सौदी अरेबियातल्या निओम शहराची इतकी चर्चा का होतेय?

३१ मार्च २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


सौदी अरेबियामधे ५०० बिलियन अमेरिकन डॉलर खर्च करून निओम नावाचं शहर उभं केलं जातंय. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निओम शहराची बांधणी केली जातेय. त्याचा पहिला टप्पा या महिन्यात पूर्ण होतोय.

सौदी अरेबियाच्या वाळवंटी भागात एका प्रोजेक्टची सध्या फार चर्चा होतेय. इथं एक शहर उभं केलं जातंय. भविष्यात हे शहर व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांसाठी हब बनेल. इथं सगळ्या सेवा रोबोट देतील. हवेत कार चालतील. त्यातून लाखो नोकऱ्या आणि लाखो कोटींची गुंतवणूक केली जाईल. जगातला १० टक्के व्यवसाय या शहरातून होईल असं म्हटलं जातंय. त्याचा पहिला टप्पा या महिन्यात पूर्ण झालाय. 

५०० बिलियनचा प्रोजेक्ट

२०१७ला सौदी अरेबियाची राजधानी रियाद इथं एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. सौदी अरेबियातली भविष्यातली गुंतवणूक कशी असावी याची चर्चा तिथं झाली. याच परिषदेत सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सौदी अरेबियासाठी 'विजन २०३०' मांडलं. सध्या चर्चेतलं निओम शहर या विजनचाच एक भाग आहे.

निओम शब्द नवीन या ग्रीक शब्द आणि भविष्य अरबी शब्दातून तयार झालाय. हे शहर सौदी अरेबियाच्या उत्तर-पश्चिमेकडच्या ताबुक भागात तर जॉर्डन आणि इजिप्तच्या सीमेजवळ असेल. १७० किलोमीटर क्षेत्रात हे शहर उभं करण्यात येतंय. या शहराला 'द लाईन' या नावाने ओळखलं जाईल. त्यासाठी सौदी अरेबिया ५०० बिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे ३७ लाख कोटी इतका खर्च करतंय. २०२५पर्यंत हा प्रकल्प उभा करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय.

या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी २९ जानेवारी २०१९ला निओम नावाच्या एका कंपनीची स्थापना करण्यात आलीय. प्रकल्पात जो पैसा गुंतवला गेलाय त्यावर पूर्णपणे या कंपनीचं नियंत्रण असेल. निओम शहराला आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित करणं कंपनीचा महत्वाचा उद्देश आहे. ही योजना घोषित झाल्यावर क्लॉस क्लेनफेल्ड यांना सीईओ करण्यात आलं होतं. पण पुढे ही जबाबदारी नदमी अल नस्त्र यांच्याकडे देण्यात आली.

विजन २०३०चा भाग

सौदी अरेबिया तेलाचं उत्पादन घेणारा दुसरा तर तेलाची निर्यात करणारा जगातला सगळ्यात मोठा देश आहे. २०३०पर्यंत हे तेलावरचं अवलंबित्व कमी झालं नाही तर तापमानवाढीत भर पडेल. शिवाय तेलाचा साठाही संपेल. त्यामुळे इतर विकासाचे मार्ग मोहम्मद बिन सलमान शोधतायत. त्यासाठी त्यांनी २४ एप्रिल २०१७ला विजन २०३०ची घोषणा केली होती.

अर्थव्यवस्थेकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन, पर्यटन, मनोरंजन, आरोग्य, शिक्षण अशा सार्वजनिक सेवांमधून विकास हा या विजनचा महत्वाचा भाग आहे. त्यातूनच आधुनिक शहर विकसित करण्याची संकल्पना पुढे आली. निओम शहर हा या विजनचा एक भाग आहे.

हेही वाचाः आंध्र प्रदेशात पाच उपमुख्यमंत्री, पण अधिकार किती?

पर्यावरणपूरक निओम शहर

निओम अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरापेक्षा ३३ पट मोठं आहे. यातच एक पाण्यावर तरंगणारं ऑक्सॅगॉन हे ७ किलोमीटरचं छोटं शहरही असेल. त्यात पर्यटन स्थळ, निसर्गाच्या सानिध्यात असलेलं रिसॉर्ट, विमानातळं असं बरंच काही असेल. या शहरामधे गुंतवणूक करणाऱ्यांची स्वतःची एक न्यायव्यवस्था असेल.

निओम शहराच्या सुरवातीच्या योजनांमधे फ्लाइंग ड्रोन टॅक्सी, मनोरंजन पार्क आणि रात्रीच्या वेळी उजळणारा कृत्रिम चंद्र यांचा समावेश असेल. निओममधे रस्ते नसतील त्यामुळे गाड्यांचा प्रश्नच नसेल. त्यामुळे कार्बन उत्सर्जन होणार नाही. प्रवासासाठी हायपर स्पीड ट्रेनचा वापर केला जाईल. त्यामुळे कुठंही अगदी २० मिनिटात प्रवास करणं शक्य होईल.

निओम शहर पूर्णपणे पवन ऊर्जा आणि सौरऊर्जेवर चालेल. या शहरात १० लाख लोक राहतील. २०३० पर्यंत या शहरात ३ लाख ८० हजार रोजगार निर्माण केले जातील. त्याच्या निर्मितीसाठी म्हणून सौदी अरेबियाकडून १०० ते २०० बिलियन अमेरिकन डॉलर खर्च केले जातील. पूर्णपणे सार्वजनिक सेवांवर भर देणारं हे शहर पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेवर चालेल.

प्रोजेक्टवर टीकाही होतेय

येमेनमधल्या लष्करी कारवायांवरून सरकारला धारेवर धरणारे वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार आणि सौदी सरकारचे टीकाकार जमाल खशोग्गी यांची २०१८ला तुर्कीमधे हत्या करण्यात आली होती. मध्य-पूर्व राष्ट्रांमधे त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. त्याचा रोख थेट सौदी अरेबियाच्या मोहम्मद बिन सलमान यांच्यावर होता. यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी मेगासिटीची योजना आणल्याची टीका त्यांच्यावर होतेय.

वेगवेगळ्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी या प्रोजेक्टमधे सहभागी व्हायला नकार दिला होता. त्यासोबतच हा प्रोजेक्ट जिथं उभा राहतोय तिथं हुवैती जमात रहायची. या प्रोजेक्टमुळे त्यांच्यावर विस्थापित व्हायची वेळ आलीय. पण हे २० हजार लोक कुठं विस्थापित झालेत हेच माहीत नसल्याचा ठपकाही मोहम्मद बिन सलमान यांच्यावर ठेवण्यात आल्याचं 'फर्स्ट पोस्ट'च्या एका रिपोर्टमधे म्हटलंय.

यावर टीका करणारे आदिवासी कार्यकर्ते अब्दुल रहीम अल यांना ठार करण्यात आलं होतं. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी या प्रोजेक्टआडून मोहम्मद बिन सलमान स्वतःची प्रतिमानिर्मिती करतायत असा आरोपही त्यांच्यावर केला जातोय. पर्यावरणविषयक आश्वासनं हा त्याचाच भाग असल्याची टीका होतेय.

हेही वाचाः

उत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा?

काकडधरा गावानं वॉटरकप स्पर्धा जिंकली पण

तेलंगणाने गोदावरीवर कसं उभारली जगातली सर्वांत मोठी पाणीउपसा योजना?

साना मारिन: जगातल्या सगळ्यात तरुण पंतप्रधान पाच पक्षांचं सरकार चालवतात