पंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं

२० सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी मराठी साहित्यातला माईलस्टोन ठरली. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा’ घेण्यात आली होती. ‘हिंदू’तल्या पात्रांवर एक वेगळी कादंबरी लिहायची असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. या स्पर्धेत एकमेव बक्षिस मिळालं ते अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतलं पान’ या नव्याकोऱ्या कादंबरीला. त्यांची ही कादंबरी मॅजेस्टिककडून लवकरच बाजारात येणार आहे. त्यापूर्वी त्यातला एक भाग इथं देत आहोत.

काही महिन्यांपूर्वी त्यांना प्रा. महापात्रा सरांनी ‘बॉडीलाईन’ नावाची बीबीसीने बनवलेली टीवी मालिका दाखवली. आठ दहा एपिसाडची पूर्ण मालिका दाखवली नाही. त्यातली फक्त दोनच दृश्य दाखवली. सरांनी आधी ही मालिका कशाबद्दल आहे असा प्रश्न विचारला. तेथे बरेच विद्यार्थी होते ज्यांना क्रिकेटचा गंध नव्हता. ती सिरीअल १९३० च्या दशकात इंग्लंड— ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट सामन्यांदरम्यान घडलेल्या गोष्टींबद्दल होती.

गुलाबला क्रिकेटमधे फार इंटरेस्ट होता. त्याला ‘बॉडीलाईन’बद्दल थोडेसे माहिती होते. त्याने हात वर केला आणि लगेच सरांनी त्याला माहिती देण्यास सांगितले. तेव्हा क्रिकेट जगतावर इंग्लंडचे राज्य होते. अचानक ऑस्ट्रेलियात डॉन ब्रॅडमन नावाचा तरुण फलंदाज समोर आला आणि त्याने दणादण सेंच्युऱ्या मारायला सुरूवात केली. यातून सतत ऑस्ट्रेलियाचा विजय व्हायचा. या ब्रॅडमनला कसं रोखायचे याबद्दल गंभीर चर्चा इंग्लंडच्या वृत्तपत्रांतून सुरू झाली. 

तेव्हा इंग्लंडचा कप्तान होता डग्लस जार्डीन, एका लॉर्डचा मुलगा, ऑक्सफर्ड केंब्रिजमधे शिकणारा. त्याला कुठून तरी कळतं की तिकडच्या धारावीसारख्या गरिबांच्या वस्तीत लारवूड नावाचा एका खाण कामगाराचा मुलगा आहे, जो तुफान वेगाने बॉलिंग करतो. कोचच्या सल्ल्याने जार्डीन कार घेऊन लारवूडला भेटायला झोपडपट्टीत जातो आणि ‘उद्यापासून प्रॅक्टीसला ग्राऊंडवर ये’ असे सांगतो. गुलाबचे निवेदन इथपर्यंत आल्यावर महापात्रानं त्याला थांबवले आणि म्हणाले, 

‘थँक्स गुलाब फॉर दॅट वंडरफुल नॅरेशन. यू आर अ गुड स्टोरी टेलर. फ्रेंड्स, लेट्स नाऊ सी दॅट सीन व्हेअर जार्डीन मिटस लारवूड. प्लीज वॉच केअरफुल्ली.’

हेही वाचा : मनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत

रूममधील लाईट घालवले आणि वीडियो सुरू झाला. सिरीअल ब्लॅक अँड व्हाईट होती. जार्डीनची कार थांबते. तो उतरतो आणि लारवूड कोठे राहतो याची चौकशी करतो. कोणी तरी लारवूडला येथे घेऊन येतो. या दहा पंधरा सेकंदात प्रेक्षकांना लंडनच्या झोपडपट्टीतील दारिद्रय दिसते. फाटके बनियन घातलेला, मळलेले शरीर असलेला लारवूड येतो. जार्डीन त्याला ‘उद्यापासून प्रॅक्टीसला ये’ म्हणून सांगतो. लारवूड होकार देतो आणि शेकहँड करण्यासाठी हात पुढे करतो. जार्डीन त्याच्याकडे कमालीच्या तुच्छतेने बघत, पँटच्या खिशातले हात बाहेर न काढता, अतिशय रागीट आवाजात ‘थँक्यू’ म्हणतो आणि चालायला लागतो.

दृश्य संपवल्यावर रूममधले दिवे लागले आणि महापात्रांनी विचारले ‘येस. कॉमेंट्स प्लीज.'

रूममधे शांतता पसरली. कोणी काही बोलले नाही. कोणाच्या काही लक्षातच आलं नाही. या म्हाताऱ्याने आपल्याला हे सर्व का दाखवले याचा कोणाला उलगडा होत नव्हता. ओरिसातून आलेली अनुराधा सत्पथी म्हणाली ‘सॉरी सर. बट आय डोंट थिंक एनी ऑफ अस हॅव अंडरस्टूड व्हॉट यू आर ट्रायिंग टू टेल अस.'

‘इज दॅट सो?’ महापात्रांच्या आवाजात अविश्वास भरलेला होता.

गुलाब चटकन म्हणाला ‘सॉरी सर, बट ऍज अनुराधा हॅज सेड वुई रीअली हॅव नॉट अंडरस्टूड.’

‘ओके. लेटस सी इट वन्स अगेन. लाईटस ऑफ अँड वीडियो ऑन.’

पुन्हा तो अर्धा मिनिटाचा वीडियो बघितला. तरीही कोणाची टयूब पेटली नाही. सर्व त्रासले होते. आता हा क्रॅक म्हातारा किती वेळा हा शॉट बघायला लावेल सांगता येत नाही!

‘ओके. लेटस किक ऑफ अवर डिस्कशन. अनुराधा, यू टेल अस वन्स अगेन व्हॉट वुई हॅव सीन.’

अनुराधाने चटकन सांगितले.

‘सी दॅट शॉट, व्हेअर जार्डीन फ्लॅटली रिफ्युजेज टू शेक हंडस वुईथ लारवूड. इज दॅज नॉट अनटचॅबिलीटी ऑफ अ काईंड?’

सर्वांचे डोळे विस्फारले. काही एकमेकांकडे बघायला लागले.

गुलाब म्हणाला ‘सर, कॅन वुई सी दॅट अगेन ?’

‘व्हाय नॉट?’

परत अंधार झाला, परत वीडियो सुरू झाला, संपला. आता प्रत्येकाचा चेहरा विस्मयचकीत झालेला होता. इंग्लंडमधे अस्पृश्यता? प्रत्येक जण शेजाऱ्याशी हळू आवाजात बोलायला लागला.

‘नो प्रायव्हेट डिस्कशन प्लीज. लेट अस सी वन मोअर वीडियो क्लीपिंग. लाईट्स ऑफ.'

आता सर्व विद्यार्थी सरसावून बसले. सर्वांच्या डोळयांत ज्ञानतृष्णा दिसत होती आणि महापात्रा सरांबद्दल अथांग कृतज्ञता. हा माणूस दर महिन्या, दोन महिन्यांत असं काही बोलतो, वाचायला लावतो किंवा आजच्यासारखं काही दाखवतो की विद्यार्थी नव्या दिशेने विचार करायला लागतात. पुन्हा ‘बॉडीलाईन’चा दुसरा कोणता तरी एपिसोड सुरू झाला. यात इंग्लंडची टीम ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे आणि आगगाडीने कोणत्या तरी शहराकडे निघाली आहे. लॉर्डचा मुलगा असलेला डग्लस जार्डीन पहिल्या वर्गाच्या डब्यांत ऐटीत बसला आहे तर गरीब खाण कामगाराचा मुलगा लारवूड तिसऱ्या वर्गाच्या डब्यांत बसला आहे.

हेही वाचा : नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास

मोजून तीस-चाळीस सेकंदाचं हे दृश्य होते. आता मात्र कोणाला काहीही सांगण्याची गरज भासली नाही. त्यांना मुद्दा चटकन समजला. लॉर्डचा मुलगा आणि खाण कामगाराच्या मुलगा यांच्यातील ‘वर्गीय अंतर’ आणि ‘वर्णीय अंतर’ स्पष्ट दिसत होते. हे दृश्य पुन्हा बघण्याची गरज भासली नाही. लाईट लावण्यात आले. विद्यार्थी आता बरेच उत्तेजित झाले होते. महापात्रांनी सुरूवात केली ‘सिमिलरली इव्हन इन जपान यू वईल फाइण्ड सेपरेट कॉलनीज फॉर स्कॅवेंजर्स, दॅट टू लोकेटेड वे आऊटसाईड द मेन सिटीज. दे आर ब्रॉट टू मेन सिटी इन द वी अवर्स अँड दे हॅव क्लीन द सिटी दे आर ड्रिवन आऊट, नॉट टू नोटीस्ड बाय अदर्स.’

महापात्रा सर्वांकडे नजर फिरवली आणि पुढे म्हणाले, ‘धीस डज नॉट मीन दॅट सच प्रॅक्टीसेस आर जस्टीफायबेल. दे आर बॅड अँड मस्ट बी स्टॉपड. अवर एंडेवर हिअर इज टू अंडरस्टँड द ग्लोबल नेचर ऑफ एक्सप्लॉयटेशन ऑफ वन क्लास ऑफ पिपल बाय अदर क्लास.’

सत्त्तरीत आलेल्या महापात्रांना जरा दम लागला. ते थांबले पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. विद्यार्थ्यांचे ‘ते’ ज्ञानाचे डोळे उघडणारे काही शिकवले की त्यांच्या चेहऱ्यावर असे समाधान दिसत होते. आपण शिक्षकाच्या भूमिकेला न्याय दिला, याचा तो आनंद असायचा.

‘आपण चर्चा पुढे नेऊ या. फ्रान्समधेसुद्धा अनेक शतकं हा प्रकार होता. संडास साफ करणाऱ्यांचा वेगळा वर्ग होता. त्यांना ‘कॅगट किंवा कॅटग’ किंवा असेच काही तरी म्हणत असत. त्यातूनच ‘कॅटेगरी’ हा शब्द निर्माण झाला. जसंजसं तंत्रवैज्ञानिक प्रगती होत गेली तसतसे ही घाणेरडी कामं मशिन्स करू लागली,’ त्यांनी पुन्हा दम घेतला.

वर्गात शांतता होती. भारतातील जातीव्यवस्थेचा सेमिनार पुढच्या आठवडयात होता. त्यात आपल्या विद्यार्थ्यांनी आलेल्या ज्येष्ठ अभ्यासकांना विचार करायला लावणारे प्रश्न विचारावेत अशी महापात्रांची इच्छा होती. त्यांना या संस्थेचा, ‘स्कूल ऑफ सोशिऑलॉजी’ चा फार अभिमान होता. ते येथेच एमए, एमफील, पीएचडी झाले आणि तेव्हापासून निवृत्त होईपर्यंत येथेच शिकवले. आता त्यांना युजीसीने ‘मानद प्राध्यापक’ हे पद दिले.

त्यांनी बोलायला सुरुवात केली. ‘अमेरिकेतल्या गुलामगिरीबद्दल तर बोलायलाच नको. तेथे अस्पृश्यता नव्हती पण गुलामांचा बाजार होता. आता ‘गुलामगिरी’ वाईट की ‘अस्पृश्यता’ वाईट असा खुळचट वाद घालण्यात काही अर्थ नाही. पण काही अभ्यासक आहेत जे एक वेळ गुलामगिरी समर्थनीय ठरेल पण अस्पृश्यता नाही अशी मांडणी करतात. मला ती मान्य नाही. तुम्ही या मुद्दाचा स्वतंत्रपणे विचार करा आणि पुराव्यांवर आधारित मतं बनवा.’

‘आणखी एक लक्षात असू द्या. अमेरिकेतील गुलामगिरी इब्राहम लिंकनने संपवली हे अर्थातच खरं आहे. त्याबद्दल सारे जग त्याला ‘महामानव’ म्हणते. पण त्याने ‘गुलामगिरी संपवण्यासाठी युद्ध सुरू केले’ की ‘देश तुटू नये’ यासाठी केले? याचासुद्धा शांतपणे विचार केला पाहिजे. अमेरिकेच्या दक्षिण भागातील अनेक राज्यं देशातून फुटून निघण्याचा विचार करत होती. तसे होऊ नये म्हणून त्याने दक्षिणेतील राज्यांशी युद्ध केले आणि त्यांचा पराभव केला. त्यानंतरच त्याला गुलामी संपवता आली. तरी ती तशी संपली नाहीच. तुम्हाला माहिती असेलच की १९६४ साली म्हणजे गुलामी कायद्याने गुलामी संपवल्यानंतर बरोबर शंभर वर्षांनंतर अमेरिकेतील निग्रोंना मतदानाचा अधिकार मिळाला, तोपर्यंत नव्हता! १८६४ ते १९६४ दरम्यान ते नागरिक होते, पण मतदान करू शकत नव्हते.’

‘शिवाय लिंकनला ते युद्ध जिंकण्यासाठी काय काय करावे लागले हे समजून घ्यायचे असेल तर अलिकडेच आलेला ‘लिंकन’ सिनेमा अवश्य बघा. आपण लवकरच हा सिनेमा बघू आणि त्यावर चर्चा करू. लिंकनला प्रत्येक टप्प्यावर समाजातील या ना त्या घटकाचा पाठिंबा मिळवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे समझोते करावे लागले, देवाणघेवाण करावी लागली. अर्थात त्यामुळे त्याचं मोठेपण कमी होत नाही. मात्र आपल्यासारख्या अभ्यासकांचे आकलन आणि सर्वसामान्य माणसाचे आकलन यात गुणात्मक फरक असलाच पाहिजे.’

हेही वाचा : पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!

त्यांना दम लागला. ते थांबले. रूममधे शांतता पसरली. गुलाब उत्स्फुर्तपणे उभा राहिला आणि टाळया वाजवू लागला. इतरांनी त्याला तितक्याच उत्स्फूर्तपणे साथ दिली. महापात्रांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. त्यांनी कोपऱ्यातील वॉकिंग स्टीक उचलली आणि जोरात जमिनीवर आपटून शांतता पसरवली. ते जुन्या पिढीचे शिक्षक. या प्रकारे भावनांचा आविष्कार केलेला त्यांना आवडत नसे.

‘ओल्ड मॅन इज जिनियस यार,' अनुराधाला राहवले नाही. 

‘वुई आर इंडीड प्रीविलेजड टू गेट हीज गाईडन्स.'

सर्व हळूहळू पांगले. गुलाब शांतपणे चालत चालत विचार करत होता. कोणता चिवटपणा आहे जातीव्यवस्थेत की जी आजही टिकून आहे? गुलाबने दुसऱ्या दिवशी लायब्ररीत बसून जातीव्यवस्थेबद्दल काही ग्रंथ चाळले. त्याच्या लक्षात आले की जातीव्यवस्थेची समूळ समीक्षा करणारे भरपूर ग्रंथ आहेत. पण जातीव्यवस्था का टिकून आहे याचे चिकीत्सा करणारे ग्रंथ किंवा लेख फारच तुरळक आहेत. त्याला आठवले की महापात्रा सरांनी एकदा वर्गात मेक्सिकन कवी ऑक्टोवियो पाझ याचा उल्लेख केला होता. हा डाव्या विचारांचा कवी १९६० च्या दशकात भारतात मेक्सिकोचा राजदूत म्हणून आला होता. तो भारतात तब्बल सहा वर्ष होता. तेव्हा त्याने भारतावर समाजशास्त्रीय स्वरूपाचे लेखन केलेले आहे. यात त्याने भारतातील जातीव्यवस्थेबद्दल दीर्घ लेख लिहला आहे.

गुलाब उठला आणि त्याने ग्रंथालयातील संगणकावर हे पुस्तक आहे का बघितले. दुर्दैवाने नव्हते. तो बाहेर पडला. मेट्रो आणि बस करत जे.एन.यू.ची लायब्ररी गाठली. तेथे ‘इन लाईट ऑफ इंडिया’ हे पाझचे पुस्तक होते. या पुस्तकात ‘द कॉस्मिक मॅट्रीक्स’ हा दीर्घ लेख होता. गुलाबने एका कोपऱ्यात बसून वाचायला सुरूवात केली. त्याच्या लक्षात आले की आपल्याच देशाकडे, आपल्याच समाजाकडे बाहेरून बघतात तेव्हा तो कसा दिसतो.

पाझने त्याच्या परीने जातीव्यवस्था समजून घेतली. त्याची काही निरीक्षणं गुलाबने स्वतःच्या नोंदवहीत लिहून घेतली.

Another element that has always perplexed the observers is the institution of castes... It has endured for at least two thousand years... caste must be distinguished from class... unlike our class system the sign of caste is religious, and not economic or political… besides their religious aspects, castes are groups ruled by councils that serve a political function in self government… Castes are mutual aid societies. They are not only co-operatives, such as ours, but also solidarity groups, genuine fraternities. Each individual is nearly always guaranteed help from other caste members…

हे सर्व वाचताना गुलाब रमून गेला. त्याला वाटले आपले अभ्यासक असं लेखन का करत नाही? जातीव्यवस्था समजून घेणे म्हणजे तिचे समर्थन करणे असे समीकरण का आहे? झाडून सर्व भारतीय अभ्यासक जातीव्यवस्थेबद्दल कठोर आवाजात बोलतात, पण कोणीही ती का टिकली याची चर्चा करताना दिसत नाही. पाझने म्हणता तशी ही व्यवस्था म्हणजे एक माठे ‘सोशल सिक्युरीटी सिस्टम’ आहे. या अंगाने विचार करायला हवा.

गुलाबला दिशा दिसायला लागली. त्याला वाटले की एम.फिल साठी हाच विषय घ्यावा. आता महापात्रा सर निवृत्त झाले असल्यामुळे ते त्याचे अधिकृत गाईड होऊ शकत नसले तरी नावासाठी कोणाचा तरी टिळा लावू आणि बाकीचे काम महापात्रांच्या मार्गदर्शनाखाली करू. त्याला माहिती होते की महापात्रांना त्याच्याबद्दल थोडे प्रेम होते. फुले आंबेडकराच्या महाराष्ट्रातून आला म्हणून त्यांना गुलाबबद्दल जिव्हाळा वाटत होता. महापात्रांना बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथप्रेमाबद्दल, त्यांच्या विद्वत्तेबद्दल फार आदर होता. त्यांच्या रूममधे मार्क्स आणि बाबासाहेब असे दोनच फोटो होते.

हेही वाचा : 

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीमागे आहे सुरस कथेचा इतिहास

१९४७ मधेच कोरोनासारख्या रोगाचं तंतोतंत वर्णन करणारी कादंबरी

१९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं

गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह

(कादंबरी majesticreaders.com वर उपलब्ध आहे.)