म्हणाल तर मात्र एखादं शेंबडं पोरही लगेच आपला हात धरून अल्ताफच्या घरापर्यंत आपल्याला घेऊन जाईल.
स्टॅनचे वडील पोलीस तर आई गृहिणी होती. वयाच्या १२व्या वर्षापर्यंत स्टॅनसाठी संगीत हे क्षेत्र कव्वाली पुरतंच मर्यादित होतं. तो सहावीत असताना त्याच्या मोठ्या भावाने त्याला ‘फिफ्टी सेंट’ या अमेरिकन रॅपरची काही गाणी ऐकवली. कव्वाली गाणाऱ्या आणि त्यातच रमणाऱ्या स्टॅनसाठी हा सांगीतिक प्रकार पूर्णपणे नवीनच होता.
‘फिफ्टी सेंट’नंतर स्टॅनने ‘एमिनेम’ची गाणी ऐकली आणि मग मात्र कव्वाली त्याच्या आयुष्यातून बाहेरच पडली. मध्य अमेरिकेत हिपहॉप संस्कृतीला मुख्य प्रवाहात आणणारा ‘एमिनेम’ हा सार्वकालीन महान रॅपरपैकी एक. त्याची गाणी ऐकून स्टॅनने कव्वालीचा नाद सोडला. त्यावेळी भारतात हनी सिंगचं ‘योयो’ वादळी वेगाने घुमत होतं.
हिपहॉप संस्कृतीचं हे नाविन्य आपलंसं करावं या ध्येयाने स्टॅन झपाटून गेला. एमिनेमसारखे इंग्रजी रॅपर काय गातात, हे समजून घेण्यासाठी त्याने इंग्रजीची शिकवणीही लावली. सहावीपासूनच हिपहॉपच्या प्रेमात पडलेल्या स्टॅनने आपला पहिला रॅप आठवीत असताना लिहला. ‘भलती पब्लिक’ या नावाने लिहलेल्या त्या रॅपचा त्यावेळी टीजरही बनवला गेला होता. त्यानंतर स्टॅन बीटबॉक्सिंग आणि बी-बॉयिंग म्हणजेच ब्रेक डान्सिंगकडे वळला.
हेही वाचा: ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?
एमसीईंग किंवा रॅपिंग, बी-बॉयिंग, ग्राफिटी, डीजे आणि बीटबॉक्सिंग हे कलाप्रकार म्हणजे खरं तर हिपहॉप संस्कृतीचं पंचांग! एमसीईंग किंवा रॅपिंग आणि बी-बॉयिंग या कलाप्रकारांना मुख्य प्रवाहात ठळक स्थान मिळालंय. ग्राफिटी आणि डीजे या कलाप्रकारांना हिपहॉपच्या पलीकडेही स्वीकारलं गेलंय. त्या तुलनेत बीटबॉक्सिंग मात्र तांत्रिक कौशल्याचा भाग असल्याचं सांगत लोकप्रियतेपासून लांब ठेवलं गेलंय.
साधारणतः हिपहॉप संस्कृतीतले अनेकजण स्वतःला रॅपर म्हणवून घेतात, तर स्टॅनसारखे काहीजण स्वतःला एमसी म्हणा असा आग्रह धरतात. रॅपचा अर्थ रिदम ऍण्ड पोएट्री म्हणजेच ताल आणि काव्य असा होतो तर एमसी म्हणजे माईक कंट्रोलर. रॅपर आणि माईक कंट्रोलरमधे बारीकसा फरक आहे. असं म्हणतात की एक एमसी रॅपर होऊ शकतो, पण रॅपर हे एमसी होऊ शकत नाहीत.
एमसी हे खऱ्या अर्थाने हिपहॉप संस्कृतीचे प्रतिनिधी मानले जातात. समोरच्या गर्दीला आपल्या शब्दांनी प्रभावित आणि नियंत्रित करणं, गाण्यांपेक्षा पंचलाईन्सवर जास्त भर असणं ही एमसींची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. रॅपिंग हे एमसीईंगचंच पुढचं पाऊल असलं तरी ते हिपहॉप संस्कृतीतल्या धंदेवाईक कलाकारांचं एक स्वरूप आहे. बऱ्याचशा रॅपरना फक्त मोठमोठ्या म्युझिक कंपन्यांसाठी गाणी बनवायची असतात.
दिखाऊपणा आणि काव्यरचनेवर अधिक भर असणारं रॅपिंग हे हिपहॉप संस्कृतीचंच एक अविभाज्य आणि प्रचंड लोकप्रिय अंग आहे. त्या तुलनेत हिपहॉप संस्कृती टिकवण्यासाठी झटणारे एमसी हे तितकेसे लोकप्रिय नाहीत. स्टॅनही रॅप रचतो, गातो पण तो त्याचबरोबरीने एक उत्तम एमसी असण्याचेही निकष पाळत असतो. त्यामुळे गल्लोगल्ली वाढत चाललेल्या इतर एमसी आणि रॅपरपेक्षा स्टॅन वेगळा ठरतो.
एमसीईंग ही स्टॅनची एक जमेची बाजू असल्यामुळे त्याला भारतीय हिपहॉप संस्कृतीत मानाचं पान आहे. त्याचबरोबरीने ‘मम्बल रॅप’ आणि ‘ट्रॅप संगीत’ हे परदेशात गाजलेले हिपहॉप कलाप्रकार भारतात आणण्याचा मानही स्टॅनलाच जातो. एकीकडे स्टॅनला या दोन कलाप्रकारांच्या भारतीयीकरणाचा शिल्पकार मानलं जात असलं, तरी याच गोष्टीवरून त्याच्यावर टीकाही होताना दिसते.
‘मम्बल रॅप’ हा तसा हिपहॉप संस्कृतीतला बदनाम कलाप्रकार. शब्दरचनेवर तसंच उच्चारांवर फारसा जोर न देता बनवलेले रॅप ‘मम्बल रॅप’ म्हणून ओळखले जातात. अनेकांना हा रॅपसारख्या आधुनिक काव्यप्रतिभेचा अपमान वाटतो. या प्रकारात मोडणारे रॅप हे बहुतांशी ‘रम, रमा, रमी’वर आधारित असतात. सामाजिक-नैतिकदृष्ट्या अपमानकारक शब्दांचा भरणा असलेले हे रॅप बनवण्यासाठी ‘मम्बल रॅप’चा आधार घेतला जातो.
‘ट्रॅप संगीत’ही ‘मम्बल रॅप’सारखंच बदनाम आणि तरीही बरंच लोकप्रिय आहे. अनेक हिपहॉप कलाकार हे ड्रग, भांडणांसारख्या बेकादेशीर कारवायांमुळे पोलिसांच्या रडारवर होते आणि असतात. आपण अशा प्रकरणात अडकलोय हे सांगण्यासाठी ते ‘ट्रॅप’ हा परवलीचा शब्द वापरतात. गुन्हेगारीतून मिळवलेलं आर्थिक-सामाजिक वर्चस्व दाखवणारे आणि हाय-हॅट, ८०८बेस वापरून बनवलेले रॅप हे ‘ट्रॅप’ संगीताचाच एक भाग आहेत.
स्टॅनच्या गाण्यांमधे या दोन्ही कलाप्रकारांचं अस्तित्व ठळकपणे जाणवतं. या कलाप्रकारांच्या आडून एखाद्या कलाकाराला ट्रोल करणं, त्याचं अस्तित्व नाकारणं विरोधकांना सोपं जातं. पण स्टॅनवर त्याचा काहीही परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे ‘मम्बल रॅप’सारखा बदनाम आणि समजायला अवघड असलेला कलाप्रकार सोपा आणि हवाहवासा वाटायला भाग पाडण्याची कला ही शब्दांवर उत्तम पकड असलेल्या स्टॅनला चांगलीच अवगत आहे.
हेही वाचा: ऑस्करच्या आयचा घो!
स्टॅनने ‘बिग बॉस’च्या मंचावर जेव्हा प्रवेश केला, तेव्हा त्याच्या गळ्यात दीड कोटींचा एक हिरेजडीत हार होता, ज्यावर रोमन लिपीतली ‘हिंदी’ ही अक्षरं ठळकपणे चमकत होती . पुण्यात वाढलेला स्टॅन हिंदीला आपली मातृभाषा मानतो, आपल्या गाण्यांमधे तसा अभिमानाने उल्लेखही करतो. त्याच्या गळ्यातला हा हार त्याच अभिमानाचं एक दृश्य रूप आहे.
असं असलं तरी स्टॅनची गाणी पूर्णपणे हिंदी नाहीत. त्यातल्या इंग्रजी, उर्दू शब्दांपेक्षा विशेष आहे तो या गाण्यांना लाभलेला, पुण्याच्या वस्त्यांमधल्या ‘टपोरी’ मराठीचा परीसस्पर्श! करोडोंनी पाहिलेल्या या गाण्यांमधे शिव्या आहेत म्हणून तथाकथित पांढरपेशा ‘रसिकां’कडून स्टॅनची हेटाळणी केली जाते, पण ती लोकप्रियता वाढवण्यात याच अस्सल टपोरी शिव्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही.
स्टॅन बिग बॉसच्या सोळाव्या पर्वाचा विजेता झाला, तेव्हा सोशल मीडियावर त्याला त्याच्या भाषेवरून ट्रोल केलं गेलं. ‘शिक्षणाचे माहेरघर’ असलेल्या पुण्यातून असा असंस्कृत मुलगा कसा काय एवढा नावारूपाला येतो, हा प्रश्न अनेकांना झोंबला. शिव ठाकरे या हिंदू प्रतिस्पर्ध्याला डावलून मुस्लीम अल्ताफ शेख जिंकल्याची खदखदही या प्रश्नाच्या आडून व्यक्त करण्यात आली.
पण स्टॅनने मात्र या सगळ्यांना आधीच एक कालातीत उत्तर देऊन ठेवलंय, ते म्हणजे - ‘रिप्रेझेंटींग पी-टाऊन बेबी’! शिक्षणाचं माहेरघर या पुण्याच्या संकुचित ओळखीला ‘पी-टाऊन’ म्हणत स्टॅनने जागतिक स्तरावर नेऊन ठेवलंय. सुगम-शास्त्रीय संगीत हे खरी अभिरुची म्हणून मिरवणाऱ्या पुण्याच्या ‘बस्ती’त जी पर्यायी हिपहॉप संस्कृती उभी राहतेय, तिचा खंदा ‘हस्ती’ असल्याचा स्टॅनला अभिमान आहे.
स्टॅन हे नाव सैतान आणि इन्सान या नावांचं एकत्रीकरण आहे. त्याच्या स्वभावाला अगदी साजेसं नाव. स्टॅनच्या गाण्यांचे बोल अनेकांना अपमानकारक वाटू शकतात. आपल्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ व्हाव्यात, यासाठी धडपड करणाऱ्यांना तर ती गाणी खटकायलाच हवीत. त्यांना विरोध व्हायला हवा. पण तो त्याच्या ‘भाषाशुद्धी’चा नसावा, तर त्याची वैचारिक शुद्धी घडवणारा असावा.
तो शिव्या देतो, टपोरी भाषा बोलतो, इतरांपेक्षा वेगळी केशभूषा-वेशभूषा करतो हे त्याच्या विरोधाचे निकष असू शकत नाहीत. या मुद्द्यांवरून त्याचं अस्तित्वही नाकारता येऊ शकत नाही. अगदी कमी वयात आणि वेळात तो यशाच्या शिखरावर पोचलाय. त्यामुळे त्याच्या सामाजिक जाणीवा तितक्याशा प्रगल्भ नाहीत, याची जाण विरोधकांना असायलाच हवी.
भारतातल्या सध्याच्या आघाडीच्या हिपहॉप कलाकारांपैकी एक असलेल्या स्टॅनचा ताडीवाला रस्ता झोपडपट्टी ते बिग बॉस विजेता हा प्रवास कित्येकांसाठी आदर्श आणि स्वप्नवत असूच शकतो. कुणाला तो ऐंशी लाखाचा बूट घालणारा माजोरडा वाटू शकतो तर कुणासाठी या ‘बस्ती’तल्या ‘हस्ती’चं आर्थिक यश प्रेरणादायी ठरू शकतं.
स्टॅनसाठी त्याचं यश हे समाजाने ठरवलेल्या कौतुक आणि विरोधांच्या व्याख्यांच्या पलीकडचं आहे. त्याचे शब्द हीच त्याची खरी ताकद आहे. कालांतराने ते प्रगल्भ होतील किंवा बिघडतील, पण त्याचं भारतीय हिपहॉप संस्कृतीतलं योगदान आणि स्थान मात्र अढळ राहील. त्यामुळे तुम्ही निंदा किंवा वंदा, तरीबी सॉलिड है ये बंदा!
हेही वाचा:
इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप
सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?
आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा
जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा