नव्या औषधामुळे अल्झायमरचा गुंता सुटणार?

०७ ऑक्टोबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


औषध नसलेला आजार अशी ओळख असलेल्या अल्झायमर म्हणजेच स्मृतिभ्रंशावर औषध सापडल्याचा दावा केला गेलाय. कोरोनानंतर या आजाराचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. जगभरात आज या आजाराचे ५ कोटी पेशंट असून, भारतात दरहजारी चार जणांना हा आजार आहे. येत्या दहा वर्षात याचं प्रमाण दुप्पट होईल, अशी भीतीही व्यक्त होतेय. त्यामुळे यावरचं औषध वैद्यक क्षेत्रातलं महत्वाचं पाऊल समजलं जातंय.

वय वाढलं की माणसाची स्मरणशक्ती कमी होत जाते, हा सगळीकडे असलेला सर्वसाधारण समज आहे. पण गेल्या काही दशकांत औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळे माणसाच्या मेंदूवर कमालीचा ताण येऊ लागलाय. त्यामुळे स्मृतिभ्रशांचा आजार वेगळ्याच पातळीवर पोचलाय.

औषध नसलेला आजार

वाढत्या वयामुळे होणारं साधारण विस्मरण आणि डिमेन्शिया किंवा अल्झायमर या आजारामुळे येणारं विस्मरण यांच्यात तुलनात्मकदृष्ट्या खूप फरक आहे. हा आजार झालेली माणसं स्वतःच्या नातेवाईकांची ओळख, जेवण-खाणं, घड्याळाच्या वेळा एवढंच काय घराचा पत्ताही विसरतात. त्यामुळे हा आजार आजच्या काळातला सर्वात आव्हानात्मक आजार म्हणून ओळखला जाऊ लागलाय.

या आजारावर अजून तरी कुठलंच औषध उपलब्ध नाही. हा आजार कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा यशस्वी होण्याचा दर कर्करोगापेक्षाही कमी आहे. कर्करोगासाठी औषधं वाया जाण्याचा दर ८१ टक्के आहे, तर अल्झायमरसाठी तो ९९.६ टक्के एवढा आहे. यामुळेच या रोगाला रोखण्यासाठी तो होऊच न देणं, एवढंच आज आपल्या हाती आहे.

आज बाजारात जी औषधं या आजारासाठी उपलब्ध आहेत, ती या स्मृतिभ्रंशांचा वेग कमी करणारी औषधं आहेत. आता नव्यानं शोधलं गेलेलं औषधही असंच आहे. पण त्याचा यशस्वी होण्याचा दर जास्त आहे. त्यामुळे त्याच्याकडे एक नवी आशा म्हणून पाहिलं जातंय. ईआयएसएआय आणि बायोजेन यांनी शोधलेल्या या ‘लेकॅनमेब’ नावाच्या चाचणीची बातमी रॉयटर्स या न्यूज एजन्सीने प्रसिद्ध केलीय.

हेही वाचा: ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

काय आहे नवं औषध?

ईआयएसएआय आणि बायोजेन यांनी आपलं औषध अल्झायमर रोखण्यासाठी उपयुक्त असल्याचा दावा या आधी १५ वेळा केलाय. हा सोळावा प्रयत्न आहे. तरीही यावेळी शोधलं गेलेलं औषध हे सर्वाधिक यशस्वी ठरलेलं औषध आहे. त्यामुळे हे औषध आधीच्या औषधांपेक्षा यशस्वी ठरण्याची शक्यता असल्याचं सीएनएन या न्यूज एजन्सीचं म्हणणंय.

साधारणतः माणसाच्या मेंदूच्या नेहमीच्या कार्यपद्धतीत होणारा बिघाड, हे या आजाराचं मुख्य कारण आहे. मेंदूत अनेक सूक्ष्म वाहिन्या, मज्जातंतूंचं जाळं असतं. हे जाळं एकमेकांशी गुंतागुंतीच्या पद्धतीनं जोडलेलं असतं. या जाळ्यांमधून ऍमिलॉईड नावाच्या प्रथिनाचं प्रमाण वाढलं की स्मृतिभ्रंशाचा धोका बळावतो. या ऍमिलॉईडचा थर रक्तवाहिन्यांमधे जमायला सुरवात होते आणि रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे स्मृतिभ्रंशाचा आजार होण्याची शक्यता वाढते.

लेकॅनमेब हे औषध एक अँटीबॉडी ड्रग असून, ते ॲमिलॉईड या प्रथिनाच्या गुठळ्या कमी करायला मदत करतं. त्यामुळे या औषधाने डिमेन्शिया आणि अल्झायमरच्या पेशंटसाठी आश्वासक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा या औषधनिर्मात्यांचा दावा आहे. या औषधाची चाचणी १८०० पेशंटवर करण्यात आली. १८ महिन्यांच्या चाचणीनंतर त्यातल्या २७ टक्के पेशंटच्या स्मृतिभ्रंशांची वाढ मोठ्या प्रमाणात रोखली गेली. आजवरच्या चाचण्यांमधली ही सर्वाधिक यशस्वी चाचणी असल्याचं या औषधाच्या संशोधकांचं म्हणणं आहे.

या औषधावर टीका का होतेय?

लेकॅनमेबचं जसं कौतुक होतंय, तशीच टीकाही होतेय. या औषधासाठी निवडलेली सँपल साइज ही जरी मोठी असली तरी ती निवडक होती. त्यामुळे त्यात सकारात्मक प्रतिसाद मिळण्यासाठी योग्य अशाच लोकांना या औषधाच्या चाचणीसाठी निवडलं गेलं अशीही टीका होतेय. या औषधामुळे होणाऱ्या परिणामाचा अजून पूर्ण अभ्यास झालेला नाही.

या औषधामुळे मेंदूला सूज येण्यासारख्या घटना घडण्याची शक्यता आहे. फक्त ती शक्यता अपवादात्मक मानायची की त्यावर गांभीर्याने अधिक संशोधन करायचं, याबद्दल स्पष्टता दिसत नाही. तसंच उच्च रक्तदाब, मधुमेहासारख्या आजाराच्या पेशंटनी या औषधाला वेगळा प्रतिसाद दिलाय. यावर अजून पूर्ण काम झालेलं नाही. या औषधाच्या किंमतीबद्दलही अजून संभ्रमाची अवस्था आहे. 

हेही वाचा: एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

भारतातलं चित्र काय?

‘सिल्वर इनिंग्स’ ही संस्था गेली अनेक वर्षं डिमेन्शिया आणि अल्झायमरच्या पेशंटसाठी काम करतेय. त्या संस्थेचे अध्यक्ष शैलेश मिश्रा यांनी कोलाजशी बोलताना म्हटलंय की, 'हे औषध रोग बरं करणारं औषध नसून, त्याची वाढ रोखणारं आहे, हे आधी लक्षात घ्यायला हवं. आज या आजारामुळे येणारं परावलंबित्व पाहता, ही मोठीच गोष्ट आहे. पण, अजूनही या औषधाला परवानगी मिळालेली नाही.'

सर्व चाचण्या होऊन हे औषध भारतात कधी येईल, याबद्दल अद्यापही साशंकता आहे. तसंच, हे औषध आधीच्या औषधांप्रमाणे विशेष परिणामकारक ठरलं नाही, तर पुन्हा एकदा वाट पाहण्याशिवाय आपल्या हातात काही राहत नाही. औषधोपचाराबद्दल ही परिस्थिती असताना, मुळात या रोगाबद्दल लोकांमधे जागरुकता कशी वाढेल, याकडे कोणीच लक्ष देताना दिसत नाही.

आज या रोगाचं प्रमाण एवढं वाढत असतानाही आपल्या देशात पुरेशी मदत केंद्र उपलब्ध नाहीत. या पेशंटना विशेष काळजीची गरज असून, त्यासाठी संपूर्ण यंत्रणा राबवणं आवश्यक आहे. साधारणतः स्मृतिभ्रशांसाठी कायमच ॲलोपथीवर जोर दिला जातो. पण या औषधांचे परिणामही तेवढेच आहेत, असंही मिश्रा यांचं म्हणणं आहे. या आजारावर उत्तम उपचार पद्धती शोधण्यात भारताला मोठी संधी आहे.

'ॲलोपथीचे दुष्परिणाम पाहता, भारताच्या आरोग्य खात्याच्या माध्यमातून आपल्याकडच्या आयुर्वेदीक, होमिओपथी, युनानीसारख्या पर्यायी पद्धतीचा वापर करून या आजाराला रोखण्यावर काम करायला हवं. आमचा असा अनुभव आहे की, साधारणतः विविध पद्धतीच्या थेरपी, संगितोपचारासारख्या उपायांनी या पेशंटना फरक पडतो. त्यामुळे फक्त फार्मा उद्योगाकडून लादल्या जाणाऱ्या औषधांवर अवलंबून न राहता, या आजारावर नव्यानं विचार करायला हवा.' असं मिश्रा म्हणतात. 

आपण काय करायला हवं?

आता स्मृतिभ्रशांवर सापडलेल्या औषधाबद्दल जगभरात मतमतांतरं असताना, आपण मात्र या आजाराबद्दल सज्ञान होणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे या आजाराच्या प्रमाणात वाढ होत असल्याचं आता स्पष्ट होतंय. मधुमेह, उच्च रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल, धूम्रपान यामुळे या आजाराची शक्यता वाढते.

त्यामुळे आपला आहार-विहार कसा योग्य राहील याची काळजी आपण प्रत्येकानं घ्यायला हवी. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखणं हाच हा आजार रोखण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी उत्तम आहार, योग्य व्यायाम, मानसिक आरोग्य उत्तम राहील याची काळजी घ्यायला हवी.

साधारणतः स्मृतिभ्रंश होऊ नये म्हणून नातेसंबंध सुदृढ ठेवणं, मेंदूला चालना मिळेल असे उपक्रम करत राहणं, सतत कार्यरत राहणं, पुरेशी झोप घेणं असे उपाय सांगितले जातात. पण या सर्वासोबत आपण माणूस म्हणून या आजारात असलेल्या पेशंटना मदत करण्यासाठी पुढे आलो, तर आपोआपच आपल्याला या आजाराबद्दलही कळेल आणि हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची याचीही कल्पना येईल.

हेही वाचा: 

कोरोनाचा प्रादुर्भाव ही माणसाचीच चूक आहे!

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

ईबोलापासून नायजेरियाला वाचवणाऱ्या डॉक्टरच्या सन्मानाबद्दल अबोला

या आजींनी आत्ता कोरोनाला आणि १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूलाही हरवलंय