निर्भया : मरणोत्तर न्याय की हिंसेचं समर्थन?

२१ मार्च २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


निर्भया प्रकरणातल्या चारही आरोपींना २० मार्चला सकाळी फाशी देण्यात आली. तेव्हापासून निर्भयाला ७ वर्षांनी न्याय मिळाला, अशा बातम्या सगळीकडे प्रसिद्ध होतायत. फाशीचं रंगतदार वर्णनही चाललंय. पण फाशीच्या विरोधात असणाऱ्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायला कुणीही तयार नाही. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या सोशल मीडियावर वायरल झालेल्या लेखाचा हा अनुवाद.

आज सकाळीच एका न्यूज चॅनेलमधून फोन आला. पलिकडून कोणत्यातरी बाईचा आवाज आला. ‘मॅडम, तुमची प्रतिक्रिया हवी आहे. निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्यात येणार आहे. त्यावर,’ मी म्हणाले, ‘माझं मत वेगळं आहे. चालेल ना?’

‘काही हरकत नाही. जसं असेल तसं! मी तुम्हाला कनेक्ट करून देते,’ असं त्या म्हणाल्या. हे संभाषण झालं खरं. पण माझा कॉल कनेक्ट केलाच नाही. अचानक त्या महिलेचा आवाज आणि कॉल बंद झाला! असं का झालं हे मला कळलं होतं. मी फाशीच्या शिक्षेचा विरोध करते, म्हणून त्यांना माझं म्हणणं ऐकून घ्यायचं नसावं.

हेही वाचा : फाशीची शिक्षा भल्या सकाळीच दिली जाते, कारण

ही तर आपली कमजोरी!

सकाळपासून न्यूज चॅनेलवरच्या बातम्या चालल्या होत्या. फाशीच्या शिक्षेचं ‘रंगतदार’ वर्णन चाललं होतं. अँकर तिहाड जेलच्या आतली आणि बाहेरची दृश्य दाखवत होता. त्या चार कैद्यांची फाशीच तो आपल्यासमोर उभी करत होता. हे रसरशीत वर्णन म्हणजे काहींसाठी मनोरंजन, काहींसाठी बदला घेतल्याची भावना, काहींसाठी देशभक्तीचा अभिमान आणि काहींसाठी स्त्री सन्मानाचं उदाहरण असेल. यानं त्या चॅनेलचा टीआपपी जरूर वाढेल. पण त्यानं माझ्या डोळ्यातला अश्रू खाली ओघळत नाही.

निर्भयावरच्या अत्याचाराची आणि त्या आरोपींना झालेल्या शिक्षेचीही मीच गुन्हेगार आहे. त्यांची फाशीची शिक्षा मी रोखू शकले नाही. ही माझी कमजोरी म्हणा किंवा मर्यादा. या गुन्हेगारांनी केलेल्या हिंसेसोबतच जगातली प्रत्येक हिंसा मी थांबवू शकले नाही, ही खरंतर माझी मर्यादाच म्हणावी लागेल.

माझ्यासारखा विचार करणारे अनेक असतील, याची मला खात्री आहे. 'अॅमनेस्टी इंटरनॅशनल' या संस्थेनं मागे मृत्यूदंडाविरोधात एक परिषद घेतली होती. तेव्हा अनेक बड्या लोकांनी तिथं उपस्थिती लावली. त्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुलदीप नय्यरही होते. पण समाजात मात्र याच्या विरूद्ध असलेला विचारच जास्त फोफावतोय.

कुणाला दोषी ठरवायचं?

निर्भयाचे ते चार गुन्हेगार. त्यातल्या दोघांचे चेहरे तर अतिशय निष्पाप दिसतात. ही चौघं इथल्या समाजव्यवस्थेचे शिकार नाहीत? त्यांच्या कृत्यामागचं कारण आपल्या आसपास वाढत जाणारा उपभोगवाद नाहीय? इथल्या व्यवस्थेनं त्या आरोपींच्या जीवनालाही विकावू बनवून टाकलेलं नाही?

लहानपणापासून ते फाशीची शिक्षा होईपर्यंत त्यांचं आयुष्य कसं गेलं, कोणकोणत्या गोष्टींचा त्यांच्यावर प्रभाव होता, याची कोणतीही माहिती माझ्याजवळ नाही. पण मानसशास्त्र, समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी याकडे लक्ष देणं गरजेचं नाही का?

आजच्या काळात दोन माणसांमधल्या बदलत्या नातेसंबंधांनी आपल्याला फक्त उपभोगाचाच रस्ता दाखवला असेल तर नेमकं दोषी कुणाला ठरवायचं? त्या चौघांना फासावर लटकवण्याच्या आधीच अशी आणखी किती पोरं या समाजात तयार झाली असतील... आपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय वर्तनामुळेच हे गुन्हेगार तयार झालेत, यावर विचार करणं गरजेचं नाहीय?

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, पत्रकार सांगतेय स्वानुभव

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

समाज आणि आरोपींमधे फरक काय?

कुणी म्हणेल, ‘तुम्ही बोलताय तो नुसता आदर्शवाद आहे. कडक शिक्षा व्हावी हीच  इथल्या समाजाची मागणी आहे. पाप केलेल्यांना शिक्षा दिली नाही तर अशा पापांचं प्रमाण वाढत जाईल,’ पण पापाची शिक्षा दिल्यानंतर पाप घडणं थांबलंय का? फाशी दिली म्हणून बलात्कार होणं थांबलं का? महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण कमी झालंय? मग फाशीच्या शिक्षेची मजा घेणारे नेमकं कोणत्या गोष्टीचं समर्थन करतायत? अहिंसेचं?

हिंसेला हिंसेनी प्रत्युत्तर देणारे, हिंसेला पाठिंबा देणारे फाशीच्या शिक्षेपलिकडे कशाचाच विचार करू शकत नाहीत. नशेत धुंद होऊन त्या चौघांनी निर्भयावर हिंसा केली. आणि अशी कृत्य थांबावताना किंवा थांबवण्याच्या नावाखाली समाज आणि शासन तेच हिंसक कृत्य संपूर्ण शुद्धीत असताना करतंय. या दोन कृत्यांतला फरक आणि सारखेपण याचाही आपण विचार करू शकत नाही का?

जात आणि धर्मामुळे भरकटलेल्या माणसाच्या मनात हिंसा करूनच बदला घ्यावा ही भावना असते. या भावनेमागचा आधार डळमळीत आहे, चुकीचा आहे हे समाजातल्या अनेक लोकांना माहीत असतं. तरीही स्त्री अत्याचाराच्या मुद्द्यावर झालेली फाशी हा त्यांना अपराध वाटत नाही तर निकडीचं उत्तर वाटतं. असं कसं? 

फाशी म्हणजे मनुष्यवधच! त्या चार आरोपींना शिक्षा सुनावणाऱ्या, त्यांना जेल बाहेर फिरायला घेऊन जाणाऱ्या, नाश्ता चहा देणाऱ्या आणि त्यांचा फाशीचा चाप ओढणाऱ्यांच्या मनात त्या जिवंत माणसांना मृत्यू देताना जरासंही दुःख दाटून येणार नाही? त्यांच्या नोकरीनं त्यांना गुलाम बनवलंय, असं समजूया. पण आपलं काय? आपण सूडबुद्धीचे गुलाम झालोय. त्याला जंगली प्राण्यांसारखं वागतो असंही म्हणता येणार नाही. याला फक्त हिंसाचारच म्हणावं लागेल.

हेही वाचा : दिशा कायदा लागू झाल्यास बलात्कारी पुरुषांचा २१ दिवसांत निकाल

उन्नाव प्रकरणात फाशी का दिली नाही?

निर्भया तर गेली. प्रियंकाही! पण या दोघींचे आणि त्या आरोपींचेही कुटूंबिय जिवंत आहेत. त्यांनी नेमका काय विचार करायचा? आरोपींना शिक्षा सुनावणारे ते न्यायाधीशही हिंसेचा फास आयुष्यभर अनुभवत राहतील. माणसांकडून अपेक्षा आहे तर ती माफीची. त्यात अहिंसेची ताकद आहे आणि संदेशही!

