नदाल आणि जोकोविचला हरवणाऱ्या युवा कार्लोस अल्कारेझची गोष्ट

१५ मे २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


‘ग्रँड स्लॅम स्पर्धा’ या टेनिसपटूंसाठी नेहमीच प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. या स्पर्धांमधे तिशीनंतरही निर्विवाद वर्चस्व गाजवणार्‍या राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांना पराभूत करणं सोपी गोष्ट नसते. स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ या युवा खेळाडूनं एकाच स्पर्धेत या दोन्ही बलाढ्य खेळाडूंना पराभवाचा धक्का दिलाय. साहजिकच, हा खेळाडू टेनिस चाहत्यांसाठी ‘किमयागार युवा खेळाडू’ बनलाय.

राफेल नदाल, नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरर हे टेनिस जगतातले सध्याचे सर्वश्रेष्ठ खेळाडू मानले जातात. या खेळाडूंच्या प्रत्येक विजयाला दाद देणारे असंख्य चाहते आहेत. या खेळाडूंनी सतत जिंकत राहावं आणि युवा खेळाडूंना प्रोत्साहन देत राहावं, ही अपेक्षा त्यांची असतेच; पण त्याचबरोबर युवा खेळाडूंकडूनही जागतिक स्तरावर चमकदार यश मिळवावं, यासाठीही ते उत्सुक असतात.

अल्कारेझ या १९ वर्षीय खेळाडूनं गेल्या तीन-चार वर्षांमधे व्यावसायिक टेनिस क्षेत्रातल्या महत्त्वाच्या चार-पाच स्पर्धांमधे अजिंक्यपद पटकावत मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत. अल्पावधीतच त्यानं जागतिक क्रमवारीत पहिल्या दहा क्रमांकामधे झेप घेतलीय.

बालवयातलं स्पर्धात्मक प्रशिक्षण

अल्कारेझला टेनिसचं बाळकडू घरातच मिळालं. त्याचे वडील कार्लोस हे स्वतः अव्वल दर्जाचे टेनिसपटू आहेत, त्यामुळे अल्कारेझनेही टेनिस या खेळातच करिअर करण्याचं निश्चित केलं नाही तर नवलच! त्याची कारकीर्द चांगली घडावी यादृष्टीनं कार्लोस यांनी स्वतः जातीनं लक्ष घातलं.

त्यांची स्वतःची आंतरराष्ट्रीय दर्जाची टेनिस प्रशिक्षण अकादमी असल्यामुळे दररोज अल्कारेझला सुरुवातीपासूनच स्पर्धात्मक सराव करण्याची संधी मिळाली. या अकादमीत फिजिओ, मसाजिस्ट, विशेष क्रीडा वैद्यकीय तज्ञ, मानसिक तंदुरुस्ती तज्ञ, क्रीडा संशोधन तज्ञ, आहारतज्ञ अशा सर्व सुविधा असल्यामुळे अल्कारेझची उत्तम दर्जाचा टेनिसपटू घडवण्यासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी बालपणापासूनच झालीय.

या अकादमीमधून अनेक नामवंत खेळाडू तयार झालेत. लहानपणीच जर अनेक ज्येष्ठ खेळाडूंबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली तर आपोआपच युवा आणि लहान खेळाडूंवर क्रीडा विकासासाठी आवश्यक असणारे चांगले संस्कार घडतात. अल्कारेझसोबतही असंच काहीसं घडतंय.

वडलांच्या अकादमीमधे येणार्‍या ज्येष्ठ खेळाडूंकडून त्याला भरपूर मौलिक मार्गदर्शन मिळतं आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडून मौलिक सूचना मिळण्यासाठीही त्याची मानसिक तयारी असते. त्याशिवाय या अकादमीमधे येणार्‍या इतर खेळाडूंसोबत तो भरपूर स्पर्धात्मक सराव करत असतो.

हेही वाचा: कुणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला कसं हरवलं?

फेडररचा आदर्श घेऊन वाटचाल

कार्लोस यांच्या अकादमीत खेळाडूंबरोबरच अनेक वेळा स्पर्धांच्या निमित्तानं प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी येत असतात. अल्कारेझनं शालेय स्तरापासूनच अनेक स्पर्धा गाजवण्यास सुरवात केली. त्याचं हे यश प्रसार माध्यमांच्या नजरेतून सुटलं नाही. तो बारा वर्षांचा असताना दोन-तीन पत्रकारांनी ‘तुझा आदर्श खेळाडू कोण?’ असं विचारलं असता, अल्कारेझनं ‘रॉजर फेडरर याचा आदर्श माझ्यापुढे आहे,’ असं उत्तर दिलं.

खरं तर पत्रकारांना ‘स्पेनचा टेनिससम्राट नदाल’ असं उत्तर अपेक्षित होतं. तेव्हा त्यांनी पुन्हा अल्कारेझला, ‘फेडरर का आवडतो?’ असं विचारलं तेव्हा त्यानं उत्तर दिलं, ‘नदाल आणि जोकोविच यांचाही खेळ मला आदर्श वाटतो; मात्र फेडररचा संयमी आणि शांत स्वभाव मला जास्त प्रिय आहे. फेडररच्या खेळामधे अधिक जास्त नजाकत आहे.’

जागतिक दर्जाचं प्रशिक्षण

टेनिसचं प्राथमिक शिक्षण तसंच स्पर्धात्मक शैलीबद्दल आवश्यक ते प्रशिक्षण घेतल्यानंतर अल्कारेझनं वडलांच्या सल्ल्यानुसार जुआन कार्लोस फेरेरो यांच्या अकादमीत अव्वल दर्जाच्या टेनिस प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला.

टेनिसमधे काही खेळाडू असे आहेत की, ज्यांना ‘ग्रँड स्लॅम स्पर्धां’मधे नेत्रदीपक यश मिळवता आलेलं नाही. पण एक चांगल्या दर्जाचा प्रशिक्षक होण्यासाठी त्यांच्याकडे उत्तम गुणवत्ता असते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणारे खेळाडू कालांतरानं ‘ग्रँड स्लॅम स्पर्धा’ गाजवतात.

फेरेरो यांच्याकडे ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे नेत्रदीपक यशानं पाठ फिरवलीय; मात्र जागतिक किर्तीचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी नाव कमावलंय. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच अल्कारेझची पुढील वाटचाल सुरू झालीय. अर्थात, त्याला या वाटचालीकरिता आई-वडिलांकडून सर्वतोपरी पाठबळ मिळतंय.

हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

टेनिस करिअरची दिमाखदार सुरुवात

अल्कारेझनं दोन वर्षांपूर्वी व्यावसायिक टेनिस क्षेत्रात पदार्पण केलं. अवघ्या दोन वर्षांतच त्यानं मास्टर्स १००० ही स्पर्धा दोनवेळा जिंकलीय. त्याशिवाय त्यानं ‘मियामी ओपन’, ‘रिओ डी जानेरो’च्या ‘मास्टर्स’ आणि ‘बार्सिलोना कप’ या स्पर्धा जिंकल्या आहेत. अलीकडेच त्यानं ‘माद्रिद ओपन’च्या उपांत्यपूर्व फेरीत नदाल, उपांत्य फेरीत जोकोविच यांच्यावर सनसनाटी विजय मिळवला.

त्याची ही घोडदौड एवढ्यावरच थांबली नाही. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता खेळाडू अलेक्झांडर जेवेरेवलाही पराभूत करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. खरं तर घरच्या मैदानावर खेळताना स्थानिक वातावरणाच्या फायद्यापेक्षाही मानसिक दडपण जास्त असतं. कारण आपण जर हरलो तर घरच्या प्रेक्षकांसमोर आपली शान धुळीस मिळणार आहे, याचं दडपण असतं.

अल्कारेझनं याबद्दल कोणतंही दडपण घेतलं नाही. नदाल, जोकोविच आणि जेवेरेव यांच्याविरुद्ध खेळताना त्यानं अतिशय आत्मविश्वासानं खेळ केला. पराभवाची चिंता माझ्यापेक्षा त्यांना अधिक जास्त आहे, असा विचार करत अतिशय निश्चिंत मनानं तो या सामन्यांमधे खेळला आणि त्यानं आश्चर्यजनक विजय नोंदवले. आतापर्यंतच्या व्यावसायिक क्षेत्रात त्यानं अनेक श्रेष्ठ खेळाडूंवर मात केलीय आणि ऐतिहासिक पराक्रम केलेत.

चाहत्यांच्या उंचावलेल्या अपेक्षा

अल्कारेझ हा सहा फूट उंचीचा खेळाडू आहे. त्याचा फायदा त्याला मिळतो. वॉलीज, फोरहँड आणि क्रॉस कोर्ट फटके, जमिनीलगत परतीचे फटके, नेटजवळून प्लेसिंग अशी विविधता त्याच्या खेळात आहे. सर्व प्रकारच्या मैदानांवर परतीचे खणखणीत फटके तसंच वेगवान आणि अचूक सर्व्हिस करण्याबद्दल त्याच्या खेळात कमालीची सुधारणा झालीय.

अलीकडेच माद्रिदच्या स्पर्धेत लाल मातीच्या कोर्टवर त्यानं लाल मातीचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणार्‍या नदाल याच्यावर केलेली मात, ही आगामी फ्रेंच ओपनपूर्वीची अप्रतिम झलकच आहे. ‘ग्रँड स्लॅम’मधे त्याची कामगिरी अपेक्षेइतकी झाली नसली, तरी अजूनही या स्पर्धांमधे अव्वल कामगिरी करण्यासाठी आवश्यक असणारी परिपक्वता त्याच्या खेळात यायचीय.

अर्थात, तो जेमतेम एकोणीस वर्षांचा आहे आणि त्याला त्यादृष्टीनं अजूनही भरपूर संधी उपलब्ध आहेत. ‘ग्रँड स्लॅम स्पर्धां’मधे श्रेष्ठ खेळाडूंकडून चाहत्यांना विजेतेपदाची अपेक्षा असतेच; पण एखाद्या युवा खेळाडूनं या स्पर्धांच्या अजिंक्यपदावर नाव कोरलं तरी त्याचंही ते भरभरून कौतुक करत असतात. हे लक्षात घेतलं, तर अल्कारेझ हा भावी काळात नदाल, जोकोविच आणि फेडरर यांच्यासारखी विजेतेपदाची मालिका निर्माण करेल, अशीच टेनिस चाहत्यांना आणि टेनिसतज्ञांना खात्री वाटतेय.

हेही वाचा: 

योग दिवस २१ जूनला साजरा करण्यामागची दोन कारणं

दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं