नेहरू विचारांचा मागोवा घेतात राज कपूरचे सिनेमे : भाग १

२७ मे २०२१

वाचन वेळ : १२ मिनिटं


आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती.

खरं तर मला या लेखाचं शीर्षक ‘नेहरूंचा नायक - राज कपूर’ असं द्यायचं होतं. पण ती बौद्धिक चोरी ठरली असती. कारण प्रख्यात स्तंभलेखक आणि हिंदी सिनेमाचे अभ्यासक लॉर्ड मेघनाथ देसाई यांनी अलीकडेच ‘नेहरूंचा नायक - दिलीपकुमार’ नावाचं पुस्तक लिहिलंय. त्याच्या मराठी अनुवादाचं प्रकाशन माझ्या हस्ते मागच्या वर्षी पुण्यात झालं होतं.

त्यावेळी मी म्हणालो होतो, ‘पुस्तक उत्तम आहे. दिलीपकुमारच्या सिनेमा आणि अभिनयाचा मेघनाद देसाईनी अभ्यासपूर्ण आढावा घेतलाय. पण कोणत्याही अर्थाने दिलीपकुमारला नेहरूंचा नायक म्हणता येणार नाही. तो मान माझ्या मते, राज कपूरला दिला पाहिजे. कारण नेहरूंचा समाजवाद आणि सेक्युलॅरिझमबद्दलच्या विचारांचं ठळक प्रतिबिंब राज कपूर दिग्दर्शित सिनेमात ठळकपणे पडलेलं जाणवतं!’

नेहरूंचा सहअस्तित्वाचा विचार

पंडित नेहरू हे सोवियत क्रांतीने प्रभावित झाले होते. ते जरी साम्यवादी विचारांचे कम्युनिस्ट नव्हते, तरी त्यांचे वैचारिक सहप्रवासी होते. लोकशाही समाजवाद हे त्यांचं जीवित ध्येय होतं. विषमता नष्ट करणारा मार्क्सचा विचार नेहरूंना लोकशाही पद्धतीनं भारतात आणायचा होता.

प्रेम, सद्भावना, करुणा आणि मानवता या शाश्‍वत मूल्यांवर आधारित लोकशाही भारत त्यांना घडवायचा होता. विषमता कमी करत देशाला औद्योगिक युगात न्यायचं होतं. आणि त्यासाठी विज्ञाननिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना समाज मनात रुजवायचा होता.

भारताच्या फाळणीनं जो रक्तपात आणि हिंसा झाली, त्यावर फुंकर घालत मुस्लिमांना दिलासा आणि सुरक्षा द्यायची होती, त्यासाठी त्यांनी आपल्या सहिष्णू परंपरेचा आणि बहुधार्मिकता, शांततामय सहअस्तित्वाच्या उज्ज्वल अशा गंगा-जमनी तहजिबचा पुरस्कार केला होता.

अस्वस्थता होती सोबत लोकांचं प्रेमही

त्यांच्या विचारांचं प्रतिबिंब १९४० च्या दशकाची शेवटची काही वर्ष ते १९६० च्या दशकापर्यंतच्या काळातल्या हिंदी सिनेमात पडत होतं. हा काळ जसा नवनिर्माणाचा आणि आशावादाचा होता, तसाच तो बेकारी, भ्रमनिराशेचा होणं सुरू झाला होता. गरिबी, पुरेशा अन्नाशिवाय होणारी उपासमार, बेकारी आणि भांडवलशाहीचा क्रूर अमानवी आणि शोषण करणारा चेहरा लोकांपुढे येत होता.

गरीब-श्रीमंतीचा वर्णभेद प्रखरपणे जाणवत होता. त्यासाठी नेहरूंनी मिश्र अर्थव्यवस्था, मोठे उद्योगधंदे, धरणे, आयआयटी, आयआयएम सारख्या शैक्षणिक संस्था आणि भाभा अणुविज्ञान केंद्रासारख्या वैज्ञानिक संस्था उभारणीला प्राधान्य दिलं होतं.

सर्वार्थानं ब्रिटिशांनी दीडशे वर्ष लुटलेल्या भारताची स्वातंत्र्योत्तर काळात वाईट अवस्था होती. त्यातून सावरायला आणि विकासाची झेप घ्यायला वेळ लागत होता. पण लोकांना झटपट विकास हवा होता, तो पुरेशा गतीनं होत नव्हता. त्यामुळे १९५० या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९६० च्या दशकात समाजात अस्वस्थता होती, असंतोष होता. तरीही भारतीय जनतेचं नेहरूंवर अलोट प्रेम आणि विश्‍वास होता.

हेही वाचा :  जवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बहीणभाऊ

राज कपूर नेहरूंचा नायक

साधारणपणे राज कपूरच्या सिने कारकिर्दीच्या प्रभावी पूर्वाधाचा हाच काळ होता. त्यांनी सिनेमे तयार आणि दिग्दर्शित केले. आपल्या बॅनर बाहेर काही महत्त्वाच्या सिनेमात अभिनय केला होता, त्यावर नेहरूंच्या विचारांचा ठळकपणे प्रभाव पडलेला होता. म्हणून त्याला मी खऱ्या अर्थाने नेहरूंचा नायक मानतो.

मोठ्या प्रमाणात नेहरू कालखंडाचं म्हणजेच १९४७ ते १९६४ चं प्रतिबिंब आणि भारताची वाटचाल हिंदी व्यावसायिक सिनेमात बऱ्याचदा लक्षात घेऊनही राज कपूरच्या सिनेमात पाहायला मिळते. त्यामुळे त्यानं दिग्दर्शित आणि तयार केलेल्या सिनेमांनी सामाजिक भान मोठ्या प्रमाणात जपलं होतं, असं मला वाटतं.

वडील नेहरूंचे निकटवर्ती 

राज कपूर रूढार्थानं मॅट्रिकही न झालेला आणि वैचारिक अभ्यास फारसा नसलेला कलावंत आहे, हे सर्वश्रुत आहे. तरीही नेहरूप्रणित समाजवाद आणि सेक्युलॅरिझम हे विचार त्यानं उपजत बुद्धीमत्तेच्या आधारे, पण प्रामुख्याने भावनांनी आत्मसात केले होते. त्याला प्रामुख्याने त्याचे वडील पृथ्वीराज कपूर यांचा प्रभाव कारणीभूत होता.

पृथ्वीराज हे जनप्रबोधनासाठी नाट्य-गीत-संगीतादी सादरीकरणांच्या कलांचा वापर करावा, या विचारांनी आणि प्रगतीशील लेखक चळवळीच्या तत्त्वज्ञानाचं प्रभावी हत्यार म्हणून स्थापन झालेल्या इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन - जन नाट्य मंच इप्टाचे सक्रीय सदस्य आणि काही काळ अध्यक्ष होते. पुढे त्यांनी ‘पृथ्वी थिएटर्स’ स्थापन करून देशभर समाजप्रबोधन करणाऱ्या नाटकांचे, ‘दिवार’, ‘पठाण’ यांचे प्रयोग करत लोकांना धार्मिक सौहार्द आणि वर्गविग्रहाचा संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 

बालपणापासून राज कपूर प्रथम इप्टा मग पृथ्वी थिएटर्सच्या वातावरणात वाढला होता, ते संस्कार त्याच्या मनात, भावनेत विचारात सहजपणे रुजले होते. पुन्हा पृथ्वीराज कपूर हे कट्टर काँग्रेसमन होते. जवाहरलाल नेहरूंचे निकटवर्ती साथी होते. त्यांच्या समाजवाद आणि सेक्युलेरिझमचे समर्थक होते! त्यामुळे साहजिकच राज कपूरच्या भावना आणि बुद्धीचं भरण-पोषण या विचारांनी झालं नसतं तर नवल म्हणलं पाहिजे.

