सव्वाशे वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी शिकागो सर्व धर्म परिषदेत भाषण केलं आणि जग जिंकलं. त्यानंतर नऊ वर्षांनीच ४ जुलै १९०२ ला त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्या निधनाची बातमी दुसऱ्या दिवशी छापून आली नाही. त्यांचं डेथ सर्टिफिकेट उपलब्ध नाही. हे सारं बुचकळ्यात पाडणारं आहे.
स्वामी विवेकानंदांचं आयुष्य अवघ्या ३९ वर्षांचं. अवघ्या सव्वाशे दीडशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा ते एक भाग आहेत. पण त्यांच्या आयुष्याविषयी अनेक कोडी अजून उलगडलेली नाही. त्यांच्याविषयी खूप लिहिलं गेलं. अनेक पुस्तकं आली. तरीही अजून प्रश्नांची उत्तरं सापडलेली नाहीत.
विवेकानंदांना एकतर हिंदुत्ववादी दृष्टिकोनातून खूप लिखाण झालं. त्यात त्यांना आदर्श महामानव म्हणून रंगवण्यात आलं. विवेकानंदांचे धाकटे भाऊ भूपेंद्रनाथ दत्त यांनी विवेकानंद हे कम्युनिस्ट असल्याचं सांगणारं त्यांचं सविस्तर चरित्र लिहिलंय. त्यामुळे त्या अंगानेही बरंच लिहिलं गेलंय. पण तिथेही त्यांना पुरोगामी म्हणून रंगवण्यात धन्यता मानली जाते. त्यांच्या शिष्यपरिवारासाठी तर विवेकानंद देवच होते. त्यामुळे त्यातही एक माणूस म्हणून आणि रसरशीत आयुष्य जगलेला तरुण म्हणून विवेकानंद क्वचितच दिसतात.
हेही वाचा : वाचा स्वामी विवेकानंदांचं जग जिंकणारं भाषण
आता विवेकानंदांच्या दिग्विजयाची प्रेरणा मांडतानाही त्यांचा केवळ उदो उदो करून देव्हाऱ्यात बसवलं जातंय. अशावेळेस मणिशंकर मुखोपाध्याय या बंगाली लेखकाचं अचेता अजाना विवेकानंद हे पुस्तक वेगळं ठरतं. शंकर या टोपणनावाने लिहिणारे मुखोपाध्याय आज ८४ वर्षांचे आहेत. बंगालीतले ते फारच मान्यताप्राप्त आणि लोकप्रिय लेखक आहेत. ते सोप्या सुंदर शैलीत लिहितात. विवेकानंदांवरचं त्यांचं पुस्तक माईलस्टोन ठरलंय. त्याच्या जवळपास लाखभर प्रती बंगालीत विकल्या गेल्यात. इंग्रजीतही `द माँक अज मॅन` हा अनुवादही लोकप्रिय ठरलाय. मराठीतही डॉ. मृणालिनी गडकरी यांनी अज्ञान विवेकानंद नावाने त्याचा अनुवाद झालाय. राजहंस प्रकाशनाने तो छापलाय.
या पुस्तकातले विवेकानंद देव्हाऱ्यातल्या फोटोफ्रेममधून बाहेर येऊन एक माणूस म्हणून आपल्याशी बोलतात. लहानपणी प्रचंड वैभव ते कमालीची गरीबी असा झालेला प्रवास, प्रॉपर्टीसाठी आयुष्यभर केलेला झगडा, वेज नॉनवेज खाण्या खिलवण्याची आवड, आजारांनी पोखरलेलं शरीर, प्राण्यांविषयीचं प्रेम अशा अनेक गोष्टी नव्याने कळतात. विवेकानंदांमधल्या साध्या माणसाची वेदना काळीज पिळवटून टाकणारी आहे.
पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यात शंकर विवेकानंदांच्या देहावसनाचं सविस्तर वर्णन करतात. त्यानंतर ते पाच महत्त्वाचे प्रश्न उभे करतात. त्यांची उत्तरं खरं तर आजही मिळालेली नाहीत. हे प्रश्न आपल्याला बुचकळ्यात पाडतात. नऊ वर्षांपूर्वी जग जिंकणाऱ्या आणि जागतिक कीर्ती मिळवणाऱ्या या विद्वात, धाडसी संन्यासाकडे इतकं दुर्लक्ष का झालं असेल, हा प्रश्न आपल्याला डिवचत राहतो.
शंकर यांनी विचारलेले प्रश्न असे आहेत. त्यांच्या मृत्यूला शंभर वर्षं पूर्ण झाल्यानंतरही काळाचे संदर्भ लक्षात घेऊनही हे प्रश्न आपल्या मनातून पुसून टाकायला मन तयार नाही, असं ते म्हणतात.
संन्याशांची अंत्यक्रिया त्यांच्या मठाच्या आवारात करण्याची पद्धत तेव्हा रूढ होती. पण जागतिक कीर्तीचे महापुरुष असूनही स्थानिक नगरपालिकेने त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी लगेच दिली नाही. त्यासाठी खूप पत्रोपत्री करावी लागली. असं का झालं असावं?
स्वामी विवेकानंदांच्या संपूर्ण चरित्रासाठी अनेक संदर्भ सापडतात. त्यांचे फोटो, पत्रं, वर्तमानपत्रांतली कात्रणं असा दस्तावेज आजही अभ्यासकांना उपलब्ध आहे. पण त्यांचं डेथ सर्टिफिकेट मात्र उलपब्ध नाही. रामकृष्ण परमहंसांचं डेथ सर्टिफिकेट सर्वत्र पुस्तकांत उपलब्ध असताना विवेकानंदांच्या मृत्यूचा दाखला पाहायला का मिळत नाही?
विवेकानंद हे सगळ्या सन्मान केलेले थोर पुरुष. त्यांचं देहावसान झालं संध्याकाळी. पण दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत बातमी का आली नाही? इतकी महत्त्वाची बातमी असतानाही वर्तमानपत्रांनी त्याची गरज का वाटली नसेल? इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी पत्रकारांना महत्त्वाची का वाटली नसेल?
हेही वाचा : विवेकानंदांचा सव्वाशे वर्षांपूर्वीचा तो ‘अनप्लॅन्ड’ प्रवास
आज विवेकानंदांच्या आठवणींचे मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. त्यात हजर राहण्यासाठी चढाओढ सुरू आहे. पण विवेकानंदांच्या निधनानंतर झालेल्या शोकसभेसाठी अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी कुणी तयार नव्हतं. मान्यवर म्हणून उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. पण दोघांनीही विवेकानंदांची निंदा करून सभेला यायला नकार दिला. इतकंच नाही, तर त्या दोघांतला एक जण म्हणाला, ‘या देशात हिंदू राजा असता, तर त्याने विवेकानंदांना फाशी दिली असती.’ याबद्दल विवेकानंदांचे भाऊ भूपेंद्रनाथांनी यांनी चरित्रात दुःख व्यक्त केलंय. असं का घडलं असावं?
अध्यात्मिक महापुरुषाच्या मृत्यूनंतर खरंतर त्याची स्मारकं बनवण्यासाठी खजिने रिकामे करण्यासाठी गर्दी उसळते. पण स्वामीजींच्या समाधीस्थळावर एक छोटं मंदिर बांधण्यासाठी अगदी कमी पैशांची गरज होती. पण तेवढेही पैसे सहज गोळा झाले नाहीत. या लहानशा कामाला तब्बल २२ वर्षं लागली. मंदिराचं काम सुरू झाले १९०७ मधे आणि पूर्ण झाले १९२४ मधे. स्मृतीस्थळासाठी पैसै का मिळू शकले नाहीत?
हे प्रश्न विचारून झाल्यावर शंकर त्याचं एका परिच्छेदात उत्तर देतात. ते असं असतं, `या सर्व प्रश्नांचा विचार केल्यास एक कठोर सत्य पुढे येतं. एकेकाळी ज्यांनी जगाला हादरवून, थरारून टाकलं, त्यांचा स्वीकार करायला आम्ही फार वेळ घेतला. युगनायक विवेकानंदांना भारतात वंदनीय स्थानापर्यंत पोचवण्यात विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठ, मिशनचं योगदान फार मोठं आहे. मठ, मिशनच्या संन्याशांनी ह्या मठ, मिशनला कार्यरत ठेवलं नसतं, तर आज आपल्याला स्वामीजी जसे स्मरणीय वाटतात, तसे वाटले असते का, याबद्दल शंकाच वाटते.`
या प्रश्नांची उत्तरं इतकी सोपी नाहीत. आता तर ती शोधण्याची गरजही कुणाला वाटत नाही.
हेही वाचा :
शाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला
जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
धर्माची नव्यानं व्याख्या करण्याची गरजः सयाजीराव महाराज
अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव