उषा खन्नाः मोहम्मद रफींची कारकीर्द सावरणाऱ्या संगीतकार

१९ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं स्वरुप असलेला हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जातो. भारतीय सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या महिला संगीतकार उषा खन्ना यांचं नाव घेतलं जातं.

बहुतेक क्षेत्रात महिलांनी पुरुषांची सद्दी संपवलीय. तरीही संगीतकार म्हणून महिला फारशा आढळत नाहीत. हिंदी सिनेसृष्टीत अनेक संगीतकारांनी अजरामर गाणी दिल्याचा इतिहास आहे. मात्र यातले बहुतेक सगळे पुरुष संगीतकारच आढळतात. याला उषा खन्ना मात्र अपवाद ठरल्या. त्यांनी नक्कीच संगीतकार म्हणून आपला ठसा उमटवलाय.

ऐंशीव्या वर्षी गौरव

उषा खन्नांच्या या अनन्यसाधारण योगदानाची कदर करताना महाराष्ट्र सरकारने यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार त्यांना जाहीर केलाय. आज उषा खन्नांचं वय आहे ७८. ७ ऑक्टोबर १९४१ हा त्यांचा जन्मदिवस. या वयात अनोखा पुरस्कार मिळतोय हे त्यांचं भाग्य म्हणावं लागेल. आज त्या विस्मृतीत गेल्यात. पण त्यांची आठवण ठेवत मानाचा पुरस्कार देण्याचं सरकारला सुचतंय हीच मोठी गोष्ट आनंदाची आहे.

उषाला खरं तर गायिका व्हायचं होतं. त्या अनेक ठिकाणी गायलाही जायच्या. वडील मनोहर खन्ना हेही त्यांना प्रोत्साहन देत होते. ते स्वतः कवी आणि गायक. ग्वाल्हेरमधे त्यांचा बऱ्यापैकी जम बसलेला होता. त्यांना त्यांच्या कलाकारीचं मानधनही मिळायचं. बऱ्याच कार्यक्रमांना ते सोबत छोट्या उषाला न्यायचे. यातूनच त्यांना गाण्याची आवड उत्पन्न झाली.

पुढे मनोहर खन्ना मुंबईत आले आणि ते जद्दनबाईला भेटले. जद्द्नबाई त्याकाळच्या ख्यातनाम तवायफ म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांनी मनोहरना चांगलं मानधन देऊन गझला लिहून घेतल्या. तिथेच उषा संगीत द्यायची. उषाला तेव्हा कल्पनाही नव्हती की आपण पुढे जाऊन जद्द्नबाईसारखी संगीतकार होऊ. जद्द्नबाईची लेक म्हणजे पुढे प्रसिद्ध पावलेली अभिनेत्री नर्गिस. या मायलेकींनी रोमिओ ज्युलिएट नावाचा सिनेमा काढला. त्याची गाणी मनोहर यांनीच लिहली होती.

हेही वाचाः आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट

तिसरी महिला संगीतकार

उषाला लहान वयातच अनेक वाद्यंसुद्धा हाताळायला मिळाली. आणि त्यांना गाण्याला चाली लावाणं जमत होतं. त्यांची ही कीर्ती संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी तिची मुलाखत सिने निर्माते शशधर मुखर्जी यांच्याशी करून दिली. उषाने त्यांना एक गाणं ऐकवलं. ते त्यांना आवडलं. आणि जेव्हा त्यांना हे समजलं की या गाण्याला चाल उषानेच लावलीय तेव्हा त्यांनी त्यांना ताबडतोब रोज एक दोन तरी गाणी तयार करायची सूचना दिली.

याच काळात शशधर मुखर्जी ‘दिल दे के देखो’ सिनेमाची जुळवाजुळव करत होते. त्यांनी याच्या संगीताची जबाबदारीच उषावर सोपवली आणि उषा खन्ना संगीतकार म्हणून पहिल्यांदा सिनेमा क्षेत्रात चमकल्या. विशेष म्हणजे हा सिनेमा शम्मी कपूर बरोबरच यातल्या गाण्यांमुळेही चांगला चालला. ‘दिल दे के देखो’ हे टायटल साँग कमालीचं लोकप्रिय झालं.

उषा खन्ना अशा तऱ्हेने जद्द्नबाई, सरस्वती यांच्यानंतर अवघी तिसरी महिला संगीतकार म्हणून नावारुपाला आल्या. त्यांनी मग शेकड्याने सिनेमांना संगीत दिलं. त्यांची काही गाणी अप्रतिम गाजली. रसिकांच्या पसंतीला उतरली. ‘हम तुमसे जुदा होके मर जायेंगे रो रो के’ हे ‘एक सपेरा एक लुटेरा’मधलं फिरोझ खानवर चित्रित गाणं मोहम्मद रफीच्या अतिशय लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं.

छोडो कल की बातें

‘हम हिंदुस्थानी’मधे उषाने दिलेलं मुकेशच्या आवाजातलं ‘छोडो कल की बातें कल की बात पुरानी’ हे गाणे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाच्या वेळेस हमखास ऐकायला मिळतं. आशा पारेखचा हा पदार्पणाचा सिनेमा होता. ‘लाल बंगला’मधल्या ‘चांद को क्या मालूम चाहता है उसे कोई चकोर’ या मुकेशच्या आवाजातलं गाण्यालाही त्यांनी संगीत दिलं. ही गाणी आजही रसिक विसरलेले नाहीत.

कवी, लेखक, दिग्दर्शक, निर्माता असा हरहुन्नरी माणूसे सावनकुमार टाक त्यांच्या आयुष्यात आला आणि या दोघांनी नंतर ओळीने आठ सिनेमे केले. त्यातले सर्वच चालले नाहीत. पण संगीतकार म्हणून उषा खन्नांचा जम बसला. ‘हवस’मधील रफीचे ‘तेरी गलीयों मे ना रखेंगे कदम’  गाण्याने कहर केला. हे तसं सॅड साँग. पण त्याला सर्वांनी नावाजलं. हेही गाणे रफींच्या सर्वांग सुंदर गाण्यांपैकी एक मानलं जातं.

मुख्य म्हणजे या गाण्यामुळे रफींची कारकीर्द सावरायला मदत झाली. १९७० पासून किशोर कुमार फॉर्मात होते. आणि रफी मागे पडले होते. तेव्हा १९७४ मधे या गाण्याने पुन्हा एकदा रफींची दखल सर्वांना घ्यावी लागली होती.

हेही वाचाः एकविसाव्या शतकात एकविसावं बाळंतपण मिरवण्याचं काय करायचं?

सावनकुमार-उषा खन्ना जोडी

१९७९ मधे सावनकुमारच्याच दादा सिनेमाला उषा खन्नांनी उत्कृष्ट संगीत दिलं. हटके गायक, गायिका आणण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. यानुसार दक्षिणेतला आघाडीचा गायक येशुदास यांना त्यांनी दादासाठी गायला लावलं आणि येशूदासचं ‘दिल के टुकडे टुकडे करके मुस्कुराके चल दिये’ हे गाणं चक्क फिल्मफेअर पुरस्काराचा धनी झालं.

सावनकुमारचा आणखी एक सुपरहिट सिनेमा होता तो म्हणजे ‘सौतन’. यात सुपरस्टार राजेश खन्ना आणि टीना, पद्मिनी कोल्हापुरे अशा दोन तरुण हिरोईन होत्या. यातलं ‘शायद मेरी शादी का खयाल’ हे गाणं तुफान गाजलं. १९८३ चा हा सिनेमा. तेव्हा लग्नासाठी मुलगी बघायच्या कार्यक्रमात हे गाणं हमखास गुणगुणलं जायचं.

‘जिंदगी प्यार का गीत है’ हे यातलंच गंभीर गाणं किशोर आणि लता यांनी सोलो गायलं. तेही तेवढंच वाखाणलं गेलें, हेही विशेष. ‘साजन बिना सुहागन’ हा आणखी या जोडीचा गाजलेला एक सिनेमा. यातले ‘जिजाजी जिजाजी होनेवाले जिजाजी’ या गाण्यानेही अशीच लोकप्रियता मिळवली होती. हवस, सौतन, साजन बिना सुहागन, बेवफा से वफा, साजन की सहेली, प्रीती, प्यार की जीत, सनम हरजाई, दिल परदेसी हो गया ही या जोडीची सलग अशी हिंदी संगीताला देणगी होती.

नवोदितांना संधी देणाऱ्या संगीतकार

सावनकुमारबरोबर उषाचं लग्नही झाला. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. मात्र त्यांनी आपलं व्यावसायिक नातंसंबंध अतूट ठेवले. उषाने ‘दिल परदेसी हो गया’ हा सिनेमाही जवळपास सहा वर्षाच्या अंतरानंतर केला. यातलं एक देशभक्तीवर गाणं तब्बल नऊ मिनिटांचं होतं. त्यांच्या अपेक्षेनुसार ते तेवढे लोकप्रिय झालं नाही. यानंतर त्यांनी सिनेमा संगीत थांबवलं. काही टीवी सिरिअल केल्या. त्यातली सर्वात हिट ठरली ती चंद्रकांता सिरिअल. पण अलिकडे त्यांचं काम फारसं दिसत नाही.

उषा खन्ना यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एक संगीतकार म्हणून त्यांना स्वतःला खूप संघर्ष करावा लागला. असा संघर्ष नवोदितांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी नेहमीच नवोदितांना संधी दिली. आशा भोसले, रफी, मुकेश, किशोर हे त्यांचे आवडते गायक गायिका. पण त्यांनी तेवढ्याच उत्साहाने अनुपमा देशपांडे, शब्बीर, हेमलता, सोनू निगम, रूपसिंग राठोड या नव्यांनाही प्रोत्साहन दिलं. त्यांच्या अपूर्व योगदानाची कदर उशिराने का होईना केली जातेय याचं स्वागतच आहे. उषा खन्नांचं खूप खूप अभिनंदन!

हेही वाचाः 

डायना राजमुकुटाची गरज नसलेली राजकन्या

आपण आपले म्युच्युअल फंड्स कधी विकले पाहिजेत?

पेरियार: बहुजनांना जातीच्या जोखडातून सोडवणारा विचार

भारतातली विविधता बाजूला सारून देश एक कसा होणार?