राजीव गांधींच्या हत्येनंतर गांधी कुटुंबाने नलिनीच्या बाबतीत जे मानवी कृत्य स्वीकारलं ते माफीचंच होतं. जगातल्या जवळपास 146 देशांतल्या न्यायव्यवस्थेनं आता फाशीची शिक्षा सुनावणं बंद केलंय. त्यातल्या बहुतांश देशांतल्या कायद्यातूनही ही अमानवीय शिक्षा काढून टाकण्यात आलीय. जन्मठेप किंवा सश्रम कारावास यापलिकडे न्याय जाऊ शकत नाही.

पण आपल्या इकडचे न्यायाधीशही समाजाचा रोष किंवा समाजाने केलेला फाशीचा आग्रह अशी कारणं समोर ठेवून शिक्षा सुनावतात. कधी कधी ते शिक्षा देतही नाहीत. अशा केसेस कुठल्या असतात? उन्नाव सारख्या! या केसमधे तर आरोपीनं पिडीतेच्या कुटुंबालाही अत्यंत निर्घृण त्रास दिला. निर्दयीपणाची सीमाच पार केली. पण तो आरोपी ना एन्काउंटरमधे मारला जातो ना त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते. त्याला फक्त 10 वर्षांचा कारावास दिला जातो. कायद्यापुढे तर सगळे समान असतात ना?

हा तर कोरोनापेक्षा भयानक!

न्यूज चॅनेलवरही बेकायदेशीर एन्काउंटर आणि फाशीचं राजकारणच दाखवलं जातं. आपली प्रतिष्ठा, दुराभिमान, दिखाऊ समाजनिष्ठा आणि सत्ताकांक्षा ठळक करण्यासाठी फाशीचा वापर केला जातोय. ही शिक्षा नाही, हत्या आहे. या शस्त्राचा वापर करताना  जातिवादही झळकतो. गरीब, दलित आरोपींना तडकाफडकी निर्णय घेत क्रुर आणि प्रचारकी वागणूक दिली जाते. ज्या समाज, समुदाय आणि व्यक्तींना हे कळत नाही त्यांना मॉब लिचिंगच्या मागे असणारी अमानवीयताही कशी दिसणार? कशी कळणार?

कोरोना वायरसचं संकट आपल्याला इतकं मोठं वाटतंय. मानवजातीवर आक्रमण करणार्या वायरसला सगळे घाबरताहेत. पण 'मानवहत्या वृत्ती' नावाचा वायरस जास्त भयानक आहे, हे आपल्याला कधी कळेल? आत्मपरिक्षण करून हा वायरस आपल्यातून काढून टाकण्याची हिंमत आपण कधी करू? फाशीची शिक्षा देशातल्या कायद्यातून काढून टाकत जगण्याचा अधिकार देणाऱ्या संविधानाचा सन्मान आपण कधी करू शकू?

माझ्या मनातली ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोचण्याआधीच त्यांना फाशी दिलेली असेल. आणखी चार बळी गेलेत. पण विचार करून आपली भूमिका ठरवण्याचा वेळ आपल्याकडे आहे. ही भूमिका आयटी सेल, भरपूर पैसे मिळवणारी माध्यमं यांचं ऐकून ठरवायची नाहीय. आपला विवेक वापरून बनवायचीय.

हेही वाचा : 

निर्भया: बलात्काऱ्यांचं डेथ वॉरंट ते फाशी दरम्यान काय होणार?

कुणाला फासावर न चढवताही प्रेमाशी संबंधित गुन्हे रोखता येतात!

१०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेणाऱ्या तरुणीचं म्हणणं ऐकायलाच हवं!

हैदराबादेतल्या पोलिस एन्काऊंटरवर टाळ्या वाजवणाऱ्यांनी एकदा हे वाचावं

बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार?

(अनुवाद : रेणुका कल्पना)