भारतावर पुन्हा पसरतंय कोरोनाचं सावट

१६ जून २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


दोन वर्षांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात झपाट्यानं होऊ लागला तेव्हाच आगामी काही वर्षं कोरोनासोबत जगावं लागणार, असं विषाणूतज्ज्ञांकडून सांगितलं जात होतं. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे आणि एका मर्यादेपलीकडे अथक प्रवास केल्यामुळे या विषाणूंची क्षमता कमी होत जाते. पण त्यांच्यातलं म्युटेशन सुरुच असतं. त्यातून नवे वेरियंट जन्माला येतात. सध्या अशाच दोन वेरियंटमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय.

आठ जूनला कोरोनाचे देशात चोवीस तासांत पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. देशात अजूनही २८ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हा आकडा धोकादायक नाही. पण महाराष्ट्र आणि तमिळनाडूसारख्या राज्यांत बीए-४ आणि बीए-५ वेरियंट आढळून आल्यानं काळजी वाढलीय.

दक्षिण आफ्रिकेत उगम

अर्थात, हे दोन्ही वेरियंट नवीन लक्षणांमधे गणले जात नाहीत आणि त्याचा गंभीर आजाराशीदेखील संबंध नाही. ओमायक्रॉननंतरचा नवीन वेरियंट म्हणून त्याकडे पाहता येऊ शकेल. मात्र या नव्या वेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यताय.

कारण हे दोन्ही वेरियंट सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आले होते आणि तेव्हाच ते मोठ्या प्रमाणावर संक्रमण करणारे आहेत, असं लक्षात आलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात उत्तरेकडच्या भागात असणार्‍या लिम्पोपो इथं या वेरियंटचा उगम झाल्याचं समोर आलं. तिथं लोकसंख्या खूप कमी आहे.

आतापर्यंत बहुतांश नवे वेरियंट हे शहरी भागातच आढळलेत, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. बीए-५ हा पहिल्यांदा २५ फेब्रुवारी २०२२ला दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर पूर्वेकडच्या जुलू-नताल या भागात आढळून आला. पण आज तो दक्षिण आफ्रिकेतल्या इतर प्रांतातही पसरलाय. यावरून याची संक्रामक क्षमता अधिक असल्याचं स्पष्ट होतं.

हेही वाचा: कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

ओमायक्रॉनपेक्षा वेगाने संक्रमण

विषाणू आणि त्यांच्या नवनव्या वेरियंटचं आकलन करताना त्यांची संक्रमणक्षमता आणि घातकपणा हे दोन निकष महत्त्वाचे ठरतात. विषाणूतज्ज्ञांच्या मते, बहुतेकदा अधिक वेगानं संक्रमण करणारे विषाणू तितक्या प्रमाणात घातक नसतात.

त्यामुळेच अशा विषाणूंचा संसर्ग होणार्‍यांमधे मृत्यूदर कमी आढळतो. अर्थातच, हे ठोकताळे असतात. त्यांना मागच्या काळातल्या अभ्यासाची जोड असली तरी प्रत्येक वेळी तशीच स्थिती राहील, असं ठोसपणानं सांगता येत नाही.

या पार्श्वभूमीवर आपल्याला या नव्या वेरियंटची लागणक्षमता आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचा बारकाईनं अभ्यास करावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेत बीए-४ वेरियंट रुग्णांची टक्केवारी जानेवारी २०२२मधे एक टक्का असताना ती एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ३५ टक्क्यांपर्यंत पोचली. एप्रिलच्या शेवटपर्यंत बीए-५ संसर्गबाधित रुग्णांचं प्रमाण २० टक्के होतं. यानुसार हा वेरियंट ओमायक्रॉनपेक्षा अधिक वेगानं पसरतो, असं लक्षात येतं.

भारतीय आरोग्य यंत्रणांची तयारी

दक्षिण आफ्रिकेत जानेवारीतच ओमायक्रॉनमुळे चौथी लाट आली आणि आता तिथल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी बीए-४ आणि बीए-५ चं वाढतं प्रमाण पाहता पाचव्या लाटेची शक्यता वर्तवलीय. त्यामुळे भारतातही ओमायक्रॉनच्या रूपातून आलेल्या तिसर्‍या लाटेनंतर आता चौथी लाट येऊ शकते, असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे.

त्याद़ृष्टीनं केंद्रीय यंत्रणांबरोबरच राज्य सरकारांच्या आरोग्य यंत्रणाही तयारीला लागल्या आहेत. कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात येतंय. तसंच आपत्कालीन स्थिती ओढावल्यास ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठीही आरोग्य प्रशासन कामाला लागलंय.

मुळातच ऋतू बदलांच्या काळात सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांचं प्रमाण वाढताना दिसतं. कोरोना विषाणू संसर्गानंतर उद्भवणारी लक्षणेही याच धाटणीची असल्यामुळे बहुतेक जणांचं त्याकडे दुर्लक्ष होतं.

पण हे दुर्लक्षच संक्रमण वाढीस हातभार लावणारं ठरतं. मुळातच आरोग्यशास्त्रानुसार कोणत्याही रोगाचं निदान जितक्या लवकर होईल, तितकं त्याच्यावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. कोरोना संक्रमणाच्या मागच्या तीन लाटांमधेही ही गोष्ट प्रकर्षानं जाणवलीय.

हेही वाचा: एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

आता हलगर्जीपणा नको

आज कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे दोन डोस मिळाल्यामुळे भारतीय नागरिकांचं सुरक्षा कवच हे दक्षिण आफ्रिकेतल्या नागरिकांच्या तुलनेत अधिक सक्षम आहे. भारतीय नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. त्यामुळेच पहिल्या किंवा दुसर्‍या लाटेप्रमाणे भारताची स्थिती ढासळणार नाही, हे निश्चित आहे.

पण तरीही नागरिकांनी खबरदारीच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. तसंच याबद्दल शासन यंत्रणांनीही सजग राहणं गरजेचं आहे. सततच्या लाटांमुळे कोरोनाबद्दल समाजात गांभीर्यभाव कमी झालाय. पण हलगर्जीपणाचा परिपाक कोरोनाची नवीन लाट येण्यात होऊ शकतो, हे लक्षात घ्यायला हवं.

सद्य:स्थिती पाहता, कोरोनाची तपासणी पूर्वीसारखीच काटेकोरपणे होतेय की नाही, यावर आगामी स्थिती अवलंबून असणार आहे. त्यामुळे लक्षणं दिसताच लोकांनी तपासणीबद्दल टाळाटाळ करू नये आणि त्या यंत्रणेतही त्रुटी राहता कामा नयेत.

बूस्टर डोसही गरजेचा

विषाणूंचं संक्रमण ही एक नैसर्गिक प्रक्रियेतली घटना आहे. विषाणूंच्या विश्वाचा आणि त्यांच्यात होणार्‍या बदलांचा अभ्यास आणि संशोधन आजही सुरु आहे त्यामुळेच त्याबद्दल भविष्यातली भाकितं वर्तवणं हे तितकंसं सोपं नाही. म्हणूनच ही चौथी लाट आहे का? पाचवीही येईल का? या प्रश्नांची उत्तरं ठोसपणानं सांगता येणार नाहीत.

एक गोष्ट निश्चित की, कोरोना संसर्ग हा कमी झालेला असला तरी तो पूर्णपणानं थांबणार नाही. त्याच्या स्वरूपात बदल होतोय आणि जोपर्यंत स्वरूप बदलत राहील, तोपर्यंत चिंता कायम राहील. विषाणू हे निसर्गसाखळीतले एक घटक आहेत. त्यांचं अस्तित्व मानव पुसून टाकू शकत नाही. त्यामुळे आपण केवळ बचावात्मकतेवर अधिक भर देणं आवश्यक आहे.

यासाठी काळानुसार लसीकरणात आणि उपचारात सुधारणा करणं गरजेचं आहे, जेणेकरून कोरोना स्थितीचं गांभीर्य वाढणार नाही. भारतात लसीकरण मोहीम यशस्वी झाली असून, याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेलीय. पण आता नव्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बूस्टर डोस घेणंही तितकंच महत्त्वाचंय. दुर्दैवानं या आघाडीवर सध्या जराही उत्साहवर्धक वातावरण दिसत नाही. कोरोना विरोधाच्या लढाईत ही शिथिलता जोखमीची ठरू शकते.

कोरोनाच्या नव्या लाटेचा सामना किती समर्थपणे करतो, यावरच आपला पुढचा प्रवास अवलंबून असणार आहे. आपण बदलत्या संसर्गाला ओळखू शकतो, म्हणूनच लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी सरकारी प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत मदत करायला हवी. पर्यवेक्षण, तपासणी, निदान आणि संशोधन यावर लक्ष केंद्रित करतच आगामी वाटचाल करावी लागणार आहे.

हेही वाचा: 

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव