जगाचं टेंशन वाढवणारा कोरोनाचा ओमायक्रॉन वेरियंट

०४ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


कोरोना वायरसच्या ओमायक्रॉन या नव्या वेरियंटमुळे जगभरात पुन्हा काळजीचं वातावरण आहे. ओमायक्रोनमधे डेल्टा वेरियंटपेक्षा ५० प्रकारची म्युटेशन झाली असून, त्यामधली ३० ते ३२ प्रोटिनशी संबंधित आहेत. त्यामुळे त्याची मानवी पेशीला संसर्ग करण्याची क्षमता दुपटीने वाढलीय. हा वायरस आफ्रिकन खंडातून बदलून आल्यामुळे जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे.

दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या भयछायेत असून भारतातली परिस्थिती आताशी काही प्रमाणात पूर्वपदावर येत असताना, दक्षिण आफ्रिकेतून पुन्हा निराशाजनक बातमी समोर आली. जानेवारी २०२० पासून चीनमधून कोरोनाचा सुरू झालेला प्रवास मार्च २०२० अखेर संपूर्ण जगात झाला.

सुरवातीला सर्वसामान्य लोक आणि संशोधकांची कोरोना वायरस हा एकच काहीतरी वायरस आहे, अशी समजूत होती. या समजुतीला तडा गेला जेव्हा ब्रिटनमधे ऑक्टोबर २०२०ला वायरसमधे झालेला बदल म्हणजे म्युटेशन दिसून आला. याच झालेल्या म्युटेशनमुळे ब्रिटनमधे डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ पर्यंत दुसरी लाट आली.

हेही वाचा: तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

ओमायक्रॉनचं मूळ बोत्सवाना देश

मार्च २०२१ला भारतामधे डेल्टा हा कोरोनामधला दुसरा बदल दिसून आला आणि यामुळे मार्च ते ऑगस्ट २०२१च्या दरम्यान भारतात दुसरी लाट आली. नोव्हेंबर २०२०ला ब्राझीलमधे ग्यामा हे वायरसचं म्युटेशन सापडलं त्यामुळे ब्राझीलमधे आलेली लाट अजूनही ओसरलेली नाही.

दक्षिण आफ्रिकेतून मे २०२०ला बीटा या नवीन वायरसचं म्युटेशन आलं. जगात घबराट पसरली. पण त्यावर नियंत्रण मिळवता आलं होतं. आता जे वायरसचं म्युटेशन सापडलं त्याचं मूळ दक्षिण आफ्रिका नसून बोत्सवाना या जवळच्या देशात त्याचा उगम असल्याचा काही लोकांचा दावा आहे.

त्या देशात दक्षिण आफ्रिकेसारखी अद्ययावत यंत्रणा नसल्याने तिथं त्याचं जीनोम सिक्वेन्सिंग करता आलं नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांत दक्षिण आफ्रिकेतल्या गौटेन्ग भागात अचानक कोरोनाचे पेशंट वाढल्यावर तिथलं स्थानिक प्रशासन जागं झालं आणि त्यानंतर त्यांना समजलं की, या पेशंटवाढीमागे नवीनच वायरसचं म्युटेशन आहे.

काय बदल झालाय?

मूळ कोरोना वायरस जो चीनमधे सापडला होता, त्याच्यावर काही प्रथिनं होती. त्या प्रथिनांमुळेच त्याला मानवी पेशीत जाण्याच्या मार्ग मिळतो. त्याला शास्त्रीय भाषेत स्पाईक प्रोटिन म्हणजेच 'ड प्रोटिन' म्हणतात. मूळ वायरसवर जेवढे ड प्रोटिन होते, त्याच्यात २८ प्रकारचे बदल होऊन ब्रिटनमधला अल्फा वेरियंट तयार झाला होता. अल्फा वेरियंटपेक्षा डेल्टा वेरियंटमधे ४० टक्के बदल होऊन तो अतिशय वेगाने लोकांना संसर्ग करत होता.

