डोळे विस्फारणारी अतिभव्य मैदानं, विविध आकारांचे हिरवेकंच बगीचे, तारांकित हॉटेलची रेलचेल, गुळगुळीत रस्ते आणि खास अरबी आदरातिथ्य यामुळे कतारमधला फुटबॉल वर्ल्डकप लक्षवेधी ठरला. हे आव्हान पेलणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. पण कतारनं तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर करून दाखवलं. त्यामुळेच आज हा टिचभर देश संपूर्ण जगात कौतुकाचा विषय बनलाय.
कतारमधला फुटबॉल वर्ल्डकप काही दिवसांपूर्वी संपला. मेस्सीच्या अर्जेंटिनाने या वर्ल्डकप ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं. जगभरातल्या फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातला ताईत असलेल्या मेस्सीची ही शेवटची स्पर्धा होती. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं.
हेही वाचा: लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'
ज्यावेळी फिफाकडून कतारला या स्पर्धेचं यजमानपद जाहीर झालं तेव्हा प्रामुख्यानं युरोपातल्या तालेवार देशांनी नाके मुरडली होती. हा इटुकला देश एवढी विशालकाय स्पर्धा कशी भरवणार याबद्दल तेव्हा शंका व्यक्त झाल्या होत्या. पण कतारनं केवळ यशस्वी आयोजनच नाही, तर आधुनिकता आणि परंपरा यांचा अनोखा संगम साधत स्वतःचं वेगळेपणही दाखवून दिलं.
यापूर्वी २००६ला कतारनं आशियाई क्रीडा स्पर्धा, २०१५मधे पुरुषांची जागतिक हँडबॉल स्पर्धा, त्याचवर्षी जागतिक बॉक्सिंग स्पर्धा आणि २०१९ला जागतिक आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद अशा क्रीडा स्पर्धांचं आयोजन तेवढ्याच दिमाखदारपणे करून दाखवलं होतं. पण फिफा वर्ल्डकपचा पसाराच अवाढव्य. त्यामुळेच कतारच्या आयोजन-क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं.
यात फिफाचे तेव्हाचे अध्यक्ष सेप ब्लॅटर यांचाही त्यात समावेश होता हे इथं उल्लेखनीय. ब्रिटिशांच्या जोखडातून १९७१ला स्वतंत्र झालेल्या कतार या छोटेखानी देशानं २०१०लाच फुटबॉल वर्ल्डकपच्या आयोजनाची शर्यत जिंकली. अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान आणि ऑस्ट्रेलिया या तगड्या देशांना पराभूत करून कतारनं हे यश संपादन केलं.
त्यावेळी कतार सरकारनं जागतिक फुटबॉल महासंघाच्या अधिकार्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना ३७ लाख डॉलरची लाच दिली, असा आरोप करण्यात आला होता. दोन वर्षांच्या चौकशीनंतर हा आरोप फेटाळण्यात आला. कतारला त्याच्याशी काहीही देणंघेणं नव्हतं. यजमानपदाचा मान मिळताच त्या देशानं फुटबॉल वर्ल्डकप महोत्सवाची तयारी सुरु केलीसुद्धा.
या स्पर्धेचं आयोजन करणारा कतार हा पहिलाच अरब देश आहे. फुटबॉल विश्वातल्या सर्वात मोठ्या स्पर्धेच्या आयोजनावर त्यांनी सुमारे २२२ अब्ज डॉलर खर्च केल्याचं समोर आलंय. ही रक्कम भारत आणि आशियातले दोन मोठे दिग्गज गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त आहे.
साहजिकच कतारमधला हा फुटबॉल महोत्सव आतापर्यंतचा सर्वात महागडा ठरलाय. तो मान कतारनं पटकावला हेही कौतुकास्पद. यजमानपद मिळाल्यापासून कतारनं हा जागतिक फुटबॉल महोत्सव यशस्वी करण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतायला सुरवात केली होती.
हेही वाचा: पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला?
या स्पर्धेसाठी सहा नवीन स्टेडियम बांधण्यात आले. दोन जुन्या स्टेडियमना नवी झळाळी देण्यात आली. यासोबतच खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी खास स्टेडियम उभारण्यात आलं. त्यावर १० अब्ज डॉलर खर्च झाला. अमेरिकन स्पोर्टस् फायनान्स कन्सल्टन्सी फ्रंटच्या मते, कतारनं या स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता २१० अब्ज डॉलर खर्च केलेत.
यामधे विमानतळ, रस्ते, नाविन्यपूर्ण हब, हॉटेल आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. एकट्या दोहामधे, द पर्ल हे खेळाडूंना राहण्यासाठी सप्ततारांकित संकुल उभारण्यासाठी १५ अब्ज डॉलर खर्च करण्यात आले, तर दोहा मेट्रोवर ३६ अब्ज डॉलरचा खर्च झाला. एवढंच नाही तर कतारनं अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दर आठवड्याला ५०० दशलक्ष डॉलर खर्च केले.
अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं तर, २०१८मधे रशियात झालेल्या वर्ल्डकपवर एकूण ११.६ अब्ज डॉलर खर्च करण्यात आले होते. त्यापूर्वी, २०१४मधे ब्राझिलमधे १५ अब्ज डॉलर, २०१०मधे दक्षिण आफ्रिकेनं ३.६ अब्ज डॉलर खर्च करून स्पर्धा आयोजित केली होती.
२००६मधे जर्मनीतल्या फुटबॉल वर्ल्डकपचा खर्च ४.३ अब्ज डॉलर, जपानमधल्या २००२च्या स्पर्धेचा खर्च ७ अब्ज डॉलर, फ्रान्सनं १९९८मधे केलेला खर्च होता २.३ अब्ज डॉलर आणि अमेरिकेत १९९४ मधे झालेल्या वर्ल्डकपवर ५९९ दशलक्ष डॉलर खर्च झाले होते.
वर्ल्डकपला एक वर्ष बाकी राहिलं तेव्हापासून कतारमधे उलट गणती सुरु झाली. टीवीवरच्या बातम्या असोत किंवा रेडिओवरचे विविध कार्यक्रम असोत, सर्व कार्यक्रमांत फुटबॉल वर्ल्डकप सुरु व्हायला आणखी किती दिवस राहिलेत याची जाणीव प्रकर्षानं करून दिली जात होती.
रस्तेबांधणीला सर्वोच्च प्राधान्य देऊन सगळेच रस्ते चकचकीत करण्यात आले. त्याच्या सोबतीला दळणवळण, खाण्याची ठिकाणं, मनोरंजनाची केंद्रे आणि विविध ठिकाणी सुंदर बागा विकसित करण्यात आल्या. फोन आणि इंटरनेटच्या नेटवर्क सुविधेत आमूलाग्र सुधारणा करण्यात आली.
वर्ल्डकपचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील पाहुणे कतारला येणार याचा विचार करून अनेक मोठे कार्यक्रम आयोजित केले गेले. त्याद्वारे गर्दी हाताळण्याचं तंत्र विकसित करण्यात आलं. म्हणजेच कुठेही आपलं हसं होणार नाही याची पुरेपूर दक्षता कतारमधल्या प्रशासनानं विविध पातळ्यांवर घेतली.
हेही वाचा: क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट
कतारची लोकसंख्या आहे सुमारे २९ लाख. यात मूळच्या कतारवासीयांची संख्या जेमतेम ४ लाख. बाकीचे लोक नंतर येऊन तिथं स्थायिक झालेत. नैसर्गिक वायू आणि पेट्रोलच्या साठ्यांमुळे हा देश आज जगातला सर्वात सधन मानला जातो. तिथलं दरडोई उत्पन्न आहे १ लाख, ४५ हजार, ८९४ अमेरिकन डॉलर. देशाचं क्षेत्रफळ ११४३७ वर्ग किलोमीटर.
तापमान कधी ४० तर कधी ५० अंश सेल्सिअस. म्हणजे सदासर्वकाळ अंगाची लाही-लाही. यावर उपाय म्हणून कतारनं या स्पर्धेच्या निमित्तानं लुसैस सिटी नव्यानं उभारण्यासाठी ३.६६ लाख कोटी रूपये खर्च केले. ही कतारमधली पहिली ग्रीन सिटी ठरली.
ग्रीन सिटी याचा अर्थ शाश्वत शहर. याला इको-सिटी किंवा हरित शहर असंही संबोधलं जातं. सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय प्रभावाचा सांगोपांग विचार करून ग्रीन सिटीची उभारणी केली जाते. खास डिझाइन केलेलं हे हरित शहर एवढं सुंदर दिसतं की, पाहताक्षणीच कोणीही त्याच्या प्रेमात पडावं.
आपल्या देशाचा विचार केला तर विस्तीर्ण हिरवाईनं नटलेलं म्हैसूर हे पहिलं हरित शहर होय. अर्थात, कतारनं लुसैस सिटीचा चेहरामोहरा बदलताना कसलीही कसर सोडली नाही. आदर्श हरित शहर कसं असावं याचा आदर्श वस्तुपाठच कतारनं सार्या जगापुढे ठेवलाय.
कतार हा पुराणमतवादी इस्लामी देश असल्यामुळे तिथं सार्वजनिक जीवनात वावरण्यासंबंधीचे नियम आणि कायदे कडक आहेत. त्यामुळेच फुटबॉल चाहत्यांना स्वतःच्या वर्तणुकीबद्दल दक्षता घेण्याच्या सूचना कतार सरकारनं स्पर्धा सुरु होण्याआधीच केल्या होत्या.
मुख्य म्हणजे या फुटबॉल स्पर्धेत, मद्यप्राशनावर अनेक मर्यादा घालण्यात आल्या. लक्झरी हॉटेलमधल्या बारमधेच मद्य विकत घेता येईल असं निश्चित करण्यात आलं. त्यामुळे सामन्यांमधे मद्याचे फेसाळते कप उंचावून बेहोष वातावरणात प्रेक्षक फुटबॉलचा आनंद लुटत असल्याचं चित्र कतारमधे दिसलं नाही. या स्पर्धेचं हे वेगळेपण म्हणता येईल.
सुरवातीला मद्यपानावरची निर्बंधाची घोषणा कतारनं केली तेव्हा प्रामुख्यानं युरोपमधल्या फुटबॉलप्रेमींनी त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण कतारनं कोणाचीही पत्रास बाळगली नाही. मुख्य म्हणजे फिफानेही याला मौन बाळगून मान्यता दिली.
हेही वाचा: महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’
एवढी मोठी स्पर्धा म्हटल्यावर सुरक्षेचा मुद्दा कळीचा ठरणार हे कतारनं वेळीच ओळखलं. चिरेबंदी सुरक्षेसाठी आयोजकांनी केलेली तरतूद होती तब्बल ६५ हजार कोटी रुपये. स्पर्धेच्या ठिकाणी टेहळणी करण्यासाठी कतारनं युरोपमधल्या सर्वात मोठ्या सुरक्षा कंपनीकडून २४ लढाऊ विमानं आणि ९ अत्याधुनिक प्रशिक्षण जेट विमानं खरेदी केली.
याशिवाय हेलिकॉप्टर आणि त्यात वापरण्यात येणारी सुरक्षा उपकरणेही विविध कंपन्यांकडून या स्पर्धेसाठीच विकत घेण्यात आली होती. हे कमी म्हणून की काय १६० देशांतील २० हजार स्वयंसेवकही स्पर्धा सुरळीत पार पडावी यासाठी अहोरात्र राबले.
आपल्या मुंबईहून छोटा असलेला हा देश सुरवातीला वैराण वाळवंट होता. पण तिथं पेट्रोल किंवा नैसर्गिक वायूचे अमाप साठे सापडले आणि कतारमधे लक्ष्मी पाणी भरू लागली. सध्या मध्यपूर्व आशियातला एक धनाढ्य देश असा लौकिक या देशानं मिळवलाय.
यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपच्या निमित्तानं जगभरातल्या सतरा लाखांहून अधिक क्रीडाप्रेमींनी कतारला भेट दिली. त्यामुळे जे आर्थिक चलनवलन झालं त्याचा फायदा भविष्यात कतारला मोठ्या प्रमाणावर होणार हे निःसंशय. एके काळी कतारमधे कमालीची गरिबी होती. आज तिथं दर तिसरी व्यक्ती करोडपती आहे. शिवाय या देशात कसलाही कर द्यावा लागत नाही. आरोग्य आणि शिक्षण मोफत आहे.
फुटबॉल वर्ल्डकपच्या निमित्तानं कतारमधल्या पर्यटनाला विलक्षण जोर चढला. २०३०पर्यंत या देशाला दरवर्षी साठ लाख विदेशी पर्यटक येतील, असा अंदाज व्यक्त होतोय. फुटबॉल महोत्सवामुळे नव्या पायाभूत सुविधा उभ्या तयार झाल्या असून या निमित्तानं संपूर्ण जगाला त्याचं विहंगम दर्शन घडलंय.
नेटके आयोजन, कडक शिस्त आणि सोवळ्या वातावरणात पार पडलेला हा फुटबॉल महोत्सव दीर्घ काळ जगभरातल्या क्रीडाप्रेमींच्या स्मरणात राहील. त्याबद्दल कतारच्या एकूणच व्यवस्थापन कौशल्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच. यानिमित्तानं जागतिक फुटबॉलचा लंबक आशियाच्या दिशेनं झुकला हेही ठळकपणे नमूद केलं पाहिजे.
हेही वाचा:
भारताकडे वेगवान गोलंदाज येण्याचं कारण काय?
अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी