छत्तीसगडमधे पुन्हा नक्षलवादी हल्ला होऊ शकतो

०३ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


२२ मार्च म्हणजे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर जनता कर्फ्यूचं आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं. या थाळीनादात छत्तीसगडमधे २१ मार्चला नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या किंकाळ्या कुणालाच ऐकू आल्या नाहीत. छत्तीसगडमधे नक्षलवाद उरलाच नाहीय या समजाला छेद देणारी ही घटना होती, असं मत पत्रकार पवन डाहाट यांनी व्यक्त केलंय.

गेले कित्येक दिवस भारत कोरोनाशी दोन हात करतोय. पण या लढाईच्या सुरवातीलाच आणखी एक लढाई आपल्यासमोर येऊन उभीय. २१ मार्च २०२० ला छत्तीसगडमधे नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. त्यात आपले १७ जवान शहीद झाले.

छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान मोठ्या संख्येनं तैनात आहेत. असं असलं तरी हा भाग अजुनही नक्षलवाद्यांचं आश्रयस्थान असल्याचं स्पष्ट झाल्याचं या भागातल्या घडामोडींसंबंधी वार्तांकन करणारे पत्रकार पवन दहत यांचं म्हणणं आहे. हन्फिंग्टन पोस्ट वेबसाईटवर त्यांचा एक लेख प्रसिद्ध झालाय. त्यात डाहाट यांनी नक्षलवादी हल्ल्याच्या वेगवेगळ्या बाजूंवर प्रकाश टाकलाय. इथे आपण त्यांच्या लेखातल्या या पाच महत्त्वाच्या गोष्टी बघूत.

हेही वाचा : दिल्लीच्या तबलिगी प्रकरणात नेमकं खरं काय आणि खोटं काय?

१) घटना कशी घडली?

छत्तीसगड जिल्हा पोलिस राखीव दल, स्पेशल टास्क फोर्स, सीआरपीएफ आणि कोब्रा टीमच्या ६०० जवानांनी बुर्कापाल, चिंतागुफा जवळच्या जंगली भागात नक्षलवाद्यांविरोधात एक ऑपरेशन सुरू केलंय. शुक्रवारी म्हणजे २० मार्चला गुप्तचर यंत्रणेकडून एल्मागोंडा, मिनापा, रेंगपारा जवळच्या जंगलात २५० नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली. त्याची खातरजमा झाल्यानंतर शनिवारी २१ मार्चला हे ६०० जवान वेगवेगळ्या गटांत विभागले गेले आणि नक्षलवाद्यांच्या शोधात मोहिमेवर निघाले. त्यातील काही गटांची नक्षलवाद्यांशी चकमक उडाली.

या मोहिमेनंतर ते जवान त्यांच्या कँपकडे परतत होते. त्यावेळी डीआरजी ३८ आणि स्पेशल टास्क फोर्सच्या एका गटाला नक्षलवाद्यांनी रेंगपारा गावाजवळ वी आकारात घेरलं. पहिल्या चकमकीत सुरक्षा दलातल्या पाच जवानांचा मृत्यू झाला. सुरक्षा दलांनीही नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्यूत्तर दिलं. गंधाम रमेश हा जवान मोठ्या धैर्यानं लढला. त्यात त्याचा मृत्यू झाला. सुरक्षा दलांनी हा हल्ला जवळपास परतवून लावला होता. पण दुर्दैवाने त्यांच्याकडील दारूगोळा संपला, असं एका जवानानं सांगितलं.

सुरक्षा दलातल्या जवानांची संख्या थोडी जास्त असती आणि पुरेसा दारूगोळा उपलब्ध असता तर एवढी नामुष्की ओढावली नसती. किमान आम्ही आमच्या सहकाऱ्यांचे मृतदेह परत घेवून आलो असतो, असं मत एका जवानाने व्यक्त केलंय. यातून वाचलेल्या जवानांना स्थानिकांपासून हल्ल्याची भीती वाटल्यानं त्यांना आपल्याकडील शस्त्रं आणि गणवेश फेकून देवून परत यावं लागलं. कारण त्यांच्याक़डे दुसरा पर्याय नव्हता.

हेही वाचा : नक्षलवाद संपवण्यासाठी आंध्रने केलं, ते महाराष्ट्राला जमलं नाही

२) नेमकं काय चुकलं?

हल्ला झाला त्यादिवशी संध्याकाळपर्यंत १५ जवान कँपवर परत आले. तर काहीजण रात्री उशिरा कँपवर पोचले. त्यानंतर १७ जवान बेपत्ता होते त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. त्याच रात्री पोलीस महासंचालक डी.एम.अवस्थी हे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना भेटले. पण त्यांनी मुख्यमंत्र्याना या हल्ल्यासंदर्भात माहिती दिली नाही.

दुसऱ्या दिवशी रविवारी ५०० जवानांच्या सहाय्याने शोध मोहीम राबवून १७ जवानांचे मृतदेह कँपवर परत आणण्यात आले. हे घटनास्थळ चिंतागुफाच्या सीआरपीएफच्या कँपपासून केवळ तीन ते चार किलोमीटर आहे. म्हणजे मृतदेह परत आणणं एवढं अवघड नसतानाही त्यासाठी एक दिवस वाट का बघितली हे कोडं आहे.

एप्रिल २०१८ सालच्या बुर्कापालच्या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान मृत्यूमूखी पडले होते. त्यानंतर एकही हल्ल्याची घटना घडली नाही. हा सारा परिसर नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इथे गेल्या तीन महिन्यांत कोणत्याही प्रतिकाराशिवाय सुरक्षा दलांची हालचाल वाढली होती. त्यामुळं सुरक्षा दलाचा आत्मविश्वास काही प्रमाणात वाढला. त्यातून हा प्रदेश नक्षलवादापासून मुक्त होतोय, असा समज सुरक्षा दलांचा झाला असेल.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

एखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं?

 

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

पंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे

लॉकडाऊनः कोकणात हापूस घरातच पडून, युरोपात फळं खायला मिळेनात

 

३) सुरक्षा रक्षकांचा माग काढणं सोपं होतं

नक्षलवाद्यांच्या ‘टॅक्टिकल काउंटर ऑफेंसीव कँपेन’ या रणनीतीनुसार, दरवर्षी जानेवारी ते मे या महिन्यांदरम्यान नक्षलवादी हे सुरक्षा दलांवर मोठा हल्ला घडवून आणतात. पण २०१९ मधे असा एकही हल्ला झाला नाही. गेल्या दोन महिन्यात या भागात सुरक्षा दलांचं ऑपरेशन सुरू होतं.

स्थानिक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, सुरक्षा दलं ही दोर्णापाल-जगरगुंडा रस्त्याने जंगलात जात. त्याच वाटेनं परत यावं लागू नये म्हणून एराबोऱा किंवा कोंता परिसराच्या बाजूला सरकत. रेंगपारामधे डोंगराचा एकच असा भाग आहे जिथून सुरक्षा दलं एकाच वाटेनं जंगलाच्या आत-बाहेर करतात. त्यामूळं नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांचा माग काढणं सोपं झालं.

गेल्या काही काळात या भागात सामान्य परिस्थिती निर्माण झाल्याचा भास करण्यात नक्षलवादी यशस्वी झाले. त्यातच कमांडिंग अधिकाऱ्यांचं रोटेशन सातत्याने होत होतं. नेहमी नवीन अधिकारी टीमचं नेतृत्व करायचा. अनेकांना तर या भागाची नीटशी ओळखदेखील नव्हती. या सगळ्याचा फायदा नक्षलवाद्यांनी घेतला.

हेही वाचा : लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी

४) धोरणांमधे संदिग्धता आहे

पवन डाहाट यांच्या मते, भुपेश बघेल यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा हातात घेतल्यापासून शासन स्तरावर नक्षलवादाशी कसं लढायचं याबाबत संदिग्धता आहे. त्यांचा एक मंत्री म्हणतोय ही घटना म्हणजे ‘सुरक्षा दलाची चूक’ आहे. तर मुख्यमंत्री म्हणतात नक्षलवादाविरोधातली ही लढाई चालूच राहणार. भाजपच्या काळात असणारा केंद्र आणि स्थानिक अधिकाऱ्यांमधला समन्वय आत्ता कमी झालाय. पण भाजपच्या काळात मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाले होते, हे विसरून चालणार नाही.

मुख्यमंत्री कार्यालयातून या भागात अनेक बदल्या झाल्यात. जगदलपूरच्या एका पोलीस अधिकाऱ्याचं उदाहरण आपल्यासमोर आहे. सरकारला नक्षलवादाचा समूळ नायनाट करायची इच्छा नाही, हेच यातून स्पष्ट होतं. सुरक्षा दलांना ताकद देण्याची गरज आहे. त्यांना गोंधळात टाकू नये.

हेही वाचा : अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

५) नव्या संघर्षाची नांदी

सुरक्षा दलांवरच्या या हल्ल्यानंतर बस्तरमधील हा संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. यापूर्वी या भागात कामाचा अनुभव असणाऱ्या जितेंद्र शुक्ला आणि के. एल. ध्रृव या दोन आयपीएस अधिकाऱ्यांची इथं तातडीनं बदली करण्यात आलीय. बऱ्याच काळानंतर सुरक्षा दलांवर झालेल्या या हल्ल्यानंतर रेंगपारा, मिनापा, एल्मागुडाच्या गावकऱ्यांना सुरक्षा दलाच्या रोषाचा सामना करावा लागेल.

या हल्ल्यातले नक्षलवादी स्थानिक नसल्याचं स्पष्ट झालयं. त्याचं नेतृत्व हिडमा म्हणजे नक्षलवाद्यांच्या बटालियन प्रमुखानं केलं असलं तरी ते ओरिया, बंगाली, तेलगू आणि मराठी अशा विविध भाषांमधे बोलत होते.

या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी वापरलेली शस्त्रं ही अत्याधुनिक असल्याचं दिसतं. याआधी त्यांच्याकडं शस्त्रसाठ्याचा तुटवडा होता. पण या हल्ल्यावरून त्यांनी तो मिळवला असल्याचं सिद्ध झालंय.

हेही वाचा : 

सोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग!

डॉन रवी पुजारी अंडरवर्ल्डचं विजिटिंग कार्ड?

प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक 

कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

दिल्लीच्या दंगलीत एका पत्रकाराने कसा वाचवला स्वतःचा जीव?

(लेखक हे हन्फिंगटन पोस्ट इंडियात पत्रकार आहे. त्यांच्या हफपोस्टवर आलेल्या त्यांच्या लेखाचा अभिजीत जाधव यांनी अनुवाद केलाय.)