आताच्या ओमायक्रॉनमधे डेल्टा वेरियंटपेक्षा ५० प्रकारची म्युटेशन झाली असून, त्यामधल्या ३० ते ३२ ही ड प्रोटिनशी संबंधित आहेत. त्यामुळे त्याची मानवी पेशीला संसर्ग करण्याची क्षमता दुपटीने वाढलीय. त्याचबरोबर डेल्टा वेरियंटमुळे संसर्ग झालेला एक पेशंट सध्या फक्त एकालाच संसर्ग करतोय, तर तेच प्रमाण ओमायक्रॉनसाठी दोन आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने फक्त ७२ तासांमधे या वेरियंटला 'वेरियंट ऑफ कन्सर्न' म्हणजेच जगासाठी चिंतेचा प्रकार म्हणून जाहीर केलंय, तर डेल्टा वेरियंटला 'वेरियंट ऑफ कन्सर्न' जाहीर करायला एक महिन्याचा कालावधी गेला होता.

हेही वाचा: कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

आफ्रिकेतली सध्याची स्थिती

दक्षिण आफ्रिकेतल्या ओमायक्रॉनच्या उद्रेकामुळे हॉस्पिटलमधे पेशंटची वाढ झालेली दिसून आली नाही. पण यामागची वास्तविक स्थिती वेगळी असू शकते. सध्या जे पेशंट आहेत ते प्राथमिक संसर्ग झालेले असून, त्यापैकी बर्‍याच पेशंटना कोरोना आजार अजूनही प्रगती करत आहेत आणि बहुतेक नवीन संक्रमण तरुणांमधे आढळलंय.

या पेशंटमधे तीव्र थकवा असलेल्या वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या आणि वेगवेगळ्या वंशाच्या तरुणांचा समावेश आहे. एका सहा वर्षांच्या मुलामधेही हा वेरियंट सापडला आहे. याचबरोबर वृद्ध, प्रौढ किंवा कॅन्सर, मधुमेह असे आजार असणार्‍या आणि अतिशय कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती असलेल्या लोकांवर हा ओमायक्रॉन कसा परिणाम करेल, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

ओमायक्रॉनमुळे गंभीर आजार होतो की नाही, किंवा इतर प्रकारांपेक्षा कमी किंवा जास्त गंभीर आजार, हे आणखी एक किंवा दोन आठवडे स्पष्ट होणार नाही. प्राथमिक विश्लेषण असं सूचित करतं. सध्या दक्षिण आफ्रिकेतल्या गौतेंग प्रांतातल्या ८० टक्के पेक्षा अधिक कोरोना पेशंट हे ओमायक्रॉनचे असून हा संसर्ग वेगाने वाढतोय.

दुसरा महत्त्वाचा प्रश्न हाही संशोधकांच्या विचारधीन आहे की, ओमायक्रॉन हा डेल्टाची जागा घेऊ शकतो का किंवा ओमायक्रॉनमुळे डेल्टाचे पेशंट कमी होतील का? आफ्रिकेतल्या काही भागातून आलेल्या माहितीनुसार काही ठिकाणी अतिशय वेगाने ओमायक्रॉनने डेल्टाला मागे टाकलंय किंवा त्याची जागा घेतली आहे.

री-इन्फेक्शनची भीती

जगभरात आजच्या दिवशी कमीत कमी ६ लसी कोरोना लसीकरणासाठी उपयोगात असून, त्यात फायजर कंपनीची लस सर्वात जास्त म्हणजे २५० कोटी आणि त्याखालोखाल ऑक्सफर्ड- अस्त्राझेनेकाची कोविशिल्ड ही जवळपास २०० कोटी लोकांना दिली आहे. युरोपमधे फायजरची लस घेतलेल्या लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला दिसून आला आहे; तर आफ्रिकेतच ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेका घेतलेल्या लोकांना याचा संसर्ग झालेला दिसून आला आहे.

शास्त्रज्ञ सध्या वायरसमधे होणार्‍या उत्परिवर्तनांच्या संख्येने चिंतेत आहेत आणि त्यापैकी काही आधीच नैसर्गिक किंवा लसीमुळे तयार झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीचं संरक्षण टाळण्याच्या क्षमतेशी जोडलेले आहेत. हे सैद्धांतिक म्हणजे गणितीय अंदाज आहेत. पेशंटच्या शरीरात तयार झालेली अल्फा, बीटा, ग्यामा आणि डेल्टा वेरियंट विरुद्धच्या अँटिबॉडीज ओमायक्रॉनविरुद्ध किती प्रभावीपणे काम करतात, याची चाचणी घेण्यासाठी वेगाने अभ्यास केले जात आहेत.

आधी ज्या लोकांना अल्फा, बीटा, ग्यामा आणि डेल्टा वेरियंटचा संसर्ग झाला होता त्यांना पुन्हा ओमायक्रॉनचा संसर्ग होईल का हेसुद्धा याक्षणी निश्चितपणे सांगता येत नाही. पण बदललेल्या ओमायक्रॉनच्या सुरवातीच्या गुणधर्मावरून री-इन्फेक्शनची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी वास्तविक-जागतिक डेटा लवकरात लवकर समोर आला पाहिजे.

हेही वाचा: कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल

लसी ओमायक्रॉनवर चालतील?

अनेक लस उत्पादकांनी ओमायक्रॉन लसीमुळे किती चांगलं संरक्षण होतं यावर अभ्यास सुरू केला आहे. ऑक्सफर्ड – अस्त्राझेनेका दक्षिण आफ्रिकेच्या सीमेवर बोत्सवाना आणि इस्वाटिनीमधल्या लोकांमधे संसर्ग आणि लसीकरणाचं विश्लेषण करत आहे.

फायझरच्या प्रवक्त्याने सांगितलंय की, कंपनीला येत्या आठवड्यात त्याच्या स्वतःच्या अँटिबॉडी अभ्यासातून परिणाम मिळण्याची आशा आहे. जर ओमायक्रॉन वेरियंट मोठ्या प्रमाणात लसीची सुरक्षितता भेदून गंभीर आजार करत असेल तर फायजर आणि मॉडर्न कंपनीने दावा केला आहे की, ते नियामकांच्या मान्यतेच्या अधीन राहून, सुमारे १०० दिवसांत नवीन, टेलर-मेड लस तयार करू शकतात.

ओमायक्रॉन चिंतेचा विषय?

सध्या तरी लोकांनी लगेचच घाबरून जाण्याची गरज नाही. हा वायरस आफ्रिकन खंडातून बदलून आल्यामुळे जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे. यापूर्वी आफ्रिकेत सापडलेल्या इबोला किंवा मारबुर्ग वायरसमुळे पेशंटचा मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक होतं. यामागची कारणं वेगळी होती, तसा प्रकार कोरोना वायरसबद्दल होईल हे सांगता येत नाही.

ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी साधारणपणे डबल मास्क वापरणं, गर्दीच्या ठिकाणी, इतरांसोबत असताना, बंदिस्त जागेत मास्क न काढणं, याचबरोबर युद्धपातळीवर लसीकरण वेगाने करून लोकांना लसीचे दोन डोस घेऊन लसीकरण पूर्ण करणं, हासुद्धा उपाय योग्य ठरू शकतो.

साधारणपणे जर लसीकरण सहा ते नऊ महिन्यांपूर्वी झालं असेल, तर संसर्ग टाळण्यासाठी खास काळजी घ्यावी लागेल. यात घरातल्या वयोवृद्ध व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. लहान मुलं आणि तरुणांमधे लक्षणविहीन संसर्ग किंवा सर्दीसारखी लक्षणं असण्याची अधिक शक्यता असते, त्यामुळे संसर्ग पुढे जाऊ नये म्हणून लक्षणं नसतानाही काळजी घेणं आवश्यक आहे.

हेही वाचा: 

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

(लेखक ऑक्सफर्ड युनिवर्सिटी, इंग्लंडच्या मेडिकल सायन्स डिविजनमधे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत)