२०० नक्षलवाद्यांसाठी २००० जवान असतानाही असं का घडलं?

१२ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


३ एप्रिलला छत्तीसगढमधे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २३ जणांचा बळी गेला. दोन-अडीचशे नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफसह विविध सुरक्षा यंत्रणांचे सुमारे दोन हजार जवान जंगलात उतरले होते. त्यांनी हा हा म्हणता नक्षलींना संपवायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यापाठीमागची कारणमीमांसा तपासली, तर काही गंभीर गोष्टी प्रकर्षाने समोर येतात.

पश्चिम बंगालमधे नक्षलवादाचा उगम झाला. डाव्या विचारसरणीवर नक्षलवाद पोसला जातो. त्याची पाठराखण करण्यात पश्चिम बंगाल हेच राज्य आघाडीवर होतं. त्याच राज्यातल्या विधानसभेची निवडणूक सुरू असताना नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधे सुरक्षा कर्मचार्‍यांवर भीषण हल्ला करून २३ जणांचा बळी घेतला. शनिवार, ३ एप्रिलला हा अमानुष हल्ला झाला. 

नक्षलींनी हल्ला करायचा, सुरक्षा कर्मचारी ठार व्हायचे हे आता नेहमीचंच झालंय. फरक काय तो आकड्यांचा! नक्षलींच्या प्रत्येक हल्ल्यानंतर बदला घेण्याची भाषा केली जाते. काही समाजघटकांकडून त्या भागात सैन्यदल उतरवण्याची मागणीही होते. सगळ्याच प्रसारमाध्यमांमधे या बातम्या एक-दोन दिवस मुख्य मथळ्याच्या जागा व्यापतात आणि सगळं काही पूर्ववत होतं. जणू असं काही घडलं होतं का, हा प्रश्न पडावा.

हे असं किती काळ चालायचं? नक्षलींच्या गोळीला, शस्त्रांना बळी पडणारे सुरक्षा कर्मचारी असले, तरी ते सर्वसामान्य कुटुंबातले असतात. नुकसान भरपाई म्हणून काही लाखांची थैली मृतांच्या कुटुंबीयांच्या हवाली केली म्हणजे या प्रश्नाचं गांभीर्य कमी होणार आहे का? राज्य-केंद्र शासनाचं कर्तव्य इथंच संपणार आहे का? पण या गोष्टीची आता राज्यकर्त्यांसह आपल्यालाही सवय झाली आहे. त्यामुळे याबाबत आता गंभीर कुणी व्हायचं, हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा : छत्तीसगडमधे पुन्हा नक्षलवादी हल्ला होऊ शकतो

दोनशे नक्षलवादी, दोन हजार जवान

तीन एप्रिलची ही वेदनादायी घटना छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात घडली. सुकमा हा नक्षलींचा गड मानला जातो. शनिवारी चकमक झालेला जोनागुडा, ताकुलगुडा आदी गावांचा हा परिसर म्हणजे घनदाट जंगलाने व्यापलेला. तिथं हिडमा या कमांडरच्या नेतृत्वाखाली दोन-अडीचशे नक्षलवाद्यांचं शिबिर सुरू असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली. 

त्या अनुषंगाने सीआरपीएफसह विविध सुरक्षा यंत्रणांचे पाच-पन्नास नाही, तर चक्क दोन हजार जवान त्यांच्या बंदोबस्तासाठी निघाले. मुळात दोन-अडीचशे नक्षलींचा बंदोबस्त करण्यासाठी दोन हजार जवान हे प्रमाणच कमालीचं व्यस्त होतं. शिवाय, सुरक्षा कर्मचार्‍यांकडे ज्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रं आहेत, त्या प्रमाणात ती नक्षलींकडे निश्चितच नाहीत. तरीही २३ जवानांना आपला जीव गमवावा लागला. यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणती असू शकते?

आदिवासी तरुणांचा रोजगार

देशात नक्षलवादाची सुरवात ही ‘आदिवासी विकास’ या गोंडस शब्दाखाली झाली असली, तरी आज तो उद्देश राहिलेला नाही. आज ही चळवळ स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचं नियंत्रण ठेवण्यापुरतीच सीमित झालीय. सत्ता टिकवण्यासाठी त्यांची कोणत्याही थराला जाण्याची तयारी आहे.

आदिवासी भागात असलेली प्रचंड गरिबी हे त्यांना मनुष्यबळ पुरवायला पुरेसं आहे. नक्षलवाद्यांवरच्या कारवाईबरोबरच राज्य संस्थेला आदिवासी विभागातल्या तरुणांना आर्थिक साधनं कशी उपलब्ध करून देता येतील याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. नक्षलवाद आवाक्यात आणण्यासाठी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे.  

हल्ले झाले, होत आहेत, होत राहतील. एकंदरीत परिस्थिती पाहता त्यामधे खंड पडणार नाही हे कटू असलं, तरी  वास्तव आहे. दोन-अडीचशे नक्षलींच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफसह विविध सुरक्षा यंत्रणांचे सुमारे दोन हजार जवान जंगलात उतरले होते. त्यांनी हा हा म्हणता नक्षलींचा खात्मा करायला हवा होता. पण तसं झालं नाही. त्यापाठीमागची कारणमीमांसा तपासली, तर काही गंभीर बाबी प्रकर्षाने समोर येतात.

हेही वाचा :  आंदोलन मोडण्याचे मोडीत निघालेले हाथखंडे मोदी सरकारला का हवेत?

नक्षलवाद्यांची ‘अ‍ॅम्ब्युश’ स्ट्रॅटेजी

त्या म्हणजे सुरक्षा यंत्रणांच्या नेहमीच्या चुका. सुरक्षा कर्मचार्‍यांची शिकार करण्यासाठी नक्षलवादी सापळा रचतात. त्याला ‘अ‍ॅम्ब्युश’ या शब्दानं संबोधलं जातं. त्या सापळ्यात ते आपलं सावज अलगद खेचतात. इथं सुरक्षा यंत्रणांना मिळालेली नक्षलींची खबर बरोबर होती. पण ती नक्षलींच्या ‘अ‍ॅम्ब्युश’चा भाग आहे का, याची शहानिशा झाली नव्हती. 

असं एखादं भयानक कृत्य करताना नक्षलवादी खबर पेरतात आणि एकदा खबर पेरल्यानंतर सावजाच्या प्रत्येक हालचालीची खबर घेतात! त्यांच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर असते आणि इथं नक्षलींनी लावलेल्या सापळ्यात सुरक्षा कर्मचारी अलगद सापडल्याचं दिसून येतं. 

सुरक्षा यंत्रणांना खबर तर मिळाली होती. पण त्यावर काम करण्याची तसदी घेण्यात आली नाही. म्हणजे त्या पाठीमागे नक्षलींचा काही डाव आहे का, अशा काही गोष्टींची शहानिशा झाली नव्हती. बातमीपाठीमागची बातमी काढली असती, तर नक्षलवाद्यांनी लावलेला हा ‘अ‍ॅम्ब्युश’च होता हे आढळून आलं असतं. नाहक गेलेले सुरक्षा कर्मचार्‍यांचे प्राणही वाचले असते!

माहिती वीस दिवसांपूर्वीच

विशेष म्हणजे, सुरक्षा जवानांना मारण्यासाठी नक्षलींनी त्या भागातल्या आदिवासींचं गावही रिकामं करून त्यांच्या घरांचा ताबा घेतला होता! नक्षलींकडून गोळ्या झाडल्या जात असताना त्या गावातल्या घरात आश्रयाला धावलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांना घरात लपलेल्या नक्षलींनी गोळ्या घातल्या. याचा विचार करता या हल्ल्यात नक्षलवादी किती प्रदीर्घ आणि परिपूर्ण तयारी करत होते आणि ही मोहीम राबवताना पोलिसांकडून किती दुर्लक्ष, ढिसाळपणा झाला होता, हे दिसून येतं. 

सुरक्षा यंत्रणांकडून सुरू असलेली ही कारवाई ड्रोन यंत्रणेवर अवलंबून होती आणि ड्रोनकडून घेतलेली माहिती ही वीस दिवसांपूर्वीची होती, हेही आता स्पष्ट झालंय. म्हणजे, ड्रोनद्वारे माहिती घेतल्यानंतरच्या वीस दिवसांत घडलेल्या घडामोडींचं, हालचालींचं काय?

नक्षली तर अचूक टायमिंगला महत्त्व देतात. सुरक्षा यंत्रणांकडून होणार्‍या प्रत्येक हालचालीची खडान्खडा माहिती त्यांच्याकडे असते. कोणतीही कारवाई गतिशील करण्यात ते माहिर आहेत. याचा विचार करता सुरक्षा यंत्रणांच्या हालचालींचा आराखडा तयार करणार्‍या अधिकार्‍यांच्या वकुबाबद्दल शंका येणं साहजिक आहे.

हेही वाचा : दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १

मदत का मिळाली नाही?

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जंगलात सर्च अभियान राबवताना एकमेकांशी समन्वय ठेवूनच वाटचाल करावी लागते. म्हणजे, एखाद्या पथकावर संकट कोसळलं तर दुसरं पथक तत्काळ त्याच्या मदतीला धावून येऊ शकेल, अशा अंतरावरून ही वाटचाल अपेक्षित असते. अशावेळी कोऑर्डिनेशन, कवर महत्त्वाचं असतं. पण, इथं काहीच नव्हतं.

