‘एमटीवी हसल’ या हिपहॉप रिऍलिटी शोचा दुसरा सीझन नुकताच पार पडला. देशभरातल्या विविध भागातून अनेक रॅपर्स या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्या रॅपर्समधून हरियाणाचा ‘एमसी स्क्वेअर’ हा ‘हसल’च्या दुसऱ्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट रॅपर ठरला. त्याचबरोबर नॅझ, सृष्टी, क्यूके, ग्रॅविटी या मराठी रॅपर्सनीही आपली वेगळी छाप या स्पर्धेवर सोडली.
सत्तरच्या दशकांत न्यूयॉर्कच्या गल्लीबोळात वाजणारं हिपहॉप भारतात लोकांच्या सवयीचं होण्यासाठी एकविसावं शतक उजाडावं लागलं. हरीजीत सिंग सेहगल म्हणजेच बाबा सेहगल हा भारताचा पहिला रॅपर. त्याच्या १९९२च्या ‘ठंडा ठंडा पानी’ने बॉलीवूडला हिपहॉप संस्कृतीशी खऱ्या अर्थाने जोडलं. गेल्या ४० वर्षांत या परदेशी हिपहॉपने देशी हिपहॉपचा अवतार धरून भारतीय तरुणाईच्या मनावर कब्जा केलाय.
बॉलीवूडमुळे मुख्य प्रवाहात आलेला रॅप आता नव्या पिढीच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीचा एक अविभाज्य घटक बनलाय. भरभरून नाम, काम, दाम देणारं हे क्षेत्र तरुणाईला हवंहवंसं वाटू लागलंय. गल्ली ते दिल्ली गाजणारे हे रॅप आणि ते बनवणाऱ्या रॅपर्सला एमटीवीने आयोजित केलेल्या 'हसल'सारख्या रिऍलिटी शोमुळे आणखी बळ मिळतंय.
हसल म्हणजे चढाओढ. यावेळी ईपीआर, किंग रॉको, डिनो जेम्स आणि एमसी डी हे या सीझनमधल्या रॅपरचे टीम बॉस बनले होते. लोकप्रिय रॅपर बादशाहने या सीझनसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलं. त्याचबरोबर इक्का, ब्रोधा वी, ऑन्कोर, काम, फोर्टीसेवन आणि बाली या रॅपर्सनीही काही एपिसोडमधे पाहुण्या परीक्षकांची भूमिका निभावत या नवख्या रॅपर्सला मोलाचे सल्ले दिले.
पहिल्या फेरीत एकूण २२ रॅपर्स होते. वेगवेगळ्या भागांचं, जागांचं आणि जगाचं प्रतिनिधित्व करणारी ही पोरं. यात चीनी, नेपाळी म्हणून हिणवल्या जाणाऱ्या ईशान्य भारतीयांचं प्रतिनिधित्व करणारा यूएनबी हा गंगटोकचा छोकरा ‘हम भी क्या कम हैं’ या रॅपमधून ‘मैं नही चीनी, खाता हूँ नमक देश का, गधेकी भीडमें एक घोडा मै हूँ रेस का’ असे खडे बोल सुनावतो.
उत्तराखंडचा श्लोविज हा रॅपर्स तर स्वतःला भारतातला पहिला संस्कृत रॅपर म्हणवून घेतो आणि त्याचे रॅप त्याचं संस्कृत रॅपर असणं सिद्धही करतात. क ते ज्ञ या हिंदी मुळाक्षरांचा वापर करून बनवलेला त्याचा रॅप हा ऐकायला तर जबरदस्त आहेच, पण त्यासाठी त्याने निवडलेले शब्द आणि अनुप्रास अलंकाराचा सुयोग्य वापर आपली मती गुंग करून टाकतो.
यूएनबी असेल, श्लोविज असेल, मिर्झापूरच्या गँगवॉरला शब्दबद्ध करणारा ‘आपका बॉबी’ असेल किंवा रॅप आणि हिपहॉपवरच्या प्रेमापायी पाचवेळा घर सोडून पळालेली खाँजादी असेल यांनी केलेले रॅप निश्चितच इतरांपेक्षा वेगळे आणि उत्तम दर्जाचे होते, पण स्पर्धेच्या निकषांत बसत नसल्यामुळे त्यांना पहिल्याच फेरीत बाद व्हावं लागलं.
हेही वाचा: छोट्याशा गावातल्या दिशाचा सतरंगी संघर्ष
पहिल्याच फेरीत चांगला रॅप करूनही काही स्पर्धकांना बाहेर जावं लागलं, यावरूनच यावर्षीची ‘हसल’ जोरदार होणार याचे संकेत मिळाले आणि झालंही तसंच. एकेका फेरीगणिक या पर्वाचा दर्जा अधिकाधिक बहरत गेला. स्पर्धा एकदम चुरशीची होऊ लागली. पण पहिल्या फेरीपासूनच सातत्यपूर्ण कामगिरी करत प्रत्येक फेरीला ‘रेडियो हिट’ मिळवणारा ‘एमसी स्क्वेअर’ हा या पर्वाचा विजेता ठरला.
‘एमसी स्क्वेअर’ म्हणजेच अभिषेक बेंसला हा हरियाणवी छोकरा खरं तर व्यवसायाने सिविल इंजिनियर. पण त्याला कविता करायचा, नाचायचा छंद होताच. त्यातूनच पुढे रॅपचा नाद लागला. त्याच्या शेतकरी, सरंजामी कुटुंबात हा नाद कुणालाही आवडणं अशक्यच. त्यांची कशीबशी समजूत घालून तो रॅप करू लागला. स्थानिक गुजरी बोलीभाषेचा आणि रागिणी या लोकसंगीताचा प्रभाव हे त्याच्या रॅपचं वैशिष्ट्य.
न्यूयॉर्कमधून इकडं आलेली हिपहॉप संस्कृती आपल्याबरोबर गुन्हेगारीचा अलिखित शापही घेऊन आली. त्यामुळे भारतातल्या वाड्यावस्त्यांमधे रॅपचे सूर घुमले तेच मुळी बंदुकीच्या गोळीबारात आणि तलवारींच्या दणदणाटात. दिल्लीचा एनसीआर हा असाच एक भाईगिरीसाठी प्रसिद्ध असलेला एरिया. याबद्दल आपल्या ‘बदमॉस छोरा’मधे एमसी स्क्वेअर म्हणतो, ‘सपलेंडरपे काटे पुरी मौज छोरा, एनसीआरमें रखे पुरी धौंस छोरा!’
रागिणी या हरयाणवी लोकसंगीताला स्क्वेअरने आपल्या ‘ले ले राम राम’ गाण्यात जागा देत सगळ्यांना ठेका धरायला भाग पाडलं. पुढच्या फेरीत जेव्हा तो अभिमन्यूची गाथा सांगणारा ‘आधा ग्यान’ हा रॅप घेऊन आला, तेव्हा काही दिवसांपूर्वी ‘बदमॉस’मधून एनसीआरमधल्या दहशतीचं, भाईगिरीचं वर्णन करणारा, ‘राम राम’मधून आपला लंबरदारी सरंजामी थाट दाखवणारा स्क्वेअर हाच का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.
‘मिलते थे चेहरे जो काफी, वो दिखते है आजभी, पाप या पापी था कौन, मैं ढूँढूं बस सादगी’ असं ‘चेहरे’मधून गाणारा स्क्वेअर आपल्या ‘चार दिन’मधे घर सोडल्याची आठवण सांगताना ‘ममता के पल्लू से निकला लाने को क्रांती वे’ म्हणतो. स्क्वेअरचे ‘वन झीरो वन’, ‘भोज’, ‘नैना की तलवार’, ‘दो वूफर’ आणि ‘पॅरॅडॉक्स’सोबतचं ‘छोरे एनसीआर आले’ही तेवढेच जबरदस्त रॅप आहेत.
विरारचा निहार म्हणजेच नॅझ हसलच्या या पर्वाचा तिसरा सर्वोत्कृष्ट रॅपर ठरला. त्याचा आवाज इतरांपेक्षा वेगळा आहे जो आपल्याला गल्लीबोळातल्या अंडरग्राऊंड रॅपची आठवण करून देतो. नॅझचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या रॅपमधला रेफरन्स गेम. आपल्या गाण्यामधे तो वेगवेगळे रेफरन्स म्हणजेच संदर्भ ज्या ताकदीने पेरतोय, ते भारतात कुणाकडेच पाहायला मिळत नाही.
नॅझचे रॅप आणि त्याचा रेफरन्स गेम तरुणाईला चटकन भावतो. याचं कारण सोशल मीडियावर वाढत जाणाऱ्या मीम कल्चरमधे दडलंय. गाजलेल्या, न गाजलेल्या सिनेमातले विनोदी, चटकदार संवाद आजची तरुणाई मीममधून वापरण्याला प्राधान्य देते. नॅझ हे सगळे लोकप्रिय मीम आपल्या रॅपमधे अगदी योग्य ठिकाणी बसवत भाव खाऊन जातो.
आपल्या ‘अगर मै होता भगवान’मधे नॅझ म्हणतो, ‘तू ऊँगली कर जितनीभी ज्यादा, तेरा नाम नही होगा रोशन.’ हृतिक रोशनच्या अतिरिक्त अंगठ्याचा संदर्भ नॅझने या गाण्यात वापरलाय. हे समजायला मीमजगताचं ज्ञान हवं, ही तर नॅझची खासियत आहेच, पण ज्याला मीम समजत नाहीत, त्यांच्यासाठीही नॅझच्या ओळी तितक्याच अर्थपूर्ण राहतात, जे जास्तच खास आहे.
हेही वाचा: आजची पिढी कमिटमेंट देते, पण अडकून पडत नाही
नॅझचा रेफरन्स गेम भल्याभल्यांकडून नावाजला गेलाय. देशी हिपहॉपमधे रेफरन्स गेमचा विचार करायचा झाला तर, सध्यातरी त्याच्या आसपास फिरकणारं कोणीच नाही. पण तरीही स्पर्धेच्या स्वरूपानुसार रॅप बॅटलमधे कुणालातरी त्याचा सामना करायचाच होता आणि ते आव्हान उचललं २३ वर्षांच्या सृष्टी तावडे या मुंबईच्याच रॅपरने. या बॅटलमधे नॅझचेच रेफरन्स वापरत तिनं स्टेज गाजवलं.
अर्थात ‘हसल’चं स्टेज गाजवायची ही तिची पहिलीच वेळ नव्हती. आधी एक कवयित्री असलेली सृष्टी लॉकडाऊनमधे रॅपर बनली. आपल्या सुरवातीच्या ‘डमीज गाईड टू मुंबई’मधे तिनं स्वप्नांचं शहर असलेल्या मुंबईची, तिथल्या संघर्षपूर्ण जगण्याची, लोकलमधल्या गर्दीची, गर्दीतल्या प्रेमाची, खाद्यसंस्कृतीची एक वेगळीच ओळख प्रेक्षकांसमोर मांडली. ‘चिल काईंडा गाय’मधून तर नास्तिक सृष्टीने देवालाही आपला दोस्त बनवलं.
एखादा किस्सा किंवा गोष्ट रॅपमधून किती प्रभावीपणे आणि वेगळ्या पद्धतीने सांगता येऊ शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सृष्टीचे ‘छोटा डॉन’ आणि ‘एक था कौव्वा’ हे रॅप. ‘छोटा डॉन’मधे सृष्टीने तिच्या कामावरचा विनोदी किस्सा सांगितला होता, तर लहानपणापासून तहानलेल्या चतुर कावळ्याची गोष्ट ‘एक था कौव्वा’मधे वेगळ्या पद्धतीने ऐकायला मिळाली.
सृष्टीच्या ‘बचपन’ या गाण्यात तिनं स्वतःचं बालपण उलगडून सांगताना, समाजात बाल लैंगिक शोषणाइतका चर्चेत नसलेला बाल शारीरिक शोषणाचा मुद्दा चव्हाट्यावर आणला. तिने गायलेलं ‘मैं नही तो कौन बे’ सर्वसामान्य महिलांनी अधिक उचलून धरलं. देसी हिपहॉपमधे मुलांच्या तुलनेत मुलींचा सहभाग अतिशय कमी आहे, पण सृष्टीसारख्या रॅपर्सचं अस्तित्व त्यांच्या कमी तरीही ठळक सहभागाचं प्रतिक बनलंय.
‘बचपन’च्या निमित्ताने सृष्टीने बाल शारीरिक शोषणाचा दुर्लक्षित मुद्दा समोर आणला, तसंच घरगुती हिंसाचाराच्या मुद्द्याचं गांभीर्य अमरावतीच्या आर्या जाधव म्हणजे ‘क्युके’ या मराठमोळ्या, नववारी साडी घालणाऱ्या रॅपर पोरीनं आपल्या ‘वर्दियाँ’ या रॅपमधून पटवून दिलं. शब्दच्छल ही खासियत असलेली क्यूके महिलांवर होणाऱ्या अन्यायाला ‘ड्रॉप इट द्रौपदी’मधे वाचा फोडते आणि ‘तलवार ले उठा’ म्हणत लढण्याचं आवाहनही करते.
हसलच्या सर्वोत्कृष्ट पाच रॅपर्सपैकी ‘ग्रॅविटी’ म्हणजेच अक्षय पुजारी हा मुंबईतला एक नावाजलेला रॅपर. आपल्या ‘टूथपिक’ या रॅपमधे त्याने झाडांचं महत्त्व लाकडाच्या दृष्टीकोनातून मांडलंय. पानवाल्याचा मुलगा असलेला हा ग्रॅविटी आपल्या ‘दुकानदार’मधून ‘पानवाले का लडका, जो भी मैने देखा दे दे तुझ जैसे को सदमा’ असं म्हणत व्यसनाधीन समाजाचं जवळून दिसलेलं भयाण वास्तव मांडतो.
उत्तर प्रदेशचा शुभम पाल म्हणजेच ‘स्पेक्ट्रा’ आपल्या ‘कालारीजम’ या रॅपमधे भारतीय समाजात जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला जाणारा काळ्या-गोऱ्या त्वचेचा विखारी वर्णभेद अधोरेखित करतो. ‘जीडी ४७’ या पंजाबी रॅपरने आपल्या ‘बायपोलर’या गाण्यातून त्याला झालेला बायपोलर डिसॉर्डर हा मानसिक आजार उलगडून सांगितला. त्याचबरोबर सर्वच मानसिक आजार आणि त्याबद्दल समाजात असलेल्या शंका-कुशंकांवरही त्याने बोट ठेवलं.
वेगवेगळे विषय आणि वेगळ्या धाटणीचं सादरीकरण यामुळे ‘हसल’चं हे दुसरं पर्व विशेष ठरलं. त्यानिमित्ताने, तरुणाईला त्यांचे प्रश्न मांडणारा, त्यावर स्वतःच उत्तरही शोधणारा, व्यवस्थेला जाब विचारणारा त्यांचा स्वतंत्र आवाज मिळालाय. ‘हसल’ म्हणजे फक्त नवख्या रॅपर्समधली चढाओढ दाखवणारी स्पर्धा नाही, तर नव्या पिढीचा नवा एल्गार मांडणारा मंच आहे, हेच या पर्वानं दाखवून दिलंय.
हेही वाचा:
प्रेमासाठी खावाच लागतो एखादा धक्का
आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!