सुनील ईरावारांच्या आत्महत्येनंतर तरी नेत्यांनी शहाणपण शिकावं!

१८ ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


सुनील ईरावार म्हणजे नांदेडच्या किनवटचे मनसे शहराध्यक्ष. राजकारण करायला पैसा आणि जात नसल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. सुनीलसारखे कार्यकर्ते नेत्यांपेक्षाही मोठे म्हणायला हवेत. पण गरज पडेल तेव्हा अशा कार्यकर्त्यांना आर्थिक किंवा निदान मानसिक आधार द्यायला कुणीही नेता पुढे होत येत नाही.

सुनील ईरावार हे नांदेडचे मनसे पदाधिकारी. त्यांनी रविवारी गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. सुनील किनवटमधे राहतात. किनवट हे नांदेडच्या कोपऱ्यातलं छोटंसं गाव. महाराष्ट्राच्या तर आणखीच कोपऱ्यातलं. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येची जास्त चर्चा झाली नाही. पण त्यांचं पत्र वाचलं आणि त्यातलं एक वाक्य मनाला स्पर्शून गेलं.

हे वाक्य म्हणजे आत्महत्येचं सुनील यांनी सांगितलेलं कारण होतं. आपल्या अखेरच्या पत्रात आई-वडीलांची माफी मागतानाच आपल्या अध्यक्षांसाठीही काही लिहिलं, ‘राजसाहेब, मला माफ करा. आमच्या इथे पैसा आणि जात यावर राजकारण केलं जातं. आणि या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीत. अखेरचा जय महाराष्ट्र. यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमकूवत असल्याने मी माझं आयुष्य स्वखुशीने संपवत आहे. जय महाराष्ट्र. जय मनसे. जय राजसाहेब’

सागाच्या लाकडांचं इंजिन

सुनील ईरावारांनी स्वत:चं जीवन ऐन तारूण्यात संपण्यासाठी दिलेलं कारण वेगळंच आहे. आजवर तसं उघडपणे कुणी हे मांडलेलं नाही. पण ते महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील वास्तव आहे. त्यामुळेच या प्रकरणाची जास्त माहिती घेण्यासाठी प्रयत्न केले. किनवटलाच शुभम शिंदे हा तरुण पत्रकार राहतो. त्याच्याकडून सुनील यांच्या अमोल जाधव या मित्राचा मोबाइल नंबर मिळाला. अमोलला कॉल लावताच तो भडाभडा बोलू लागला. आणि एक सामान्य कार्यकर्ता निष्ठेच्या बळावर मनानं किती मोठा असतो ते अनुभवता आलं.

अमोल म्हणाला, ‘सुनील ईरावार आमचा मित्र. मी काही मनसेचा कार्यकर्ता नाही. पण आमचा सुनील गेली दहा वर्ष तरी राजसाहेबांचा फॅन. त्यामुळे तो मनसेचं काम करू लागला. आम्हीही त्याला साथ देऊ लागलो. राजकारणात असला तरी सुनील खूपच गरीब घरातला होता. त्याचे वडील मेल एक्स्प्रेसमधे काही कामं करून कमाई करायचे. लॉकडाऊनने ती कामंही थांबली. त्याची आई किनवटच्याच एका वसतीगृहात भांडी घासायचं काम करते. कष्ट करणारे हे कुटुंब होतं.

सुनीलही तसाच. मात्र तो आपलं कुटुंब, स्वत: यापेक्षा समाजाचाच जास्त विचार करायचा. त्यानं कधीच पैशाच विचार केला नाही. राजसाहेबांचा कडवट चाहता. वाट्टेल ते करण्यास तयार असणारा. केवळ त्यांना भेटायचं म्हणून दोन वेळा मुंबईला गेला. एकदा मनसेचं निवडणूक चिन्ह असणारा इंजिन भेट दिलं. तेही असं तसं नाही. किनवटला सागाची झाडं खूप. साहेबांना द्यायचं म्हणून त्यानं सागाचं इंजिन बनवून घेतलं आणि दिलं. गर्दीमुळे थेट साहेबांच्या हाती देता आलं नाही. त्याची रुखरुख राहिली. पण टीवीवर साहेब दिसलं की दिसणारं इंजिन आपणच दिलेलं, असं तो अभिमानानं सांगायचा.’

हेही वाचा : उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची

जातीच्या राजकारणात निभाव लागेल?

मला स्वत:ला असे कार्यकर्ते खूप भारी वाटतात. नेत्यांपेक्षाही मोठे वाटतात. त्यामुळेच खरंतर सुनील यांच्याविषयी माहिती मिळवत होतो. अमोल सांगू लागला, ‘सुनील खूप काम करायचा. त्याला इतर पक्षांमधेही बोलवायचे. पण तो निक्षून सांगायचा, जे काही आहे ते राजसाहेबांसाठीच करेन. सुनील मनसेचा किनवट शहराध्यक्ष होता. पण पक्षाशी आणि लोकांशीही खूप प्रामाणिक असायचा. अडीनडीला धावायचा. खिशात काही नसताना काम करत राहायचा.’

अमोलने पुढे सुनील यांच्या नैराश्याचं कारण मांडलं, ‘किनवटमधे दोन समाजांची लोकसंख्या जास्त. एसटी आणि बंजारा. मतांच्या राजकारणात सुनील होता ती मसनजोगी जात तशी काहीच महत्व नसलेली. त्यामुळे सुनीलची निराशा वाढत गेली. त्यातच आर्थिक स्थितीनं तो अधिकच ढासळला.’
 
अमोलनं सांगितलेलं आत्महत्येचं कारण सुनीलनी त्यालाही सांगितलं नसावं. सुनीलने ते आत्महत्येच्या पत्रात लिहिल्यानं उघड झालं. आर्थिक तंगी ठाऊक होती. पण ती आताची नाही. कदाचित लॉकडाऊननं सर्वच आटवलं असावं. त्यात मग जातीय समीकरणांच्या राजकारणात आपला निभावच लागणार नाही, ही भावना अधिकच तीव्र झाली असावी. त्यातूनच रविवारी पहाटे त्यांनी गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. 

सुनीलला समजवणारं कुणी नव्हतं

खरंतर जातीय समीकरण हे विदारक वास्तव. मात्र, तसं असल्यानं काहीच करता येत  नाही असं नाही. अनेक राखीव मतदारसंघांमधे ज्यांच्यासाठी जागा राखीव असते ते समाज सोडून इतर समाजाचे कार्यकर्ते नेते काम करत राहतात. किमान पदांच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. तसंच ओपन मतदारसंघांमधे इतर कमी संख्या असणाऱ्या जातींच्या बाबतीत घडतं. त्यांना इतर काही जागा राखीव असल्यानं त्यांनी ओपनकडे पाहूच नये असाही एक दृष्टीकोन आढळतो. पण तिथंही ते कार्यकर्ते-नेते थांबत नाहीत. काम करत राहतात. 
 
काही ठिकाणी तर समाज नसला तरी कामाच्या, पक्षाच्या बळावर चंद्रकांत खैरेंसारखे नेते अनेक वर्ष निवडून येत राहतात. त्यांच्या बुरुड समाजाची घरं मोजलीत तर काही टक्केही नसतील. तसंच इतरही काही लोकप्रतिनिधी असतात. अर्थात ते अपवादच. पण सुनीलला हे समजवणारं कुणी नसावं. तो आपल्या नेत्यांशी बोललाही नसावा. त्यात आर्थिक तंगीची झळ मनातील नैराश्य अधिकच दाट करणारी ठरली असावी. त्यातूनच त्याने स्वत:ला संपवलं. पण सुनील ईरावारांना हे कुणी समजवलंच नसावं.

हे लिहून संपवतानाच राज ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली. ‘अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण बदलण्यासाठी पक्ष स्थापन केला. जात आणि पैसा या गोष्टीवर मला माझ्या पक्षाचं राजकारण करायचं नाही. त्यासाठी मी माझे तत्त्व सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात, तर मला जास्त त्रास होईल,’ असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

राजकारण म्हणजे अर्थकारण?

महाराष्ट्रातील शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष असे आहेत जे जातीय आधारावर राजकारण करताना दिसत नाहीत. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनाला किती लागलं असावं ते समजू शकतो. पण एक मात्र नक्की! थेट पक्षाचे सर्वोच्च नेते नाही. पण किमान इतर जिल्हा, संपर्क नेत्यांनी तरी आपल्या पक्षाच्या अशा स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे.

राजकारण म्हटलं की अर्थकारणच असं नसतं. मी शेकडो तरी अशा कार्यकर्त्यांना, स्थानिक नेत्यांना ओळखतो जे घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजतात. काही तर कर्जबाजारी होतात. बर्बाद होतात. असे मनसेतच नाही प्रत्येक राजकीय पक्षात आहेत. नेत्यांनी या कार्यकर्त्यांना सभोवतालच्या गर्दीतून वेळ काढत समजून घेण्याची एक व्यवस्था उभारली पाहिजे. पुढच्या फळीतल्या नेत्यांची अशी व्यवस्था. समर्पित कार्यकर्त्यांना वेळ देणारी. या व्यवस्थेनं अशांना आधार दिला पाहिजे. शक्य तसा पैशाचाही, किमान मानसिक आधार तरी! समजवलं पाहिजे.  संपत नसतं काहीच. प्रतिकुलतेतही नेहमीच संधी असते.

श्रद्धांजली वाहण्याची वेळ येऊ नये

सुनीलचा भाऊ अनिलशी राज ठाकरे बोलले. तो संवाद ऐकला, राज ठाकरेंनी विचारलं, ‘अनिल, राज ठाकरे बोलतोय, काय झालं? असं का केलं?’ अनिल म्हणाला, ‘वाघ गेला. साहेब, तुमचा वाघ गेला. अचानक काय टेन्शन होतं? साहेब, गेला! खूप जीव लावत होता हो, साहेब. तुमच्याबद्दल कुणी काही पोस्ट केली तर खूप भांडत होता. सांगायचा खूप भाग्यवान मी, साहेबांना अशी तशी माणसं भेटत नाही. मी भेटलो.’

अशा वेळी नेत्यांचं दु:खही वेगळंच. राज ठाकरेंच्याच शब्दात सांगायचं तर, ‘मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की, अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्य़ावर येऊ नये.’ अशी वेळ त्यांच्यावरच काय कुणावरही येऊ नये. आणखी कोणत्याही सुनीलमधलं महाराष्ट्राचं भविष्य असं अकाली करपू नये. पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील ते नेत्यांनाच. तसं घडलं तर बिघडणं नक्कीच थांबेल.

हेही वाचा : 

गांधी घराण्यानं संन्यास घेणं हेच देशहिताचं ठरेल

महाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं

महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?

आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?

राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री

राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही