आपला आपला अंदाजः भाजप २५०+, एनडीए २८०, पंतप्रधानपदी मोदी!

१८ मे २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान उद्या रविवारी होतंय. मतदान झाल्यानंतरच्या क्षणापासून सगळीकडे एक्झिट पोल सुरू होतील. पण त्याआधीच सगळीकडे वेगवेगळी भाकितं येताहेत. निवडणुकीच्या विश्लेषणाच्या कोलाज स्पेशल लेखांतला हा एक लेख.

एका वाक्यात हा लेख संपवायचा झाल्यास वरचं हेडिंग हाच माझ्या लेखाचा सार आहे. सगळ्यात आधी एक लक्षात घेऊयात की अनेक जण अगदी भाजपवालेही खासगीत हे मान्य करतात की यंदा मोदी लाट नाही. मात्र त्याचा दुसरा आणि खोलातला अर्थ न लक्षात घेताच भाजपच्या आणि त्यामुळे एनडीएच्या पराभवाची गणितं काहीजण मांडत बसतात. मोदी लाट नाही हे खरंच. पण त्यासाठी मुळात ती २०१४ला का होती हे लक्षात घ्यावं लागेल.

ती काँग्रेसविरोधाची मोदीलाट होती

१० वर्षांच्या युपीएच्या शासन काळाला विविध खऱ्याखोट्या कारणांनी कंटाळलेली जनता मोदी नावाच्या ‘इमेज मेकिंग’ला प्रतिसाद देऊ लागली. दुसरीकडे काँग्रेस घोटाळ्यांपासून ते निर्भया बलात्कार, अण्णा आंदोलन वगैरे सामाजिक घटनांबद्दल नकारात्मकरित्या निष्क्रिय राहिली.

मला कुणीतरी गंमतीत म्हटलं होतं की, अण्णा आंदोलन अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झालं असतं तर कुणी सांगावं, वाजपेयीच अण्णांच्या व्यासपीठावर अचानक गेले असते आणि ‘आओ अण्णाजी आप और हम मिल के भ्रष्टाचार मिटाते है’, असं काहीतरी करून सगळा नूरच पालटून टाकला असता. काँग्रेसचे तत्कालीन सरचिटणीस राहुल गांधींनी असं काहीही केलं नाही.

तर सांगायचा मुद्दा असा की अशा हतप्रभ काँग्रेसच्या ‘प्रतिमेला’ कंटाळलेल्या जनमताची लाट मोदींच्या रूपानं तयार झाली. आणि भाजपची नौका पार होऊन सत्तेच्या बंदरात उतरली. अर्थात लाट, लाट म्हणताना एकूण मतदानाच्या सरासरी ५० टक्के झालेल्या मतदानाच्याही निम्म्यापेक्षा कमी मतदानात ‘लाट’ तरी कशाला म्हणायचं? पण ते असो.

हेही वाचा: भोपाळमधे लागणार सॉफ्ट हिंदुत्व विरुद्ध हार्ड हिंदुत्वाचा निकाल

यंदा मात्र लाट नाही

तेव्हा त्या अर्थानं यंदा मोदी लाट नाही. मात्र याचा अर्थ असाही नाही की मोदी विरोधाची लाट आहे. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष असं कितीही म्हणत असले तरी मोदी विरोधातली अशी कुठली ‘लाट’ मला तरी महाराष्ट्रात दिसली नाही. ना भारतात जाणवतेय. मुळात एखादा खासदार जिंकून येणं ही इतक्या स्थानिक मुद्दे आणि राजकारणाची परिणती असते की त्याचा राष्ट्रीय मुद्यांशी फार कमीवेळा संबंध असतो. ताजा अपवाद फक्त २०१४चा. तेव्हा परिवर्तन घडवण्यासाठीचा रेटा लाटेच्या रूपानं दिसला.

यंदा मात्र आणि आता माझं पुढचं विधान मी काळजीपूर्वक करतोय. यंदा मात्र ‘फार बरं केलं नसलं तरी टीका करायला का होईना पण पुन्हा एकदा मोदीला संधी देऊन बघू. कारण टीका करायला युपीए, अन्य आघाड्या यांच्याकडे कुणीच एक व्यक्ती नाही,’ असा विचित्र फिनॉमिना मला दिसतोय. म्हणजे ‘मोदींना पर्याय कोण?’ हे नकारात्मक अर्थानं लोक स्वीकारताहेत. हे भाजपसाठी फार भूषणावह नाही.

आता माझा अंदाज बदलला

पण, सत्ता आणि २७०+ असं आकड्यांपुरताच बोलायचं असेल तर भाजप सत्तेत येईल असं मला वाटतं. याआधीच्या एका लेखात मी एनडीए म्हणालोय. मात्र, माझे इनपुट्स आता वेगळे आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला वाटतोय तितका तोटा नाही. भाजप ५०-६० जागा राखेल. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, बिहार या राज्यातला एकूण कल मोदींच्या बाजूनं आहे.

राजस्थान, एमपीत विधानसभेला भाजपची सत्ता गेली तरी लोकांचा मोदींवर रोष नव्हता. मध्य प्रदेश, कर्नाटकात तर अवघ्या काही आमदारांवर सत्ता समीकरणं अवलंबून आहेत. तेव्हा काऊ बेल्ट म्हणून ओळखला जाणारा हा भारताचा भाग मोदींच्या बाजूनं अजूनही आहे असं वाटतंय. जोडीला ओदिशाला पटनायकांची राखीव मदत, प.बंगालमधे वाढू शकणाऱ्या जागा, आंध्रमधे जगनमोहनचा हात आणि कर्नाटकमधे विधानसभेच्या यशाची लोकसभेत पुनरावृत्ती यामुळे एनडीए ३००पर्यंत गेल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.

हेही वाचा: आपला आपला अंदाजः महाराष्ट्रातल्या ४८ जागांवर कोण जिंकणार, कोण हरणार?

पण सगळं काही एकतर्फी नाही

अनेक सर्वे, पत्रकार एनडीएला १८०च्या आसपास कल देतायत. मात्र भारतीय मतदाराची नकारात्मक प्रतिक्रिया म्हणजे नकारात्मक मतदान इतकं बाळबोध विश्लेषण चुकीचं ठरेल. माझ्या अल्प समजुतीनुसार ‘लोकप्रियता म्हणजे बाजूनं मतदानाची खात्री नाही आणि टीका म्हणजे विरोधी मतदानाची हमी नाही.’

काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी ही निवडणूक एकतर्फी ठेवली नाही हे मान्य करावंच लागेल. राहुल यांना आवाज सापडलाय. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. मात्र स्वबळावर काँग्रेसप्रणित युपीए २७०+ गाठेल अशी मुळीच शक्यता नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे प्रादेशिक पक्षांचा प्रभाव. देशात भाजपनं, संघानं वर्षानुवर्ष घडवत आणलेली हिंदू वोट बँक, अन्य आघाड्यांमधे आजही सुप्तपणे असलेला ‘गैर काँग्रेसवाद’. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोदी हा चेहरा असलेली भाजप.

महाराष्ट्रात काँग्रेसी घोळ सुरूच

राहुल यांचा चेहरा तसा रजिस्टर झालेला नाही असं वाटतं. मोदींनी या निवडणुकीचं नॅरेटिव आपल्या सोईनुसार ठेवलं आणि काँग्रेस त्यात अडकत गेली. हिंदू दहशतवाद, नेहरू, राजीव गांधींची ट्रीप, शीख दंगल हे भूतकाळातले मुद्देच प्रचारात फिरत राहिले. राफेलमुळे चौकीदार चौर हैच्या नाऱ्यामुळे सुरवातीला घेतलेली आघाडी काँग्रेसला नंतर कायम ठेवता आली नाही.

महाराष्ट्रात तर काँग्रेसमधे जानच नव्हती असं वाटलं. अशोक चव्हाणांचं फोन संभाषण, विखेंचे भाजपगमन, तिकिट वाटपातले घोळ यामुळे काँग्रेसचा प्रचार असा दिसलाच नाही. राष्ट्रवादीला यंदा फायदा होताना दिसत असला तरी त्याचा राष्ट्रीय पातळीवर फारसा उपयोग नाही. राज ठाकरेंमुळे विरोधकांच्या प्रचारात धुगधुगी दिसली इतकंच काय ते फलित.

हेही वाचा: आपला आपला अंदाजः महाराष्ट्रात भाजप महायुतीला मोठा फटका

काही वेगळी निरिक्षणं

भाजपला स्वबळाचा आकडा मिळो न मिळो. एनडीए सत्तेत येणार असेल तर मात्र पंतप्रधान मोदीच असतील. अन्य कुणाचंही नाव मोदी पुढे येऊ देणार नाही. एनडीएला सत्तावंचित ठेवण्यासाठी युपीए आणि अन्य पक्ष एकत्र येणार असतील तर भाजप त्यात फूट पाडून विनाशर्त पाठिंबा देऊन वेगळीच आघाडी बनवेल. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत ममता, मायावती, शरद पवार यांना पंतप्रधान होऊ देणार नाही.

पवार नुकतेच म्हणाले की एनडीए सत्तेत कमी संख्येनं आल्यास ते सरकार अल्पजीवी ठरेल. हेच अन्य मिश्र आघाडीलाही लागू आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले होते, युपीएतील ज्या पक्षाला जास्त जागा असतील तोच युपीएचा चेहरा बनेल. युपीए आणि अन्य आघाडी एक व्हायच्या झाल्यास काँग्रेस दुय्यमपणा स्वीकारणार नाही.

२०१९ साठी माझा अंदाज

देशात काय होईल?

भाजप - २५० एनडीए (हा आकडा २८०-३०० पर्यंत जाऊ शकतो)
काँग्रेस - ६० युपीए - १३०
युपीतलं महागठबंधन - २०
अन्य - १२०
(सगळ्या अंदाजामधे दहाऐक जागांचा फरक गृहित धरावा.)

हेही वाचा: आपला आपला अंदाजः महाराष्ट्रात कोण जिंकणार किती जागा?

महाराष्ट्रात काय होईल?

भाजप - २३ (मुंबईच्या सर्व जागा भाजप-सेनेकडे)
शिवसेना - ०९
काँग्रेस - ७ (स्वाभिमानीची सांगली सीट धरून)
राष्ट्रवादी - ६
(३-५ जागा कमी जास्त फरकानं वाढू-घटू शकतात)

डेंजर झोनमधे कोँण?

काँग्रेस - अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे
राष्ट्रवादी - सुप्रिया सुळे, उदयनराजे, धनंजय महाडिक (तसंच राजू शेट्टीही)
भाजप - हंसराज अहिर, पूनम महाजन
शिवसेना - अमरावतीत अडसूळ, मावळात बारणे, परभणीत जाधव, उस्मानाबादमधे ओमराजे, औरंगाबादेत खैरे, यवतमाळ-वाशिममधे भावना गवळी 

हेही वाचा: आपला आपला अंदाजः सगळ्या पक्षांना विस्कळीतपणाचा फटका बसणार

(लेखक हे एबीपी माझाचे लोकप्रिय अँकर आहेत. )