आयएएस अधिकारी सरकारी यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी असतात. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी त्या यंत्रणेरच्या नियंत्रणासाठी संघर्ष करतात. काही अधिकारी ती यंत्रणा राजकारण्यांच्या पायावर वाहतात. काही अधिकारी ही यंत्रमा लोकांचं भलं करण्यासाठी वापरतात. पण त्यातलं कुणी सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे स्वतः दाखल होत नाही किंवा बायकोची बाळंतपणं त्यात करत नाही. मात्र त्याला नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर अपवाद ठरले आहेत.
कोरोनाच्या काळात सरकारी हॉस्पिटल किती महत्त्वाची असतात, हे पुन्हा एकदा लक्षात आलं. तरीही सरकारी हॉस्पिटलऐवजी खासगी हॉस्पिटलमधेच दाखल होण्यासाठी सगळ्यांची धावपळ होती. तिथे नांदेडमध्येही हेच दिसलं. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनाची लागण झाल्यावर त्यांनी थेट मुंबई गाठली. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही आपल्या मुलासह औरंगाबाद गाठलं. पण जिल्ह्याचे कलेक्टर असणारे विपिन इटनकर यांनी आपला कोरोनाचा उपचार जिल्हा रुग्णायलातच केला. इतकंच नाही तर पत्नीची प्रसूतीही सरकारी हॉस्पिटलमध्येच केली.
असे फार कमी आयएएस अधिकारी आहेत. जुलै २०१९ मधे ओडिशा राज्यातल्या मलकानगिरी या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त जिल्ह्याचे कलेक्टर मनीष अग्रवाल यांनीही आपल्या पत्नीचं बाळंतपण जिल्हा रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला. त्यांना मुलगा झाल्यानंतर ही राष्ट्रीय बातमी झाली होती. ओडिशा सरकारनेही त्यांचं याबद्दल कौतूक केलं होतं.
त्यापूर्वी कर्नाटकातल्या बेल्लारी जिल्ह्याचे कलेक्टर एस.एस. नकुल यांनीही बायकोच्या बाळंतपणासाठी सरकारी हॉस्पिटलचीच निवड केली होती. उत्तराखंडच्या उत्तरकाशी सबडिविजनल मॅजिस्ट्रेट अनुराय आर्य यांनीही बायकोचं बाळंतपण सरकारी हॉस्पिटलमधे करून उदाहरण घालून दिलं होतं. तेलंगणामधल्या मुलुगू जिल्ह्याचे कलेक्टर अकुनुरी मुरली यांनीही मुलीचं बाळंतपण सरकारी हॉस्पिटलमधेच केलं होतं.
या सगळ्यात लक्षवेधी ठरल्या होत्या त्या आयएएस अधिकारी किरण पासी. झारखंडमधे याच वर्षी मार्च महिन्यात गोड्डा जिल्ह्याच्या डेप्युटी कमिशनर म्हणजे आपल्याकडच्या जिल्हाधिकारी किरण पासी यांनी सरकारी हॉस्पिटलमधे बाळाला जन्म दिला. स्वतःचं बाळंतपण सरकारी हॉस्पिटलमधे करणाऱ्या त्या नव्या जमान्यातल्या पहिल्या महिला आयएएस ऑफिसर ठरल्या.
या प्रत्येक वेळेस राष्ट्रीय स्तरावर बातम्या झाल्या. अधिकाऱ्यांचं कौतुक केलं गेलं. प्रत्येक वेळेस महाराष्ट्रात असं कधी होणार, असा प्रश्न विचारला गेला. पण आता महाराष्ट्रात असं घडलं तेव्हा मात्र कोरोनाच्या धबडग्यात कुणाचं फारसं लक्ष गेलं नाही. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवरचा विश्वास वाढवण्याची सर्वाधिक आवश्यकता असताना नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी सगळ्यांसमोर एक आदर्श घालून दिलाय.
हेही वाचा : सुनील ईरावारांच्या आत्महत्येनंतर तरी नेत्यांनी शहाणपण शिकावं!
विपीन इटनकर हे चंद्रपूर जिल्ह्याचे. नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केलं. त्यानंतर चंदीगड इथल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी करत यूपीएससी क्रॅक केलं. ते २०१४मधे आयएएस झाले. त्यावर्षी ते देशात चौदावे आणि राज्यात पहिले आले. नांदेडमधे यावर्षी फेब्रुवारीत जिल्हाधिकारी पदाची सूत्रं स्वीकारण्याआधी ते लातूर इथं जिल्हापरिषदेचे सीईओ होते. नांदेडला ते आले तेव्हा त्यांच्या पत्नी डॉक्टर शालिनी गरोदर होत्या. १६ ऑगस्टला त्यांची डिलिवरी नांदेड जिल्हा स्त्री रूग्णालयात झाली.
