नेहरू विचारांचा मागोवा घेतात राज कपूरचे सिनेमे : भाग २

२७ मे २०२१

वाचन वेळ : १३ मिनिटं


आज जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी. राज कपूरसाठी पंडित नेहरू हे महान नायक होते. त्यानं सलग सहा बिग बजेट सिनेमे काढून नेहरूंना मानवंदना दिलीय. त्यातले तीन सिनेमे तर अगदी मेनस्ट्रीमचे होते. ही मानवंदना नेहरुंच्या विचारांना, खास करून विषमता कमी करणाऱ्या समतावादी विचारांना होती. त्याला के. ए. अब्बासच्या कथा आणि शैलेंद्रच्या अर्थपूर्ण गीतांनी समर्थ साथ दिलीय.

रशिया आणि चीन या कम्युनिस्ट देशात १९५०च्या दशकात राज कपूरचा ‘आवारा’ आणि त्यानंतर आलेला ‘श्री ४२०’ सिनेमा एवढा का लोकप्रिय झाला आणि राज कपूरला तिथल्या रसिकांनी का डोक्यावर घेतलं? याचा शोध घेताना अनेक सिने आणि समाज अभ्यासकांनी केलेलं विवेचन जास्त सार्थ वाटतं. 

दुसऱ्या महायुद्धानंतरचं दशक रशियासाठी खडतर होतं. अन्नाच्या अभावाचं आणि गरिबीचं होतं. रशियन सिनेमा हे युद्धाची दाहकता या काळात दाखवत होते. त्या पार्श्‍वभूमीवर लोभस भणंग आवारा, त्याचा अभंग आशावाद, माणुसकीवरची श्रद्धा आणि गरिबीतही उत्कट प्रेम फुलतं, हे राज कपूरच्या सिनेमाचं वैशिष्ट खडतर जीवन जगणाऱ्या रशियन माणसाला भावलं.

राज कपूरचा हसू आणि अश्रूंचा सुरेख आणि प्रमाणशीर संगम असणारा चॅप्लीन टाईप अभिनय, अर्थपूर्ण गीतं आणि नाट्यपूर्ण पण चार घटका रोजच्या दु:ख-दारिद्य्राचा विसर पाडणारी, माणुसकी आणि प्रेमाचा जयघोष करणारी कथा यामुळे राज कपूर रशियातील ‘लिटल मॅन’चा आम आदमीचा लाडका कलाकार बनला!

हेही वाचा : जवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बहीणभाऊ

बहिरं झालेलं शहर

१९५५ ला आलेला राज कपूरचा दुसरा अजरामर सिनेमा म्हणजे ‘श्री ४२०.’ कोरोना काळात स्थलांतरित कामगारांकडे शहरानं पाठ फिरवली. म्हणून शेकडो मैल चालत गावी जाणारे तांडे आणि त्यांच्या पायाला आलेले फोड पाहून हा सिनेमा आठवतो. तो ‘यू-ट्यूब’ वर पाहिला आणि प्रकर्षानं जाणवलं की, राज कपूरनं समावादी विचार किती अतरंगी मुरवून घेतलाय. 

यातला असाच भणंग बेकार नायक राज गाव सोडून मुंबईला काम करण्यासाठी येतो. त्याला शहराच्या आलेल्या अनुभवात वाढलेला भ्रष्टाचार, राष्ट्रवाद, वर्ग विग्रह आणि भांडवलशाहीचा कुरूप-फसवा चेहरा ही समाजवादी आशय सूत्र सिनेमात प्रभावी पण रंजकपणे उलगडली जातात.

शहरातली धावपळ आणि कुणी कुणाला विचारत नाही हे पाहून राज विचारतो, ‘हे शहर बहिरं का आहे?’ एक रस्त्यावरचा भिकारी त्याला उत्तर देतो, ‘अरे बाबा, ही बंबई नगरी म्हणजे सिमेंटच्या इमारती आणि पत्थर दिल माणसाची नगरी आहे.’ त्यातून असंवेदनशीलता आणि शहरात कामासाठी गावावरून येणाऱ्या कामगाराप्रतीची तुच्छता सहजतेनं सूचित होते.

मानवी वर्तनाचे ग्रे शेड्स

राजला शहरात काम मिळत नाही. बेकारीचं जीणं जगताना इथं राहायचं असेल तर गबरी-पीडित राहण्यापेक्षा फसवणूक करून श्रीमंत व्हावं असं वाटू लागतं. मूळचा हुशार - स्ट्रीटस्मार्ट राज पाहता पाहता उच्चभ्रू वर्तुळात सामील होतो. इथं त्याला पुढं करून शेठ मंडळी काळे धंदे आणि फसवणुकीचे व्यवहार करतात. त्यातला एक स्वस्त घरं देण्याचची योजना आखतो. त्याद्वारे पैसे गोळा करून राजचा बळी देऊन आपण नामानिराळं व्हायचा, त्याचा कावा असतो. 

शेठचं एक वाक्य मोठं मार्मिक आहे, ‘हम घर नही सपना बेचते है’ त्यातून गरिबांनाही भांडवलशाही व्यवस्थेचं समृद्ध जीवन जगण्याचा मोह कसा असतो, हे दाखवत राज कपूरनं मानवी वर्तनाचे ग्रे शेड्स जाणकारीनं दाखवलेत. वर्ग आणि भ्रष्टाचार क्लास आणि करप्शनबाबत राजच्या तोंडी एक भेदक प्रश्‍न सिनेमात आहे, ‘सत्य आणि प्रामाणिकतेचे लेक्चर केवळ गरिबांनाच का नेहमी दिलं जातं? श्रीमंत फसवणूक करत अधिक गब्बर होतात तेव्हा सुखानं जगतात?’

यातली माया ही व्यक्तिरेखाही प्रतिकात्मक आहे. ती म्हणते, ‘या मायानगरीत छोट्या फसवणुकीला कलम ४२० खाली पकडून शिक्षा होते. तर मोठी फसवणूक करणारा प्रतिनिधित्व आणि दानी म्हणून समाजात वावरतो.

हेही वाचा : गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचं चांगभलं होईल?

जपानी जुता आणि हिंदुस्तानी दिल

पण राज कपूर हा कायम आशावादी आणि माणुसकी आणि चांगुलपणावर विश्‍वास ठेवणारा कलावंत आहे. त्यामुळे या सिनेमात मायाच्या विरुद्ध विद्या ही व्यक्तिरेखा येते. जगण्यासाठी प्रामाणिकपणा पुरेसा आहे, आणि भ्रष्टाचार, फसवणूक या निंदनीय बाबी आहेत, असं ती मानणारी असते. राजची मूळ प्रवृत्ती विद्यासारखी असते. पण परिस्थितीनं तो ‘श्री ४२०’ बनतो आणि मायाच्या आहारी जातो. शेवटी त्याचा विवेक त्याला विद्याकडे परत आणतो. आणि गरीब मनाची श्रीमंती, प्रेम आणि माणुसकी दाखवत सिनेमाचा शेवट गोड होतो.

हे कथानक आणि हा आशावादी, कदाचित अवास्तव आणि भाबडा असला तरी उमेद जागवणारा आहे. ते प्रगतीशील लेखक चळवळीच्या आणि इप्टाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत आहे. कारण कलावंतांनी गरीब-शोषितांचा आवाज बनत त्यांना आत्मबल दिलं पाहिजे, हे ही विचारधारा सांगते. राज कपूरचा ट्रॅम्प भणंग, भोळाभाबडा, सुहृदयी नायकाच्या व्यक्तिरेखेतून हे सिनेमात कौशल्यानं मांडतो आणि आम आदमीला दिलासा देतो.

‘श्री ४२०’ सिनेमात देश नामक संकल्पना पण गाण्याच्या मदतीनं समर्पकपणे राज कपूर मांडतो. नेहरूंचा स्वतंत्र भारताचा विचार कसा होता, हे शैलेंद्रच्या ‘मेरा जुता है जपानी, पतलून इंग्लिसस्तानी, सरपे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी’ या गाण्यातून व्यक्त होतो. अंगावरचे सगळे कपडे परदेशी, पण मन मात्र भारतीय. हेच तर आजच्या जागतिकीकरणानंतरच्या भारताचं ग्लोबल रूप आणि आकांक्षांचं प्रतिबिंब नाही का?

नव-भांडवलशाही समाजरचनेवरचं भाष्य

राज कपूरची निर्मिती असलेले पुढचे तीन सिनेमे लो-बजेट होते. त्यांचं दिग्दर्शन त्याचं नव्हतं. पण ते तीनही समाजवादी विचारधारेच ठळक सादरीकरण करणारे होते. पुन्हा आशय आणि थीम तीच. नव-भांडवलशाही समाजरचना विषमता पुरक असते. ती गरिबांचं शोषण करणारी असते. त्यावरचं प्रभावी भाष्य हे सिनेमा करतात. 

पंडित नेहरूंनी पन्नासच्या दशकात लोकशाही मार्गाने विषमता निर्मूलक समाजवाद राबवण्याचा प्रयोग आरंभला होता. त्याला पुरक असे राज कपूरचे हे समाजवादी विचार कथेद्वारे मांडणारे आणि नेहरूंच्या धोरण आणि कार्यक्रमाला पाठिंबा जनतेतून मिळावा यासाठी साह्य करणारे होते. त्या अर्थाने मार्क्सवादी कलाप्रचाराच्या या नमुनेदार केस स्टडी होत्या.

हेही वाचा : कमला हॅरिस : संघर्ष करण्याची तयारी असेल तर तुम्ही जगाला बदलू शकता!

सामाजिक भान जपणारे सिनेमे

‘जागते रहो’ हा शंभू मित्रा, अमित मित्र दिग्दर्शित बंगाली-हिंदी असा द्वैभाषिक सिनेमा होता. या आणि ‘बुट पॉलिश’ या सिनेमांची निर्मिती मला का कराविशी वाटली, याबाबत राज कपूरनं स्वत: एका मुलाखतीत जे म्हणलं आहे, ते खाली उद्धृत केलंय.

‘स्वातंत्र्योत्तर काळात सगळेच स्वातंत्र्याच्या आकांक्षांनी प्रेरीत झाले होते. आपले राष्ट्रीय नेते नवभारत घडवण्याच्या ध्येयानं काम करत होते. ते स्वातंत्र्यासाठी लढले होते. ते मिळाल्यानंतर ते लोकांचा विकास, प्रगती, समतेच्या अपेक्षापूर्तीत बदलण्याचं त्यांच्यापुढे आव्हान होतं. या वेळी मी सामाजिक भान जपणाऱ्या सिनेमांच्या निर्मितीनं झापटून जात ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘जागते रहो’, ‘बुट पॉलिश’ सारख्या सिनेमांची निर्मिती केली.’

‘आम्हाला नवी समतावादी समाजरचना साकारायची. तसंच शिस्त, शिक्षण, दारिद्य्र निर्मूलन आणि समता हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करायचं होतं. मी त्यांचे जनमानसात उमटलेले पडसाद पहात होतो. ते मी टिपून सिनेमात रोमँटिझम, संवेदनशीलता आणि मानवतावादाच्या अंगाने मांडत गेलो. आणि ते लोकांच्या हृदयाला जाऊन भिडले.’

राज कपूरचं मॉब लिंचिंग

‘जागते रहो’ हा एक पूर्ण लांबीचा भ्रष्ट शहरी जीवनावर बोट ठेवणारा व्यंगपट आहे. तो एका गरीब खेडूत माणसाच्या नजरेतून दाखवलाय. तो तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी एका मोठ्या अपार्टमेंटमधे शिरतो. तेव्हा वॉचमन त्याला चोर समजून हुसकू लागतात. तेव्हा तो त्याला चुकवत रात्रभर अपार्टमेंटच्या विविध मजल्यावर जात राहतो.

त्याला तथाकथित श्रीमंत, मध्यमवर्गीय, उच्चभ्रू लोकांचे काळे, अनैतिक धंदे कळतात आणि तो त्याच्या दर्शनानं व्यथित होतो. त्याला चोरी करायची नसते. तर फक्त तहान भागवण्यासाठी घोटभर पाणी हवं असतं. ते शोषक म्हणून श्रीमंत झालेले, श्रम न करता वरकड उत्पन्न आणि रेंट सिंकिंग वृत्तीनं जगणारे शहरी समाजविन्मुख आणि गरीब-शोषितांबद्दल तुच्छता बाळगणारे असतात. पूर्ण सिनेमात राज कपूरच्या तोंडी एकही संवाद नाही. तो येतो तो सिनेमाच्या शेवटी. जेव्हा त्याला चोर समजून हे रात्रीच्या अंधारात काळेधंदे करणारे त्याचं ‘मॉब लिंचिग’ करायला सरसावत उन्मादाने पुढे येतात तेव्हा.

तो म्हणतो, ‘खबरदार, आगे आये तो सर फोड दूंगा. क्यों मुझे मारते हो? क्या कसूर है मेरा? मै किसान का बेटा हूँ. तुम्हारे शहर मे नोकरी ढुंढने आया था. प्याससे मेरी छाती फट रही थी, तो दो घुंट पानी पिने आया था. यही कसूर है ना मेरा? आज मेरे पिछे चोर-चोर चिल्लाते पड गये. जैसे बावला कुत्ता हूँ मैं. मै चोर हूँ?’

यहाँ हर घर मे मैने चोर देखे. कोई नकली नोट बनानेवाला, कोई जहरिली शराब करनेवाला, कोई बीवी के गहने चुरानेवाला. मैने यहा हर जगह चोर देखे. आप पढे-लिखे हो. मुझे गंवार को यही शिक्षा दी, कि बिना चोर बने मैं बडा आदमी नह बन सकता. आज इस किसान के बेटे ने यही सिखा है, मै चोर बनू, गुंडा बनू- बेईमानी करके पैसा कमाऊ और तुम जैसा बडा बनू.’

हेही वाचा :  कमलनाथः इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा

आशावादाचा चाहता

इथं शोषितांना, दुबळ्यांना लुटणाऱ्या शोषक समाजावर, ज्याची शक्ती भांडवल असतं, त्यावर सटिक भाष्य आहे. खेडेगावातल्या गरिबांना निर्दयी शहरात काही स्थान काही, हे हा सिनेमा अधोरेखित करतो. आजही हे रोकडं सत्य नाही का? तरीही राज कपूरला प्रेक्षकांनी नाउमेद होणं मंजूर नसतं. नव्हे सगळ्याच प्रगतीशील कलावंतांचं स्वप्न असतं. कितीही वाईट परिस्थिती असली तर सुख-प्रगतीची ‘वो सुबह कभी तो आयेगी’ आणि ठाम विश्‍वास असतो, की ‘वो सुबह हमीसे आयेगी.’

त्यामुळे ‘जागते रहो’चा शेवट हा त्याला एक सुशील स्त्री भूपाळी म्हणताना पाणी पाजून त्याची तहान भागवते, असा केलाय. हा शेवटचा क्षण प्रेक्षक सिनेमागृह सोडताना बाहेर एका आशा घेऊन जातात.

राज कपूरचा चौथा या विचारधारेचा सिनेमा म्हणजे ‘बुट पॉलिश’. व्यावसायिक सिनेमाच्या मर्यादा लक्षात घेऊनही हा भारतातला एक सर्वोत्तम बाल सिनेमा आहे. तो सुखद बाललीला दाखवणारा नाही. तर अनाथ आणि गरीब मुलांचं जगण्यासाठी भीक मागून आणि बुट पॉलिश करून पोट भरण्याचा संघर्ष दाखवणारा हृदयद्रावक सिनेमा आहे. तो राज कपूरनं निर्माण केला आणि त्यानंच तो ‘घोस्ट डिरेक्टरी’ केला होता, असं मानलं जातं!

अनाथांची जबाबदारी कुणाची?

हा सिनेमा का निर्माण केला, याबाबत राज कपूरनं ‘इंडियन एक्स्प्रेस’मधे २ एप्रिल १९५४ ला एक लेख लिहिला होता. त्यात त्यानं म्हणलं होतं, ‘आवारा’ सिनेमात मी हे सिद्ध करायचा प्रयत्न केला की, भणंग, भटके, आवारा हे जन्मान येत नाहीत. तर आधुनिक शहरातल्या झोपडपट्टीत दारिद्य्र आणि वाईट वातावरणात घडतात. 

‘बुट पॉलिश’ सिनेमा तपशीलाने अनाथ मुलांचे प्रश्‍न मांडतो, त्यांचा जगण्याचा संघर्ष आणि संघटीत भिक्षा मागण्याविरुद्धचा लढा चितारतो. या सिनेमाचा उद्देश हा आहे की, या अनात बालकांची जबाबदारी जेवढी शासनाची आहे, तेवढीच नागरिकांचीही आहे, हे समाजाला पटलं पाहिजे. वैयक्तिक दान आणि मदतीनं हा प्रश्‍न सुटणार नाही, तर राष्ट्रीय पातळीवर नागरिक शासनाच्या सहकाऱ्यानं तो सोडवला गेला पाहिजे.’

हेही वाचा : संजय गांधींनी खरंच पंतप्रधान असलेल्या आईला थापड मारली होती?

माणूसशून्य भांडवलशाही

हा विचार नि:संशय नेहरूंचा होता. त्या काळात ते गरिबी कमी करण्यासाठी उद्योगधंदे वाढवत होते. सगळ्यांना शिक्षण कसं मिळेल याचा प्रयत्न करत होते. त्याचा आधार जसा विज्ञाननिष्ठ होता, तसाच समाजवाद हाता त्या विचारांना पुरक असा हा ‘बुश पॉलिश’ सिनेमा होता. दोन अनाथ मुलांना त्यांची आत्या भीक मागायला शिकवते आणि पैसे जबरदस्तीनं स्वचैनीसाठी वापरत असते. तेव्हा एका सहृदयी जॉन चाचामुळे ते दोघे बहीण भाऊ कष्ट करून पैसे मिळावेत म्हणून बुट पॉलिशचा रेल्वेत धंदा करू लागतात. 

पण पावसाळ्यात काम बंद पडतं, तेव्हा फाटके पडू लागतात आणि भीक मागायला ते पुन्हा मजबूर होतात. पुढे ते त्यातूनही बाहेर पडतात हा सुखद शेवट थोडासा पलायनवादी जरूर आहे. पण त्याआधीचा भाग हा अत्यंत हृदयस्पर्शी आणि वास्तव आहे. अनाथ मुलांना जगण्यासाठी समाजकंटक भीक मागायला लावून त्यांचं शोषण करतात आणि मौज करतात. कोवळ्या जीवांच्या श्रमाची चोरी आणि शोषण ही पण नव भांडवलशाही झाली. ती माणूसशून्य आहे, हे या सिनेमातून प्रभावीपणे मांडण्याण आलंय.

दिल्ली दूर नही

पंडित नेहरूंना लहान मुलं किती प्रिय होती, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे मुलांचं बालपण उबदार गेलं पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, हा नेहरूंच्या धोरणाचा एक प्रमुख गाभा होता. राज कपूरनं हाच विचार ‘बुट पॉलिश’मधे पुढे नेत हे प्रेक्षकांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न केलाय की, भारताच्या बालकात सगळ्या प्रकारच्या क्षमता आहेत. ते प्रामाणिक आणि शिक्षित आहेत. संधी मिळाली तर ते भारताचे उत्तम नागरिक बनू शकतात. पण काही अनिष्ट बाबींमुळे ते दबले जातात आणि हाताश होतात.

राज कपूरसाठी पंडित नेहरू हे महान नायक होते आणि त्याची त्यांच्या नेतृत्वावर आणि समाजवादी विचारांवर निष्ठा होती. हे त्याच्या ‘अब दिल्ली दूर नही’ या सिनेमातून स्पष्टपणे जाणवतं. वडलांना खोट्या खूनाच्या आरोपाखाली पोलीस तुरुंगात डांबतात. तेव्हा त्याचा दहा-अकरा वर्षांचा मुलगा दिल्लीला चाचा नेहरूंना भेटण्यासाठी निघतो. कारण त्याचा विश्वास असतो की आपले चाचा नेहरू माझा प्रश्‍न सोडवतील. अतिशय हृद्य आणि बालसुलभ भावनांचं प्रकटीकरण करणारी कथा पडद्यावर पाहताना प्रेक्षक त्या बालकाच्या व्यथा वेदनांशी समरस होतात.

‘बुट पॉलिश’ नंतरचा राज कपूरनं निर्माण केलेला हा दुसरा बालसिनेमा. हा शोमॅन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राज कपूरचं समाजभान जमणारे आणि समाजवादी विचारांचं वहन करणारे हिंदी सिनेमातले दोन अजोड बालपट आहेत. अशी कमिटमेंट दाखवणारा दुसरा बडा निर्माता शोधूनही सापडत नाही.

गांधी-नेहरू विचारांचा मागोवा

‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘जागते रहो’ आणि ‘बुट पॉलिश’ या चारही सिनेमांच्या कथा-पटकथा ख्वाजा अहमद अब्बासच्या असणं हा योगायोग नव्हता. तर त्यांचं आणि राज कपूरचं वैचारिक मैत्र आणि कमिटमेंट होती, हे आवर्जून नमूद केलं पाहिजे. 

जीवन कलेचं अनुकरण करतं याचा प्रत्यय देणारा राज कपूरचा आणखी एक सिनेमा आहे. जयप्रकाश नारायण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चंबळचे डाकू पोलिसांना शरण येत मुख्य प्रवाहात सामील झाले होते. ही घटना १९७० च्या दशकातली आहे. पण त्यापूर्वी या आशयाचा राज कपूरनं १९६१मधे ‘जिस देश में गंगा बहती है’ हा सिनेमा काढला होता. 

त्यातलं शैलेंद्रचं गाणं ‘होटो पे सच्चाई होती है, जहाँ दिल मे सफाई होती है, हम तो उस देश के वासी है, जिस देश में गंगा बहती है’ हे या सिनेमाचं थीमसाँग सिनेमाचा आत्मा आहे. गंगा नदी हे भारतीय माणसाच्या पवित्र आणि निर्मख मनाचं प्रतीक आहे. तर प्रेमानं हिंसक डाकूंचं मन आणि मत परिवर्तन होतं, या गांधी-नेहरू विचारांचा मागोवा घेत या सिनेमाची कथा फुलते.

हेही वाचा :  इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

नेहरुंना मानवंदना

१९५१ ते १९६१ म्हणजेच ‘आवारा’ ते ‘जिस देश मे गंगा बहती है’ हे राज कपूरचे सहा सिनेमा नेहरू कालखंडांशी समांतर आहेत. त्यांचा विचार आणि ध्येय धोरणाचं वहन करणारे आहेत. बिमल रॉय आणि बी. आर. चोपडा यांनी ‘दो बिघा जमीन’ आणि ‘नया दौर’ या काळात काढले. महबूब खानच्या ‘मदर इंडिया’ पण याच काळातला. हे सिनेमेही नेहरू विचारांनी प्रभावित झालेत. 

सलग सहा, त्यातल्या तीन मेनस्ट्रीमच्या, बिग बजेट सिनेमांमधून राज कपूरनं नेहरूंना जी मानवंदना दिलीय त्याला तोड नाही. ही मानवंदना त्यांच्या विचारांना - खास करून विषमता कमी करणाऱ्या समावादी विचारांना होती. त्याला के. ए. अब्बासच्या कथा आणि शैलेंद्रच्या अर्थपूर्ण गीतांनी समर्थ साथ दिली.

खरंतर ज्याप्रमाणे मेघनात देसाईंनी चुकीचा निष्कर्ष काढत ‘दिलीपकुमार - नेहरूंचा’ नायक लिहिला, तसाच या सहा सिनेमांचं सामाजिक राजकीय अंगानं विश्लेषण करत या काळातलं नेहरूंच्या राजकारण, समाजकारण आणि ध्येय धोरणाला ते कसे पुरक होते, किंबहुना त्याचं वहन करणारे होते. यावर अभ्यासपूर्ण पुस्तक निर्माण झाल्याशिवाय राज कपूरच्या या असाधारण कामाला न्याय मिळणार नाही. त्या दृष्टीने हा लेख एक अल्प प्रयत्न आहे.

पीपल्स स्टार

राज कपूर हा सामाजिक बांधिलकी मानणारा आणि कलेमार्फत समावादाचा रंजकतेने संदेश देणारा एक महान निर्माता - दिग्दर्शक आणि कलाकार होता. चार्ली चॅप्लीनच्या ट्रॅम्पला भणंग आवाराचं भारतीय रूपडं देत प्रेम, रोमान्स, मानवतावाद आणि समाजवादी नजरेनं विषमता दाखवत समतेचा पुरस्कार करणारा बुद्धिगम्य विचार या आभूषणानं त्याला राज कपूरनं एतद्देशीय रूप दिलं. ते रसिकांना विलक्षण भावलं. आणि त्यांनी राज कपूरला खऱ्या अर्थानं ‘पीपल्स स्टार - लोक तारा’ बनवून डोक्यावर घेतलं.

कुठल्याही राष्ट्राच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या दशकात उत्तुंग नेतृत्वाच्या विचारांचं वहन आणि देशाच्या वाटचालीचं दर्शन जाणीवपूर्वक घडवणारा राज कपूर हा कदाचित पहिला कलावंत असावा. पुढे तो शो-मॅन होत गेला. त्याचे नंतरचे ‘संगम’ ते ‘हिना’ सिनेमाही दर्जेदार होते. पण या सहा सिनेमातून खरा सामाजिक बांधिलकी मानणारा राज कपूर प्रकट झालाय. 

ही कलेची जीवन आणि वैचारिक तत्त्वज्ञानाशी एकरूप होणारी कलात्मक कामगिरी आम जनतेपर्यंत नेण्याचा पराक्रम करणारा दुसरा भारतीय कलावंत आजवर झाला नाही. राज कपूर म्हणूनच एकमेवाद्वितीय आहे, हे निर्विवाद!

हेही वाचा : 

फक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर?

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!

बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या