इथं सकाळी अकराच्या सुमारास चकमक सुरू होऊन ती संध्याकाळपर्यंत सुरू होती, असं अहवालात समोर आलंय. इतक्या वेळात त्यांच्या मदतीला कुणी का धावू शकलं नाही? जीपीएस, ट्रॅकर, सॅटेलाईट फोन, मोबाईल, वॉकीटॉकीबरोबरच इतर संपर्काची असंख्य साधनं उपलब्ध असतानाही त्याचा वापर का झाला नाही, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. 

नक्षलींशी चकमक झाल्यानंतर ठार झालेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांचे मृतदेह शोधण्यासाठी मात्र नंतर ६०० कर्मचारी पाठवण्यात आले होते! या सहाशेजणांचं कवर अगोदरच देण्यात आलं असतं तर. बातम्यांनुसार नक्षलींच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या दोन हजार सुरक्षा कर्मचार्‍यांचे पाच ग्रुप करण्यात आले होते आणि ते जंगलात विखुरले होते. याचा अर्थ ते दिशाहीन पद्धतीनेच वावरत होते, असंच म्हणावं लागेल.

मारणारेही आपलेच आणि मरणारेही

जंगलात उतरल्यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांकडूनही सतर्क राहण्याची अपेक्षा असते. इथं फॉर्मेशनला महत्त्व असतं. आपण शत्रूच्या मागावर निघालोय, पर्यटनाला नाही याची जाणीव असावी लागते. ज्या दरीतून सुरक्षा कर्मचार्‍यांची वाटचाल सुरू होती, त्याच दरीच्या दोन्ही कडांवर अवघ्या शे-दोनशे मीटर अंतर ठेवून नक्षलवादी होते. तिथूनच त्यांनी सुरक्षा कर्मचार्‍यांना टिपलं. यावरूनही जंगलात उतरलेले सुरक्षा कर्मचारी किती सुशेगात होते हेच दिसून येतं.

केंद्र असो किंवा राज्य दोन्ही पातळीवर नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी प्राधान्य देण्यात आलंय. आंध्र प्रदेशसारख्या राज्यात ‘ग्रे हाऊंड’सारखे अभियान राबवून नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यात आला. नक्षलवाद्यांना अजूनही तिकडे आपलं बस्तान परत बसवता आलं नाही. कारण, तिथल्या सुरक्षा यंत्रणा तितक्या प्रमाणात सतर्क आहेत. 

महाराष्ट्रातही नक्षलींबद्दल आक्रमक धोरण अवलंबण्यात आलं. पण मे २०१९ मधे कुरखेडामधे नक्षलींनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून १९ सुरक्षा कर्मचार्‍यांचा बळी घेतला. तेव्हाही अशीच खबर पेरून अ‍ॅम्ब्युश लावण्यात आलं होतं. म्हणजे घटना घडतात. पण त्यातून काही तरी शिकण्याची मानसिकता आपल्या सुरक्षा दलं हाताळणार्‍या अधिकारीवर्गाकडे नाही, हे सत्य आहे. 

नक्षलवादाचा बीमोड हे दीर्घकालीन युद्ध समजून आपल्याकडे स्टॅ्रटेजी आखली जात नाही. पण तात्कालिक यशावर हुरळून जाऊन उत्सव साजरे केले जातात, ही प्रवृत्ती घातक आहे. दोन वर्षांपूर्वी गडचिरोलीत इंद्रावती नदीकाठी झालेल्या चकमकीत जवळजवळ ४० नक्षलींना कंठस्नान घालण्यात आलं. त्यावेळी आनंद व्यक्त करताना सुरक्षा कर्मचार्‍यांनी गाण्याच्या कॅसेट लावून त्यावर डान्स केला होता! मारणारे आणि मेलेले आपलेच असताना हा आनंदही आसुरीच म्हणायला हवा. त्यामुळे बदल्याची आग ही फुलतच राहते याचं भानही आपल्याला उरत नाही.

हेही वाचा : आज लेनिनचं भारताशी असलेलं नातं समजून घ्यावंच लागेल

कालबाह्य स्ट्रॅटेजीचा विचार होईल?

कुरखेडा भूसुरुंग स्फोट घडवून आणण्यामधे विलास कोल्हा या नक्षलीचा मोठा सहभाग होता. तो पुढे नक्षलींमधील एका अनैतिक संबंधाच्या घटनेवरून झालेल्या बेबनावातून पोलिसांना शरण आला. त्याने इंद्रावती नदीकाठी तळ टाकणं ही नक्षलींची चूक होती आणि ती त्यांना भोवल्याचं सांगितलं. त्याचवेळी त्यानं नक्षली अशी चूक कधी करीत नाहीत. शिवाय एखादी घटना घडवून आणायची असेल तर त्याची कशी तयारी करवून घेतात, हेही सांगितलं होतं.

चकमकीत ठार झालेल्या नक्षलींचे मृतदेह नक्षलींनी दोन ट्रॅक्टरमधून नेल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केलाय. इतक्या घनदाट जंगलात ट्रॅक्टर कसे चालले, हे कोडंच आहे. २२ सुरक्षा जवानांचे मृतदेह उचलणार्‍या सुरक्षा यंत्रणांच्या हाती फक्त एका महिला नक्षलीचा मृतदेह लागलाय! आपल्या चुका लपवण्यासाठी पोकळ बढायांचा आधार घेण्याअगोदर सुरक्षा यंत्रणांनी आपल्या कालबाह्य स्ट्रॅटेजीचा विचार करणं आवश्यक आहे.

जंगलयुद्धात स्टॅ्रटेजी जरूर असावी. पण वेळेनुसार त्यामधे बदल करण्याची तत्परताही हवी. असे निर्णय घेण्याची धडाडी लागते आणि त्यासाठी त्या परिसराचा, निसर्गाचा अभ्यास असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अशा मोहिमांमधे खबर्‍यांचं जाळं आणि त्यांच्याकडून प्रत्येक मिनिटाला येणारी माहिती महत्त्वाची असते, याचं भान तर पावलोपावली ठेवलं पाहिजे.

नक्षलींनी दिली होती धमकी

सीआरपीएफसारख्या सुरक्षा यंत्रणा देशपातळीवर काम करतात. त्यामधे संपूर्ण देशातून तरुण भरती होतात. त्यांना देण्यात आलेलं प्रशिक्षण हे पुरेसं असतंच असं नाही, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिवाय, सीआरपीएफ, डीआरजी अशा अनेक यंत्रणा त्या भागात काम करतात. या सुरक्षा यंत्रणांना वेगवेगळं ट्रेनिंग मिळतं. साहजिकच, सर्वांमधे एकसूत्रीपणा नसतो, हा प्रश्नही कळीचा आहे.

हा हल्ला होण्याअगोदर काही महिने नक्षलींनी हल्ल्याची धमकी दिली होती. त्याचा गांभीर्याने विचार झाला असता, तर हा हल्ला टाळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं असतं. आपणही आधीच्या नक्षली हल्ल्यानंतर बदला घेण्याची भाषा केली होती. स्थानिक पातळीपासून केंद्रीय पातळीपर्यंत मॅरेथॉन बैठका झाल्या होत्या. मर्दपणाची भाषाही वापरण्यात आलेली. अर्थात, त्याचीही देशातील जनतेला चांगलीच सवय झालीय.

हेही वाचा : बेरोजगारीतही भारतातल्या मध्यमवर्गानं सांप्रदायिकतेला रोजगार बनवलं

अमित शहा कुणाला मारणार?

यापूर्वी नक्षलींचे झालेले हल्ले आणि बस्तरमधे आता झालेला हल्ला यामधे एक महत्त्वाचा फरक आहे. घटना घडली शनिवारी आणि तत्काळ सोमवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी जगदलपूरला पोचले. त्यावेळी त्यांनी घेतलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीत ‘आम्ही आता नक्षलवाद मुळापासून संपवण्यासाठी लढणार आहोत,’ अशी घोषणा केली.

पण यावेळच्या घटनेतला मूलभूत फरक म्हणजे, अमित शहा यांच्या धमकीनंतर नक्षलींकडून चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलींना श्रद्धांजली वाहण्यासाठी काढण्यात आलेलं पत्रक. त्यामधे त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना थेट सवाल केला आहे की, ‘अमित शहा देश के गृहमंत्री होकर भी बदला लेने जैसी असंवैधानिक बात करते हैं. लेकिन वह किस किस से बदला लेंगे?’

नक्षलींनी वापरलेल्या भाषेचा गर्भित अर्थ काय आहे, याचा मात्र गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलीय. हे चक्क केंद्र सरकारलाच दिलेलं जाहीर आव्हान असून, ते पुढच्या संकटांची चाहूल देणारंच आहे.

हेही वाचा : 

किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?

नलिनी पंडितः दलित, बहुजनांच्या वकील

 केशवानंद भारतीः संविधान रक्षणाला कारण ठरलेले धर्मगुरू

न्यायमूर्तींनी संसदेत गेलं पाहिजे, पण गोगोईंसारखं नेमणुकीच्या दारानं नको!