उच्च दर्जाच्या सुखसोयी असलेल्या खासगी हॉस्पिटल ऐवजी सरकारी हॉस्पिटलची निवड का केली, यावर डॉ. इटणकर सांगतात, 'आमच्या पहिल्या मुलाचा जन्मही आम्ही हरयाणात असताना सरकारी हॉस्पिटलमधे झाला होता. मी स्वतः सरकारी वैद्यकीय कॉलेजमधून शिक्षण घेतलं. माझी पत्नीही डॉक्टर आहे. नांदेड स्त्री हॉस्पिटलमधे सर्व सुविधा आहेत. कलेक्टर म्हणूनही मी वेळोवेळी या हॉस्पिटलची पाहणी केली. खासगी हॉस्पिटलमधे असतात तसे खोलीत टीवी नाहीतबस्स. गेले काही महिने माझ्या पत्नीच्या तपासण्याही इथंच होत होत्या आणि म्हणून आम्ही इथंच डिलिवरी करण्याचा निर्णय घेतला. मी स्वतः डॉक्टर म्हणूनही या डिलिवरीच्या वेळेस उपस्थित होतो.`
नांदेड स्त्री रूग्णालय आणि नवजात अर्भक केंद्राचे अधीक्षक डॉ. भारत संगेवार यांनी आनंद करताना म्हटलं, 'सकाळी ८.३० च्या दरम्यानन जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पत्नी आल्या. आम्ही लगेच उपचार सुरू केले. त्यांची प्रसूती नॉर्मल झाली. जिल्हाधिकारीसारख्या उच्च पदावर असलेल्या व्यक्तीने आमच्या शासकीय रूग्णालयाची निवड केली हा आमचा सन्मान आहे. ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. त्यांनी समाजाला संदेश दिलाय की जिल्हाधिकारी सरकारी रूग्णालयात येतात तर तुम्ही का येत नाही.'
हे कोरोना स्पेशलही वाचा :
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
बाळासाठी सुरक्षित असेल का कोरोनाग्रस्त आईचं दुध?
कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय
कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?
डॉ. इटनकर आयुष्यात पहिल्यांदाच कलेक्टर झाले आणि अवघ्या एका महिन्यात कोरोनाचं संकट आलं. तेलंगणाच्या ८ जिल्ह्यांमधून कोरोना कधीही येऊ शकत होता. नांदेडमधे असलेला हुजूर सचखंड गुरूद्वारामुळे या जिल्ह्यात देशभरातून हजारो लोक येत असतात. कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यानंतर देश, विदेशातून, मुंबई-पुण्यातून, औरंगाबाद आणि जवळच्या तेलंगणातून किमान १० लाख लोक नांदेड जिल्ह्यात परत आल्याचा अंदाज होता. या आव्हानांना समर्थपणे झेलत इटणकर यांच्या नेतृत्वात २६ एप्रिलपर्यंत जिल्हा कोरोनामुक्त होता.
तेव्हा नांदेड पॅटर्न गाजत होता. सलून बंद असल्यामुळे आपल्या मुलाचे केस कापणारे इटणकर सोशल मीडियावर वायरल झाले होते. शिवाय फेसबूक लाईव करत नांदेड जिल्ह्याचे अपडेट देण्याच्या त्यांचा उपक्रमही कौतुकास्पद ठरला. मात्र गुरुद्वारा सचखंड साहेबमधे लॉकडाऊनमुळे अडकलेल्या साडेचार हजार भाविकांना पंजाबमधे पाठवण्याच्या निर्णयावरून आरोप प्रत्यारोप झाले.
कोरोनाकाळातल्या अनुभवावर डॉ. इटनकर सांगतात, 'डॉक्टर असण्याचा फायदा झाला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पुढील टप्प्यात आणखी काय तयारी करावी लागेल, याचा मला आधीच अंदाज येत होता. त्यानुसार मी तयारी केली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेडची संख्या वाढवली. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष केंद्र उभारलं. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात टेस्टसाठी यंत्रणा उभारण्यात आली.'
हेही वाचा : भिऊ नका, मीच तुमच्या पाठीशी आहे!
केवळ पत्नीची प्रसूती सरकारी रुग्णालयात करून डॉ. इटनकर थांबले नाहीत तर त्यांनी अलीकडेच त्या पुढचं पाऊलही टाकलं. त्यांना ३० ऑगस्ट रोजी कोरोनाची लक्षणं आढळून आली. म्हणून त्यांनी लगेच स्वतःची तपासणी करून घेतली. हा अहवाल पॉझिटिव आल्याने ते आता नांदेड जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात दाखल झाले. यापूर्वी त्यांचे स्वीय सहायक आणि त्यांच्या कार्यालयातील अन्य कर्मचारीही कोरोना पॉझिटिव आल्याने त्यांच्यातील काहींना याच हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आले आहे.
आज राज्यातल्या सरकारी हॉस्पिटलकडे श्रीमंत आणि मध्यमवर्ग यांनी जवळजवळ पाठच फिरवली आहे. सरकारी यंत्रणाही या हॉस्पिटलमधे सुधारणा करण्याबाबत उदासीन आहेत. पण तेव्हाच कोरोनाच्या काळात सरकारी हॉस्पिटल ही किती महत्वाची असतात हे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लक्षात आलं आहे. राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर जो विश्वास इटनकर यांनी दाखवला तोच प्रशासन, राजकारण, उद्योग जगत यांनी दाखवला तर सरकारी हॉस्पिटल उत्तम सुखसुविधांनी सज्ज होतील. कोरोनाच्या काळात आपण हा धडा डॉ. विपीन इटनकरांकडून घ्यायला हरकत नाही.
भिऊ नका, मीच तुमच्या पाठीशी आहे!
देश का नेता कैसा हो, गणपती बाप्पा जैसा हो!
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
सर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं!
विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?
१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय