कन्नड सिनेमा कात टाकतोय!

१९ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


सध्या देशभर ‘केजीएफ: चाप्टर २’ची तुफान चर्चा होतेय. हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत डब झालेल्या या मूळच्या कन्नड सिनेमाने लोकप्रियतेचा कळस गाठलाय. ‘केजीएफ’च्या निमित्ताने का होईना, लोक पुन्हा एकदा तेलुगू, तमिळ आणि मल्याळम सिनेसृष्टीच्या बरोबरीने कन्नड सिनेसृष्टीचं नाव घेऊ लागलेत.

तसं बघायला गेलं तर कन्नड सिनेसृष्टी ही भारतातल्या महत्त्वाच्या सिनेसृष्टींपैकी एक आहे. पण आपल्याकडे ‘साऊथचा सिनेमा’ असं गायपट्ट्याने रूढ केलेलं लेबल लावून कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम सिनेमे बघितले जातात आणि यात सर्वाधिक अन्याय होतोय तो कन्नड सिनेमावर.

एकेकाळी भारतीय पॅरलल सिनेचळवळीला खतपाणी घालणाऱ्या कन्नड सिनेमाला ‘साऊथ’च्या लेबलमुळे मसाला जॉनरचे टुकार सिनेमे बनवत तेलुगू सिनेमांच्या पंगतीत जाऊन बसावं लागलं. गेल्या दशकभरात मात्र हे चित्र बदलू लागलंय. सिनेरसिक पुन्हा एकदा चोखंदळपणे कन्नड सिनेमाच्या वाटा धुंडाळू लागलेत. या नव्या बदलात २०१८ला आलेल्या ‘केजीएफ’चा मोलाचा वाटा आहे. 

‘केजीएफ’ची जादू

२०१८ संपायला उणापुरा एक आठवडा बाकी असताना प्रशांत नील लिखित-दिग्दर्शित आणि रॉकिंग स्टार यशची प्रमुख भूमिका असलेला ‘केजीएफ: चाप्टर १’ हा कन्नड सिनेमा हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत रिलीज झाला. सोन्याची तस्करी करणाऱ्या मुंबईतल्या टोळीच्या एका भाडोत्री गुंडाचा गोल्ड माफिया होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे ‘केजीएफ’. भारतातली सर्वात मोठी सोन्याची खाण असलेल्या कर्नाटकातल्या ‘कोलार’ खाणीची पार्श्वभूमी या सिनेमाला होती.

‘केजीएफ’ हा पॅन इंडिया म्हणजेच वेगवेगळ्या भारतीय भाषांमधे रिलीज होणारा पहिला मोठा कन्नड सिनेमा होता. हा सिनेमा पब्लिकने उचलून धरला. यश सोडला तर या सिनेमातलं दुसरं कुठलंही नाव महाराष्ट्रात फारसं परिचित नव्हतंच. ‘केजीएफ’आधीच यशला त्याच्या ‘गुगली’, ‘गजकेसरी’, ‘मि. अँड मिसेस रामाचारी’ आणि ‘मास्टरपीस’ या सिनेमांच्या हिंदी वर्जनमुळे बऱ्यापैकी फॅन फॉलोविंग मिळालं होतं. ‘केजीएफ’ने ते आणखीनच वाढवलं.

‘दाक्षिणात्य किंवा साऊथचे सिनेमे’ या जुलमाच्या लेबलखाली आपली स्वतंत्र ओळख हरवत चाललेल्या कन्नड सिनेजगताला ‘केजीएफ’मुळे नवसंजीवनी मिळाली. त्यानंतर सिनेरसिक आवर्जून कन्नड सिनेमांचीही यादी चाळू लागले. या निमित्ताने गेल्या दशकभरात आलेल्या कित्येक सिनेमांना पुन्हा प्रसिद्धी तर मिळालीच; त्याचबरोबर कन्नड सिनेमाचा सुवर्णकाळ म्हणून गणल्या जाणाऱ्या जुन्या सिनेमांनाही कल्ट फॉलोईंग मिळू लागलं.

हेही वाचा: आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

कन्नड सिनेमाचा सुवर्णकाळ

१९३४ला आलेला ‘सती-सुलोचना’ हा पहिला कन्नड बोलपट. ऐतिहासिक आणि पौराणिक कथा-लोककथांवर आधारित सिनेमांनी कन्नड सिनेसृष्टीचा पाया रचला. ‘मॅटीनी आयडॉल’ राजकुमार यांची प्रमुख भूमिका असलेला १९५४चा ‘बेडरा कन्नप्पा’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पहिला कन्नड सिनेमा होता. याच सिनेमातून साठचं दशक गाजवणाऱ्या ‘हास्य चक्रवर्ती’ नरसिंहराजू यांनीही पदार्पण केलं.

राजकुमार, ‘रिबेल स्टार’ विष्णूवर्धन, अंबरीश, नरसिंहराजू, ‘अभिनय सरस्वती’ बी. सरोजा देवी, जयमाला, कल्पना, लोकेश, अनंत नाग, शंकर नाग, अरुंधती नाग, गिरीश कर्नाड, वैशाली कासारवल्ली या कलाकारांशिवाय कन्नड सिनेमाचा गौरवशाली इतिहास अपुरा आहे. टीवी मालिका असो, नाटक असो किंवा सिनेमा, या कलाकारांनी कन्नड भाषिकांच्या मनोरंजनाचा वारसा अव्याहतपणे चालू ठेवला.

सत्तर-ऐंशी-नव्वदच्या दशकात पुट्टण्णा कनगाल, गिरीश कासारवल्ली, गिरीश कर्नाड, शंकर नाग, पी. लंकेश, बी. वी. करांत अशा अनेक लेखक-दिग्दर्शकांनी कन्नड सिनेसृष्टीत पॅरलल सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली. या काळात आलेल्या कन्नड सिनेमांनी भारतीय पॅरलल सिनेचळवळीत मोलाचं योगदान दिलंय. लोकप्रिय मालिका ‘मालगुडी डेज’चं दिग्दर्शन शंकर नाग यांनीच केलं होतं. १९९०मधे शंकर नाग यांच्या अपघाती निधनानंतर कन्नड सिनेसृष्टीचा खऱ्या अर्थाने पडता काळ सुरु झाला.

न सावरणारी पडझड

दहाएक वर्षांपूर्वी बंगलोरमधे राहणारी तरुणाई आपण कन्नड सिनेमे पाहतो हे सांगायलाही लाजायची, इतके वाईट दिवस कन्नड सिनेसृष्टीवर आले होते. सिनेजगतातलं ठराविक लॉबीचं राजकारण आणि भाषिक, प्रांतिक अस्मितेचा अभाव हे या पडझडीमागचं खरं कारण होतं. १९९०नंतरही चांगले सिनेमे बनतच होते पण त्यांच्यातला एकसुरीपणा प्रेक्षकांना तेलुगू, तमिळ सिनेमांकडे वळवायला कारणीभूत ठरला.

सुवर्णकाळ गाजवणारे कलाकार आता दुय्यम किंवा सहायक भूमिकेत दिसू लागले होते. नेपोटीझमचं ग्रहण इथंही लागलेलं होतंच पण प्रेक्षकांनी ते सरसकट नाकारलंही नव्हतं. शिवा- पुनीत राजकुमार, अर्जुन शारजा, ‘किच्चा’ सुदीप, उपेंद्र ही नवी पिढी प्रेक्षकांना भावत होती खरं, पण त्यांच्या सिनेमाला नंतर थंड प्रतिसाद मिळायचा. तेच तेच चेहरे, त्याच त्याच कथा, लोकलवरून ग्लोबल व्हायच्या नादात बोथट झालेली राजकीय, सामाजिक, भाषिक, प्रांतीय जाणीव कन्नड सिनेसृष्टीला मारक ठरली.

कित्येक गुणी कलाकारांनी शेवटी हिंदी, तेलुगू आणि तमिळ सिनेसृष्टीचा रस्ता धरला. आपल्या खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले प्रकाश राजही इथलेच. अगदी ऐश्वर्या राय, दिपीका पदुकोनही इथलीच. सुदीप, उपेंद्र, अर्जुन शारजा यांनाही तेलुगू, तमिळ सिनेमात चांगली कामं मिळत होती. अनुष्का शेट्टी, नित्या मेनन, पूजा हेगडे, रश्मिका मंदानासारख्या देखण्या मंगलोरी नायिका तेलुगू-तमिळ सिनेसृष्टीने पळवल्याची खंत कन्नड प्रेक्षकांना अजूनही बोचते. याला कन्नड-तुळू वादाचीही पार्श्वभूमी आहे.

हेही वाचा: सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

आशयघन सिनेमा गेला कुठे?

सध्या कन्नड सिनेसृष्टी एकापेक्षा एक दर्जेदार टिपिकल मसाला जॉनरचे सिनेमे देत असली तरी हा कन्नड सिनेमाचा मूळ जॉनर नाही. पॅरलल सिनेमांनी घालून दिलेला आशयघन आदर्श अजूनही अस्सल कन्नड सिनेरसिक आपल्या काळजात साठवून आहेत. पुट्टण्णा कनगाल यांचे सिनेमे मेनस्ट्रीम आणि पॅरललचा समन्वय साधणारे होते. एकाचवेळी पॅरलल आणि मेनस्ट्रीम सिनेमात अभिनय करण्याचं त्यावेळच्या कलाकारांचं टॅलेंट आता दुर्मिळ झालंय.

‘सती सुलोचना’सारखा पौराणिक सिनेमा असो किंवा ‘गेज्जे पूजा’सारखा वेश्याव्यवसायाच्या विषयाला हात घालणारा सिनेमा असो, कन्नड सिनेमातलं स्त्रीजीवनाचं, आधुनिक स्त्रीवादाचं चित्रण हा नेहमीच कौतुकाचा विषय राहिलाय. तोच कन्नड सिनेमा मध्यंतरी मसाला जॉनरच्या नावाखाली द्विअर्थी संवाद, बरबटलेली पुरुषप्रधान मानसिकता, स्त्रीदेहाचं विकृत चित्रण मांडत राहिला, यावर विश्वास ठेवणं जरा कठीणच आहे.

पौराणिक, ऐतिहासिक संदर्भांचा आधार घेत सद्यस्थितीवर भाष्य करणं ही कन्नड सिनेमाची खासियत असली तरी तेलुगू, तमिळ आणि मल्याळम सिनेमासारखा कन्नड सिनेमा राजकीय घडामोडींवर थेट भाष्य करायचं टाळतो. त्यामुळे वादग्रस्त राजकीय वर्तुळ आणि कन्नड सिनेमा कायमच एकमेकांपासून लांब राहत आलेत. हिंदू-मुस्लिम वादासारखा सदैव चर्चेचा विषय इथल्या सिनेमात नसतो. त्याउलट बऱ्याचदा गिरीश कर्नाडांची सेक्युलर विचारसरणी कन्नड सिनेमांमधे झळकताना दिसते.

कन्नड सिनेमा बदलतोय

‘केजीएफ’मुळे देशभरातला प्रेक्षक कन्नड सिनेमाकडे नव्या आशेने बघतोय यात दुमत नाही. खुद्द कन्नड भाषिक तरुणाईने काही काळ या सिनेजगताकडे पाठ फिरवल्यामुळे दशकभरापूर्वीच्या कन्नड सिनेमाला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. या कालावधीत आलेले आणि हिंदीत डब झालेले कन्नड सिनेमे शिवा-पुनीत राजकुमार, उपेंद्र, सुदीपसोबतच दर्शन, यश, रक्षित शेट्टी, ध्रुव शारजासारख्या सिनेनायकांची क्रेझ वाढवताना दिसतायत. ‘होम्बेल फिल्म्स’सारख्या निर्मितीसंस्था कन्नड सिनेमाला पॅन इंडिया रिलीजचं स्वप्न दाखवतायत.

आता प्रशांत नील, पवन कुमार, अनुप भंडारी, रक्षित शेट्टी, राम रेड्डी, राज शेट्टी अशा आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्या, मातीतल्या गोष्टी सांगण्याची हौस असणाऱ्या, ताज्या दमाच्या दिग्दर्शकांचा भरणा झालाय. मेनस्ट्रीम सिनेमासोबतच पॅरलल सिनेमांची चळवळही पुन्हा हातात हात धरून उभी राहतेय. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय सिनेमा फेस्टिवलमधे नावाजलेला आणि कपोलासारख्या जागतिक दर्जाच्या दिग्दर्शकाने गौरवला गेलेला राम रेड्डी लिखित-दिग्दर्शित २०१५चा ‘तिथी’ हा या अनुषंगाने महत्त्वाचा सिनेमा म्हणता येईल.

गुन्हेगारीला पौराणिक संदर्भांची झालर लावणारा ‘गरुडा गमना वृषभ वाहना’, खजिन्याचा वेध घेणारा ‘अवने श्रीमन्नारायणा’, गाणी नसूनही उत्तम प्रेमकहाणी असलेला ‘दिया’, नव्या पिढीचा रॉमकॉम ‘किरीक पार्टी’, स्त्रीमनाच्या भावनांचा वेध घेणारा ‘नातिचरामी’, न्यूयॉर्क बॉक्स ऑफिस गाजवणारा मिस्ट्री थ्रिलर ‘रंगीतरंग’, नोलनच्या सिनेमांची आठवण करून देणारा ‘लुसिया’ हे सिनेमे कन्नड सिनेसृष्टीच्या प्रयोगशीलतेचे, सर्जनशीलतेचे आणि नाविन्यपूर्ण कथांचे दाखले देतायत. 

आता ‘केजीएफ: चाप्टर २’ थियेटरमधे ठाण मांडून बसलाय. बेभान होऊन टाळ्या, शिट्ट्या वाजवणाऱ्या अस्सल सिनेरसिकासाठी हा सिनेमा बनवला गेलाय. ‘केजीएफ’च्या घवघवीत यशाची खाण खणता खणता नव्या दिग्दर्शकांच्या रुपात मातीतलं सोनं कन्नड सिनेजगताला गवसलंय. मसाला जॉनरच्या नावाखाली टुकार, बटबटीत सिनेमे दाखवण्याचे दिवस आता संपलेत, हेच कन्नड सिनेसृष्टी ‘केजीएफ’च्या निमित्ताने छाती ठोकून सांगतेय.

हेही वाचा: 

ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?

ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा