नेटफ्लिक्सने २०२० मधे चार नवीन सिनेमे रिलीज करणार असल्याची घोषणा केलीय. या सिनेमांची बेसिक स्क्रीप्ट आणि त्यात कोणकोण काम करणार हे सगळं आता स्पष्ट झालंय. क्रिएटिविटीला प्रचंड वाव देणारे हे चार सिनेमे म्हणजे सिनेमाच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. सिनेमांची स्टोरीही खूप रंजक आहे. नेटफ्लिक्सची ही घोडदौड भारतातलं सिने कल्चर बदलू पाहणारं आहे.
एक फार प्रसिद्ध सिनेमा डायरेक्टर आहे. त्याच्याच काळातल्या एका मोठ्या सुपरहिरोसोबत त्याला नवा सिनेमा काढायचाय. हिरोच्या मुलीचं अपहरण होतं, अशी त्या सिनेमाची बेसिक कथा असते. पण हिरो काही डायरेक्टरसोबत सिनेमा करायला तयार होत नाही. आता काय करायचं? डायरेक्टरसमोर प्रश्न उभा राहतो. मग डायरेक्टर चक्क हिरोच्या खऱ्या आयुष्यातल्या मुलीचं अपहरण करतो. हिरो कासाविस होतो. मुलीला शोधत शहरभर हिंडत राहतो आणि त्या दरम्यान हा हुशार डायरेक्टर त्या हिरोचं शुटींग करतो. हिरोचा इतका रिऍलिस्टिक लूक दुसरीकडे कुठं मिळणार म्हणून डायरेक्टर एकदम खूश असतो.
कशी काय आहे स्टोरी? हिरो अनिल कपूर आणि डायरेक्टर अनुराग कश्यप यांना घेऊन याच पटकथेचा एक सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा खरा डायरेक्टर असेल विक्रमादित्य मोटवानी. सिनेमाचं नाव आहे ‘एके वर्सेस एके.’ पण हा सिनेमा कुठल्याही थेटरात नाही तर चक्क नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
नेटफ्लिक्सनं टीवी चॅनेल्सचं गणित बिघडवलंय. नेटफ्लिक्स हे युट्युब सारखं एक अॅप आहे. त्यावर महिन्याचे पैसे भरून अनेक दर्जेदार सिनेमे, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स बघायला मिळतात. नेटफ्लिक्स आल्यानंतर विडिओ अॅपच्या स्पर्धेत अमेझॉन प्राईम विडिओ, झी विडिओ, हॉटस्टार असे अनेक अॅप्स बाजारात उतरले. आणि तरुणाई, नवं काही बघू पाहणारा वर्ग प्रचंड प्रमाणात त्याकडे आकर्षित झाली.
नेटफ्लिक्सवर बॉक्स ऑफिस गाजवलेले काही सिनेमे आहेत. काही सिनेमे, वेब स्टोरीस या नेटफ्लिक्सवरूनच रिलीज होतात. अशाच प्रकारे नेटफ्लिक्स आपल्या ग्राहकांसाठी नव्या वर्षात मेजवानी आणलीय. नवे कोरे चार वेबसिनेमे येत्या वर्षांत रिलीज करणार असल्याची घोषणा नेटफ्लिक्सने आपल्या ट्विटर अकाउंटवरून केलीय.
हेही वाचा : पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे
‘एके वर्सेस एके’ हा त्यातलाच एक सिनेमा. या फिल्मचे डायरेक्टर विक्रमादित्य मोटवानी यांचा उडान हा सिनेमा खूप गाजला. ‘एके वर्सेस एके’मधे अनिल कपूर हा हिरो आणि अनुराग कश्यप हा डायरेक्टर अशी लढत असेल. या सिनेमात हिरो म्हणून अगोदर शाहिद कपूरचं नाव ठरलं होतं. सिनेमात त्याची बायको मीरा राजपूत किडनॅप झालीय अशी स्टोरी दाखवण्यात येणार होती. पण त्याच्यासोबतची बोलणी फिसकली. त्यामुळे अनिल कपूरच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. आता अनिल कपूर यांची मुलगी अभिनेत्री सोनम कपूर किडनॅप होणार आहे, असं दाखवण्यात येईल.
सिनेमात अनुराग कश्यप हिरोच्या भूमिकेत असला तरी नेटफ्लिक्सवर तोही आपला ‘चोक्ड’ नावाचा सिनेमा घेऊन येणार आहे. कॅशिअरचं काम करणाऱ्या एका सर्वसामान्य मुलीची ही गोष्ट असेल, असं एम गॉसीप डॉटकॉम या वेबसाईटने ट्विटरवर सांगितलंय. खर्चण्यासाठी हातात पैसा नसल्यानं ही कॅशिअर मुलगी हैराण झालेली असते. आणि गंमत म्हणजे रोज दुसऱ्याचे पैसे मोजण्यात तिचं आयुष्य जात असतं. एक दिवस तिला आपल्या स्वयंपाकघरातच भरपूर पैसे सापडतात. स्वयंपाकघरात हे पैसे पुरलेले असतात. त्यानंतर तिच्या आयुष्याला कसा टर्न मिळतो, हे सिनेमात दाखवलंय. सैय्यामी खैर आणि रोशन मॅथ्यू हे दोघं या सिनेमात लीड रोलमधे दिसणार आहेत.
‘एके वर्सेस एके’ बाबत स्वतः अनुराग कश्यप यांनीच ‘लाइवमिंट’ला एक मुलाखत दिलीय. ते म्हणतात, 'नेटफ्लिक्स मला नेहमीच घरासारखं वाटतं. नेटफ्लिक्ससाठी केलेल्या प्रत्येक प्रोजेक्टसोबत माझ्यातली क्रिएटिविटी वाढत जाते, असं मला जाणवतं. चोक्ड हासुद्धा असाच भन्नाट सिनेमा असेल. सगळ्याच वयातल्या प्रेक्षकांचा त्याला प्रतिसाद मिळेल.'
नेटफ्लिक्सवर असेच दर्जेदार सिनेमे दाखवले जातात. गेल्यावर्षी नेटफ्लिक्सवरची लस्ट स्टोरी नावाची एक वेबसिरीज खूप गाजली होती. करण जोहर या बॉलिवूडच्या नंबर एकच्या डायरेक्टरनं ती वेबसिरीज केलीय. बायकांची लैंगिकता या विषयावर चार वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बनवलेल्या चार गोष्टीतून या वेबसिरीजमधे प्रकाश टाकला होता. त्याच धर्तीवर आता करण जोहर पुन्हा ‘द अदर’ हा सिनेमा घेऊन येतोय. दोन माणसांच्या नात्यात कुण्या ‘अदर’नं म्हणजे तिसऱ्या माणसानं एंट्री केली तर काय होतं असं या सिनेमात वेगवेगळ्या गोष्टींवरून दाखवण्यात येणार आहे.
चार वेगवेगळ्या गोष्टींचा हा सिनेमा असेल. इंग्लिशमधे त्याला ऍनथोलॉजी असं म्हणतात. लाईवमिंटला दिलेल्या मुलाखतीत करण जोहर म्हणतात, ‘एकाच गोष्टीच्या वेगवेगळ्या पैलुंना एकत्र आणण्याचं आणि आपली क्रिएटिविटी वापरून आगळ्यावेगळ्या पद्धतीने ते पैलू उलगडून दाखवणं अशा प्रकारच्या ऍनथोलॉजीमुळे शक्य होतं. द अदर हा सिनेमा गुंतागुंतीच्या मानवी नातेसंबंधांविषयी बोलणारा आहे. नातेसंबंधांचेही वेगवेगळे पैलू या सिनेमातून आपल्या लक्षात येतील.’
हेही वाचा : #बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?
नसरूद्दीन शहा, हुमा कुरेशी, कलिकी कोचिन असे ओळखीचे चेहरे आपल्याला ‘फ्रीडम’ सिनेमा पाहताना फ्रेममधे दिसतील. डायरेक्टर दिवाकर बॅनर्जी यांचाही सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. यात एका सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातल्या तीन पिढ्यांची एकातएक गुंफलेली गोष्ट असेल. पण त्यात त्या कुटुंबाच्या खासगी भूतकाळाच्या माध्यमातून भारताच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
‘आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय माणसांची ती गोष्ट आहे. नात्यांची बंधनं, आई वडील, आजी आजोबा, मुलं, प्रेम, त्यांनी एकमेकांशी केलेला खोटेपणा आणि त्या खोटेपणातून निर्माण झालेलं गुपित बाहेर येणं याभोवती हा सिनेमा फिरतो. आपण काय खातो, आपली स्वप्न काय आहेत, आपण कशाविषयी पॅशनेट आहोत याविषयीचा हा सिनेमा आहे. आपण काय लपवतो आणि आपल्या माथ्यावर उजळपणानं काय घेऊन मिरवतो याविषयी हा सिनेमा बोलतो. एका भूतकाळाचा आणि आपण ज्याला इंडिया म्हणतो त्या भविष्यकाळाविषयीचा हा सिनेमा आहे’ असं चॅटर्जी यांनी एका मुलाखतीत सांगितलंय.
'भारतीय आणि जगभरातल्या प्रेक्षकांना खूप आवडतील असे सिनेमे बनवण्यावर आम्ही भर देतोय. भारतीय प्रेक्षकांसाठी सिनेमांमधे आम्ही वाढ करणार आहोत. नेहमीपेक्षा वेगळ्या, समाजानं ठरवून दिलेल्या सीमा ओलांडायला लावणाऱ्या गोष्टी आम्ही दाखवणार आहोत,’ असं नेटफ्लिक्स इंडियाच्या डायरेक्टर सृष्टी आर्या यांनी सांगितलं.
भारतीय संस्कृतीत गोष्ट सांगणं ही मोठी कलाच आहे. ससा कासवापासून ते रामायणापर्यंत आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो. लहानपण सरलं तरी या गोष्टींची आवड कमी होत नाही. आता नेटफ्लिक्सद्वारे गोष्टी सांगण्याची मॉडर्न पद्धत येतीय. काही दिवसांपूर्वीच भारतीय ग्राहकांसाठी नेटफ्लिक्सनं स्वस्तातला मासिक प्लॅन बाजारात आणलाय. नव्या पॅकप्रमाणे महिन्याला साधारण २०० रुपये चार्जेस पडतात.
स्वस्त दर आणि दर्जेदार कलाकृती या नव्या गोळाबेरजेतून नेटफ्लिक्स नवी कल्चर आणण्याच्या तयारीत आहे. त्याची सुरवात बॉलिवूडच्या दर्जेदार डायरेक्टर्सना सोबत घेऊन झालीय. हे चौघेही बॉलिवूडमधले आघाडीचे डायरेक्टर आहेत. त्यांची क्रिएटीविटी आणि सिनेमा रंजक बनवायच्या अफलातून स्कीलपुढे सगळ्यांनी हात टेकलेत. याला आता नेटफ्लिक्ससारख्या माध्यमाची जोड मिळतेय म्हणजे चार चांदच लागतील!
हेही वाचा :
सोनाली बेंद्रेः कॅन्सरशी पंगा घेणारी लढवय्यी
कैफी आझमींचं कवितेतलं स्वप्न साकारणारी शबाना