हेही वाचा : महिला दिन विशेष : आईंना हमे देखके हैरान सा क्यूँ हैं?

नेहरू काळाचं प्रतिबिंब सिनेमात

राज कपूरच्या नेहरूविषयक विचारांचं पहिलं प्रभावी दर्शन घडलं ते १९५१ ला प्रदर्शित झालेल्या ‘आवारा’ या सिनेमानं त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती.

हा सिनेमा आज सत्तर वर्षानंतरही आजच्या तरुण प्रेक्षकांनाही ताजा आणि आपला वाटू शकतो. कारण आज जागतिकीकरणाच्या तिशीनंतर भारताचं चित्र काय आहे? विषमता अधिक तीव्र झालीय. अवघ्या २ ते ५ टक्के उद्योगपतींकडे देशाची ८० टक्क्यांहून अधिक संपत्ती केंद्रीत झालीय.

अन्नसुरक्षा कायद्याने देशाच्या जवळपास ७५ टक्के लोकांना स्वस्त धान्य देण्याच्या परिघात आणलं आहे. कोरोनाच्या काळात ‘गरीब कल्याण योजने’चा प्रमुख कार्यक्रम सहा महिने ८० कोटी नागरिकांना पाच किलो धान्य मोफत देणं हा होता. त्यामुळे गरिबी आणि विषमता किती विदारकपणे वाढलीय, याचं हे ठळक द्योतक आहे.

मार्क्सचा वर्गसंघर्ष रंजक पद्धतीने

स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकात ब्रिटिशांनी लूट करून कंगाल केलेल्या भारताचं हे चित्र वास्तविक असणं समजून घेता येतं, पण आजही ते तसंच नाही, अधिक विदारक व्हावं, हे कसं समर्थनीय मानायचं? त्यामुळे गरिबी-श्रीमंतीमधीली दरी आणि विषमता दाखवणाऱ्या आणि सहजतेनं मार्क्सचा वर्गविग्रहाचा सिद्धान्त कथानकाद्वारे रंजक पद्धतीनं दाखवणारा ‘आवारा’ आजही प्रासंगिक वाटतो.

हे त्या सिनेमाचं आणि राज कपूरच्या प्रतिभेचं यश तर भारत म्हणून आपल्या सर्वांचं अपयश म्हणलं पाहिजे.
‘आवारा’ सिनेमात पहिल्यांदा राज कपूरनं आवारा - भटक्या आणि विद्रोही तरुणाची भूमिका साकार केली होती. त्यासाठी त्यानं चार्ली चॅप्लीननं अजरामर केलेल्या ‘ट्रॅम्प’ - बेघर, भटक्या प्रतिभेला आणि मॅनेरिझम हावभावाला देशी भारतीय रूपडं देत आपल्या देहबोलीनं आपली वेगळी ओळख आयडेंटिटी रुपेरी पडद्यावर साकारली व ती लोकांना आपलीशी वाटली.

त्यांना राज कपूरचा ‘आवारा’- ट्रॅम्प हा ‘कॉमन मॅन’ची सुख-दु:ख प्रकट करणारा आणि जीवन संघर्ष करतानाही उमेद आणि माणुसकी न हरवणारा, आपलं प्रतिरूप असणारा सामान्य भारतीय माणूस वाटला, म्हणून मनस्वी भावला. त्यामुळे त्याला देवदुर्लभ अशी लोकप्रियता मिळाली.

हेही वाचा : वाचा धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण

आवारातला कॉमन मॅन

राजेश खन्नाला हिंदी सिनेमाला पहिला सुपरस्टार मानलं जातं. कारण लोक त्याच्यासाठी वेडे व्हायचे. हे भाग्य त्या आधी राज कपूरला लाभलं होतं. अर्थात, त्या वेळी सिनेमागृहांची संख्या कमी होती आणि सोशल मीडिया बाल्यावस्थेत होता. तरीही राज कपूरची प्रचंड लोकप्रियता आणि त्याच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस यश हे प्रचंड आणि खणखणीत होतं. 

त्याची लोकप्रियता आणि क्रेझ भारताबाहेरही विशेषत्वानं सोवियत युनियन, मिडल इस्ट आणि चीन, तुर्कस्थानातही मोठी होती! तो जगाच्या किमान अर्ध्या हिश्शात पोचलेला पहिला भारतीय स्टार-नायक होता. पण त्याचं कारण, आजच्या नायकांप्रमाणे ‘लार्जर दॅन लाईफ’ नाही तर ‘कॉमन मॅन’ ही प्रतिमा कारणीभूत होती, हे विशेष.

अशी भणंग, आवारा, भटकी प्रतिमा जपत सामान्य माणसांच्या भावनांना स्पर्श करणारा आणि त्यांच्या दु:खावर हळूवार फुंकर घालत त्यांची जगण्याची उमेद आणि आशा कायम ठेवणारा तो एकमेव हिंदी सिनेमातला नायक आहे.

चार्ली चॅप्लीनचा देशी ‘ट्रॅम्प’

‘आवारा’ पूर्वी राज कपूरनं ‘बरसात’, ‘आग’ आणि ‘अंदाज’मधे आपल्या सहजसुंदर नैसर्गिक अभिनयाचं जे रूप दाखवलं होतं, त्याला सिनेरसिकांनी पसंतीची दाद दिली होती. त्या मार्गाने पुढे जात तो प्रेमपटांची लोकप्रिय नायक झाला असता. मग त्याला आपली अभिनय शैली आणि देहबोली - मॅनेरिझम ‘आवारा’च्या वेळी का बदलावी वाटली? त्यासाठी त्यानं चार्ली चॅप्लीननं अजरामर केलेल्या ‘ट्रॅम्प’ला देशी ‘आवारा’ रूप का द्यावंसं वाटलं?

त्याचे विचार रितू नंदा - त्याच्या कन्येनं ‘राज कपूर वन अँड ओन्ली शोमन’ या पुस्तकात दिलेत, त्याचा सारांश असा आहे. ‘मी अगदी बालवयापासून चार्ली चॅप्लीनचा निस्सीम चाहता-फॅन होतो. मी त्याचे ‘सिटी लाईट्स’, ‘द गोल्ड रश’ आणि ‘लाइम लाईट’ हे सिनेमे अनेकदा पाहिले होते. त्याचा ‘लिटिल मॅन’- खोट्या माणसानं मला प्रेरित केलं होतं. मी जेव्हा माझ्या चित्रपय करियरला सुरवात केली, तेव्हा मला माझ्या भोवताली सर्वांत ‘छोटी माणसं - लिटिल मेन्स’ दिसत होती.'

'समाजाच्या निम्न स्तराची; त्यांचा काही अपराध नसताना मार खात होती. पिडली जात होती. मला चार्ली चॅप्लीनच्या सिनेमातलं काय आवडलं असेल तर चार्ली - ट्रॅम्प. सीधासाधा माणूस साकारणारा चार्ली. त्याचा ट्रॅम्पचा गेटअपपेक्षाही मला महत्त्वाचा वाटला तो त्यानं साकारलेला ‘सामान्य छोट्या’ माणसाचा साधेपणा आणि त्याच्या मानवी संवेदना! गरिबीत राहूनही आनंदात कसं जगावं, हे त्याच्या या फिल्मी रूपामागचा त्याचा विचार मी जाणून घेतला. माझ्या मते, त्याचा ‘ट्रॅम्फ’ ही एक जगातली सर्वोत्तम रीत्या पडद्यावर साकार झालेली व्यक्तिरेखा आहे. त्यानं मी प्रभावित झालो होतो.'

हेही वाचा : बुद्ध विचारात सर्वसामान्यांना आपलंसं वाटणारं लोकशाहीवादी तत्त्वज्ञान

वास्तववादी शैलीचा पहिला सिनेमा

‘आवारा’ सिनेमातली मागच्या पाच-सहा वर्षांत लोकप्रिय झालेली प्रतिमा पुसून टाकत राज कपूरनं एकदम नवा चार्ली चॅप्लीन पद्धतीचा पण भारतीय वाटणारा नायक साकार केला. त्यामागे त्याचा बुद्धिमान आणि समाजाशी जोडला गेलेला अभिनेता आणि दिग्दर्शक होता.

या सिनेमाची कथा प्रगतीशील लेखक चळवळीचे बिनीचे शिलेदार, लेखक, पत्रकार आणि ‘धरती के लाल’ या नव-वास्तववादी शैलीचा पहिला सिनेमा म्हणावा, अशा सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या ख्वाजा अहमद अब्बास यांची होती. आणि चित्रपटाचं सार तीन कडव्यात सांगणारं ‘आवारा हूं’ या हिंदी सिनेमात संगीतातल्या सर्वाधिक गाजलेल्या गीताचे कवी शैलेंद्र गीतकार होता.

अब्बास यांनी आपल्या आठवणीत नमूद केलं आहे की, जेव्हा ‘आवारा’ची कथा त्यांनी त्याचे सहलेखक वी. छी. साठे सोबत राज कपूरला ऐकवली चांगली दोन तास, तेव्हा त्या स्टोरी रोशनला शैलेंद्र उपस्थित होता. कथा ऐकवल्यानंतर राजनं त्याचा अभिप्राय विचारला, तेव्हा तो एकदम स्फूर्ती आल्याप्रमाणे गुणगुणला ‘आवारा हूं... या गर्दिश मे हूं आसमान का तारा हूं...!’ आणि अब्बास उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘मै जो दो घंटे मे स्टोरी सुनाई, उसका सारांश तो ये दो लाईने है... वाह बहोत खूब!’

मेलोड्रामॅटिक तरीही खेळकर अभिनय

राज कपूरनं चार्लीची ट्रॅम्प प्रतिमा या सिनेमात कोणत्या विचारानं स्वीकारली, याबद्दल काही भाष्य केलेलं नाहीय. पण शैलेंद्रचा या गाण्यातल्या अर्थानं सिनेमाचं नाव ‘आवारा’ ठरलं. आवारा राजू साकार करायचा झाला तर पूर्वीच्या गंभीर - वास्तववादी अंडरप्ले शैलीचा अभिनयाद्वारे साकार करता येणार नाही, हे त्याला जाणवलं.

हा राजू झोपडपट्टीत, वाहत्या गटाराच्या बाजूला वाढलेला आणि जगण्यासाठी आवारागिरी करत पॉकेटमारी करणारा परिस्थितीशी शरण गेलेला गरीब तरुण आहे. तो साकार करताना गरिबी-श्रीमंतीमधला भेद आणि दोन भिन्न जग दाखवायचं, गरिबांची होरपळ दाखवायची, तरीही त्यांची जगण्याची अक्षय्य उमेद आणि अभंग माणुसकी दाखवायची असेल, तर ‘ओवर द टॉप’ मेलोड्रामॅटिक पद्धतीचा गंभीर तरीही खेळकर अभिनय केल्याशिवाय ‘आवारा’ जिवंत होणार नाही.

हेही वाचा : दाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा

आधार ट्रॅम्पचा रंगरूप भारतीय

गरिबांनाही प्रेम करता येतं, त्यांच्यात माणुसकी आणि इतरांना मदत करण्याची भावना असते. जगण्याची, आनंदी राहण्याची उमेद असते. हे सारं दाखवायचं झालं तर व्यक्तिरेखेत विदुषकी रंग भरले पाहिजेत, पण निव्वळ मस्करी नको, तर त्यात गहिरी वेदना हास्याला बिलगून आली पाहिजे, त्यासाठी चार्ली चॅप्लीननं अजरामर केलेल्या ‘ट्रॅम्प’चा आधार ‘आवारा’साठी घेतला पाहिजे, पण कॉपी न करता त्याला भारतीय रूपरंग-भावना-संवेदना दिल्या पाहिजेत.

भारतीय काव्य-नाट्य शास्त्रातल्या जीवनाचा भाष्यकार असणाऱ्या विदुषकाला पडद्यावर आधुनिक रूप देत त्यावर टॅ्रम्पपणाचं कलम केलं पाहिजे. हा विचार दिग्दर्शक म्हणून आणि ही व्यक्तिरेखा साकार करताना अभिनेता म्हणून राज कपूरनं बुद्धी आणि भावनांनी केला असणार आणि तो अंगी मुरवला असणार. त्याला कायिक-वाचिक रूप बहाल करत आणि काही निशब्द क्षणी भावपूर्ण डोळ्यांनी आणि बोलक्या लवचिक चेहर्‍यांनी रंग भरले.

सोशालिस्ट ब्लॉकमधे सिनेमा पोचला

पहिल्याच प्रयत्नात राजनं आवारातून अभिनय आणि दिग्दर्शनाची झेप घेतली ती एवढी उत्तुंग आणि सर्वस्पर्शी होती की, भारताप्रमाणे भारताबाहेरही सोशालिस्ट ब्लॉकमधे पण सिनेमा लोकप्रिय झाला. आजही रशियात राज कपूरची, ‘आवारा हूं’ आणि ‘मेरा जुता है जपानी’ या गीताची आणि आवारा-ट्रॅम्प प्रतिमेची अमीट छाप आहे.

त्याचा अनुभव खुद्द पंडित नेहरूंना आला होता. ते सोविएत युनियनचा पहिला दौरा करून भारतात परत आल्यानंतर पृथ्वीराज कपूरला ‘कोणता हा तुझ्या मुलानं बनवलेला सिनेमा आहे आवारा? स्टॅलिन माझ्याशी त्याबाबत बरंच बोलत होता.’ असं म्हणल्याच रशिस किडवाई यांनी एका लेखात नमूद केलं आहे.

खुद्द राज कपूरला रशियात पासपोर्ट काढलेला नसतानाही त्यांनी प्रेमानं प्रवेश दिला होता. एवढंच नाही, तर हा किस्सा पण मशहूर आहे की, नेहरूंना जे शासकीय बँक्वेट दिलं होतं, त्या वेळी रशियन बँडनं राष्ट्रगीतासोबत ‘आवारा हूं’ची धून वाजवली होती. ख्रुश्‍चेव आणि चीनच्या माओला पण हे गीत आवडत होतं, असं अब्बास यांनी आपल्या आठवणीत लिहून ठेवलंय.

वर्ग संघर्षाचं सुतोवाच

‘आवारा’ हा प्रभावीपणे कथेच्या माध्यमातून समाजवादी विचार मांडत भांडवलशाहीचा निर्घृण चेहरा बेनकाब करतो - कुठेही प्रचारकी न होता. त्यासाठी ‘आवारा हूं’ या गाण्याच्या तीन मिनिटांच्या सादरीकरणातून राज कपूरमधल्या दिग्दर्शकानं राजची ट्रॅम्प व्यक्तिरेखा, त्याचं ध्येय आणि वर्ग संघर्ष किती कलात्मकतेनं सादर केलं आहे.

अर्थात त्यासाठी कवी शैलेंद्र ‘आवारा’पणाचं अँथम म्हणता येईल असं गीत मदतीला असल्यामुळे राज कपूरला जे सांगायचं आहे, ते नेमकेपणानं प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोचतं. ते सुरू होतं तेव्हा आवारा राज हा एक सेठ आणि एका सुटाबुटातल्या काळ्या साहेबाचं घड्याळ असलेली सोन्याची साखळी आणि पाकीट अलगद लंपास करतो.

हे जमीनदार आणि भांडवलशाहीचं प्रतीक म्हणून प्रेक्षकांसमोर येतात. मग तो चार्ली चॅप्लीन स्टाईलनं एका सायकलवर स्वार होतो. पुढे तीही सोडून देत एका कामवाल्या स्त्रियांनी बांधकामाच्या ठिकाणी  घेऊन जाणाऱ्या ट्रकवर चढतो. त्या वेळी शैलेंद्रचे शब्द किती प्रभावी वाटतात. ‘घरबार नाही, संसार नही, हमको किसीसे प्यार नही, सुनसान नगर अंजान डगर का प्यारा हूं’ यातून स्थलांतरीत भटक्या कामगाराची व्यथा- वेदना साकार होते. पुढे तो त्याला ज्याचा सहारा आहे, त्या झोपडपट्टीत शिरतो. तिथली माणसं त्याची आपली - त्याच्यासारखी भणंग आणि गरीब आहेत.

तो दोन अर्धनग्न छोट्या मुलांना उचलून घेत प्रेम करतो. त्या वेळी त्याच्या ओठावर गीताचं दुसरं कडवं उमटतं. ‘आबाद नही, बरबाद नही, गाता हूं खुशी के गीत मगर जख्मोसे भरा सीना है मेरा हसती है मगर ये मस्त नजर’ अवघ्या तीन मिनिटांच्या गीतातून कथा किती वेगानं पुढे सरकते आणि आवारा नायकाची व्यक्तिरेखा प्रकट करत वर्ग संघर्षाचं सुतोवाच करते. मोठा दिग्दर्शक गीतांचा अचूक वापर कथा प्रवाही ठेवण्यात आणि पुढे नेण्यात वापरतो, तो असा.

हेही वाचा : सरकारला धडकी भरवणारं महुआ मोईत्रा यांचं वायरल भाषण

शब्दही न वापरता समाजवादाचा संदेश

‘आवारा’चं कथानक नाट्यपूर्ण आणि वर्गसंघर्षाचं चित्रण करणारं आहे. गर्भवती पत्नीला संशयावरून राजचा बाप सोडतो आणि जन्मानंतर त्याला गरिबीत वाढावं लागतं आणि जज असणाऱ्या बापावर सूड उगवावा म्हणून जग्गा हा गुन्हेगार राजला वाम मार्गाला लावतो. पुढे एका अपराधासाठी राजला जजबाप शिक्षा सुनावतो.

तो आपला मुलगा असल्याच त्याला कळतं आणि त्याचा विचार की गुन्हेगाराचा मुलगा गुन्हेगारच होतो व चांगल्या घरचा मुलगा चांगला, किती फोल आहे, हे जजला कळून येतं. गुन्हेगारी हे विषमताप्रधान समाज रचनेचं कुरूप-कडू फळ असतं. जो समाज गरिबांना गुन्हेगारीत ढकलतो, तो समाज बदलला पाहिजे आणि त्यासाठी विषमता निर्मूलन करणारा समाजवाद आला पाहिजे. हा संदेश कुठेही समाजवाद हा शब्द न वापरता नाट्यपूर्ण कथेद्वारे आणि आवारा प्रतिमेच्या माध्यमातून हसू आणि आसूचा विदुषकी परंपरेचा वापर करत राज कपूरनं दिला आहे.

स्वतंत्र झालेल्या तत्कालीन भारताच्या विषमतेचं आणि गरिबीचं जे जीवन चित्रण केलं आहे, ते कोरडं वाटत नाही. अंगावरही फारसं येत नाही. कारण कथेला प्रेम, रोमान्स आणि मधुर गीत-संगीताची जोड आहे. राज कपूरला समाज प्रबोधन जरून करायचं होतं, पण शर्करा गुंठीत रीतीनं त्यात तो सफल झाला.

हेही वाचा : 

 मोदीप्रेमाचा ताप आता ओसरू का लागलाय?

 नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?

भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी

हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?